मला स्पेस हवी पर्व १ भाग ४६
प्रियंका हे जग सोडून गेली त्याला आता वर्ष झालं. या वर्षभरात निरंजन ऑफीसमध्ये जायला लागला पण प्रियंकाच्या आठवणीतून पूर्ण पणे बाहेर आला नव्हता. सुधीर आता पूर्वीसारखा रोज येत नसे. निरंजनला वास्तवाची जाणिव सुधीरने करून दिली तेव्हा तो ऑफीसमध्ये जायला लागला.
****
त्या दिवशी निरंजनच्या बाबांनी सुधीरला निरंजनला चार समजूतीने गोष्टी सांग असं म्हणाले तेव्हा सुधीर निरंजनच्या घरी मुद्दाम निरंजनशी बोलायला आला,
“निरंजन कसा आहेस?”
“कसा असणार? प्रियंका शिवाय मला हे जीवन एक रखरखीत वाळवंट वाटतं. वाळवंटात मला प्रेमाची तहान लागली आहे पण… “
एक दीर्घ नि: श्वास निरंजनने सोडला.
“निरंजन तुला काय म्हणायचंय ते मला कळतंय. अरे प्रेमाची तहान सगळ्यांनाच असते. कोणाला सहज तो प्रेमाचा झरा मिळतो. मिळाला की टिकतो .पण काही जणांच्या आयुष्यात हा झरा अकाली आटतो जसं तुझ्या आयुष्यात झालं. एक झरा आटला म्हणजे सगळं संपलं असं नाही. तू प्रियंका शिवाय जगायला शिक. तसा जगला तर कदाचित तुला दुसरा प्रेमाचा झरा सापडेल. पण तू स्वतःला सतत दु:खात कोंडून घेतलंस तर कसं होईल.?”
“पण सुधीर मला सगळं नकोसं झालंय.”
“तू एकदा दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न कर. “
“कसा प्रयत्न करू?”
हे बोलून निरंजनच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. त्या पाण्याकडे लक्ष न देता सुधीर शांतपणे म्हणाला,
“निरंजन ऑफीसला जायला सुरु कर. तुझं तुझ्या ऑफीसमध्ये नाव चांगलं असल्याने अजूनही तुला कंपनीने काढलं नाही. तुला कंपनी पगार देते. तू किती दिवस काम न करता फुकटचा पगार घेणार आहेस? मी स्पष्ट बोलतो राग आला तरी चालेल.”
सुधीर हे जरा कडक आवाजात बोलला तेव्हा निरंजनला वास्तवाची जाणीव झाली.
“निरंजन प्रियंका गेल्यामुळे तुझे आईबाबा आधीच दु:खात आहेत त्यात तूही असाच राहिलास तर त्यांनी कुणाकडे बघावं?
निरंजन प्रियंकाचं जाणं आम्हालाही दु:खी करून गेलं. माझी बहीण होती प्रियंका. लहानपणापासून मी तिला खेळवले, सांभाळलय . मी मोठा असलो तरी पुष्कळदा मला ती छान सल्ला द्यायची. माझी खूप छान सल्लागार मी गमावली आहे. निरंजन प्लीज आमच्यासाठी दु:खातून बाहेर ये. आपल्या दु:खाला फार कुरवाळू नकोस. हात जोडतो तुझ्या समोर.”
सुधीरला हात जोडलेलं बघताच निरंजन बावचळला.
“सुधीर हे काय करतोस? असे हात नको जोडूस. तू माझा चांगला मित्र आहेस. तसाच रहा. हात जोडून आपल्या मैत्रीमध्ये अंतर नको पडू देऊ.”
“तू मला मित्र म्हणतोस नं मग ऐक माझं. माणसाचं आयुष्य नदीच्या पाण्यासारखं वाहतं असावं. तलावा सारखं ठेवलं तर त्यात शेवाळे साचतं. हे शेवाळं नकारात्मक ऊर्जा असते. निरंजन तुझं आयुष्य तलावासारखं साचलेले नको बनवूस.”
खूप वेळ निरंजन काहीच बोलला नाही. तो काहीच बोलत नाही हे बघून सुधीरला टेन्शन आलं. याच्या डोक्यात काय चालू आहे ते सुधीरला कळायला मार्ग नव्हता.
खोलीच्या दाराशी निरंजनचे आईबाबा ऊभे होते. सुधीर निरंजनला काय सांगतो ते ऐकायला आणि सुधीर सांगतो ते निरंजन ऐकेल का याची उत्सुकता त्यांना होती म्हणून ते आवाज न करता खोलीच्या दाराशी उभे होते.
निरंजन आणि सुधीर एकाच वयाचे असल्याने आणि दोघं चांगले मित्र झाल्याने त्याने जरा समजुतीच्या गोष्टी निरंजनला सांगाव्या हे निरंजनच्या आईबाबांना वाटत होतं.
कोणताही दु:खद प्रसंग आला तरी त्यातून काही दिवसांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आईबाबांनी आडून आडून निरंजनला ब-याचं वेळा सांगून बघितलं होतं पण त्याने मनावर न घेतल्यामुळे त्यांना निरंजनची फार काळजी वाटू लागली. म्हणून हे काम त्यांनी सुधीरवर सोपवलं होतं. त्यांची आता सगळी आशा सुधीरवर एकवटली होती.
“निरंजन बोलत का नाहीस?”
“सुधीर माझ्या मनातून प्रियंकाचे विचार काढून टाकू शकत नाही. खूप प्रयत्न केला.”
“तू ऑफिसमध्ये जायला लाग म्हणजे तुला तुझे कलीग भेटतील. वेगळं वातावरण मिळेल. सतत घरी राह्यला तर तुझं मन सतत प्रियंकाच्या भवती फिरेल..तिच्या आठवणीत सतत गुंतून पडेल.. यामुळे तू तुझ्या दु:खातून बाहेर पडणार नाहीस.”
“हं”
“निरंजन तुझ्या आयुष्यात तुझे आईबाबा पण आहेत.हे आहे नं लक्षात?”
“हो. मी माझ्या आईबाबांना कसा विसरेन? काहीतरी प्रश्न का विचारतोस?”
“मग तुझ्या हे लक्षात आलं नाही की इतक्या दिवसांपासून तुझे आईबाबा कसे आहेत? तू तुझ्या दु:खाला कुरवाळत बसला. तुझी अशी अवस्था बघून त्यांच्या मनावर किती ताण आला असेल? हे जाणवलं का कधी तुला? “
“मी रोज बघतो आईबाबांना.चांगले आहेत ते.”
“या आठवड्यात तू किती बोललास आईबाबांशी सांग?”
“एवढं मोजत नाही बसत.”
“मग एका घरात राहून तुला कळलय का की मागचे पंधरा दिवस तुझी आई व्हायरलने आजारी होती. त्यांना खूप ताप चढल्यावर काकांनी मला फोन करून बोलावून घेतलं कारण काकूंना दवाखान्यात न्यायचं होतं पण एकट्या काकांना ते जमणार नव्हतं. तू घरीच होतास पण तू तुझ्या खोलीतच तुझं दु:ख कुरवाळत बसला होता.”
“काय आईला बरं नव्हतं?”
“हो. आत्ता दोन तीन दिवस झाले त्यांना जरा बरं वाटतं आहे. मला सांग हे तू वागतोय ते बरोबर आहे?”
निरंजन काहीच बोलला नाही.
“निरंजन मी जे बोलतो ते तुला कठोर वाटेल, तुला राग येईल पण जगात अशा अनेक प्रियंका आहेत ज्या लहान वयात कॅंन्सरने हे जग सोडून गेल्या तसेच काही पुरूषही आहेत इतक्या लहान वयात आपल्या कुटुंबाला पोरकं करून जगाचा निरोप घेतला आहे.”
निरंजन नुसतंच सुधीरकडे बघत बसतो.
“निरंजन जगातील ब-याच लोकांना आपलं दुःख कुरवाळत बसायला वेळ नसतो. तुझ्यासारखे ते आपलं दुःख कुरवाळत बसले तर त्यांना जगणं मुश्कील होईल. जगायला पैसा लागतो. निरंजन तुला भरपूर पगार मिळतो आहे. तुमचं स्वत:चं घर आहे तू महिना झाला तरी दुःख कुरवाळत बसलाय तरी तुला फरक पडला नाही. पण पुष्कळ लोकांना तुझ्या सारख्या सुखसोयी नसतात.”
निरंजन काहीच प्रतिसाद देत नसल्याने सुधीरला आता त्याचा राग येऊ लागला होता. सुधीर निराश होऊन मान खाली घालून बसला. यापेक्षा आणखी किती समजाऊन सांगायचं हा प्रश्न त्याला छळत होता.
निरंजनचे आईबाबा पण निराश झाले. आपला मुलगा असाच राहिला तर कसं करायचं? हा प्रश्न त्यांना पण छळू लागला. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दोघांच्याही डोळ्यात निराशा दिसली.
बराच वेळ वाट बघून सुधीर निरंजनला म्हणाला,
“मी निघतो.तुला काही समजुतीच्या गोष्टी सांगाव्या म्हणून आलो होतो. तुझं असं दु:खात राहणं मला बघवत नव्हतं आणि काकाकाकूंची मानसिक अवस्था बघवत नव्हती म्हणून तुला जागं करण्यासाठी एवढं बोललो. मला वाटतं तुला ते नोकरी सोडून घरी बसून दुःख कुरवाळायला बरं वाटतं आहे. तू बसं तुझं दुःख कुरवाळत. दुस-या विषयांवर गप्पा मारण्याच्या स्थितीत आलास की सांग तेव्हा भेटू.”
एवढं बोलून सुधीर खोली बाहेर आला तर त्याला खोलीच्या दाराशी निरंजनचे आईबाबा दिसले. त्यांचा तणावग्रस्त चेहरा बघून त्याचं मन गलबललं पण काही उपयोग नव्हता.
‘तू नकोस वाईट वाटून घेऊ. आमच्याच नशिबाचे भोग अजून संपले नसतील.”
निरंजनचे बाबा सुधीरला म्हणाले.
“काका मला कळतच नाही निरंजन सारखा चाणाक्ष आणि बुद्धीमान मुलगा, आज मी एवढं पोटतिडकीने बोललो तरी त्याला काहीच फरक पडला नाही. आता कोणत्या वेगळ्या पद्धतीने त्याला समजवायचं मला कळत नाही.”
“तू आज विषय काढला आहेस तर आता काही दिवस बघू तुझ्या बोलण्यावर विचार करत असेल तर ते व्यक्त करणं कदाचित आत्ता त्याला जमलं नसेल.”
“होऊ शकतं. काकू आज कसं वाटतंय?”
“आज जरा बरं वाटतंय.”
“जेवण जातंय नं?”
“ जातं कसंबसं थोडंसं”
निरंजनच्या आईचा चेहरा प्रकृती बरी नसल्याने ऊतरला होता.
“तुम्हाला बाईच्या हातचं जेवण सध्या खावंसं वाटत नसेल तर नेहाला पाठवतो. ती ऑफीसनंतर येईल आणि तुम्हाला हवं ते करून देईल. काकांनाही काही वेगळं हवं असेल तर करून देईल.”
“अरे नको. नोकरी करते रे ती. त्यात ऋषीपण लहान आहे. नको तिला उगीच तडतड नको करायला लावू. बाईंना सांगेन काय हवं ते.”
निरंजनची आई म्हणाली.
‘नेहाला त्रास होतोय का हे बघण्यापेक्षा तुमची तब्येत महत्वाची आहे. तुम्हाला गोळ्या दिल्या आहेत डाॅक्टरांनी. त्यासाठी नीट जेवावं लागेल.कसंबसं थोडंसं जेऊन चालणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी नेहाला सांगतो.”
‘सुधीर नेहा तरूण आहे म्हणून तिला किती तडतड करायला लावायची? असूदे.”
“काका तुम्ही खरंच संकोच करू नका. “
सुधीरने लगेच फोन काढला आणि नेहाला फोन केला.
“हॅलो”
नेहा पलीकडून बोलली.
“नेहा मी प्रियंकाकडे आलोय. काकूंना आजच जरा बरं वाटतं आहे पण त्यांना नीट जेवण जात नाही. तू संध्याकाळी येऊन काकूंना हलकं काहीतरी जेवायला करून देशील का? कारण काकूंना गोळ्या घ्यायच्या आहेत.”
“अरे असं विचारतोस काय? मी त्यांच्याकडे ऑफीसमधून डायरेक्ट पोचीन. पाऊणे आठ होतील. सांग त्यांना”
“हो ठीक आहे.ठेवतो. काकू पाऊणे आठ पर्यंत नेहा इथे येतेय.”
“सुधीर खरं मला अवघडल्यासारखे होतंय.”
“का?”
“अरे पोर एवढी दमून भागून येईल आणि त्यात तिला माझ्यासाठी जेवायला करायला सांगावचं जीवावर येतंरे.”
“काही अवघडून नका.. नेहाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. बरं मी निघतो.”
….
त्यादिवशी सुधीर जे निरंजनला बोलला त्याचा परीणाम दोन दिवसांनी दिसला.
“आई मी आजपासून ऑफीसला चाललोय.”
“खरच ! जा बाळा तुलाच बरं वाटेल.”
“सुधीर जे म्हणाला ते पटलं. मी प्रियंकाला विसरू शकत नाही पण ती जोपर्यंत होती तोपर्यंत मी तिची प्रामाणिकपणे सेवा केली. त्यात यश आलं नाही हे माझं दुर्दैवं. आता मी तुमच्याकडे पूर्ण लक्ष द्यायला हवं. आई तुला मधे बरं नव्हतं हे आपण एका घरात राहून मला कळलं नाही हे बरोबर नाही झालं. आई साॅरी.”
निरंजनने आईचा हात हातात घेऊन साॅरी म्हटलं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
हे सगळं निरंजनचे बाबा दारात उभं राहून बघत होते.आफला मुलगा दुःखातून बाहेर आलेला बघून त्यांना बरं वाटलं. आत्तापर्यंत त्यांच्या मनावर जो ताण होता तो दूर झाला. निरंजनला समजावण्याची जबाबदारी आपण सुधीरवर सोपवली हा योग्य निर्णय होता यांचाही आनंद त्यांना झाला.
“बाबा मी दु:खाच्या दरीतून वर आलोय. आता तुम्ही काळजी करू नका. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला.साॅरी.”
निरंजन डोळ्यातील अश्रू न थांबवता बाबांच्या डोळ्यात बघून बोलला. आपल्या हाताने त्याचे डोळे पुसत, हलकसं हसत बाबांनी निरंजनला जवळ घेतलं आणि म्हणाले,
“नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी तुला खूप शुभेच्छा.”
निरंजनने पटकन बाबांना घट्ट मिठी मारली.
आईबाबांच्या चेहे-यावर आनंद झळकला. आईने लगबगीने देवाजवळ साखर ठेवली आणि म्हणाली,
“ देवा तुझी कृपा झाली म्हणून आमच्या घरांवरचं ग्रहण सुटलं. निरंजन वर अशीच कायम कृपादृष्टी ठेव हीच तुझ्या जवळ प्रार्थना करते.”
आईने शांतपणे आणि प्रसन्न चेहऱ्याने देवाला नमस्कार केला.
________________________________
पुढे आता काय घडेल बघू पुढील भागात.