Mala Space havi parv 1 - 61 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६१

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६१

मला स्पेस हवी पर्व १ भाग 61
 
मागील भागात आपण बघीतलं की नेहा कोणत्या विचारात गुंतली असेल हा विचार अनुराधाच्या मनात चालू होता. आता पुढे बघू.
 
 
नेहाला सरळ विचारण्याची हिंमत अनुराधा मध्ये नव्हती. नेहा सारख्या सुशिक्षित, प्रेमळ स्त्रीला आयुष्याचा वैताग यावा इतका त्रास कशाचा असेल? आजपर्यंत आपण नेहमीच मॅडमना हसतमुख बघीतलं. इतक्या हस-या चेहे-यामागे दु:ख असू शकतं? वैताग येण्याइतके?
 
माणसाला कधी कुठली गोष्ट त्रासाची वाटेल सांगता येत नाही. खरंच आहे कोणाच्या आयुष्यू कुठला रंग भरला असेल आणि कुठला रंग त्याला त्रास देत असेल कळत नाही.
 
आपण एवढी पुस्तक वाचतो त्या पुस्तकातून किती वेगवेगळे रंग वाचायला मिळतात. कुठला रंग असेल नेहा मॅडमच्या आयुष्यात त्यांना त्रास देणारा? खूप असे वेगवेगळे विचार अनुराधाच्या मनात येत होते. पण काय करणार? अचानक ती भानावर आली आणि तिने घड्याळात बघितलं तर साडेअकरा वाजले होते. नेहा मॅडम ना जेवायला वाढायचं आहे याची आठवण होऊन ती घाईने उठली आणि नेहाच्या खोलीत केली.
 
 
“ मॅडम चालता ना जेवायची वेळ झाली .”
 
हळूच अनुराधा म्हणाली. नेहाने डोळे मिटलेले होते. डोळ्यातून अखंड पाणी गळत होतं पण ते अनुराधाला दिसत नव्हतं कारण नेहाची तिच्याकडे पाठ होती. हळूच नेहाने डोळे पुसले आणि म्हणाली,
 
 
“अनुराधा तुला पण त्रास होतो ग माझ्या तब्येतीमुळे.”
 
नेहा अगदी कळकळून म्हणाली. अनुराधाला नेहाचा हा स्वर ऐकून कसंसच झालं. ती म्हणाली,
 
 
“नाही हो मॅडम असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही एकट्या आहात इथे. तुमची फॅमिली पुण्यात असते . तुम्हाला इथे मदत करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही तुमचे सहकारी आहोत. आम्हाला हे कारण आवश्यक नाही का?”
 
यावर नेहा हसली. पण तिच्या हसण्यात काही दम नव्हता. हे अनुराधाला जाणवलं. अजूनही नेहाला थकवा जाणवतो आहे हे बघून अनुराधा म्हणाली,
 
“मॅडम तुम्हाला इथेच आणू का जेवायला? तुम्हाला जर जास्त चालवत नसेल इथेच जेवा. मग तोंड धुवायला हवं तर मी घेऊन जाईन.”
 
नेहाला अनुराधाच म्हणणं पटलं. ती म्हणाली,
 
“ ठीक आहे आण. आज मला खूप थकवा वाटतोय.”
 
अनुराधा म्हणाली,
 
“ थकवा वाटतोय ना ! मग आराम करा. मी इकडेच आणते जेवायला . स्टूल कुठे आहे?”
 
नेहाने हाताने कोपऱ्यात असलेलं स्टूल दाखवलं.ते स्टूल अनुराधाने नेहाच्या समोर ठेवलं आणि ती स्वयंपाक घरात केली.
 
भाजी, वरण, पोळी सगळं अन्न गार झालं होतं म्हणून अनुराधानी सगळं गरम केलं. मग नेहासाठी ताट वाढलं. कोपऱ्यात ओट्यावर तिला लिंबाच्या लोणच्याची बाटली दिसली. ती स्वतःशीच म्हणाली,
 
“ अरे वा लिंबाचं लोणचं ! देऊया मॅडमना जेवताना. मॅडमच्या तोंडाला चव येईल."
 
ताटात तिने एका बाजूला थोडंसं लिंबाचं लोणचं वाढलं. गरम पोळी भाजी, वाढत असताना तिच्या लक्षात आलं की पोळी तर एकदमच कोरडी होती. तिने थोडसं तुपाचा हात पोळीला लावला आणि ताट घेऊन नेहाच्या खोलीत आली.
 
सस्टुलावर जेवणाचं ताट ठेवलं आणि म्हणाली,
 
“ मॅडम आता सावकाश जेवा. सगळं छान गरम करून आणलय. तुम्ही जेवू शकताय का ? की मी तुम्हाला भरवू?”
 
इतकं प्रेमाने अनुराधाने विचारलं की नेहाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं.
 
“अहो मॅडम तुम्ही रडता का?”
 
अनुराधानी घाबरून विचारलं तर नेहा म्हणाली,
 
“अनुराधा तू आणि अपर्णा कुठल्या जन्माच्या माझ्या मैत्रिणी आहात ग ? तुम्ही इथल्या मी पुण्याची पण कसा जीव जडला तुमचा माझ्यावर ?अपर्णांनी सुद्धा मला भरवलं. आज तू विचारतेस. आईच्या मायेने करता ग दोघी माझं. कशी मी उतराई होऊ गं तुमच्या उपकाराची?”
 
यावर अनुराधा म्हणाली ,
 
“मॅडम हे उपकार नाही हो ! आम्ही तुम्हाला खूप छान मैत्रीण मानतो. मैत्रीणीमध्ये ऊपकाराची भाषा कधी येते का? नाही. तिथे फक्त निखळ मैत्री असते व्यवहार नसतो. तुम्ही किती छान आमच्याशी बोलता. किती छान रॅपो तुम्ही आमच्या बरोबर साधला आहे. म्हणून आमची तुमची मैत्री जमली.”
 
“ अ आई ग”
 
नेहा एकदम त्रासून म्हणाली.
 
“ मॅडम तुम्हाला थकवा येत असेल तर पलंगावर मागे टेकून बसा. मी तुम्हाला भरवते.”
 
 
बराच विचार करून नेहा हो म्हणाली. कारण तिला खरंच आज बसवत नव्हतं. शेवटी हळूहळू अनुराधानी तिला मागे सरकवून पलंगाच्या मागच्या बाजूला ऊषा ठेऊन त्यावर नेहाला टेकून बसवलं. स्टूलवर प्लेट ठेवून नेहाच्या बाजूला बसली आणि एकेक घास नेहाला भरू लागली. नेहा एक एक घास डोळ्यातल्या पाण्याबरोबर गिळत होती .
 
“ मॅडम जेवताना असं रडायचं नाही अन्नपूर्णा रुसून बसेल ना ! तिच्यासमोर नका रडू."
 
इतकी प्रेमाने अनुराधा बोलत होती ती नेहाला वाटलं अरे ही तर माझी आईच आहे जणू ! हळूच नेहाने डोळे पुसले आणि जेवायला सुरुवात केली.
 
नेहाला जेवताना अवघड वाटू नये म्हणून अनुराधा मधून मधून गप्पा मारत होती. गप्पा करता करता काही विनोदही सांगत होती की ते विनोद ऐकून आणि नेहा हसायला लागली.
 
“ अनुराधा इतके विनोद तू कुठे वाचलेस? “
 
तेव्हा अनुराधा म्हणाली,
 
“ मॅडम मला वाचनाची खूप आवड आहे. आमच्या घराजवळच लायब्ररी आहे. तिथून मी पुस्तकं आणते वाचायला .पु.लं.चे विनोद तर मला खूप आवडतात. खूप छान विनोद असतात. माझ्याकडे त्यांची दोन तीन पुस्तकं आहेत.”
 
“अरे वा ! तुझी खाजगी लायब्ररी आहे का?”
 
नेहा ने विचारलं.
 
“हो मॅडम माझ्या घरी मी जवळपास शंभर पुस्तकं जमवली आहेत . मारुती चितमपल्ली यांची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत अगदी त्यांची पक्षांची डिक्शनरी सुद्धा आहे. पु.लं ची सुद्धा सगळी पुस्तकं आहेत.”
 
“ अरे बापरे ! हो का? अजून कोणती पुस्तकं आहेत तुझ्याकडे?”
 
“ बरीच चरित्र आहेत. ज्ञानेश्वरी आहे.”
 
नेहाला खूपच छान वाटलं.
 
“अनुराधा तुझी ओळख किती वेगळी आहे ग. तू लिहीतेस की नाही?”
 
यावर अनुराधा हसली.
 
“ नाही हो मॅडम. लिहिणं इतकं सोपं नाही. मी फक्त भरपूर वाचते .”
 
“अनुराधा तू एवढा वाचतेस तर तू लिहूपण शकशील. कधी प्रयत्न केलाय का?”
 
“ नाही हो कुठे वेळ मिळतो ?ऑफिस आणि घर यातच सगळा दिवस संपतो.”
 
“हे बघ अनुराधा कशाला वेळ काढायचा म्हटलं की वेळ मिळतो. एक काम कर तुला जेव्हा तुझा स्वतःचा वेळ हवा वाटतो ना त्यावेळी तू काहीतरी लिहीत जा. घरातलं सगळं आटोपलं की लिही.”
 
“मॅडम घरातलं सगळं आवरेपर्यंतच साडेअकरा कधी होतात रात्रीचे कळत नाही.”
 
“हो बरोबर आहे. तुझी मुलं पण आता मोठी आहेत. त्यांच्या ट्युशन्स,अभ्यास सगळं जमवताना तुझी धावपळच होत असेल.”
 
“हो ना मॅडम खूप धावपळ होते. म्हणून मी काय करते रात्री थोडंसं पुस्तक वाचते. झोपायच्या आधी दोन-तीन पानं जरी वाचली तरी मला खूप छान झोप लागते. “
 
“ अरे वा ही पण छान सवय आहे. तुला माहितीये का इंदिरा गांधी रोज रात्री झोपताना एक दीड पान वाचल्याशिवाय झोपायच्या नाहीत. त्यांच्या उशाशी काही पुस्तकं ठेवलेली असायची .झोपताना जे पुस्तक हाती ते यायचं ते त्या वाचायच्या. ही सवय त्यांना जवाहरलाल नेहरूंनी लावली होती. “
 
“ हो मॅडम. माहिती आहे. त्या खूप हुशार होत्या. त्यांना खूप भाषा येत होत्या.”
 
“ हो त्यांना जवळपास अठरा भाषा यायच्या. तू लिही कधी वेळ काढून."
 
" मॅडम मला कळत पण वेळ जमवताना कठीण होतं."
 
"हे बघ तू टाईम टेबल कर.रोज रात्री झोपताना पुस्तक वाचतेस ना एक दिवस पुस्तक वाच एक दिवस लिही. लिहिताना वेळेचं भान राहत नाही तेव्हा छोट्या छोट्या विषयावर तू आधी लिहीत जा. मग हळूहळू वाढवत ने.”
 
“ मॅडम आज मी तुमच्याकडे आले नसते तर किती छान सल्ल्याला मुकले असते. किती छान मार्गदर्शन केलंय.”
 
“ अनुराधा मला खूप आवडलं तुला सांगायला पण तुला माझं बोलणं आवडलं हे महत्वाचं आहे. नाहीतर आजकाल कोणाला काही सांगितलेलं आवडतं नाही.”
 
अनुराधा यावर फक्त हसली. दोघींमध्ये आता खूप मोकळेपणा आला होता. दोघींच्या गप्पांमध्ये कधी नेहाचं जेवण झालं हे नेहाला कळलं नाही पण अनुराधाचं लक्षं होतं.
 
“ मॅडम मी ताट स्वयंपाक घरात ठेवून येते. मग आपण तोंड धुवायला जाऊ.”
 
“ अगं मी जाईन.”
 
“ नको. तुम्हाला सध्या खूप थकवा आहे. मघाशी तुमचा तोल जात होता.थांबा मी आलेच. मी येईपर्यंत उठू नका.”
 
अनुराधा जेवणाचं रिकामं ताट स्वयंपाक घरात ठेवून घाईनेच नेहाच्या खोलीत आली.न जाणो या उठून तोंड धुवायला गेल्याच तर..
 
“ चला.”
 
अनुराधा काळजी पूर्वक नेहाला तोंड धुवायला घेऊन गेली. नेहाला जेवणा नंतरच्या गोळ्या दिल्या.
 
“ मॅडम आता थोडा आराम करा.”
 
“ हो.अनुराधा मला जेवण भरवलस पण तुझं राह्यलय नं?”
 
“ हो मी जेवते आता. तुम्ही नका काळजी करू.”
 
नेहाच्या अंगावर पांघरूण घालून अनुराधा जेवायला गेली.
 
अंथरुणावर पडल्या पडल्या नेहा मनात म्हणाली,
 
"परमेश्वरा कुठलं नातं आहे रे या दोघींशी माझं ? हा पण नात्यांचा गुंताच आहे पण या नात्याचा मनावर वळ उमटत नाही. हे नातं गर्भरेशमी आहे. अगदी भरजरी वस्त्र आहे.
 
या वस्त्राला अंगभर लपेटण्यासही माझी हरकत नाही. आत्मीयतेची सोनेरी जर या वस्त्राला लाभली आहे. प्रेमाची चंदेरी कडा आहे. ममत्वाचे किती मनमोहक रंग आहे या वस्त्राला. खूप भावलं माझ्या मनाला हे वस्त्र.
 
हे सुंदर आनंदाचे विचार मनात येताच नेहा स्वतःशीच खुदकन हसली. मघाशी ज्या चेहऱ्याला डोळ्यातील पाण्याने भिजवून निराश केलं होतं त्याचं चेहऱ्यावर आता सुंदर आणि आनंददायी विचारांनी हास्याचे मोती घरंगळत आले. किती छान दिसतोय नेहाचा हा चेहरा.
तुम्हाला कसा वाटला?
 
_________________________________