Mala Space havi parv 1 - 51 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५१

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५१

मला स्पेस हवी पर्व १ भाग 51
 
मागील भागात आपण बघितलं सुधीर नेहाला बाहेर फिरायला जाऊ असं तिला पण यावर नेहा प्रतिसाद देत नाही. रंजना पण तिला सांगते तू बाहेर गेलीस की तू जरा या ताणातून बाहेर पडशील मग तुझ्या मनात असलेली निगेटिव्हिटी चालली जाईल. यावर रंजनालाही नेहा प्रतिसाद देत नाही.
 
काही महिने सुधीर सतत नेहाला बाहेर जाण्याविषयी बोलत असतो पण नेहा तयार होत नाही. त्यानंतर एक दिवस नेहा सुधीरला सांगते,
 
“मला आता स्पेस हवी आहे. मला बंगलोरला प्रमोशन वर जायला मिळते आहे तिथे मी जाते आहे. मला आता सगळ्या बंधनांचा कंटाळा आलाय.”
 
ती जेव्हा हे सांगते तेव्हा सुधीरला खूप मोठा धक्का बसतो. कारण त्याला नेहा कडून ही अपेक्षा नसते. नेहा ऋषीला पण बरोबर नेणार नाही असं म्हणते. तेव्हा तर सुधीरचं डोकच चआलएनआसं होतं.
 
ती म्हणते,
 
“मला आता कोणीच नको आहे. मला एकटीला तिथे जायचंय आणि एकटच जगायचं आहे.”
 
या तिच्या म्हणण्यावर सुधीर इतका अस्वस्थ होतो की त्याला काही सुचत नाही. मुळात त्याला असं वाटतं की नेहाने घायकुतीला येऊन हा निर्णय घेतला आहे. यावर तिने परत विचार करावा पण नेहा ते ऐकत नाही ती म्हणते,
 
‘ हे माझं फायनल डिसिजन आहे.”
 
यावर सुधीर काहीच बोलू शकत नाही
 
दुसऱ्या दिवशी नेहा रंजनालाही हेच सांगते तेव्हा रंजनाही चपापते. नेहा कडून रंजनाला ही अपेक्षा नसते. ती नेहाला समजावते,
 
“नेहा तू असा टोकाचा निर्णय घेऊ नकोस.”
 
पण तरीही नेहा ऐकत नाही. नेहा सगळं सोडून बंगलोरला निघून जाते.
 
आता वर्तमान काळात बघूया काय घडामोडी घडणार आहेत.
 
नेहा बंगलोरला गेलेली आहे तिथे नेहाला ऑफिसमध्ये रुजू होऊन पंधरा दिवस झालेले आहेत. तिने ऑफिसमधलं आत्तापर्यंत झालेलं काम जाणून घेतलं आहे. आज तिची सत्यम ॲडवर्टाइजमेंट या कंपनीतील क्रिएटिव्ह हेड रमण शहा यांच्याशी ताम्हाणे साहेबांच्या केबिनमध्ये आज पहिल्यांदा भेट होणार असते.
 
ताम्हणे साहेबांचा फोन आल्यावर नेहा साहेबांच्या केबिनमध्ये जाते. नेहा केबिन मध्ये शिरते तेव्हा तिला बघून रमण शहाचे डोळे विस्तारतात. नेहा गव्हाळी वर्णाची आहे, नाकी डोळी सुंदर नसली तरी आकर्षक आहे, तिने नेव्ही ब्लू कलरचा छान ड्रेस घातलेला आहे, साधीशीच तयार झालेली नेहा रमण शहाला आकर्षक वाटते. तो पहिल्याच भेटीत नेहावर लुब्ध होतो.
 
ताम्हणे सर नेहाची रमण शहा यांच्याशी ओळख करून देतात
 
“नेहा मॅडम हे सत्यम ॲडवर्टाइजमेंट कंपनीमधील क्रिएटिव्ह हेड आहेत रमण शहा आणि शहा सर या नेहा मॅडम.आत्ताच प्रमोशन घेऊन इथे आल्या आहेत त्यांच्या काय कल्पना आहे त्या आपण ऐकू मॅडम तुम्ही बोला.
 
ताम्हणे सरांनी ओळख करून दिल्यावर नेहा रमण शहाला नमस्कार करते. दिसायला रमण शहा रुबाबदार आहे, त्याचा ड्रेसिंग सेन्स उत्तम आहे हे नेहा पहिल्याच भेटीत नोटीस करते.
 
ती स्वतःच्या कल्पना मांडायला लागते,
 
“ शहा साहेब मला वाटतं स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जाहिरात ही सेलिब्रिटी लोकांकडून न करता आपल्या ट्रॅव्हल्स बरोबर वारंवार जे प्रवासी आलेले आहेत. ज्यांनी आपल्या ट्रॅव्हल कंपनीला चांगलं रेटिंग दिले आहे अशांना घेऊन आपण जाहिरात करू शकतो. ही जाहिरात कुठल्याही स्टुडिओमध्ये जाऊन न करता त्या प्रवाशाच्या घरी शूट करूया. तो प्रवासी जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचा परिसरही त्या जाहिरातीत घेऊया. यामुळे ती जाहिरात बघताना लोकांना आपलीशी वाटेल. तो परिसर दिसला की तिथे रहाणारे लोक ही जागा नक्की ओळखतील आणि त्यांना खात्री पटेल की हे आपल्यासारखेच सामान्य प्रवासी आहेत. कोणीही सेलिब्रिटी नाही. त्यामुळे आपल्याला बुकिंग चांगलं मिळेल हा माझा तयास आहे.”
 
हे नेहाच बोलणं ऐकून रमण शहा स्तिमित झाले. नेहा दिसते जेवढी आकर्षक तेवढीच बुद्धीने ही उत्तम आहे हे रमण शहाच्या लक्षात येतं.
 
रमण शहा म्हणाला,
 
“ आपण स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सची जाहिरात आज पर्यंत सेलिब्रेटी कडूनच करत आलो आहे. तेव्हा अचानक आपण ते न करता सामान्य प्रवाशांकडून जाहिरात करून घेणे मला थोडं धोकादायक वाटतं.”
 
“ का बरं तुम्हाला हे धोकादायक वाटतं ?”
 
असं नेहाने उलट प्रश्न केला तेव्हा रमण शहा ने त्याचं स्पष्टीकरण देताना म्हंटलं,
 
“सेलिब्रिटी आणि स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स याची जाहिरात असं समीकरण लोकांच्या मनात पक्क बसलेलं आहे. तेव्हा तिथे सेलिब्रिटी नसून सामान्य प्रवासी बघून जाहीरात बघणा-यांच्या मनात काही शंका येऊ शकते. सगळ्या टूर्सची जाहिरात प्रवाशांकडूनच केली तर हा धोका आहे. कारण प्रवाशांच्या मनात शंका निर्माण झाली आणि बुकिंगच मिळालं नाही तर?”
 
यावर ताम्हणे सर म्हणाले,
 
“ नेहा मॅडम रमण शहा म्हणतात त्यात थोडं तथ्य आहे. आपण धोका पत्करणं म्हणजे खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.”
 
यावर नेहा म्हणाली,
 
“ साहेब धोका आपण कधी ना कधी कुठे ना कुठे पत्करावाच लागतो. धोका पत्करल्याशिवाय आपल्यामध्ये बदल होत नाही. खूपदा तो बदल सकारात्मक आहे असं नंतर आढळून येतं. साहेब तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आपण सगळ्या जाहिराती सामान्य प्रवाशांकडून न करता काही जाहिराती सेलिब्रिटींकडून करू आणि काही जाहिराती सामान्य प्रवाशांकडून करू हा एक मार्ग आपण अवलंबू शकतो.”
 
यावर ताम्हणे सर म्हणाले,
 
‘हा मार्ग आपण अवलंबला तर आपला धोका कमी होईल.”
 
यावर तिघांचं एकमत होतं. नंतर नेहा म्हणते,
 
“शहा साहेब मला स्क्रिप्स रायटिंग करणारा आऊट ऑफ द बॉक्स विचार करणारा लेखक हवा आहे. नेहमीची तीच रटाळ आणि छापील वाक्य लिहिणारा लेखक नको आहे. आपल्या जाहिरातीतील शब्द हटके असायला हवे असा कोणी लेखक तुमच्याकडे आहे का?”
 
रमणशहा यावर म्हणाले,
 
“आमच्याकडे लेखक आहेत. ज्यांना आम्ही लेखक द्यावा असं वाटतं त्यांना आम्ही देतो नाहीतर जे जाहिरात करायला आम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतात ते स्वतः स्क्रिप्ट लिहून देतात.”
 
यावर ताम्हणे साहेब म्हणाले,
 
“नेहा मॅडम यांच्याकडे दोन लेखक फार हुशार चाणाक्ष आणि मार्केटचं ज्ञान असलेले आहेत. त्यांच्या जाहिराती एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर आपण ठरवू.”
 
“ ताम्हाणे साहेब आपल्याकडे दोन-चार लेखक आहेत पण त्यांचं स्क्रिप्ट मी बघितलं तीच रटाळ भाषा आहे. एक जण मला छान विचार करणारी लेखिक दिसली आहे. तिला आधी आपण लिहायला देऊन पाहूया ते जर नाही आवडलं तर शहा साहेबांकडचे लेखक आपण घेऊ.”
 
 
यावर शहा म्हणाले,
 
“हरकत नाही. एक काम करता येईल एकाच टूरचं स्क्रिप्ट दोन लेखकांना आपण लिहायला देऊ शकतो. तुमचा एक लेखक आणि आमचा एक लेखक दोघेही एकाच टूरवर स्क्रिप्ट लिहून देतील. त्यातलं ज्याचं स्क्रिप्ट हटके आणि मॅडम तुम्हाला जसं आऊट ऑफ द बॉक्स विचार करणारा असं हवं आहे तसं असेल त्याचं स्क्रिप्ट आपण सिलेक्ट करू.”
 
नेहाला पण हे पटलं. ती हो म्हणते यानंतर चहा आणल्या जातो. चहा बिस्किट घेऊन नेहा तिच्या केबिनमध्ये निघून जाते.
 
नेहा निघून गेल्यावरही रमण शहा कितीतरी वेळ ती बसली होती त्या खुर्चीकडे बघत असतो.
 
“शहा साहेब “
 
ताम्हणे सरांच्या या आवाजाने रमणशहा भानावर येतो.
 
“बोला ताम्हाणे साहेब?”
 
तो म्हणतो यावर ताम्हणे म्हणतात,
 
“तुमची कल्पना मला आवडली. आता कुठला टूर न्यायचा हे नेहा मॅडम कसं अरेंज करतायेत ते बघू. एकदा टूर फायनल झाला की त्याच्यावर स्क्रिप्ट लिहायला आपण देऊया.”
 
“ठीक आहे. मग निघतो मी.”
 
रमणशहा म्हणतो.यावर ताम्हाणे साहेब धन्यवाद देत रमण शहाला म्हणतात,
 
“ शहा साहेब तुम्ही इथे आलात त्याच्यामुळे फार बरं झालं. यापुढे तुमच्या सोयीने किंवा नेहा मॅडमच्या सोयीने तुम्ही पुढचं काम कसं करायचं ते ठरवू शकता.”
 
यावर रमणशहा म्हणाला,
 
“ ताम्हाणे साहेब तुमच्याशी आमचं एवढ्या वर्षांचं टायअप आहे. इतकी वर्षे आपण एकत्र काम करतोय.अजूनही तुम्ही आम्हाला परके समजता का?”
 
“ अरे शहा साहेब गैरसमज करून घेऊ नका.अचानक
 
मी बोलून गेलो.”
ताम्हाणे हसत आपली बाजू सावरता म्हणाले.
 
“ इतक्या वर्षांचे आपले संबंध असल्याने मी इथे येणे आवश्यकच होतं. बाकी नेहा मॅडम फार सर्जनशील आणि हुशार वाटल्या मला.”
रमण शहा नेहाची तारीफ करत म्हणाला.
 
ताम्हणे सर यावर म्हणाले ,
 
“हो. पुण्याच्या आमच्या ब्रांच मध्ये त्यांच्याबद्दल खूप चांगलं मत आहे. म्हणूनच त्यांचं प्रमोशन इकडे झालं.”
 
त्यानंतर रमण शहा ताम्हणे सरांचा निरोप घेऊन केबिन बाहेर पडला. जाता जाता नेहाच्या केबिनमध्ये डोकवण्याचा मोह रमण शहा आवरू शकला नाही. रमण शहा नेहाच्या केबिनमध्ये डोकावला तर त्याला नेहा आपल्या कामात गढलेली दिसली. आताही काही क्षण रमण शहा नेहाकढे टक लावून बघत बसला.क्षणभरात भानावरही आला. भानावर येऊन सभ्य स्वरात म्हणाला,
 
“मॅडम निघतो मी”
 
नेहा खाली मान घालून कामात गुंतलेली असते.अचानक तिच्या कानावर अनोळखी आवाज येतो. रमण शहाच्या आवाज अजून तिच्या ओळखीचा झालेला नसतो.
 
नेहा मान करून वर करून बघते तर समोर रमण शाह उभा असतो. त्याला बघून तिला आश्चर्य वाटलं.ती हसली आणि म्हणाली.
 
“आपण लगेचच पुन्हा यावर बोलूया”
 
“ हो. तुमच्या कल्पना मात्र झकास आहेत.”
 
रमण शहाने हे म्हणताना नेहाकढे टक लावून बघीतलं. रमण शहाच्या त्या नजरेने नेहा क्षणभर गांगरली. स्वतःला सावरून रमण शहाला थॅंक्यू म्हणाली.
 
रमण शहा नेहाच्या केबीनपासून दूर होत स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफीसमधून बाहेर पडला. जाताना मात्र त्याच्या डोक्यात सतत नेहाचाच विचार होता.
 
रमण शहा निघून गेला पण नेहाच्याही डोक्यात रमण शहाचे विचार घोळायला लागलेले असतात. रमण शहा रुबाबदार असतो त्याच्यामुळे पहिल्या भेटीतच त्याचं समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. नेहाच्या मनावरही त्याचा प्रभाव पडलेला असतो. रमण शहाचे विचार डोक्यातून काढून नेहा कामावर लक्ष देते.
 
रमण शहा मात्र आपल्या डोक्यातून नेहाचा विषय काढू शकत नाही. स्वस्तिक टूर्स स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्या ऑफिस मधून निघून रमण शहा आपल्या ऑफिसमध्ये पोहोचतो तरीसुद्धा त्याच्या डोक्यातून नेहाचा विचार जात नाही. तो खूपच नेहाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गुंतून जातो.
 
 
 
नेहा तिची असिस्टंट अपर्णा हिला फोन करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेते. अपर्णाला आत्ताच रमण शहा बरोबर झालेल्या मीटिंगमध्ये काय ठरलय ते सांगते. यावर अपर्णा म्हणते,
 
“मॅडम हे ठीक राहील. फिफ्टी-फिफ्टी पर्सेंट चा धोका आपली कंपनी सहन करू शकेल. सेलिब्रिटी कडून बिझनेस मिळेलच. काही सामान्य प्रवाशांनी केलेल्या जाहिरातींनी जर बुकिंग नाही मिळालं तरी स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हल्सला इतकं नुकसान पोहोचणार नाही.”
 
“बरोबर आहे. अपर्णा मला हा मध्यममार्ग पटला पण तरीही माझ्या मनात अशी इच्छा आहे की पुढे जाऊन सेलिब्रिटींना बाजूला करून फक्त सामान्य प्रवाशां कडूनच आपली जाहिरात करायला हवी. दरवेळेला आपण नवीन प्रवाशांना संधी देऊ शकतो आणि माझं असं निरीक्षण आहे की लोकांना स्क्रीनवर येण्याचं आकर्षण असतं. जाहिरातीमध्ये येण्यास तर आकर्षण असतंच असतं.म्हणून आपण हा पर्याय निवडू शकतो. काही दिवसानंतर हंड्रेड परसेंट प्रवाशांची जाहिरात होईल.”
 
“पण मॅडम जर आत्ता प्रवाशांच्या जाहिरातीतून आपल्याला बुकिंग चांगलं मिळालं तर पुढे जाऊन आपण सेलिब्रिटींना काढून प्रवाशांकडून जाहिरात करून घेऊ शकतो. पण जर बुकिंग नाही झालं तर?”
 
यावर नेहा म्हणते,
 
“ अपर्णा कुठलाही बदल हा लोकांना पटकन रुचत नाही. म्हणून मी ताम्हाणे सरांना आता सांगणार आहे. मी रमण शहा समोर मुद्दाम बोलले नाही कारण त्यांचाही बिझनेस आहे. आपला जरी बिझनेस असला तरी आपल्या कंपनीसाठी किती खर्च कमी करता येईल ते बघणं आपलं काम आहे. मी ताम्हाणे सरांशी यावर बोलणार आहे. दोन-तीन जाहिराती आपण प्रवाशांकडून करून घेऊ. वेगवेगळ्या प्रवाशांना घेऊन करून घेऊ. त्या जाहिरातीनंतर आपल्याला किती बुकिंग येतं हे कळेल. तीन बुकिंग पर्यंत आपण थोडासा तोटा सहन करण्याची तयारी ठेवू. जर तोटा सहन करण्याची तयारी आपण ठेवली तर आपल्याला तोटा होईल का ही भीती राहणार नाही. ही भीती जेव्हा राहणार नाही तेव्हाच आपण धाडस करून अशा जाहिराती तयार करू शकतो. अपर्णा यावर तुला काय वाटतं?”
 
नेहाने असं विचारतात अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम तुम्ही म्हणता आहात तसं आपण करू शकतो. दोन किंवा तीन जाहिराती मधून येणारा तोटा अपेक्षित करूनच या जाहिराती आपण करू म्हणजे आपल्याला भीती राहणार नाही.”
 
“ अपर्णा एकदम परफेक्ट बोललीस.”
 
या नंतर अपर्णा नेहाला विचारलं,
 
“मॅडम स्क्रिप्ट रायटर बद्दल सुद्धा तुम्ही मागे बोलला होता. ते शहासाहेबां समोर बोललात का?”
 
“ हो. मी त्यांना सांगितलं की मला आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करणारा लेखक हवा आहे . तेव्हा ते म्हणाले, आमच्याकडे दोन लेखक असे आहे. यावर मी म्हटलं आमच्याकडेही एक लेखक मला असा दिसतो आहे. तेव्हा असं ठरलं की एकाच टूरची जाहिरात त्यांच्या लेखकांना सांगायची आणि आपल्या लेखकाला सांगायची. त्यांच्यापैकी ज्याचं स्क्रिप्ट आपल्याला हटके आणि आऊट ऑफ ती बॉक्स जाऊन विचार केलेला दिसेल ते स्क्रिप्ट आपण सिलेक्ट करायचं.”
 
“ मॅडम खूप चांगला विचार आहे. म्हणजे तिन्ही स्क्रिप्ट मधून एक निवडताना आपल्याला कठीण जरी गेलं तरी तिन्ही लेखकांची प्लस आणि मायनस बाजू कळेल. आपल्या लक्षात येईल की कोणता लेखक कोणत्या प्रकारचं स्क्रिप्ट कसं लिहू शकतो ?”
 
“बरोबर मलाही तेच वाटतं म्हणून शहा साहेबांनी सुचवलेली ही कल्पना मला लगेच पटली. कारण त्या तीन लेखकांमधून ज्या लेखकाचा जाॅनर जसा आहे त्या प्रकारचं लेखन त्यांना पुढे आपण देऊ शकतो. अपर्णा तुला ज्या लेखिकेची माहिती कळली आहे तिच्या बद्दलची माहिती प्लीज मला फॉरवर्ड कर. म्हणजे मी बघते. त्यानंतर तू त्या लेखिकेला काॅल कर.”
 
“ ठीक आहे मॅडम.”
 
“ तू आता निघालीस तरी चालेल.”
 
अपर्णा आपल्या जागेवर गेली. नेहा आपल्या समोरच्या टूर्स कश्या अरेंज करायच्या याबद्दल विचार करत होती. विचार करता करता मध्येच तिच्या मनात रमण शहा डोकावत होता. दोन-तीनदा असं झाल्यावर तिने आपल्या डोक्याला जरा एक झटका दिला
 
‘हा रमण शहा का माझ्या डोक्यात येतोय? मला आत्ता टूरचं प्लॅनिंग करायचं आहे.’
 
असं स्वतःशीच बडबडत नेहाने पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष दिले.
 
__________________________________
ही कथा मालिका आता वर्तमान काळात आली आहे.आता बघू पुढे काय होईल?