किमयागार -हृदय
पुढील तीन दिवस ते हत्यारबंद सैन्याच्या मधून जात होते आणि क्षितिजावर पण सैन्य दिसत होते. तरुणाचे ह्रदय भितीची भाषा बोलू लागले होते. ते त्याला जगद्आत्म्याकडून ऐकलेल्या गोष्टी सांगत होते.
अशा माणसांच्या गोष्टी सांगत होते जे खजिन्याच्या शोधात निघाले होते पण अयशस्वी झाले होते.
काही वेळा अशी भीती दाखवत असे की तो खजिना शोधू शकणार नाहीच पण तो या वाळवंटात मृत्यू पावेल.
काही वेळा ते प्रेम व श्रीमंती दोन्ही मिळाल्यामुळे समाधानी असल्याचे पण सांगत असे.माझे ह्रदय विश्वास घातकी आहे,
ते दोघे घोड्यांना विश्रांती देण्यासाठी एके ठिकाणी थांबले तेव्हा
तरुण किमयागाराला सांगत होता , ते पुढे जाऊ नको असे सांगतेय.
ते एका दृष्टीने बरोबरच आहे. किमयागार म्हणाला,
साहजिकच आहे की स्वप्नाच्या मागे धावताना तू मिळवलेले जे काही आहे ते पण गमावून बसशील अशी त्याला भीती वाटत आहे.
मग अशा परिस्थितीत मी ह्रदयाचे कां ऐकावे?.
कारण तू त्याला शांत बसवू शकणार नाहीस. कारण तू जरी असे दाखवायचा प्रयत्न केलास की तू त्याचे काही ऐकत नाहीस तरी ते सतत तुझ्याबरोबर असणार आहे. ते तुला सतत सांगत असेल की तू जीवनाविषयी आणि जगाविषयी काय विचार करत आहेस.
म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की ते विशवासघातकी असले तरी मी त्याचे ऐकावे. विश्वासघात हा अचानक बसणारा फटका असतो. आणि म्हणून ह्रदय काय सांगतेय ते ऐकणे चांगले म्हणजे तुम्हाला अनपेक्षित फटका बसत नाही.
तरूण प्रवासात त्याच्या ह्रदयाचे ऐकत होता. त्याला आता ह्रदयाच्या युक्त्या आणि हुलकावण्या समजू लागल्या होत्या.
आणि त्या स्विकारायला तो तयार झाला होता.
त्याची सर्व भीती निघून गेली होती. ओॲसिसवर परत जायचे आहे हेही तो आता विसरला होता.
आणि एका दुपारी ह्रदय म्हणाले ते आनंदी आहे. ते म्हणाले, मी जरी काही वेळा तक्रारी करत असलो तरी ते योग्यच आहे कारण मी माणसाचे ह्रदय आहे आणि ते असेच असते. माणसे त्यांच्या महत्वाच्या स्वप्नाच्या पूर्ण करण्याला घाबरतात कारण त्यांना वाटतं असते की आपण तेवढे पात्र नाही किंवा ते अपयशाला घाबरतात. आणि आम्ही ह्रदये घाबरत असतो कारण, आपल्या प्रेमाच्या माणसांना सोडून आपण दूर आलेले असतो त्याना गमावणार तर नाही ना किंवा आम्हाला काही क्षण चांगले वाटतात पण ते तसे नसतात किंवा आपण ज्या खजिन्याच्या शोधात निघालोय तो वाळूत खोल दबला गेला असेल असे वाटून, कारण असे घडतं तेव्हा आम्हाला खूप दुःख होते.
एका अंधाऱ्या रात्री तरुणाने किमयागाराला सांगितले, माझे ह्रदय त्याला दु:ख होईल म्हणून घाबरत असते.
किमयागार म्हणाला, तुझ्या ह्रदयाला सांग दुःखाची भीती ही दुःखापेक्षा वाईट असते. आणि एखादा माणूस आपल्या स्वप्न पूर्ती साठी प्रयत्न करतो तेव्हा दुःख येतच नाही कारण प्रत्येक क्षणाला परमेश्वर व वैश्विक शक्ती त्याला मदत करत असतात.
तरूण मनात म्हणाला, शोधाचा प्रत्येक क्षण म्हणजे परमेश्वराची भेट असते. मी अगदी सच्चेपणाने खजिन्याच्या शोध घेत असतो तेव्हा माझा प्रत्येक क्षण उत्साहाने भरलेला प्रकाशमय असतो कारण मी मला पाहिजे ते मिळवीनच असे मला दर तासाला वाटत असते, कारण तो प्रत्येक तास माझ्या स्वप्नाचा भाग असतो. मला माझ्या स्वप्न पूर्तीच्या वाटचालीत मला अशा काही गोष्टी कळल्या आहेत ज्या मला एरवी कळल्या नसत्या, आणि एका मेंढपाळाला अशक्य वाटतील अशा गोष्टी केल्या आहेत, मिळवल्या आहेत.त्या रात्री तरुणाला छान झोप लागली.
तो उठला तेव्हा त्याचे हृदय त्याला जगद्आत्म्याकडून ऐकलेल्या गोष्टी सांगू लागले.
ते
म्हणाले, प्रत्येक आनंदी माणसांमध्ये परमेश्वर वास करीत असतो. आणि किमयागार म्हणाला तसे आनंद हा वाळुच्या कणात देखील सापडू शकतो. कारण वाळुचा कण ही एक अशी निर्मिती आहे, ज्याला बनवण्यासाठी या विश्वाला खूप वर्षे लागली आहेत.