Mala Space havi parv 1 - 55 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५५

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५५

मला स्पेस हवी पर्व १ भाग 55
 
 
मागील भागात आपण बघितलं की जाहिरातीचं स्क्रिप्ट तयार करत असताना रमण शहा आलेला असतो जे नेहाला आवडलेलं नसतं पण ती काही बोलू शकत नाही यानंतर काय घडतं आता या भागात बघा.
 
पहिल्या जाहिरातीचं स्क्रिप्ट पूर्ण तयार झाल्यावर नेहा अपर्णाला सांगते की ते स्क्रीन रमण शहाला मेल कर म्हणजे पुढची प्रोसेस ते सुरू करतील. नेहाने सांगितल्याप्रमाणे अपर्णा करते. यानंतर जाहिरातीचं शूटिंग करण्यासाठी रमण शहा बाकी सगळी तयारी करतो. या जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी ज्या सेलिब्रिटींना बोलवायचं असतं त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो. लोकेशन ठरवतो. तारखा ठरवतो आणि त्यानंतर नेहाला फोन करतो.
 
नेहाला फोन करायचा यापूर्वीच रमण शहाने मनात ठरवलेलं असतं. जाहिरातीचं शूटिंग बघायला नेहाला बोलवायचं. सेलिब्रिटीजना भेटण्यासाठी लोक वाट बघत असतात. नेहा सुद्धा नक्की येईल. याची खात्री रमण शहाला असते .
 
या वेळेला तिला आपण आपल्या कह्यात घेण्यासाठी सगळे प्रयत्न केलेच पाहिजे. कारण नेहाने त्याच्या युक्तीला दोन्ही वेळेस प्रतिसाद न दिल्याने रमणशहाला मनातून राग आलेला असतो. त्याला आत्तापर्यंत हा अनुभव कधीच आलेला नसतो म्हणून यावेळी नेहाला आपल्या बाजूला करून घेण्यासाठी जाहिरातीच्या शूटिंगला बोलवायचं ठरवतो.
 
 
‘रमण शहा’ हे नाव फोनवर पाहिल्यावर नेहाच्या कपाळाला आठी पडते. तिला त्याच्याशी फार बोलायची इच्छा नसते पण जाहिरात जर शेड्युल केली असेल तर तो आपल्याला फोन करत असेल हे समजूनच नेहा फोन उचलते.
 
“हॅलो”
 
“हॅलो गुड मॉर्निंग मॅडम “
 
“गुड मॉर्निंग”
 
नेहा उत्तर देते.
 
“मॅडम आपल्या जाहिरातीचा शूटिंग पुढच्या आठवड्यात करणार आहे. ते शूटिंग कसं चाललंय हे बघण्यासाठी तुम्ही याव असं मला वाटतं.”
 
यावर नेहा जरा वेळ बोलली नाही नंतर म्हणाली,
 
“शहा सर ते शूटिंग वगैरे कसं चाललंय हे तुम्ही बघा. मला त्यातील काही कळत नाही.‌ तुम्ही त्यात एक्सपर्ट आहात.”
 
“नाही हो. मॅडम तुमची क्रिएटिव्हिटी जबरदस्त आहे म्हणून तुम्हाला मी आमंत्रण देतो आहे. “
 
बराच वेळ हो नाही करता करता नेहा शेवटी जाहिरात बघायला तयार होते. नेहा फोन ठेवते. रमणशहाला अर्ध युद्ध जिंकल्याचा आनंद होतो. तो जाहिरातीच शूटिंग बघण्यासाठी नेहा येईल तेव्हा काय करायचं याची युद्धनीती आखावी अशी योजना रमण शहा तयार करतो.
 
अपर्णा नेहाच्या केबीनमध्येचं असताना रमण शहाचा फोन आलेला असतो. त्यामुळे अपर्णाला उत्सुकता असते. पण ती सरळ नेहाला विचारू शकत नाही कोणाचा फोन आहे?
 
 
“ अपर्णा रमण शहांचा फोन होता. त्यांनी जाहिरातीचे शूटिंग बघायला बोलावलेला आहे.”
 
असं नेहाने म्हणताच अपर्णाच्या लक्षात येतं परवा रमण शहाच्या येण्याने नेहा फार खुश नव्हती. हे अपर्णाच्या लक्षात आलेलं होतं. तिच्याच नाही तर राजेशच्याही ते लक्षात आलं होतं. राजेश बरोबर कॅन्टीन मध्ये गेल्यानंतर रमणशहाच्या अस्वस्थतेबद्दल राजेश अपर्णा जवळ बोललेला असतो. या सगळ्या गोष्टी मॅडमनाही कळत असाव्यात . असा अपर्णाच्या कयास होता.
 
अपर्णाला आत्ताही असं वाटलं की नेहा मॅडमना सांगावं की रमण शहा हा माणूस कसा आहे? पण तिला असं सांगणं बरोबर वाटलं नाही. असंही वाटलं की नेहाच्या मनात रमण शहाबद्दल नक्की काय भावना आहे हे कळल्याशिवाय तिला रमण शहाबद्दल सगळं सांगणं बरोबर नाही म्हणून अपर्णा गप्प बसते.
 
नेहा अपर्णा बरोबर इतर जाहिराती बद्दल थोडी फार चर्चा करून तिला सांगते
 
“अपर्णा. राजेश सरांनी टूरचं प्लॅनिंग तयार केल्यानंतर त्या लेखकांना दुसरी जाहिरात करायला आपण सांगू. सांगू. “
 
“हो मॅडम “
 
यानंतर थोडीफार चर्चा झाल्यावर अपर्णा आपल्या जागेवर निघून जाते. नेहाला जाहिरातीचं शुटिंग बघण्यासाठी इंटरेस्ट नसतो पण आता तिने होकार कळवल्यामुळे तिला जाणं भाग असतं. नेहा कुठल्याही रुबाबदार माणसाला बघून त्याच्यावर भाळणारी मुलगी नसते. नेहाच्या स्वभावात एक ठेहेराव असतो. अल्लड मुलीसारखी वागणारी नसते म्हणून तिने इतके दिवस मनाची घुसमट होत असतानाही घर सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नसतो.
 
रमण शहाला नेहाच्या स्वभावाची बांधणी कळली नसते. तो इतर स्त्रियांच्या बरोबर तिची तुलना करतो. नेहाला शुटिंग बघण्यासाठी येण्याचा इतका आग्रह करावा लागला याचं त्याला आश्चर्य वाटलं. कधी कधी स्त्रिया मुद्दाम वरवर नाही नाही म्हणत असतात हा पण त्याला अनुभव असतो म्हणून तो फार टेन्शन घेत नाही.
 
*****
 
शुटिंगचा दिवस उजाडतो. रमण शहा सकाळ पासूनच ऊत्साही असतो. त्याच्या हृदयाची गती वाढलेली असते. मन गुलाबी क्षणांनी भरलेलं असतं. त्याने आज खास ड्रेसिंग केलेलं असतं.
 
रमण शहाची सकाळपासून चाललेली विशेष धडपड रमण शहाच्या बायकोच्या नजरेतून भावनाच्या नजरेतून सुटत नाही. काम करता करताच तिने रमणला विचारलं,
 
“ आज कोणी स्पेशल गेस्ट येणार आहेत का?”
 
बायकोच्या प्रश्नाने रमण धाडकन जमिनीवर कोसळला. तयार होतं असताना त्याने बायकोचा धोका लक्षातच घेतला नव्हता.
 
“ अगं जाहिरातीचं शुटिंग आहे. म्हणून जरा तयारी करतोय.”
 
रमण ने हसत ऊत्तर दिलं. आता बायकोच्या मनाचं समाधान होईपर्यंत आपल्याला खिंड लढवावी लागणार आहे हे त्याच्या लक्षात आलं.
 
“ एरवी तुम्ही असं तयार होत नाही?”
 
रमणकडे पाठ असताना हे संभाषण चाललेलं असल्याने तिला रमणच्या चेहे-यावरचे बदललेल्या हावभावांची कल्पना आली नव्हती.
 
“ तुझं काहीतरीच असतं.”
 
संभाषण तिथेच पटकन थांबवून तो घरातून बाहेर पडला.
 
गाडीत बसल्यावर त्याने कपाळावर साचलेला घाम पुसला आणि समोरच्या आरशात बघून चेहरा ठीक केला. गाडी सुरू करून रमण शहाने शुटिंगच्या लोकेशन वर जायला गाडी सुरू केली. गाडी सुरू झाल्यावर रमण पुन्हा आपल्या स्वप्नात रमला.
 
रमण शुटिंगच्या लोकेशन वर पोहोचला. तिथे त्याच्या डिपार्टमेंटचे सगळे लोकं आणि शुटिंग करणा-या टीमचे सगळे लोक आले होते. आता हिरो महेशकुमार आणि हिरोईन अमिता यायची वाट होती.
 
रमण इकडे तिकडे बघत नेहाची वाट बघत होता. तेवढ्यात त्याला नेहा समोरून येताना दिसली. तिच्याबरोबर अपर्णाला बघितल्यावर रमण शहाला जरा रागच आला. पण हा राग तो आता व्यक्त करू शकत नव्हता. कारण अजूनही नेहा त्याच्या कह्यात आलेली नव्हती. कदाचित अपर्णाने तिला काही वेगळे सांगितलं नसेल ना अशी शंका रमण शहाच्या मनात आली पण त्याने शांत राहायचं ठरवलं.
 
 
नेहा येताना दिसली तरी रमण शहा समोरच्या क्रिएटिव्ह डायरेक्टरशी गप्पा मारत मुद्दामूनच नेहाकडे लक्ष नाही असं दाखवत चक्क दुर्लक्ष करत होता. त्याच्याजवळ आल्यावर नेहाने त्याला नमस्कार केला.
 
“ गुड आफ्टरनून सर.”
 
तसं रमण शहानी मागे वळून बघितलं आणि तिला
 
“गुड आफ्टरनून” म्हटलं .
 
नेहाने विचारलं,
 
“ शूटिंग कधी सुरू होत आहे?”
 
नेहाच्या प्रश्नावर रमण उत्तरला,
 
“ अजून महेश कुमार जो आपला हिरो आहे ते अजून आलेले नाहीत त्याचबरोबर अमिता ही पण आलेल्या नाहीत.”
 
नेहाला मनातून या स्टार लोकांचा यासाठी राग येत असतो. हे स्टार्स दुसऱ्याच्या वेळेची किंमत करत नाही. तिच्या मनात जे विचार चाललेले असतात ते तिच्या चेहऱ्यावर उमटतात ते बघून रमण शाह म्हणतो ,
 
“या स्टार लोकांना त्यांच्या मर्जीची वागायची सवय असते आपण काय करू शकतो?”
 
त्यावर नेहा म्हणाली,
 
“शहा सर मी यासाठी सेलिब्रिटी नको म्हटलं होतं. यांच्या ऊस्तवाऱ्या करण्यात आपल्या कामाला लेट होतो. आता बघा आपण सगळे तयार आहोत पण हेच अजून उगवलेले नाहीत. या ऐवजी जर सामान्य माणूस घेतला असता तर ही जाहिरात कधीच शूट करून झाली असती.”
 
“ मॅडम सेलिब्रिटीमुळे जे वलय येते जाहिरातीला ते सामान्य माणसामुळे येत नाही.”
 
असं रमण शहा म्हणाले. यावर नेहाच उत्तर तयारच होतं.
 
“असं कोणी सांगितलं? सामान्य माणूस उलट जास्त पटकन रिलेट होईल. सेलिब्रिटी मुळे जाहिरातीला वलय असतं पण सामान्य लोकांच्या बोलण्यात सच्चेपणा असतो. ऐवजी सामान्य लोकांच्या द्वारे सांगितलेल्या गोष्टी इतर लोकांना पटकन कळते.”
 
रमण शहाने यावर आपलं आग्रही मत व्यक्त करून नेहाला नाराज करू इच्छित नव्हता. त्यामुळे तो गप्प बसला.
 
तेवढ्यात महेश कुमारची आणि अमिताची एन्ट्री झाली. रमणशहा लगेच पुढे झाले आणि त्यांना विश केलं
 
“ या सर. स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्याची आपण आत्ता जाहिरात करतोय त्या कंपनीच्या या टूर्स आणि ॲडव्हर्टाईजमेंट डिपार्टमेंटच्या नेहा मॅडम. अशी त्यांनी ओळख करून दिली. महेश कुमार हा सुपरस्टार आणि अमिता सुद्धा. त्यांना बघायला लोक धडपडायचे. येथे नेहाला दोन हात अंतरावरून महेश कुमार आणि अमिता या दोघांना बघायला मिळालं, बोलायला मिळालं. एखादा असता तर स्वतःच्या नशिबाचं त्याने कौतुक केलं असतं. पण नेहा अशा कौतुकात रमणारी मुलगी नव्हती. तिला तिचं काम महत्त्वाचं होतं. त्यामुळे ती औपचारिक बोलून गप्प बसली. हे अपर्णाला फार आवडलं स्वतःच्या कामाबद्दलची जागरूकता प्रत्येकाजवळ असतेच असं नाही मागच्या ऑफिसर वरून तिला कल्पना आली होती.
 
****
 
जाहिरातीच्या सगळ्या प्रोसेस मध्ये नेहा आणि अपर्णा एका बाजूला खुर्चीवर बसून बसून कंटाळलेल्या होत्या तिकडे रमण शहाचं कामात सुद्धा आणि नेहा कडे सुद्धा लक्ष होतं त्याच्या लक्षात आलं की नेहाला या गोष्टीची काही क्रेज नाही त्याच्यामुळे ती कंटाळलेली आहे.
 
मध्येच थोडा वेळ काढून रमण शहा नेहा जिथे बसली होती तिथे आला आणि म्हणाला,
 
“ मॅडम कंटाळल्या का ?”
 
“हो सर. मला या सगळ्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी येणार नाही म्हटलं होतं.”
 
नेहा का येणार नव्हती याचं मुख्य कारण तिने मनातच लपवलं. रमण शहाला तिने हे खोटं कारण सांगितलं यावर रमेश शहा म्हणाला,
 
“मॅडम बस एक दहा पंधरा मिनिटात आपला लंच टाईम होईल. त्यानंतर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही जाऊ शकता.”
 
यावर नेहा म्हणाली.
 
“ सर मला आत्ताच कंटाळा आलेला आहे. लंच टाईम पर्यंत कशाला वाट बघायची ? मी जाऊ शकते का? “ असं नेहाने विचारल्यावर रमण शहा मनातून दु:खी झाला.
 
“ साॅरी मॅडम. मी तुम्हाला हे सगळं आवडेल म्हणून बोलावलं पण आता वाटतं की उगीच जबरदस्ती केली.”
 
 
“ नाही सर जबरदस्ती नाही केली तुम्ही. मला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसल्याने मी कंटाळले. मीच साॅरी म्हणायला हवं.”
 
या जाहिरातीच्या निमित्ताने नेहाची आपण चांगली जवळची ओळख करून घेऊ असा विश्वास रमण शहाला होता तो फार मोडीत निघाला.
 
“ शहा सर त्यापेक्षा मी ऑफिसमध्ये जाऊन पुढच्या जाहिराती द बद्दल अपर्णाशी चर्चा करते.”
 
“ ठीक आहे.तुमची इच्छा.”
 
रमण शहा मनातून नाराज झाला. वरकरणी मात्र तसं त्याने दाखवलं नाही.
 
“ मॅडम जाणार कशा तुम्ही?”
 
“ कॅबने जाऊ.”
 
“ मी सोडतो तुम्हाला ऑफिसमध्ये.”
 
“ नको सर तुम्ही इथे थांबणं गरजेचं आहे.”
 
नेहाला रमण शहा बरोबर अजीबात जायचं नव्हतं.
 
 
“ आमचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहे इथे.मी पण थांबलो
नाही तर चालणार आहे. एरवी मी येत नाही.”
 
 
रमण शहाने ऊगीचच स्पष्टीकरण दिलं. नेहाने फारसं ऊत्साह दाखवला नाही त्यामुळे रमणलाही इच्छेविरुद्ध तिथे थांबावं लागलं.
 
 
रमण शहाचा निरोप घेऊन नेहा आणि अपर्णा स्टुडिओ बाहेर पडल्या.
 
रमण शहा कितीतरी वेळ नेहा गेली त्या दिशेने बघत होता. त्याची आजची सगळी तयारी फुकट गेली. नेहमी इतकं कडक मॅचींग करून तयार होऊन रमण शहा कधी येत नसे आज आला तर सगळंच मुसळ केरात गेलं.
 
नेहाला कसं आकर्षित करावं यावर सखोल विचार करायला हवा हे त्याच्या लक्षात आलं.
 
आता रमण शहाला त्या हिरो आणि हिरोईन चं पण आकर्षण वाटत नव्हतं. काही वेळ शूट थांबलं होतं त्या वेळात रमण शहाने महेशकुमार आणि अमीता ची माफी मागून महत्वाचं काम आलंय असं सांगावं लागलं. क्रिएटिव्ह टीमला सांगून रमण शहा स्टुडिओतून बाहेर पडला.
__________________________________
नेहावर इंप्रेशन मारण्यासाठी आता रमण शहा कोणती युक्ती शोधले? बघू पुढील भागात.