Preet tujhi majhi - 5 - Last part in Marathi Love Stories by अक्षय राजाराम खापेकर books and stories PDF | प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ५ अंतिम)

Featured Books
Categories
Share

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ५ अंतिम)

प्रीत तुझी माझी 🐾♥
भाग - ४ पासून पुढे..


सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे चार भाग नक्की वाचा. धन्यवाद 😊🙏🏻


======================================



आता वेळ होती सप्तपदींची. समोर एका पाटावर एका ओळीत सात सुपाऱ्या थोडे तांदुळ ठेवून त्यावर ठेवलेल्या होत्या. बाजूला एका छोट्या होमकुंडात धगधगता अग्नी प्रज्वलित करून ठेवला होता. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांचा हात हातात धरला. आणि सप्तपदी सुरु झाल्या. ते जसे सप्तपदी चालत होते तसे गुरूजी त्या दोघांना प्रत्येक पाऊलांचा अर्थ समजावून सांगत होते. आणि प्रत्येक पावलानंतर तिला एक सुपारी तिच्या उजव्या पायाच्या अंगठ्याने सरकवायला सांगत होते.


सप्तपदीचे पहिले पाऊल : सौख्याचे.
(अग्नीकुंडाभोवती पहिला फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत एक पाऊल चाललीस. म्हणजे तुम्हा दोघांचे सौख्य झाले. तु सुंदर अन्न बनवणारी अन्नपूर्णा हो. व पतीशी एकनिष्ठ वाग. तुम्ही दोघे मिळून तुमच्या कुटुंबाचे कल्याण कराल."


*******


सप्तपदीचे दुसरे पाऊल : धैर्याचे व सामर्थ्याचे
(अग्नीकुंडाभोवती दुसरा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत दोन पाऊले चाललीस. म्हणजे तु याचे सतत मनोबल वाढवणारी हो. तुम्ही दोघे मिळून धैर्य व सामर्थ्य ठेवून कुटुंबातील आनंद सुरक्षित ठेवाल."


*******


सप्तपदीचे तिसरे पाऊल : समृध्दीचे व ज्ञानाचे.
(अग्नीकुंडाभोवती तिसरा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत तीन पाऊले चाललीस. म्हणजे तु याला धन प्राप्त करून देणारी धनलक्ष्मी हो. तुम्ही दोघे मिळून संपत्ती आणि ज्ञानाची समृध्दी कराल."


*******


सप्तपदीचे चौथे पाऊल : सुखाचे.
(अग्नीकुंडाभोवती चौथा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत चार पाऊले चाललीस. म्हणजे याचे सुख वाढवणारी हो. तुम्ही दोघे मिळून घरातील सुख आणि आनंद वाढवाल."


*******


सप्तपदीचे पाचवे पाऊल : संततीचे व कुळोद्धाराचे.
(अग्नीकुंडाभोवती पाचवा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत पाच पाऊले चाललीस. म्हणजे तु याची संतती वाढवून याच्या कुळाचा उध्दार करणारी हो. तुम्ही दोघे मिळून सदगुणी व संस्कारी संतती निर्माण कराल."


*******


सप्तपदीचे सहावे पाऊल : सर्व ऋतूतील सुखाचे.
(अग्नीकुंडाभोवती सहावा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत सहा पाऊले चाललीस. म्हणजे तु याला सर्व ऋतूत सुख देणारी याची अर्धांगिनी हो."


*******


सप्तपदीचे सातवे पाऊल : विश्वासाचे.
(अग्नीकुंडाभोवती सातवा फेरा सुरू होतो.)

"आज तु याच्यासोबत सात पाऊले चाललीस. म्हणजे तुझे याच्याशी असलेले सौख्य अतिशय दृढ होवोत. तुम्ही दोघे आजपासून तुमच्या कुटुंबातील सुखदुःखे विश्वासपुर्वक एकमेकांना वाटून घ्याल व आपापल्या ऋदयात जतन करून ठेवाल."


*******


सप्तपदी संपन्न झाल्या. आयुष्यभरासाठी एकमेकांना दिलेल्या सात वचनांसोबत पवित्र अग्नीभोवतीचे सात फेरे पूर्ण झाले. लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. दोघेही एका पवित्र बंधनात बांधले गेले. आज तिच्या आयुष्यातील हा सर्वात जास्त आठवणींत राहणारा अमूल्य क्षण होता. ती हा क्षण कधीच विसरू शकणार नव्हती. आज त्याच्या नावाचे मंगळसुत्र गळ्यात होते. त्याने तिला सौभाग्याचं लेणं दिले होते. तो आता कायमचा तिचा झाला आहे हे पाहून आज ती मनोमन सुखावली होती.


या सर्व गोष्टींचे श्रेय जात होते ते लहानग्या निशांतला. तो तिच्या आयुष्यात आल्यामुळेच निखिल कायमचा तिला भेटला होता. तिनेही निशांतला स्वतःचा मुलगा म्हणून मनापासून स्वीकारले होते. लग्न झाले, कन्यादान झाले, स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. आता वेळ होती ती पाठवणीची. माहेरचा निरोप घेऊन सासरी जायची. तसे बाबांना बिलगून आराध्या रडू लागली. त्यांना सोडून तिला जाऊशी वाटतच नव्हते. आई तिला पाठीवर हात ठेवून धीर देत होती.


थोडा वेळ आईलाही बिलगूण रडणे झाले. सर्वांचा निरोप घेऊन आराध्या सासरी जाण्यासाठी निघाली. एका आलिशान कारमध्ये बसून आराध्या निघून गेली. सर्वांनी तिला निरोप दिला. कार मुंबईतील चाळीत शामरावांच्या घरासमोर येऊन थांबली. तसे चाळीतील सर्वांनीच नववधू कोण आहे हे बघण्यासाठी गर्दी केली. कारच्या आतून नवी नवरी बाहेर उतरली निखिलचा हात धरून. दोघेही दारात येऊन उभे राहिले. निखिलच्या मोठ्या बहिणीने औक्षण केले व माप ओलांडून येण्याआधी नाव घेण्यास सांगितले.


आता नाव घ्यायचे, पण काय नाव घ्यायचं हे तिलाच काही समजेना. गडबडून तिने फक्त निखिल असं लाजतंच नाव घेतलं. तसे गर्दीतून शेजारच्या काकू बोलू लागल्या. ये पोरी नाव असं थोडी घेत्यात व्हय ? म्या सांगते तसं घे. असं म्हणत त्या काकूंनी तिला कानात काहीतरी सांगितलं. तसं आराध्याने निशांतला जवळ घेतलं व जरा लाजतच बोलू लागली..


"आयुष्यात हक्काचं प्रेम मिळावं एवढीच होती आस.. निशांत माझा जीव आणि निखिलराव माझा श्वास..😊"


तिचं असं नाव घेणं त्याच्यासाठी अनपेक्षितच होतं. काही वेळ स्तब्ध होऊन तो तिच्याकडे पाहतच राहिला. नव्या नवरीच्या श्रुंगारात खुललेली ती लाजेने अजुनच लाल गुलाबी झाली होती. व दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवले होते. बहिणीने त्याच्या हातांना स्पर्श करताच दोघेही एकदम भानावर आले. तसे ती त्याची नजर चोरून खाली बघून गालातल्या गालात हसायला लागली. आता वेळ होती ती निखिलला नाव घेण्याची. तो काय नाव घेणार याकडेच सर्वजण कान लावून होते. आणि तो तिच्याकडे पाहतच बोलू लागला..


"नियतीने बांधली आमच्या लग्नाची रेशीमगाठ जन्म सात.. आयुष्यभर दोघांना जपेल घेऊन आराध्याचा हाती हात.. 🤝🏻"


त्याचा उखाणा घेऊन होताच तिने माप ओलांडून आत गृहप्रवेश केला. व किर्तीच्या फोटोजवळ उभे राहून दोघांनी तिला वंदन केले. आणि आराध्या बोलू लागली.


"किर्तीताई आज तुम्ही आमच्यात नाही. म्हणून मला इथं यावं लागलं. पण आज मी तुम्हाला वचन देते की, निशांतला मी कधीही अंतर देणार नाही. मी त्याला जन्म दिला नाही तरी आईचे प्रेम मात्र भरभरून देईल. कुठल्याच गोष्टीची मी त्याला कमी पडू देणार नाही. तसेच तुमच्या नवर्‍याची देखील मी खूप काळजी घेईल. माझे आयुष्य खूप कमी आहे पण जिवंत आहे तोवर मला सर्वांसाठी खुप काही करायचंय. फक्त तुमचे आशिर्वाद माझ्या तेवढे पाठीशी असू द्या.."


एवढे बोलून दोघांनी किर्तीचे आशिर्वाद घेतले. व नंतर बाबांच्या पाया पडत आशिर्वाद घेतले. दोन दिवसांनी घरी सत्यनारायण महापुजा झाली. सर्व पाहुणे मंडळी एक एक करत निघून गेले. घर आता रिकामे झाले. आराध्या देखील घरातील सर्व कामे आवडीने करु लागली. आराध्या व निखिलचा सुखी संसार आता सुरू झाला होता. निशांतला हक्काची आई भेटली होती. सर्व काही सुरळीतपणे पार पडलं होतं.


*******


पाच वर्षांनंतर...


आज बरोबर पाच वर्षे झाली आराध्या आणि निखिल यांच्या लग्नाला. त्यांची आज पाचवी ॲनिवर्सरी आहे. व आराध्या आजही हॉस्पिटलमध्येच ॲडमिट आहे. पण कॅन्सरच्या ट्रिटमेंटसाठी नाही तर वेगळ्याच कारणासाठी. आजच आराध्याने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. व तीसुद्धा दिसायला आराध्याप्रमाणेच सुंदर आणि अतिशय गोड आहे. निखिल व आराध्या यांनी जर मुलगी झालीच तर तिचं नाव किर्ती असं ठेवायचं आधीपासूनच ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले होते.


कारण किर्तीने तिच्या डिलीव्हरीला जायच्या आधीच निखिलला सांगितलं होतं की, "मला जर काही झालं ना तर मी तुमच्या पोटी तुमची लेक बनुन नक्की परत येईन.पण तुमची पाठ सोडणार नाही वचन आहे माझे. पण माझ्यानंतर आपल्या बाळाचा तुम्ही नीट स्वीकार कराल. हे वचन द्या मला." तिचे हे शेवटचे शब्द आजही निखिलला स्पष्टपणे आठवत होते. तिने तीचे वचन पाळले आणि आली पुन्हा माझी लाडाची लेक बनून. आणि मीपण तुझे वचन पाळत आहे निशांतची योग्य ती काळजी घेऊन. निखिल मनातच पुटपुटला.


इकडे नयना आणि विशालचे पण दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे नयना देखील गरोदर आहे. तिलाही पाचवा महिना सुरु आहे. मातृत्वाच्या सुंदर अनुभवासाठी ती देखील आसुसली आहे. असं म्हणतात प्रत्येक स्त्रीचा मुल जन्माला आल्यावर नव्याने जन्म होतो. तसंच आराध्याचा पण पुनर्जन्म झाला आहे. किर्तीच्या पुन्हा आयुष्यात येण्याने. ज्याच्यासाठी दोघे एकत्र आले होते तो निशांत मात्र खुप सुधारला आहे. हट्टीपणा सोडून आता शांत रहायला शिकला आहे.


आईची म्हणजेच आराध्याची खूप काळजी घेत आहे. कारण त्यालाही आईच्या कॅन्सरच्या आजारपणाची जाण आहे. शामराव देखील आनंदात आहेत. आराध्याचे आई - बाबा ही आनंदाची बातमी ऐकून मनोमन देवाचे आभार मानत आहेत. सर्वांच्या आयुष्यात सुख नांदत आहे. असंच सर्व मंगलमय घडो आणि आराध्याचा ब्लड कॅन्सर लवकर बरा होवो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना.. 😊🙏🏻


=============!! समाप्त !!=============


काय मग वाचकहो कशी वाटली आजची कथा ☺ कथा आवडली तर नक्कीच कमेंट करुन कळवा. कथेला प्रोत्साहन द्या. मी पुन्हा तुमच्या भेटीला येईल लवकरच. एक नवीन प्रेमकथा घेऊन. 🤗 तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. 😊🙏🏻


लेखक : अक्षय खापेकर.
©All Copyright Reserved