Mala Space havi parv 1 - 26 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २६

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २६

मला स्पेस हवी पर्व १ भाग भाग २६

मागील भागात आपण बघीतलं की सुधीर नेहाच्या उत्तराची वाट बघत होता.बघू या भागात काय होईल?


नेहा बराच वेळ बोलली नाही तेव्हा सुधीरचा जीव कासावीस व्हायला लागला. शेवटी त्याने धीर करून विचारलंच,

"तुमचा काय निर्णय आहे तो ठरला की मला सांगा मी निघतो."

असं म्हणून सुधीर निराश होऊन जायला निघाला तसं नेहा म्हणाली,

"मी तयार आहे."

हे ऐकताच सुधीर गर्रकन मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर अशक्य गोष्ट प्राप्त केल्याचा आनंद त्याच्याही नकळत उमटला. सुधीरचा इतका आनंदात चेहरा बघून नेहा लाजली.

"मी सांगू बाहेर की तू मला पसंत आहे."

नेहाने होकारार्थी मान हलवली. तसा घाईने बाहेर येता येता सुधीर नेहाला "थॅंक्यू "म्हणाला.


बाहेर सगळे गप्पा मारत होते पण प्रत्येकाचे कान मात्र आतल्या खोलीत बोलत असणा-या सुधीर आणि नेहाकडे होते.

सुधीर बाहेरच्या खोलीत आला तोच मुळी हसतहसतच. बाहेरची मंडळी सुधीरचा हसरा चेहरा बघून समजली. सगळ्यांनी एकमेकांना नेत्रपल्लवीने सुधीरच्या आनंदी चेहऱ्यामागचं रहस्य सांगितलं.

नेहाच्या आईने सुधीरचा हसरा चेहरा बघून सुटकेचा निःश्वास सोडला.प्रणाली चटकन आत गेली.

"इशारो इशारे में ऐसां हुआ! अगं काय?"

नेहाला बघून प्रणालीने तिला कोपरखळी मारली.यावर
नेहा फक्त हसली.

"नेहा कसा वाटला ग सुधीर?"

"छान आहे."

"काही बोलला का?"

"दोन चार वाक्य बोलला."

"बस्स!"

"पहिल्याच भेटीत किती बोलणार? तुला तर माहीती आहे माझा स्वभाव."

"हरकत नाही. यानंतर भेटा बोला. मग कधी करायचा साखरपुडा की एकदम लग्न?"

"तुम्ही जसं ठरवाल तसं"

"ओ हो किती आज्ञाधारक मुलगी आहे. नेहा आपण पुढच्या वर्षी करायचं का लग्न?"

"प्रणाली काहीतरी काय ग?"

'आम्ही म्हणतोय या वर्षी साखरपुडा करू पुढच्या वर्षी लग्न."

"प्रणाली तू नं माझा जीव घेऊ नकोस."

असं म्हणून नेहाने प्रणालीला बुक्की मारण्यासाठी हात उगारला तो पकडून प्रणालीने हसत हसत नेहाला मिठीत मारली.


"मुलाला मुलगी पसंत आहे. मुलगी काय म्हणते बघा."

सुधीरचे बाबा म्हणाले.

आनंदाने घायकुतीला येऊन सुधीर म्हणाला,
"नेहाला पण मी पसंत आहे."

सुधीरचं हे बोलणं ऐकून सगळे हसायला लागले तेव्हा सुधीरला आपली चूक कळून तो लाजला. तेवढ्यात प्रणालीने बाहेर येऊन सांगितलं की नेहाला सुधीर पसंत आहे.

"मी आमच्या गुरूजींना विचारतो की कोणता दिवस दोघांसाठी शुभ आहे तसं तुम्हाला कळवतो."

"हो ठीक आहे. चला निघतो आम्ही."

असं म्हणून सुधीरचे बाबा,आई, प्रियंका सगळे बाहेर जायला निघाले. सुधीरच्या बाबांनी मागे वळून पाहिले तर सुधीर आपल्याच विचारात अजूनही खुर्चीचा बसून होता.

'सुधीर आपल्या घरी जायचं नं? की आजच लग्नं करायचं?"

या वाक्याने सुधीर भानावर आला.घाईगडबडीने खुर्चीतून उठला.त्याचं हे बावचळलेपण बघून सुधीरच्या बाबांनी हसतच नेहाच्या बाबांच्या हातावर टाळी दिली. तसे सगळेच हसले. सुधीर लाजून घाईने नेहाच्या घराबाहेर पडला.

****

आता दोन्ही घरी सुधीर आणि नेहाला चिडवणं सुरू झालं.

"आई आता दादा मला विसरणार हं"

"काहीतरी काय बोलतेस प्रियंका."
सुधीरची आई म्हणाली.

"काल कसा विसरला आपल्या घरचा रस्ता?"

सुधीरने एक टपली प्रियंकाच्या डोक्यावर मारली.

"काय ग खूप चुरूचुरू बोलायला लागलीस आजकाल."

"दादा मी करवली आहे. तू मला राग आणू नकोस."

प्रियाच्या या बोलण्यावर सुधीरने तिचा गालगुच्या घेत म्हटलं ,
"अग तू नुसती करवली नाहीस ग माझी सोनपरी आहेस."

यावर सुधीरची आई बाबा दोघे हसले. सुधीरच्या घरी जसं वातावरण होतं तसंच वातावरण नेहाच्या घरी पण होत. नेहाला पण आता जाता येता प्रणाली चिडवू लागली म्हणायला लागली,

"आई बघा आजकाल नेहा आपल्याला विसरायला लागली आहे."

हे असं ऐकताच नेहा थोडीशी लाजायची म्हणायची,
"प्रणाली नको ना ग किती किती चिडवशील."

हळूहळू साखरपुड्या जवळ आला तसं दोन्ही घरी लगबग सुरू झाली. साखरपुड्याची जागा नेहाच्या बाबांनी त्यांच्या घराजवळ असलेले एका कार्यालयात बुक केली

साखरपुड्याचा दिवस उद्यावर येऊन ठेपला तर दोन्ही घरी खूपच धावपळ सुरू झाली सगळ्यांना आमंत्रण पोचली आहेत की नाही हे पुन्हा एकदा तपासून पाहिल्या गेलं.

"अहो लिलावन्संना आमंत्रण दिलं नं ?"

"हो त्याच दिवशी दिलं असं काय करतेय बावचळल्यासारखं?"

"तुमच्या दोघी बहीणी मला बावचळूनच टाकतात. त्यांना रूसायला कोणतंही कारण चालतं. कधी या दोघींचे गाल फुगतील सांगताच येत नाही."

"बरं बरं माझ्या बहिणींना एवढं नाव ठेवायला नकोय. तुझे ते अमरावतीचे मामा आहेत नं त्यांची काळजी घे."

"दत्ता माणसाचं काय म्हणता?"

"त्यांना पण रुसायला कारण लागत नाही."

"मी तुमच्या बहिणीं बद्दल म्हटलं म्हणून लगेच माझ्या मामाला येऊ नका."

"नेहा तुझं लग्न म्हणजे आमच्या दोघांमध्ये जुगलबंदी रंगणार दिसते."

असं नेहाकढे बघून तिचे बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले. यावर नेहापण हसली.

"हसा दोघंही. इकडे माझी धावपळ कोणाला दिसत नाही."

"आई तुम्ही कशाला पॅनीक होताय? बाबा आणि नेहा दोघंही हसतात आहे. तुमची गंमत बघतात आहे."
प्रणाली म्हणाली.


"दिसतय मला मी तुझ्या आधीपासून तुझ्या सास-याला ओळखते. फार गरीब सिंह आहे."

नेहाच्या आईने हे वाक्य बोलताना असा काही आविर्भाव केला आणि हातवारे केले के ते बघून नेहा, नेहाचे बाबा, प्रणाली,अक्षय सगळे हसायला लागले.

"हसा मी एक एन्टरटेन्मेंट चॅनलच आहे तुमच्यासाठी."

आत्तापर्यंत चिडलेला भाव असलेला नेहाच्या आईच्या चेह-यावर हलकसं हसू ऊमटलेलं बघून सगळे रिलॅक्स झाले.

***

"सुधीर आपण नेहासाठी जी साडी घेतली आहे तिचं ब्लाऊजपीस मी दुकानदार कडून काढून घेतलय ते आजच तिला नेऊन दे. म्हणजे तिला ब्लाऊज शिवता येईल आणि तेवढंच तुला तिला भेटण्यासाठी कारण मिळेल.


सुधीरकडे बघत हसत आई म्हणाली

"आई तुला आवडली आहे नं होणारी सून?"

"कारे? मी जर आवडली नाही असं म्हटलं तर नकार कळवशील नेहाला?"

आईने असं म्हणताच सुधीरचा चेहरा पडला.

"आई साॅरी मला ती मुलगी आवडली तर मी तुमची इच्छा विचारायचं विसरलो.."

"अरे वेड्या मी गंमत केली. लग्न तुला करायचं आहे तुला ती आवडायला हवी. फक्त आमच्या इच्छा पूर्ण करणारी मुलगी सून म्हणून आणून काय उपयोग? तू तिच्याबरोबर आनंदाने नाही राहू शकला तर काय उपयोग? नेहा आम्हाला पण आवडली आहे. मुख्य म्हणजे तिच्या घरीपण सगळे एकत्र राहतात त्यामुळे ती आपल्या घरी छान रुळले."

"हे मी तिला विचारलं की आमच्या घरी आम्ही सगळे एकत्र राहतो तर म्हणाली आम्ही पण एकत्र राहतो मला सवय आहे."

"छान आहे मग ती चटकन रूळेल आपल्या घरी. ऑफीसमधून परस्पर जाणार आहेस का नेहाला भेटायला?"

"हो."

म्हणत सुधीर आनंदाने ऑफीसमध्ये निघाला. आईला सुधीरच्या चालीत झालेला बदल कळला. त्या आनंदीत झाल्या.त्यासुद्धा खूश होत्या कारण त्यांच्या मुलांचं सूख बघून त्यांचाही जीव सुपाएवढा होणार होता.हसतच त्या उरलेली काम आटोपायला स्वयंपाक घरात शिरल्या.

****

ऑफीसमध्ये शिरल्या शिरल्या सुधीरने नेहाला फोन लावला. फोनची रिंग वाजत होती पण समोरून फोन ऊचलल्या जात नव्हता. सुधीर अस्वस्थ झाला. निशांतचं मघापासून त्याच्या कडे लक्ष होतं. निशांतने खुणेनेच त्याला काय झालं म्हणून विचारलं.

सुधीरने फोन बंद करून निशांतला मेसेज केला. तो मेसेज वाचून निशांतने स्माईली पाठवलं आणि लिहीलं इतका उतावीळ होऊ नकोस तीपण नोकरी करते. गडबडीत असेल

हा मेसेज वाचल्यावर सुधीरला स्वतःच्या ऊतावीळपणाचं हसू आलं. ओके म्हणून त्याने निशांतला रिप्लाय केला आणि कामाला लागला.

सुधीर कामात असतानाच नेहाचा फोन आला.स्क्रीनवर नेहाचं नाव बघताच सुधीरच्या अंगावर रोमांच उठले. गोड शिरशिरी कशी असते याचा अनुभव आत्ता सुधीरला आला. फोन कट होण्याआधी त्याने चटकन फोन घेतला.

"हॅलो."

"हं फोन केला होता?"
नेहाने विचारलंं.

"हो तुला जी साडी आम्ही साखरपुड्यासाठी घेतली आहे तिचं ब्लाऊजपीस आईने आज तुला देण्यासाठी मला सांगीतलं आहे. कुठे भेटू शकतो?"

"माय माऊली मध्ये भेटूया. "

"चालेल साधारण किती वाजता?"

"सातनंतर."

"ठीक आहे. मी पोहचतो तिथे . तू कशी येणार आहेस?"

"अरे माझ्या जवळ गाडी आहे. भेटू तेव्हा बोलू."

"हो चालेल."

नेहाने फोन ठेवला. कितीतरी वेळ नेहा सुधीरच्या विचारात बुडाली ते तिलाही कळलं नाही. इकडे सुधीरचीही तीच अवस्था झाली होती.

निशांत दुरूनच सुधीरची देहबोली एन्जॉय करत होता. लंचटाईममध्ये कालच्या कार्यक्रमाबद्दल सुधीरला विचारायचं आणि त्याला चिडवायचे निशांतने मनाशी ठरवलं आणि तो कामाला लागला.

__________________________________
नेहा आणि सुधीर भेटल्यावर बघू काही बोलतात की फक्त लाजतात! बघू पुढील भागात.