Mala Space havi parv 1 - 60 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६०

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ६०

मला स्पेस हवी पर्व १ भाग 60
 
 
मागील भागात आपण बघीतलं की रमणने नेहाजवळ आपल्या मनातील भावनांची कबुली दिली.नेहा अचंबित झाली. आता पुढे
 
 
त्यादिवशी नेहा कडे दोन दिवसासाठी अनुराधा मॅडम येणार होत्या. त्यावेळेस अपर्णा आपल्या घरी जाऊन परत येणार होती. नेहा मॅडमचा चहा बिस्कीट झाल्यावर अपर्णांनी ब्रेकफास्ट तयार करून ठेवला आणि नेहा जवळ तिच्या खोलीत आली ,
 
 
“मॅडम आज मी घरी जाते आहे. थोड्यावेळाने अनुराधा मॅडम येतील.त्या दोन दिवस थांबणार आहेत.”
 
“ कशाला त्यांना त्रास देतेस? मला तर बरं वाटतंय.
 
“नाही मॅडम तुम्हाला अजून पूर्णपणे बरं वाटत नाही. तुमचा थकवा गेलेला नाही. तुम्ही एकट्या राहू शकणार नाही.”
 
“अपर्णा तुझे दहा दिवस गेले .अनुराधाचे किती जातील? कशाला आपली घरं सोडून इथे राहता आहात?”
 
 
“नाही मॅडम त्या दोन दिवसच राहतील. मी येतेच तुम्ही काळजी करू नका.”
 
नेहाला मनातून या सगळ्या गोष्टींचं आश्चर्य वाटत होतं. अपर्णा, अनुराधा कोण कुठल्या? आपण बंगलोरला येतो काय ? आणि या दोघी आपल्यावर इतका जीव टाकतात काय? आपण सगळी नाती तिकडे पुण्याला सोडून इकडे आलो कारण आपल्याला मनासारखं जगायचं होतं. पण या रमणच्या वागण्याने माझ्या मनात सुद्धा काहीतरी हालचाल झालेली मला जाणवते आहे. हे योग्य आहे का? मी ही सुधीरशी प्रतारणा तर नाही करतय?
 
सुधीर अजूनही माझ्यावर तितकच प्रेम करतो हे मला माहीत आहे. पण मलाच सगळ्या गोष्टींचा, नात्यांचा इतका वीट आलेला होता की मला एकटच स्वतःबरोबर जगायचं म्हणून मी इथे आले. इथे तीन महिने माझे खरंच छान गेले. मी कधी कधी ऋषीचा फोन सुद्धा उचलत नाही कारण मला स्वतःला एकटं राहिला आवडतं म्हणून.
 
 
आता रमण आपल्या आयुष्यात आला याचं काय करावं? त्याच्याविषयी मला जे थोडं फार वाटतंय ते तेवढंच राहील की वाढत जाईल ? काहीच कळत नाही.
 
 
कोणीही एकदा कोणत्याही नात्यामध्ये गुंतलं तर त्यातून बाहेर पडू शकत नाही. हे मला माहिती आहे. त्या गुंत्यामधूनच तर मी हिरीरीने बाहेर पडले. इतकी वर्ष फार नाही प्रियंकाच्या आजारपणापासून सुरू झालेला हा नातेवाईकांचा गुंता. जो कसा सोडवायचा कळत नव्हतं. मी, सुधीर,सुधीरचे आईबाबा सगळेच या गुंत्यात अडकलो.
 
या नात्यांच्या विळख्यामध्ये आम्हा प्रत्येकाचा दम घुसमटत होता. या विळख्यातून सुटण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करत होतो पण कधी आईंच्या माहेरच्या नात्याचा गुंता होता तर कधी बाबांच्या माहेरचा गुंता होता. दोन्ही वेळेस आईबाबा मुकाट्याने विळख्याचा वळ सहन करत होते. मी आणि सुधीर काहीच करू शकत नव्हतो.
 
सुधीर बराच मोकळा होता मी मात्र सासुरवाशीण म्हणून त्या विळख्यात खोल खोल रूतत गेले. प्रत्येक वेळी रूततांना वेगळाच वळ मनावर उठत असे. प्रियंकाच्या जाण्याचं दुःख हलकं करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी येऊ नये असं माझं म्हणणं कधीच नव्हतं पण हे नातेवाईक दु:खात सामील होण्या ऐवजी आपली खाण्याची हौस मौज भागवत होते त्याचा मला तिटकारा आला होता.
 
बरं बोलायची सोय नव्हती. लगेच आजकालच्या सुना यावर चर्चा सत्रं रंगलं असतं. तेच मला नको होतं म्हणून पटत नसूनही ते सगळे वळ मी सहन केले. सुधीरला माझी धडपड, माझी नाराजी कळत होती. पण तो काय करणार? आलेल्या नातेवाईकांसमोर आपल्या बायकोची बाजू घेणार? छे: असं होणं कसं शक्य आहे का? समजा सुधीरने माझी बाजू घेतलीही असती तरी लगेच सगळे सुधीरला बायकोच्या ताटाआलचं मांजर म्हणाले असते. ते सुधीर सहन करू शकला असता का?
 
एवढा गुणी मुलगा बनण्याचा प्रयत्न करण्याची सुधीरला नव्हे कोणत्याच नव-याला काय गरज आहे?
गुणी बाळ म्हणून सुधीर शंभर पैकी शंभर मार्क्स घेऊन पास झाला आणि मी ? सून आहे तरी करत होते ना सगळं? यातील पन्नास टक्के काम तरी केलं का सुधीरने? मग मला शंभर टक्के मार्क्स पडायला हवेत तर त्या ऐवजी नातलग काय म्हणाले,
 
“ नेहा सून आहे या घरातील. तिने ही सगळी कर्तव्य पार पाडायला हवी.”
 
त्यांना आईबाबा किंवा सुधीर यांनी एकाही शब्दाने माझं कौतुक करून गप्प बसवलं नाही. का? त्या क्षणी मला जाणवलं ही सगळी नाती बेगडी आहेत.आपल्याला हवं तेव्हा चालीरितीची कुंपणं हवी तिथे वळवून घेणारी.
 
 
वैताग आला होता सगळ्यांचा. मी माझ्या वरही चिडले होते. का मी विरोध करू शकले नाही या सगळ्यांना? मला का आदर्श सून होण्याचं नाटक करण्याची हौस होती? मी तसं वागले नसते तर काय झालं असतं?
 
नातेवाईक दुरावले असते म्हणून की आपला संसार धोक्यात येईल म्हणून आपण घाबरलो आणि जुनाट विचारांचं,चालीरितीचं जू आपल्या मानेवर घेऊन फिरलो?
 
कदाचित हीच भीती असावी तेव्हा माझ्या मनात. नाहीतर आत्ता सगळे बंध तोडून इथे आले त्या ऐवजी तेव्हाच सगळ्या जुन्या विचारांना आणि चालीरीतींना अराध्य दैवत मानणा-या नातलगांना तोडून आपली स्पेस जपण्याची हिंमत केली असती.
 
याच कंटाळवाण्या नात्यांच्या गुंत्यामधून मी बाहेर पडले. आता पुन्हा रमणच्या रूपाने नवीन गुंता नको.
 
 
अपर्णा दोनदा नेहाच्या खोलीत डोकावली पण तिला नेहा तिच्याच विचारात गुंतलेली दिसली.नेहाच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. नेहाचं एकंदरीत रूप बघून अपर्णाने नेहाला हाक मारण्याची हिंमत केली नाही.
 
नेहा मधुनच स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती.यावरून अपर्णाने अंदाज लावला की नेहाच्या मनात खूप वादळ घोंघावत आहे. ते पूर्ण बाहेर पडलं तरच तिची तब्येत ठीक होईल.अपर्णा हळूच पाय न वाजवता नेहाच्या खोलीबाहेर पडली.
 
****
 
अनुराधा मॅडम नेहाच्या घरी आल्या. त्यांना बघून अपर्णा म्हणाली,
 
“ बरं झालं तुम्ही आत्ता आला “
 
“मॅडम कुठे आहे?”
 
अनुराधाने विचारलं.
 
“ मॅडमना काहीतरी खटकतंय. त्या जरा त्रस्त आहेत.”
 
“कशाने त्या त्रस्त आहेत?त्यांची तब्येत ठीक आहे ना?”
 
“काही कळत नाही ग अनुराधा? तब्येत खूप चांगली नाही अजून. थकवा आहे पण त्या कोणत्या विचारात त गुंतलेल्या आहेत मला अंदाज नाही लावता येत.”
 
“ काय झालं ?कशामुळे त्या एवढ्या विचारात आहेत?”
 
“तेच ना ! काहीच कळत नाही. कालपर्यंत खूप चांगल्या बोलत होत्या. पण कधी ! जेव्हा नाश्ता आणि जेवायला उठायच्या तेव्हा. बाकी वेळ गोळ्यांमुळे त्यांना झोप लागायची. गोळ्यांचा असर उतरल्यावर माझ्या लक्षात यायचं त्या डोळे मिटून झोपण्याचं नाटक करतात.”
 
 
“का असं का करतात ? “
 
“तेच तर अनुराधा मला कळत नाही. त्या दिवशी ताम्हाणे साहेबांचा फोन आला होता ते मॅडमना म्हणाले
‘मॅडम तुम्ही ऑफिसची काळजी करू नका. जाहिरातींचं काम चालू आहे.’ अनुराधा मध्येच मी पण त्यांना म्हटलं मॅडम एक जाहिरात आपली शूट झाली आहे .दुसरी तयार झाली आहे फक्त तुमच्या नजरे खालून घालायची आहे. त्याचं इतकं टेन्शन घेऊ नका. तुमची तब्येत आधी सांभाळा. एवढं सगळं त्यांना सांगीतलं पण कालपासून त्या आणखीनच विचारात गुंतलेल्या मला दिसतात .”
 
नेहा कधीपासून आणि कोणत्या खूप विचारात गुंतली हे अपर्णांनी मुद्दामून अनुराधाला सांगितलं नाही कारण अनुराधाला रमण शहाबद्दल फार माहिती नाही. अनुराधा रमण शहाला खूप ओळखत नाही. अनुराधाला जर ही गोष्ट कळली तर ही गोष्ट ऑफिसमध्ये पसरू शकेल ज्यामुळे नेहा मॅडम बदल गैरसमज होऊ शकतो म्हणून अपर्णांनी ही गोष्ट अनुराधाला सांगितली नाही
 
 
अपर्णाच्या बोलण्यावरून अनुराधा नेहाची काळजी वाटली.
 
“ मॅडम मी एकदा बघू का नेहा मॅडमना ?”
 
अनुराधाने विचारलं. यावर अपर्णा म्हणाली,
 
“बघ पण त्या जाग्या आहेत का झोपल्या हे मला कळत नाही. कारण कुठेतरी शून्यात दृष्टी लावून बसतात .”
अपर्णाचं हे वाक्य ऐकताच अनुराधाला आणखीन काळजी वाटली.
 
“ काय ! शून्यात दृष्टी लावून बसतात ?”
 
अपर्णाची परवानगी घेऊन अनुराधा तडक नेहाच्या रूममध्ये गेली. तिने बघितलं खुर्चीवर डोकं मागे टेकून नेहा कुठेतरी वर छताकडे नजर लावून बसलेली होती आणि नेहाच्या डोळ्यातून घळघर पाणी वाहत होतं. ते बघून अनुराधा चमकली. अपर्णाकडे तिने बघितलं अपर्णाही चमकली नेहा का रडते ?काय झालं ? कळेना शेवटी धीर धरून अपर्णा नेहा जवळ गेली आणि म्हणाली ,
 
“नेहा मॅडम काय झालं का रडताय तुम्ही?”
 
अपर्णाला बघून नेहा ढसढसा रडू लागली. नेहाला रडताना बघून अपर्णा बरोबर अनुराधालाही काही समजेना .अनुराधानी आणि अपर्णांनी नेहाला असं रडताना कधीच बघितलं नव्हतं.
 
 
अपर्णाला रमण शहा हे कारण असू शकतं असं वाटलं. पण तेवढ्याने एवढं नेहाला रडायला येईल यावर अपर्णाचा विश्वास बसेना. नेहाला अनुराधा दिसलीच नाही तिला वाटलं एकटी अपर्णाच आहे.
 
 
नेहा रडणं थांबवून म्हणाली ,
 
“अपर्णा कसं सांगू तुला ? मी नात्यांचा सगळा गुंता मागे तोडून टाकून बंगलोरला आले. तो नात्यांचा गुंता मला फार त्रास देत होता. इतके वळ माझ्या मनावर उमटले की ते मला नकोसे झाले होते म्हणून ती नाती तोडून मी बंगलोरला आले आणि इथे आता मला वेगळी नाती नाही जोडायची.”
 
“काय झालं तुम्हाला अचानक नेहा मॅडम?”
 
अनुराधाचा आवाज ऐकून नेहाचं अनुराधा कडे लक्ष गेलं नेहाने स्वतःला सावरत म्हटलं,
 
“ काही नाही असंच मागच्या काही नकोश्या जुन्या आठवणी मनात जाग्या झाल्या आणि त्यामुळे मला रडू आलं.”
 
 
नेहा मॅडमनी सारवासारव केली हे अपर्णाच्या लक्षात आलं म्हणून तिने पुढे काही विचारलं नाही. नजरेनेच नेहाला गप्प राहण्यासाठी सांगितलं. अपर्णा म्हणाली,
 
 
“मॅडम सध्या तुम्हाला बरं नाही.नका जुन्या आठवणी जाग्या करून स्वत:ला त्रास करून घेऊ. आता अनुराधा दोन दिवस राहणार आहे. मी घरचे बघून येते. अनुराधा आहे तोपर्यंत काळजी करू नका. मी औषध पाण्याचं अनुराधाला समजून सांगते.”
 
 
“ठीक आहे. मी झोपू का थोड्यावेळ?”
 
नेहाने असं विचारल्यावर अपर्णा म्हणाली,
 
“ हो चालेल झोपा थोडावेळ .पण एक अर्ध्या तासाने तुम्ही जेवायचं बर का ? म्हणजे जेवणानंतर औषध आहेत.”
 
नेहा हो म्हणून खुर्चीवरून उठली आणि पलंगाकडे जायला लागली. मधूनच तिचा तोल जात होता अपर्णा लगेच तिच्या मागून गेली आणि तिला हळूच पलंगावर झोपवलं. नेहाच्या अंगावर पांघरून टाकून अपर्णा आणि अनुराधा बाहेरच्या खोलीत आल्या .
 
 
अपर्णाने अनुराधांना म्हटलं ,
 
“नेहा मॅडम सध्या कोणत्या विचारात आहे कळत नाही. पण त्या विचाराच्या ताणामुळे त्यांना अजून थकवा येतोयं. आणि त्यात त्यांचा तोल जातोय. तुम्ही लक्ष द्या थोडसं. मधून मधून त्यांच्या खोलीत जाऊन बघा. तुम्हाला जर झोपावसं वाटलं तर त्यांच्या खोलीतच झोप बाहेर नका झोपू. बरोबर साडेअकराला त्यांना जेवायला वाढा. मी स्वयंपाक करून ठेवला आहे. मी तुम्हाला त्यांना द्यायच्या सगळ्या गोळ्या समजाऊन सांगते.”
 
अपर्णाने नेहाच्या औषधांबद्दल अनुराधाला कल्पना दिली आणि नंतर अनुराधाला सांगून अपर्णा घरी निघाली .
 
 
इकडे अपर्णा गेल्यावर अनुराधा विचार करत होती आपल्या नेहा मॅडम मध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. त्या इतक्या स्वभावाने चांगल्या आहेत की तीन महिन्यातच आपल्या ब्रॅंच मध्ये नेहा मॅडम सगळ्यांच्या लाडक्या झाल्या.
 
त्यांच्या मागे असं काय दुःख आहे? काय कळत नाही. सुखी माणसाचा सदरा कुणालाच कधी मिळत नाही हे खरंय.
 
रामदास स्वामींनी म्हटलंच आहे ,
 
“जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारी मला तूच शोधून पाहे.”
 
स्वामी तुम्ही जे बोललात ते अगदी खरं आहे.
 
नेहा मॅडम बद्दल आता अनुराधा विचार करू लागली.
 
कोणत्या नात्यांचे वळ मॅडमना सहन झाले नाही? कोणत्या नात्यांपासून मॅडमने स्वतःची सुटका करून घेतली ? असं काय घडलं असावं नेहा मॅडमच्या आयुष्यात बंगलोरला येण्यापूर्वी?
 
अनुराधा नेहा मॅडमच्या दु:खाचं मूळ शोधण्यात आपल्याच विचारात गुंतून गेली.
 
__________________________________