योगीनींचे बेट भाग २
योगीनिंचे बेट
दुसर्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर मी व अशोक बाळा खोत व त्या भ्रमिष्ट झालेल्या गुराख्याच्या घरी गेलो.त्यांच्या कुटुंबियांकडून फारशी माहिती कळली नाही.मग आम्ही आमचा मोर्चा कातळ शिल्पंकडे वळवला. वर पोहचल्यावर मी सर्वत्र नजर फिरवली.सगळीकडे शांतता होती मंद वरा होता.वाळू काढणारी होडकी खाडी परिसरात दिसत होती.
" अशोक ,तू यातल्या प्रत्येक शिल्पाचा जवळून फोटो घे" मी अशोकला सुचवले.
मी प्रत्येक शिल्पं बारकाईने न्याहाळत पुढे सरकत होतो.माझ्या टिपण वहीत टिपण काढत होतो.त्यातल्या वेगळेपणाची नोंद घेत होतो.मी त्या अवकाशयाना सारख्या दिसणाऱ्या आकृतीकडे पोहचलो.त्याचे खालचा ,मधला व वरचा तीन भाग पडत होते. कदाचित वरच्या भागात अवकाश यात्री बसत असावेत.अर्थात त्याची आतली रचना कशी असेल ते कळत नव्हते. त्या शिल्पाच्या बाजूला आणखी एक विचित्र अशी वितभर लांबीची आकृती होती. एक आयताकृती पट्टी व तिला मध्ये मध्ये खाचा होत्या व टोकाला त्रिकोणी आकार होता. त्या त्रिकोणाभोवती प्रकाश वलये दाखवली होती. ती आकृती कशाची असावी ते कळत नव्हते. मी तिथून थोडा दूर गेलो.दूर एक चिंचेचे डेरेदार झाड होते.मी तिथे सावलीत बसून परीसराचे निरीक्षण करत होतो. एवढ्यात एक हातभर लांबीची घोरपड सरसरत उजवीकडून आली.मी दचकून उडी मारली. ती घोरपड चिंचेच्या मुळात असलेल्या एका बिळात घुसली.बाहेरून ते बिळ लक्षात येत नव्हत.पण जेवढ्या चपळाईने ती आत गेली त्याच्या दुप्पट वेगाने ती काही क्षणांनंतर बाहेर पडली.बाहेर आल्यावर तिने जोरदार झेप घेतली की कोणीही अचंबित होईल.सहासा घोरपड कारणाशिवाय झेप घेत नाही.आत निश्चितपणे
दुसरा कुणीतरी प्राणी असावा त्यामुळे घाबरून घोरपडीने उडी मारली असावी. त्यानंतरही घोरपड एवढ्या वेगाने पळत होती की तिच्या अंगात एखाद्या
शक्तीचा संचार झाला असावा असं वाटतं होतं.
मी कूतहलाने त्या बिळाजवळ गेलो व सावधपणे आत डोकावून पाहू लागलो पण बिळ वेडंवाकडं होत .मी खांद्याला लटकलेल्या पिशवीतून टोकदार कोरणी काढली.मोबाईलची टाॅर्च चालू केली.मी सावधगिरीने जमीन कोरु लागलो. हळूहळू
बिळ रूंदावत चाललं होतं.साधारण हातभर आत गेल्यावर मला जे दिसले.त्याने मी आश्चर्याने थक्क झालो. माझे भान हरपले.आत एक विलक्षण असा प्रकाश पडला होता ज्याचा रंग सतत बदलत होता.काय होत ते? मी झपाझप माती उरकू लागलो. शेवटी मला ते दिसले.वितभर लांबीची पट्टी दिसत होती.मी हात लांबवला व ती पट्टी पकडली.त्याच क्षणी माझ सर्वांग गदागदा हलू लागल. प्रचंड ताकद किंवा व उर्जा माझ्यात संचारल्याचा भास मला झाला.मी पट्टी बाहेर खेचली.घाईघाईने मी त्या त्रिकोणी आकारावर रूमाल टाकला.पण तरीही हलकासा प्रकाश बाहेर पडत होता.ती पट्टी अतिशय टणक व गुळगुळीत होती.तिला मध्ये मध्ये खाचा होत्या.म्हणजे त्या शिल्पात दाखवलेल्या आकृती प्रमाणेच ते चित्र होते.
मी घाईघाईने ती पट्टी माझ्या खांद्यावरच्या कातडी पिशवित टाकली.मला थोडं हलकं वाटलं.पण अमर्याद उर्जेची जाणीव अजूनही तशीच होती. घोरपडीला सुध्दा अशीच ऊर्जा मिळाली असेल व त्यामुळे तिच्या ताकदीत बदल झाला असावा.तसेच प्राण्यांना अमानवीय गोष्टींचं लवकर जाणीव होते व त्यामुळे तिने वेगाने पळत काढला असावा.एक निश्चित होत ती पट्टी म्हणजे प्रचंड ऊर्जा स्रोत होती.
मी अशोककडे पाहिलं तो कातळ शिल्पाच्या टोकाकडे पोहचला होता.कदाचित तो शेवटच्या शिल्पाचे फोटो मारत असावा.मी जवळपास धावतच पुन्हा शिल्पांजवळ गेलो.मी ते पट्टीचे शिल्पं पुन्हा पाहिलं आणि माझी खात्री पटली ती वस्तू व माझ्या कातडी बॅगेत असलेली वस्तू एकच होती .पण ते नेमके काय होते? कोणत्या पदार्थांपासून बनवलेले होते?त्याचा नेमका उपयोग काय ? असा मला प्रश्न पडला.त्या पट्टीच्या बाजूला असलेली तीन समकेंद्री छोटी वर्तुळ जी केंद्रातून एकमेकांना जोडलेली त्या पट्टीबद्धल सांगू की नको याचा मी विचार करत होतो. विचारांती मी ठरवलं की सध्या तरी त्याला यातलं काही सांगणे बरोबर नाही.आता ऊन वाढत चाललं होतं.त्यामुळे आता खाली गावात जावं असं आम्ही ठरवलं.पण आज रात्री बेटावर पुन्हा येवून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा असे मी ठरवले.
मी काल रात्री पाहिलेल्या त्या दोन दिव्य स्त्रींया...ती कातळशिल्प व मला सापडलेली ती ऊर्जा पट्टी यांचा एकमेकांशी काहीतरी ताळमेळ असावा या निर्णयाप्रत मी आलो होतो.
" सगळे फोटो व्यवस्थित घेतलेस?"
" झकास ! अगदी बारीक सारीक गोष्टीं मी टिपल्या आहेत."
" व्वा!"
" पण तूला काय सापडलं? तू तिथं झाडाखाली काहीतरी करत होतास?"
" अरे एक घोरपड झाडांच्या मुळात घुसली होती.तिला हुसकावून लावत होतो." मी वेळ मारून नेली."
सकाली आलो तर गावात गोंधळ माजलेला होता. बाळा कोणाला शोधण्यासाठी पोलीस आले होते.
" सर, तुम्हाला वडापावच्या मंदिरात बोलावलंय." बावकर मला म्हणाला.
आम्ही हातपाय धुवून मंदिरात गेलो. मालवण वरून दोन पोलीस आले होते. त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले.
मी त्यांना आमच्या येण्याचा हेतू व माझा पुरातत्त्व विभागाने दिलेला परवाना दाखवला.आम्ही आल्यापासून बेटा बाहेर गेलो नसल्याचे मी त्यांना सांगितले.
" हे बघा, तुम्हाला काही सापडलं किंवा सुगावा लागला तर आम्हाला कळवा." सिनिअर पोलीस म्हणाला.
मी मान डोलावली व.त्यांचा फोन घेतला.
--------*--------*---------*-------*-------*------*---------
.
त्या रात्री जेवण झाल्यावर मी अशोकला म्हणालो...
" चल ,आज शेवटची रात्र त्या बेटावर घालवू..."
अशोकच अंग थोडं गरम झालं होतं तरीही तो माझ्यासोबत यायला तयार झाला होता.
बावकर आम्हाला रात्री ऐवजी पहाटेला जा असं सुचवत होता.पण आम्ही बाहेर पडलो.
माळावर गेल्यावर आम्ही काही काळ कातळावर झोपलो .वरच्या चांदण्या न्याहाळत मी म्हणालो.
" आपल्यासारखे असे असंख्य ग्रह असतील ज्यावर
कोणत्या ना कोणत्या स्वरूपातले सजीव असतील."
" असतीलही पण तूला आताच हे का आठवलं?"
" ही कातळशिल्प मानवनिर्मित नाहीत तर कुणा परग्रहवासीयांनी बनवली असावीत."
" असेलही. माझा तेवढा अभ्यास नाही. पण ही शक्यता खूप धूसर आहे.अजूनतरी तसा पुरावा सापडला नाही." अशोक म्हणाला.
" आणि मी असं सांगितलं की अगदी आजही ते आपल्या आसपास आहेत तर तूला हे पटेल?"
मी त्याला काल रात्री काय घडलं ते सांगितले.
तो माझ्याकडे अचंबित होऊन पाहू लागला.तो अक्षरशः भितीने थरथरत होता. थंडीतही घामाघूम झाला होता.
" म्हणजे काल मी झोपलो नव्हतो तर त्यांच्या संमोहनाखली
होतो."
" होय, आणि काल सकाळी मला एक अजब वस्तू मिळाली आहे." मी ती पट्टी माझ्या कातडी बागेतून बाहेर काढली .
त्या पट्टीच्या टोकाकडील भागातून रंगांची उघळण सुरु झाली .रात्रीच्या वेळी ते रंग अधिक प्रखर व आकर्षक वाटत होते. कधी इंद्धनुष्य सारखे तर कधी रंगीत ढगांसारखे ते सतत बदलत होते.
" हे..हे.. नेमकं काय आहे?" तो अचंबित होत म्हणाला.
" ते मलाही माहित नाही .ते शोधायलाच आपण इथं आलोय.पण यांचा संबंध नक्की त्या यांना सारख्या आकृतीशी असणार."
" मी ही पट्टी हातात घेऊन बघू?"
" हो...पण सांभाळ तिच्यात प्रचंढ ऊर्जा भरलेली आहे."
माळावरचा तो रंगाचा खेळ कुणाच्या नजरेस पडला असता तर गोंधळ झाला असता.
अशोकने ती पट्टी हातात पकडली आणि त्याच क्षणी तो अक्षरशः एखादं इंजिन धडधडत तसा हलू लागला. त्याचे डोळे रूंदावले.
" मी...मी.. सर्व शक्तिमान आहे.मी सम्राट आहे."
तो वेड्यासारखा बरळू लागला. कदाचित त्याला झेपणार नाही एवढी प्रचंड उर्जा त्याला मिळाली होती.मी थोडा घाबरलो.त्याने ती ऊर्जा पट्टी द्यायला
नाकार दिल्यास गोंधळ होणार होता.कारण ती त्याच्याकडून हिसकावून घेणे या क्षणी तरी शक्य नव्हते. माझ्यावर त्या पट्टीचा फारसा परिणाम झाला नव्हता.मी नियमित ध्यानधारणा करत असतो.तसेच मी रेकी व संमोहन शिकलो होतो .कदाचित त्यामुळे मी त्या ऊर्जा प्रवाहात वाहत गेलो नव्हतो.
" अशोक, ती पट्टी माझ्या कडे दे.कुणी बघितलं तर गोंधळ उडेल."
" नाही, मी ही पट्टी देणार नाही." तो मोठ्याने ओरडला.तो पूर्णपणे त्या ऊर्जेच्या प्रभावाखाली होता.
मी कपाळाला हात लावला.उगाचच ती पट्टी त्याला दाखवली असं मला वाटलं. पण तिनं चार मिनिटातच तो अचानक गप्प झाला.कदाचित अतिभार झाल्याने तो थकला होता.
" हे..हे घे.माझ्याने सहन होत नाही." तो कसाबसा म्हणाला.
मी ती पट्टी झपकन घेतली व पुन्हा बॅगेत ठेवली.
अंगातली वार गेल्यासारखा अशोक निपचीत कातळावर झोपला.
काही वेळ असाच गेला.
" हे..हे सगळं भयानक आहे.' अशोक उठून बसता बसता म्हणाला.
" भयानक नाही तर गूढरम्य असावं." मी विचार करत म्हणालो.
मी समोर खाडीच्या पाण्याकडे बघत म्हणालो.मी कश्याची तरी अपेक्षा करत होतो.
" आज त्या स्फटिक स्रीया येतील?" अशोकने विचारले.
" कदाचित."
एवढ्यात तो नेहमीचा धडधड असा आवाज व त्या पाठोपाठ धुक्याची एक लाट सार्या परीसरावर पसरत गेली.एक विलक्षण मधाळ गंध जाणवायला लागला.मी अशोक कडे पाहिले.बसल्या अवस्थेतही त्यांचे डोळे बंद होत चालले होते.मी मात्र आज पूर्ण तयारीत होतो.माझ स्वतःवर पूर्ण नियंत्रण होत.
अचानक खाडीच्या मध्यावरचे पाणी वर उसळले.त्यापाठोपाठ रंगाचे फव्वारे उडू लागले. पाण्यातून उसळी घेत दोन सुंदर युवती हवेत झेपावल्या.पारदर्क...प्रकाशमान असणार्या स्त्रींया जलक्रीडा करू लागल्या. अशोक आता जाणीवेपलीकडे गेला होता.मी कागदावर काही मजकूर खरडला व तो कागद अशोकच्या बाजूला ठेवला.त्यात मी असं लिहिलं होतं की मी उद्यापर्यंत नाही आलो तर मी जे त्याला सांगितले ते गावकर्यांना सांगायला हरकत नाही.
मी एकवार अशोक कडे पाहिलं . डोक्यावर माझी नेहमीची टॉर्च बसवली व माळाच्या उतारावरील निसरड्या खडकांवरून खाली उतरायला सुरूवात केली.मी सावकाश व सावधगिरीने खाली उतरलो.
खाली बघताच मी दचकलो.जिथे खडक पाण्याला टेकले होते.तिथला एक मोठा खडक गोलाकार आकारात कापल्या सारखा बाजूला झाला होता.काल सोडाच पण आज सकाळीही असं काही नव्हतं. तो दगड अचूक गोल आकारात कोणी व कसा कापला असेल याचा विचार करत मी आत शिरलो.
आत शिरल्यावर माझ्या लक्षात आले की आत एक भली मोठी पोकळी आहे.आतल्या ताशीव दगडी भिंतीवरही विविध आकृत्या, काही अगम्य खुणा रेखीत केल्या होत्या. वर गोलाकार छपरावर सुध्दा रंगीत पट्टे काढले होते.संपूर्ण पोकळीत तो विशिष्ट गंध जाणवत होता.मी थोडा पुढे गेलो. मला जे दिसलं ते बघून मी अचंबित झालो.
होय! तेच ,बाहेर कातळावर ज्याचे शिल्प होते तिच अवकाशयानासारख दिसणारी वस्तू माझ्या समोर होती. मी लगबगीने पुढे सरकलो पण त्या वस्तूच्या जवळ पोहचलो तोच दूर ढकलला गेलो.मी पडता पडता वाचलो.मी सावरत पुन्हा प्रयत्न केला.पुन्हा तेच घडलं.त्या वस्तू भोवती कसल्या तरी अदृश्य शक्तीच कवच होत.कदाचित प्रभावी विद्युत चुंबकीय लहरी किंवा त्या सारख्या वेगळ्या लहरींच असावं. मी इतरत्र लक्ष वळवलं. डाव्या बाजूला अंधार दिसला मी माझ्या हेडलाइटसचा झोत तिकडं फिरवला.मी दचकलो.तिथे एक माणूस शून्यात डोळे लावून बसला होता.मी जवळ जाऊन बघितलं त्याची कोणतीही हालचाल होत नव्हती.फक्त छाती हलत होती.डोळे उघडे होते पण डोळ्यात कोणतेही भाव नव्हते.तो...तो बाळा खोत तर नव्हता? त्याची अशी अवस्था कश्यामुळे झाली होती?
माझे हात पाय थरथरू लागले.भितीची भावना माझ्या मनात निर्माण झाली.पण मला घाबरून चालणार नव्हते.नाहितर माझीही अवस्था अशीच होईल.मी स्वत:ला सावरले.थोडा वेळ डोळे बंद करीत मी मन एकाग्र केले.मी त्या माणसाकडे न बघता माझा मोर्चा पुन्हा त्या वस्तू कडे वळवला. मी त्या वस्तूला फेरी मारली ती वस्तू सुमारे विस मीटर लांब व दहा मीटर व्यासाची होती.मी पुन्हा अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. अचानक घरघरण्याचा आवाज आला. काही क्षण गेले आणि तिथल्या वातावरणात खळबळ सुरू झाली.कुणीतरी वार्यागत
आत आल्याचं मला जाणवलं.त्यापाठोपाठ रंगांचे कारंजे उसळले. त्या दोन स्फटिक स्रीया माझ्या समोर उभ्या होत्या.असंख्य साप अंगावर रेंगाळल्याचा भास मला झाला.त्यांच्या निळ्या डोळ्यांत प्रचंड राग दिसत होता.माझ्या दिशेने हातवारे करत माझ्या भोवती चक्राकार फेर्या मारू लागल्या.त्यांच्याकडे लक्ष न देता मी माझी कातडी पिशवी उघडली व ती पट्टी बाहेर काढली.मी असीम ऊर्जेन भरुन गेलो.पट्टीतून रंगाचे फव्वारे उडू लागले.
अचानक त्या स्त्रीया थबकल्या.त्यानी एक विचित्र आवाज काढला व माझ्या समोर गुढग्यावर बसत आपले स्फटिकासारखे लांबसडक हात जोडले.
" तुम्ही कोण आहात? पृथ्वीवर कुठून आलात?"
काही क्षण तसेच गेले.कदाचित त्या माझी भाषा समजून घेत असाव्यात.
" आम्ही आकाशातून दूरच्या गोलावरून आलोय. आम्ही या पृथ्वीवर हजारो वर्षे येत आहोत.इथले लोक आम्हाला योगीनी ....परी या नावाने ओळखतात. आम्ही इथं या जागी आलो त्याला तुमच्या पृथ्वीवरील सातशे वर्षे झाली . आम्ही परत फिरु शकलो नाही.कारण आमच्या अवकाश यानाच
ऊर्जा स्रोत हरवलं होतं. आता जे तूझ्या हातात आहे तेच ते ऊर्जा स्त्रोत आहे.तू ते आम्हाला दे आम्ही आमच्या गोलावर निघून जाऊ."
मी हसलो.हुकमाचा एक्का माझ्या हातात होता.
" तुम्ही सातशे वर्ष तश्याच आहात?"
" आमच्या गोलावरचा एक दिवस म्हणजे तुमची बाराशे वर्षं.ज्यावेळी आम्ही या यानात जाऊन विश्रांती घेतो तेव्हा आमच शरीर पूर्ववत होत.यानातल वातावरण अगदी आमच्या ग्रहासारख आहे."
" वर कातळावर शिल्पं कोणी काढली? "
" आम्ही इथं आलो तेव्हा इथं मानवी वस्ती नव्हती.आम्हाला हे बेट आवडलं होतं.काही काळ इथं घालवावा असा आम्ही ठरवलं.अस पाणी...अशी झाड आमच्या गोलावर नाहीत.वेळ घालवण्यासाठी व नंतर इथं येणाऱ्या आमच्या गोलावरील योगी व योगीनींना मार्गदर्शन होईल म्हणुन ती काढली.ती सारी शिल्पे आम्ही या ऊर्जा पट्टीने काढलीत.असच एकदा पट्टी तिथेच ठेवून जलक्रीडा करायला गेलो.परत आलो तर पट्टी दिसली नाही.ह्या पट्टी शिवाय आमच यान अवकाशात झेप घेऊ शकणार नव्हते.या ऊर्जेवर आम्ही अवकाशात फिरत असतो.प्रकाशाच्या कित्येक पट वेग त्यामुळे आम्हाला प्राप्त होतो." त्यातली एक योगीनी म्हणाली.
"त्या इसमाची अशी अवस्था का झालीय?"
" तो या गुहेच्या दरवाज्याजवळ पोहचला होता.म्हणून त्यांची स्मृती घालवावी लागली."
" हा इसम व तो गुराखी पूर्ववत होतील?"
" होय, आम्ही इथून गेल्यावर तू ते करु शकतो .या पट्टीमुळे तूझ्यात एक अमाप ऊर्जा निर्माण झालीय.तू त्यांच्या डोक्याला स्पर्श करताच ते पूर्ववत होतील.पण त्यांच्या आयुष्यातील हे मधले दिवस वजा होतील.चल दे ती पट्टी त्या शिवाय आम्ही इथून जाऊ शकत नाही."
"मला हे यान आतून पाहायचे आहे."
" ते अवघड आहे.कारण तू आत गेलास तर तूझ वय खूपच कमी होईल.तूझ शरीर आहे तसंच राहिलं पण तूझ्या आयुष्यातील मधली वर्षे वजा होतील.तूझ्यासाठी सगळंच अवघड होऊन बसेल. पण तू हे बाहेरून बघू शकतील"
त्यातली एक युवती त्या यांना जवळ गेली व तिने
विशिष्ट ठिकाणी तीन वेळा गोलाकार बोट फिरवली.यानाचा मधला कप्पा उघडला.आत अनेक
गुंतागुंतीच्या यांत्रिक रचना होत्या .ह्या सगळ्या रचना पारदर्शक स्फटिकाच्या होत्या.त्या स्फटिकांचे रंग वारंवार बदलत होते.
" हे रंग कशामुळे बदलत आहेत?"
" आमच्या गोदावरी सतत रंगीत वायूंचे ढग निर्माण होत असतात.आम्ही अक्षरशः रंगाच्ज्ञा ढगात वावरत असतो."
दुसरी तरूणी सूर मारत आत गेली व क्षणभरात पुन्हा बाहेर आली नारळाच्या आकाराचा एक स्फटिक गोल ज्यात सतत रंगाचे ढग फिरताना दिसत होते तो आणून तिने माझ्या हाती दिला.
" ही आमच्या गोलाणी प्रतीकृती आहे.तूला आमच्या कडून भेट समज."
मी माझ्या जवळची ऊर्जा पट्टी त्यांना दिली.त्या विलक्षण आनंदी झाल्या.रंगाचे झोत गुहेत उडवत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
" मी याला बाहेर घेऊन जातो मग तुम्ही यान सुरू करा."
त्यांनी मान डोलावली.मी बाळा खोताला अथक प्रयत्नाने वर माळावर घेऊन आलो. त्याच क्षणी घरघरण्याचा आवाज सुरू झाला.सार बेट भूकंप झाल्यासारखं काही क्षण थरथरल.....आणि त्या गुहेतून एक यान हवेत झेपावले.बाहेर पडताच त्याने प्रचंड वेग धारण केला व ते दिसेनासे झाले.त्यापाठोपाठ इंद्रधनुष्याचा रंगीत पट्टा भर रात्री आसमंतात दिसला.
------*----------*---------*---------*---------*------*---
मी बाळा खोत व अशोकला घेऊन खाली आलो तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते.खाली येताच मी
बाळा खोताच्या डोक्याला स्पर्श केला.
" मी ....मी इथं कसा? माझा बैल कुठं आहे?"
" पहिल्यांदा आपण घरी जाऊया."
आम्ही सावरकरांचा घरी आलो तेव्हा ती मंडळी जागीच होती.आजूबांजूच्या घरातही गडबड सुरू होती.
" आत्ता थोड्या वेळा पूर्वी भूकंप झाला. अरेच्या हा बाळा..! कुठे सापडला तुम्हाला? बावकर म्हणाला.
मी फक्त हसलो.
" तो गुराखी सुध्दा बरा झाला असेल... आणि हो तुमच्या जोगीणींच्या माळाखाली एक गुहा आहे .त्यात असंख्य शिल्पं आहेत.उद्या पत्रकारांना बोलवून दाखवू या " मी बावकरला म्हणालो.
दोन दिवसांनी वर्तमान पत्रात नव्या गुहेच्या व त्यातील शिल्पांची बातमी झळकली.त्या शोधाच श्रेय मला मिळालं होतं .तो वर्तुळाकार दगडी दरवाजा व गुहेत दरवळणारा मधाळ गंध चर्चेचा विषय बनले होते.
सध्या माझ्या वस्तू संग्रहालयात रंगीत वायूंचे ढग तयार होणारा एक स्फटिक गोल आहे.मी तो कुठे मिळाला ते मी नमूद केलंय.मी तो दोन संशोधकांना दाखवलाय पण तो स्फटिक कोणत्या द्रव्यांने बनलाय ते त्यांना सांगता आल नाही एकाने तर हे द्रव्य पृथ्वीवरच नसावं अशी शंका बोलून दाखवली.
कधीतरी त्या रंगीत ढगात काही आकृत्या फिरतानाचा भास होतो व त्या स्फटिक स्रीया आठवतात. हो...अशोकला सुध्दा काहिच आठवत नाही अगदी ती ऊर्जा पट्टी सुध्दा..! पण तो आताशा अधिक तरतरीत व ऊर्जेने भरलेला दिसतो.
-------*-------*------*----*-------*--------*----*----
कथा पुर्णतया काल्पनिक आहे.
बाळकृष्ण सखाराम राणे.