Preet tujhi majhi - 3 in Marathi Love Stories by अक्षय राजाराम खापेकर books and stories PDF | प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ३)

Featured Books
Categories
Share

प्रीत तुझी माझी.. पर्व -१ - (भाग : ३)

प्रीत तुझी माझी 🐾♥
भाग - २ पासून पुढे..


सर्व वाचक मित्रांना माझी नम्र विनंती आहे की, जर कुणी या कथेचा हा भाग पहिल्यांदाच वाचत असाल तर, या कथेचे आधीचे दोन भाग नक्की वाचा. धन्यवाद 😊🙏🏻


======================================


आज निशांत पुण्यात येऊन बरोबर एक महिना झाला होता. अवघं चार वर्ष वय होत आलेला निशांत आमच्या घरात मात्र चांगलाच रमला होता. रोज बाबा त्याला बागेत फिरायला घेऊन जात होते. मग काय दररोज येताना या साहेबांना एक आईसक्रीम भेटायची. आई त्याला मागेल तो पदार्थ बनवून देत असे. मी बॅंकेतून घरी आले की त्याला चित्र काढायला शिकवत होते. कधीकधी चित्र चांगलं आलं तर माझ्याकडूनही त्याला कॅडबरी असायची.


संध्याकाळी हातपाय धुतले की सरळ देवघरात जाऊन माझ्या आईपाशी बसून शुभंकरोती म्हणायचा. रात्रीचे ए आरू मावशी म्हणून जोरात माझ्या नावाने ओरडत येऊन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्याकडे हट्ट करायचा. कधी लाडात मांडीवर येऊन बसायचा. मी गोष्ट सांगायला लागले की, गोष्ट ऐकता ऐकता माझ्या कुशीत डोकं टाकून शांतपणे झोपून जायचा. किती मस्त फिलिंग येत होती मला. कदाचित तो माझ्यात त्याची आई पाहत होता.


माझ्या कुटुंबात तो त्याला हवं ते प्रेम अनुभवत होता. त्याच आजूबाजूला असणंही मला खूप आवडत होतं. तो क्षणभर जरी नजरेआड झाला तरी, माझं मन मला खायला उठत असे. कदाचित माझ्यातली मायेची ऊब त्यालाही हवी हवीशी वाटत होती. शेवटी तो दिवस आलाच. निखिल कार घेऊन पुण्यात त्याच्या मुलाला (निशांतला) मुंबईला परत घेऊन जाण्यासाठी आला. पण तो त्याच्यासोबत जायला तयारच नव्हता. मी आरु मावशीला सोडून कुठेही जाणार नाही, असा त्याने मनाशी दृढ निश्चयच केला होता.


नेमकं त्याच दिवशी मी घरी नव्हते. मी कुठं होते तर इथे. या हॉस्पिटलमध्ये. मला खूप त्रास होत असल्याने मी सकाळीच बॅंकेतून इथं आले होते. मला चक्कर येत होती. माझे चेकिंग केल्यावर समजले की, अंगात रक्त कमी आहे. म्हणून अशक्तपणा आला आहे. मला लगेचच इथे अॕडमिट करून घेण्यात आले. बाबांना कॉल करुन मी तसे कळवले होते. माझा रक्तगट ए निगेटिव्ह होता. हा रक्तगट नेमका आज शिल्लक नव्हता. इतक्यात कुणीतरी ब्लड डोनर मिळाला असल्याचे ओरडत डॉक्टरांकडे आलं होतं. मला रक्त तर मिळालं होतं. पण देणारी व्यक्ती कोण आहे हे नाव मला अजूनही समजलं नव्हतं.


अशातच माझ्या रुमचा दरवाजा नॉक झाला. मी कोण आहे ? असे विचारताच, एक व्यक्ती दरवाजा उघडून आत शिरला. व मी डोळे मोठे करुन दरवाजाच्या दिशेने पाहतच राहिले. तो निखिल होता. बाबांनीच मी इथे उपचारासाठी अॕडमिट असल्याचे त्याला सांगितले होते. आणि माझ्या कॅन्सरच्या आजाराबद्दलही खरं काय होतं ते सर्व सांगितलं होतं. माझ्या अल्प आयुष्याची त्याला कल्पना दिली होती. तसा तो माझ्याकडे धावतच आला मला भेटायला.


माझ्या शेवटच्या क्षणी तरी माझं प्रेम आज माझ्या जवळ आहे, याचा आनंदच माझ्यासाठी काहीसा वेगळा होता. जो मी शब्दांत नाही व्यक्त करू शकत. त्याला समोर बघून माझे डोळे भरून आले होते. आज तो आला होता. फक्त माझ्यासाठी आला होता. माझ्या अगदी जवळ येऊन बसला होता. मी त्याला कधीच माझ्या ब्लड कॅन्सरच्या आजाराबद्दल सांगितले नव्हते, याचा त्याला राग आला असेल असे मला वाटत होते. पण तसे काही झाले नाही. तो न रागावताच माझा हात हातात घेऊन बसला. माझे डोके त्याने मांडीवर घेतले. व माझ्या डोक्यातून, चेहर्‍यावरून प्रेमाने हात फिरवू लागला.


मला कधीच काहीच होणार नाही याची मला खात्री देऊ लागला. न राहवून आज मी त्याच्या जवळ माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या. माझे प्रेम मी व्यक्त केले. आज जे मनात दडले होते ते सारं सांगितलं. सत्य ऐकून तर तोही आज भरभरून व्यक्त झाला. तो म्हणाला की, त्याचेही माझ्यावर लहानपणी पासून खूप मनापासुन प्रेम होते. पण तो कधीच मला सांगू शकला नाही. आणि जेव्हा सांगायचे ठरवले तेव्हा घरच्यांनी माझं परस्पर लग्न ठरवले होते. मी ना घरच्यांच मन तोडू शकत होतो, ना त्या मुलीचं.


नाईलाजास्तव मला किर्तीसोबत लग्न करावं लागलं. मी शरीराने तिचा होतो पण मन मात्र तुझ्यातच गुंतलं होतं. आज त्याने सगळं सांगितले होतं. भरभरून व्यक्त झाला होता माझ्यापाशी. पण आता एकत्र जगायचं म्हणलं तरी आयुष्यच उरलं नाही माझ्याकडे. आज असं वाटत आहे की, त्या वेळेस जर मी हिंमत करून मी त्याला विचारलं असतं ना तर प्रेमाचे काही क्षण तरी माझ्या नशिबात आले असते. पण नशिबच फुटकं होतं माझं. संसार नावाचं सुख माझ्या नशिबात नव्हतंच. निदान मरणापुर्वी शेवटची एकच इच्छा होती. ती म्हणजे निखिलच्या नावाचं कुंकू कपाळी लावून त्याची सौभाग्यवती म्हणून सरणावर जायचं.


वर्तमानकाळ..

मी काय करू गं नयना. आज माझे खरे प्रेम, माझा निखिल माझ्यासोबत आहे. पण जगण्यासाठी क्षणच अपुरे आहेत गं माझ्याकडे. आणि आराध्या बोलता बोलता मधेच थांबते. व जोर जोरात रडू लागते. आराध्याची ही ऋदय हेलावून टाकणारी कहानी ऐकून नयनालाही आता खुप रडू येतं. दोघीही एकमेकांच्या मिठीत बराच वेळ रडत बसतात. थोड्या वेळाने संध्याकाळचे सहा वाजतात. नयना जायला निघते. निखिलला आपण चुकीचा गैरसमज करुन घेतला होता म्हणून सॉरी बोलते. व उद्या परत भेटायला येईल असे आराध्याला सांगून निघते.


हॉस्पिटलच्या बाहेर येताच नयनाला खुप टेंशन आले होते. तिने पर्समधून तिचा मोबाईल काढला. व विशालला कॉल केला. त्याला सारसबागेत भेटायला बोलवले. त्याने तिकडून फोन ठेवताच ती तिच्या कारमध्ये बसली व थेट सारसबाग गाठली. विशाल तिथेच बाहेर उभा होता तिचीच वाट बघत. दोघेही आत गेले. बाप्पांचे दर्शन घेतले व तेथील तलावासमोर असलेल्या उंच एका झाडाखाली जाऊन उभे राहिले. आता दोघांतील संभाषण सुरू झाले.


नयना : "विशाल.. मला ना. तुला काहितरी महत्त्वाचे सांगायचे आहे."

विशाल : "मग सांग ना. तसंही मला इथं बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार."

नयना : “तुझं मत काय असेल माहीत नाही मला. पण मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम करते.”

विशाल : (जरा हसतच) "अगं एवढंच ना. मग ऐक मीपण तुझ्यावर खुप जीवापाड प्रेम करतो."


त्याचे हे शब्द ऐकून तिला खुपच आनंद होतो. आणि आनंदाच्या ओघात ती त्याला घट्ट मिठी मारते. व त्याला "आय लव्ह यू" बोलते. तसा तो "लव्ह यू टू माय जान" म्हणत तिच्या भोवतालची मिठी घट्ट करतो. काही क्षण असेच निघून जातात. दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले असतात. आणि लोकांच्या गर्दीच्या आवाजाने त्यांचे भान हरपते. आजुबाजुला बघतात तर खुप लोक जमा झालेले असतात व त्यांच्याकडे बघून हसत असतात. तसे दोघेही वेगळे होतात. नयना लाजून तिथून पळ काढते. तोही तिच्या मागे जात काढता पाय घेतो.


दुसर्‍या दिवशी आराध्याला भेटायला नयना हॉस्पिटल मध्ये येते. निखिल तिथंच बसुन कॉलवर बिझी होता. त्याचे आराध्याच्या बाबांकडे असलेल्या निशांत सोबत बोलणे सुरू होते. त्याचे बोलणे संपताच नयना दोघांना नाश्ता देते. आणि त्याला विशालसोबत त्याच्या घरी पाठवते. आवरुन यायला सांगते. दोघेही निघून जातात. तसे जाताच रूमचा दरवाजा बंद करते व आराध्याला थॅंक्स म्हणतच घट्पणे बिलगते. आराध्याला नयनाचे असे वागणेच समजत नाही. ती काय झालं ? म्हणून विचारते. तसं नयना काल जे काही सारसबागेत घडलं ते तसंच्या तसं तिला सांगते.


हे सर्व ऐकून आराध्याला खुप हसू येतं. दोघीपण खूप हसत असतात. आज तिच्या चेहर्‍यावर मनापासून आलेलं हसू बघून नयनाला जरा समाधान वाटतं. नयनाने ऑफिस मधून सकाळीच जाऊन १५ दिवसांची रजा टाकली होती. तीने आणि विशालने आराध्यासाठी सरप्राइज प्लॅन केले होते. त्यासाठीच निखिलला नयनाने त्याच्या घरी पाठवले होते. दोन दिवसांनी निशांतचा बर्थडे होता. आराध्याला हे माहितच नव्हतं. नेमकं त्याच दिवशी तिला हॉस्पिटल मधून घरी सोडण्यात आलं. नयना तिला स्वतःचा कारने तिच्या घरी घेऊन आली.


डॉक्टरांनी तिला आता आराम करायला सांगितला होता. सोबत आणलेल्या मेडिसीन नयनाने आराध्याच्या आईकडे सुपूर्त केल्या. आराध्या घरात शिरताच निशांतने धावत येऊन तिला घट्ट मिठी मारली. व म्हणू लागला. तु कुठे गेलतीस आरू मावशी मला सोडून. व रडू लागला. तिने त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत त्याला शांत केले. तसा तो शांत झाला. जन्मतःच आई गमावलेला निशांतला आईची माया आराध्याच्या रुपात मिळत होती.


क्रमशः ..


======================================


काय मग वाचकहो. कथा आवडत आहे ना तुम्हाला.☺ आराध्या व निशांतची चांगलीच गट्टी जमली आहे. पुढे काय होईल ? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करुन मला नक्की कळवा.
धन्यवाद 😊🙏🏻


लेखक : अक्षय खापेकर
©All Copyright Reserved