Doctor Babasaheb is truly an inspiration in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | डॉक्टर बाबासाहेब खरंच प्रेरणास्थानच

Featured Books
Categories
Share

डॉक्टर बाबासाहेब खरंच प्रेरणास्थानच

अछूत शब्दानंच केलीया क्रांती?

चौदा एप्रिल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. याच दिवशी महू इथं भीमाबाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेब हे लहानपणापासूनच क्रांतीकारी विचारांचे होते.
म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. बाबासाहेबांच्याही बाबतीत तसंच झालं. बाबासाहेब जेव्हा लहान होते, तेव्हा ते निरीक्षण करायचे. निरीक्षण करायचे की त्यांच्या समाजाला समाजात निश्चीतच चांगलं वागवलं जात नाही. भेदभाव व विटाळ आहे समाजात. आपलाच समाज, ज्यांचं रक्त, मांस व हाड एकच आहे. तो आपला समाज एकमेकांबद्दल आपसात विटाळ बाळगतो. माणसाला माणूस म्हणून जगू देत नाही. याचं कारण काय असावं? ते त्यांना लहानपणी कळत नव्हतं. त्यातच ते जेव्हा सवर्णांच्या मुलांना खेळतांना पाहात, तेव्हा त्यांचीही इच्छा त्यांच्यासोबत खेळायची असायची. परंतु ते तसं खेळतो म्हणताच सवर्णांची मुलं त्याला म्हणत की तू अछूत आहे.
'अछूत' अछूत शब्द बाबासाहेबांना त्यावेळेस कळत नसे. परंतु ती चीडच वाटायची बाबासाहेबांना. साधारणतः अछूत शब्द ऐकला की बस बाबासाहेबांचं मस्तकच गरम व्हायचं. पायातील आग मस्तकात जायची. असं पदोपदी घडायचं.
माझ्या वडीलांनी बाबासाहेबांना पाहिलं नसेलच. परंतु त्यांनी सांगीतलेली एक गोष्ट अजुनही आठवते मला. त्यांनाही ती कोणीतरी सांगीतली असेलच. असे सांगायचे माझे वडील की एकदा बाबासाहेबांना एका मुलानं अछूत म्हटलं. तसं अछूत म्हणताच अछूत म्हणणाऱ्याला बाबासाहेबांनी एक दगडच भिरकावला होता व तो दगड त्याला मस्तकाला लागला होता. बरं झालं की तो वाचला. यावरुन समाजाच्या भागात फारच वाद झाला होता बाबासाहेबांच्या लहानपणी. त्यावर एका इंग्रज अधिकाऱ्याच्या सामंजस्यानं तो वाद संपला होता. त्यावेळेस रामजीनं माफीही मागीतली होती. परंतु त्यावेळेस तो दगड त्या मुलाच्या मस्तकाला चांगला लागला असला तरी चूक त्या सवर्ण मुलाची असल्यानं आणि त्यातही माफी प्रत्यक्ष बाबासाहेबांच्याच वडीलांना मागावी लागल्यानं झालेला अपमान हा बाबासाहेबांना सहन झाला नाही. त्यांना तशीही त्या आधी चीडच यायची अछूत म्हणताच. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या वडीलांचा त्या घटनेनं झालेला अपमान तो सहन न झाल्यानं ती जी चीड बाबासाहेबात निर्माण झाली. त्या चीडीचं रुपांतरण बाबासाहेबांच्या आयुष्याचं परीवर्तन करण्यात झालं. तेच पहिलं पाऊल ठरलं बाबासाहेबांच्या जीवनातील. त्या घटनेच्या वेळेस रामजींनी पहिल्यांदाच बाबासाहेबांना मारलं होतं.
ती घटना. ती घटना घडलीच असेल, नसेल. परंतु त्या घटनेचा उल्लेख तसा बाबासाहेबांच्या पुस्तकात दिसला नाही. त्यानंतर रामजींना बाबासाहेबांनी प्रश्न केले असतील की चूक बाबासाहेबांची नव्हती. चूक होती ती सवर्ण असलेल्या मुलांची. मग रामजीनं बाबासाहेबांना का मारलं? अन् हा असा विटाळ समाजात का असावा? हा विटाळ कसा दूर करता येईल? असं नक्कीच बाबासाहेबांनी म्हटलं असेल. त्यावर रामजीनं त्याला म्हटलं असेल की की हा विटाळ आहे आणि राहणारच. जेव्हापर्यंत कोणी हा विटाळ दूर करणारा मसीहा तयार होणार नाही. जर तुला वाटत असेल की हा विटाळ दूर व्हावा तर तो तुलाही दूर करता येईलच. परंतु त्यासाठी तुला शिकावं लागेल. खुप खुप शिकावं लागेल. काहीतरी बनावं लागेल. तेव्हाच समाज तुझं ऐकेल आणि ज्यावेळेस तुझं ऐकेल. तेव्हाच समाजाचं एकत्रीकरण होईल आणि जेव्हा समाजाचं एकत्रीकरण होईल तेव्हाच समाजातील भेदभाव, विटाळ दूर करता येईल.
रामजी तेवढे शिकलेले नव्हतेच त्याही काळात. परंतु शिक्षणाचं महत्व त्यांना समजत असेल. हे वरील प्रसंगावरुन दिसतं आणि नसेलही माहीत, तरीही प्रत्येक मायबाप आपल्या लेकरांकडून तशीच अपेक्षा करतो. तशी अपेक्षा रामजीनंही केली. परंतु ते ऐकणाऱ्या बाबासाहेबांनी अगदी लहानपणीच तो प्रसंग व ते रामजीचे बोल मनाला लावून घेतले नव्हे तर मनात घट्ट बसवून घेतले. संकटं होतीच. पैसा नव्हता, प्रवासाची साधनं नव्हती. आईचं प्रेम नव्हतं. बापानं दुसरी पत्नी केली होती. सावत्र आई चांगली जरी असली तरी खंत ती होतीच मनात. तरीही बाबासाहेब डगमगले नाहीत. ते शिकत गेलेत. उच्च उच्च उच्च शिकत गेलेत आणि जेव्हा शिकले. तेव्हा त्यांनी समाजाचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार त्यानंतर त्यांचं काहीजणांनी ऐकलं. काहीजण ऐकत नव्हते. परंतु बाबासाहेबांसमोर ध्यास होता. एक नवा क्रांतीकारी विचार होता. रामजीचा प्रश्न होता. त्यातच रामजीची अपेक्षाही होती. ती अपेक्षा पुर्ण करण्यासाठी ते येथील परिस्थितीशी लढ लढ लढले आणि तो विटाळ दूर झाला. तो तेव्हा दूर झाला, जेव्हा परीवर्तन झालेला हा समाज पाहायला रामजी या जगात नव्हते. जर बाबासाहेब झाले नसते तर....... तर कोणी दुसरा झालाच असता. परंतु त्यानं बाबासाहेबांएवढं महान कार्य केलं नसतं वा करता आलं नसतं.
बाबासाहेब घडले. बाबासाहेब घडले हे केवळ त्या प्रसंगानं नाही, तर त्या प्रसंगानंतर रामजीनं जे प्रश्न केले. त्या प्रश्नानं. तसे प्रश्न उपस्थीत करुन रामजीनं बाबासाहेबांच्या मनात समाजातील रुढी, परंपरा, चालीरीती, विटाळ, भेदभाव व अंधश्रद्धेशी लढायला प्रेरणा दिली. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी जरी म्हटलं असेल तरी त्याची खरी ओळख बाबासाहेबांना रामजींनीच करुन दिली. रामजींनीच त्यांच्या पुस्तकांची गरज भागवली. त्यानंतर जे बाबासाहेब तयार झाले. ते काही औरच होते.
वरील सर्व प्रकरणात एका बापाचा त्याग आणि मेहनत दिसून येते. रामजींनी कोणाकडून काय काय आणून बाबासाहेबांच्या पुस्तकाची हौस भागवली ते वाखाणण्याजोगंच आहे. तसं पाहिल्यास बाबासाहेबांच्या काळातही आणि त्यापुर्वीही रामजीसारखे असे बरेच मायबाप होते आणि बाबासाहेबांसोबत जे प्रसंग घडले. तसे प्रसंग रोजच घडत होते त्यांच्याहीसोबत. परंतु त्यांनी बाबासाहेबांसारखं आपल्या मुलांना घडवलं नाही वा रामजीसारखी कोणी मेहनत घेतली नाही. त्यांनी तसाच होत असलेला अत्याचार सहन केला वर्षानुवर्ष. त्यामुळंच भेदभाव व विटाळ टिकून राहिला बरेच वर्ष. त्यांना तर बाबासाहेबांसारखी मुलंही होते बाबासाहेब घडण्यापुर्वी. परंतु त्यांनी स्वतःला घडवलं नाही वा मेहनत घेतली नाही. म्हणूनच वर्षानुवर्ष समाज भेदभाव व विटाळच मानत राहिला.
आजही तसंच आहे. आजच्या मुलातही काहीसे बाबासाहेबांसारखे गुण आहेत. तसेच आजच्याही काळातील मायबाप हे रामजीसारखेच आहेत. परंतु ते आपला स्वार्थ पाहणारे आहेत. म्हणूनच आजही समाजात जो काही थोडासा भेदभाव व विटाळ उरला आहे. तो तेवत आहे. दूर व्हायचं नावच घेत नाही. शिवाय असं वाटायला लागलं आहे की त्यात वाढ तर होणार नाही ना. आजची मुलं शिकत नाहीत असं नाही. ते आजही शिकतात. परंतु आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी करीत नाहीत. तर आपला स्वार्थ पाहतात. ते मोठमोठ्या पदावर जातात. मोठमोठ्या नोकऱ्या पकडतात. परंतु मायबापाला ओळखत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात. त्यांचे अनन्वीत हाल हाल करतात. ही आजची पिढी. ती कसा समाजावर होत असलेला अन्याय, अत्याचार, भेदभाव, विटाळ वा अंधश्रद्धा दूर करेल? शिवाय आजचा बापही रामजीसारखा शिकवतो आपल्या लेकरांना. परंतु त्याची अपेक्षाच नसते की त्याच्या लेकरानं बाबासाहेबांसारखं कार्य करावं. त्या मायबापाला वाटतं की त्याच्या मुलानं एक चांगली सरकारी नोकरी तिही जास्त पैशाची मिळवावी. शिवाय त्या लेकरानं मायबापाला विचारलं नाही तरी चालेल, त्यांनी विदेशात जायला हवं. त्यांना वृद्धाश्रमात टाकलं तरी चालेल. परंतु तो आपल्या परिवारासह सुखी असावा जीवनात. हा आजचा आमचा रामजी. आजच्या आमच्या रामजीला व बाबासाहेबांना शिक्षण वाघिणीचं दूध आहे एवढंच माहीत आहे. परंतु ते दूध क्रांती करतं हे माहीत नाही. म्हणूनच आजच्या आमच्या रामजीला व बाबासाहेबांना शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी करणं व आपला स्वार्थ साधणं एवढाच माहीत आहे. तशीच सरकारी नोकरी करुन गुलाम राहाणं पसंत आहे.
बाबासाहेबांनी समाजातील अन्याय, अत्याचार दूर केला नव्हे तर त्यांना करता आला. कारण त्यांना कोणता स्वार्थ नव्हता. रामजींनी बाबासाहेबांना घडवलं समाजबांधणीसाठी. कारण त्यांचा त्यात कोणताच स्वार्थ नव्हता. त्यांनी पुढंही गरीबीत दिवसं काढणे पसंत केले. परंतु सरकारी नोकरी येवूनही ती स्विकारली नाही. कारण त्यांचं मानणं होतं की सरकारी नोकरी करणं म्हणजेच गुलामी करणं. शिक्षण शिकणं याचा अर्थ सरकारी नोकरी मिळवणं नाही तर त्या ज्ञानाचा वापर आपण समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करावा. असे ते म्हणत असत.
आज प्रत्येकजण शिक्षण शिकतो. उच्च प्रतीचं शिक्षण शिकतो. त्या भरवशावर सरकारी नोकरी मिळवतो व त्या ज्ञानाचा वापर समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी करण्याऐवजी आपल्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी करतो. याला शिक्षण म्हणत येत नाही.
महत्वाचं म्हणजे शिक्षणाचा उद्देश केवळ ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा उपयोग सरकारी नोकरी मिळविण्यासाठी करु नये तर समाजातील दांभीकता, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी करावा. यालाच खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणता येईल. कोणीही त्या ज्ञानाचा वापर स्वार्थासाठी करु नये. प्रत्येक मुलाने बाबासाहेबांसारखे तंतोतंत कार्य केले नाही तरी चालेल. परंतु थोडेसे तरी कार्य करावे. तसेच प्रत्येक मायबापांनीही आपल्या पाल्यांकडूनही स्वार्थीपणाची अभिलाषा ठेवू नये. जेणेकरुन स्वार्थीपणाच्या अभिलाषेनं आपली मुलं बाबासाहेबांसारखी निपुत्रिक नाहीत. ती आपलीच मुलं असूनही आपल्यालाच वृद्धाश्रमात टाकतात ही वास्तविक सत्यता आहे. यात शंका नाही.
विशेष सांगायचं झाल्यास आपण काही बाबासाहेब आणि रामजी बनू शकत नाही. परंतु थोडासा प्रयत्न नक्कीच आपण करु शकतो. तेवढा प्रयत्न निश्चितच करावा. शिवाय आपल्यातील ज्ञानाचा उपयोग सरकारी नोकरी मिळविण्यासाठी केला तरी चालेल, परंतु आपल्या मायबापांना विसरु नये. त्यांची सेवा करावी. तशीच थोडीशी का होईना, समाजाचीही सेवा करावी. कारण आपण समाजाचेही काही देणे लागतोच. यासाठीच शिक्षण आहे. जो असा समाजाचा विचार करीत नाही व त्यादृष्टीनं तसा प्रयत्न करीत नाही. तो कितीही शिकला तरी त्याच्या त्या शिकण्याला अजिबात अर्थ नाही. हे तेवढंच खरं. याबाबत किंचीतही शंका नाहीच. शिवाय विशेष बाब ही की आज काही लोकं आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करु लागले आहेत. ते शिकतात आहेत. ते बाबासाहेब व रामजीचीच देण आहे. मात्र आजही काही लोकं शिकूनही अज्ञानागत वागत आहेत नव्हे तर वागतांना दिसत आहेत. ते समाजाचं एकत्रीकरण करणं सोडून आपसातच भांडत आहेत. याला काय म्हणावे ते कळत नाही. हाच बाबासाहेबांनी सांगीतलेला शिक्षणाचा उद्देश असावा काय?
विशेष म्हणजे हा शिक्षणाचा उद्देश होवूच शकत नाही व विचार येतो की बाबासाहेबांनी याच गोष्टीसाठी संकटं झेलली काय? अवकळा शोषल्या काय? अन् रामजींनी यासाठीच त्याग केला काय? हे समाजाला जेव्हा माहीत होईल. तेव्हाच समाजातील प्रत्येक व्यक्ती खऱ्या अर्थानं माणूस बनल्यासारखा वाटेल. तो माणसात आल्यासारखा वाटेल. त्याचबरोबर शिक्षणाचा बाबासाहेबांनी सांगीतलेला अर्थ व उद्देश यशस्वी झाल्यासारखा वाटेल यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०