Mala Space havi parv 1 - 21 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २१

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २१

मला स्पेस हवी पर्व १ भाग २१

मागील भागात आपण बघीतलं की नेहा ताम्हाणे साहेबांना आपली टूरप्लॅनींगबरोबर जाहिरातीमधील नव्या कल्पना सांगते. ताम्हाणे साहेबांनी संचालक मंडळामध्ये या कल्पना मांडल्या होत्या .संचालक मंडळाला त्या कल्पना आवडल्या की नाही हे आज कळेल.


सकाळी नेहा ऑफीसमध्ये पोचली. दहा मिनिटातच नेहाच्या टेबलवरचा इंटरकाॅम वाजला. नेहाने फोन ऊचलला.

" हॅलो

"नेहा मॅडम ताम्हाणे बोलतोय."

"गुड मॉर्निंग सर"
नेहा म्हणाली.

"गुड मॉर्निंग. काल संचालक मंडळासमोर मी तुमच्या कल्पना मांडल्या त्यांना आवडल्या. त्यांना आणखी डिटेल्स हवे होते. ऊद्या पुन्हा मिटींग घ्यायची हे अध्यक्षांच्या संमतीने ठरलंय. या मिटींग मध्ये फक्त तुम्ही मांडलेल्या कल्पनांवर चर्चा होणार आहे. तुम्ही व्यवस्थित तयारी करून या. होऊ शकतं तुमच्या कल्पना उद्याच्या मिटींग मध्ये सर्वानुमते मान्य होऊ शकतात. तर ऊद्या शार्प दहा वाजता आपल्या काॅन्फरन्स रूममध्ये या."

"हो सर. "

"ठीक आहे फोन ठेवला तरी चालेल."

"हो सर."

नेहाला प्रचंड आनंद झाला. ऊद्या काय मुद्दे मिटींगमध्ये मांडावेत यांचे विचार नेहाच्या डोक्यात सुरू झाले.

****

अपर्णाला ही बातमी सांगण्यासाठी नेहाने इंटरकाॅम वर तिचा नंबर डायल केला.

" हॅलो'

"अपर्णा नेहा बोलतेय."

"मॅडम गुडमाॅर्निंग"

"गुड मॉर्निंग. ऐक नं आत्ताच ताम्हाणे साहेबांचा फोन आला होता. संचालक मंडळासमोर त्यांनी माझ्या टूर आणि जाहीरातीबद्दलच्या कल्पना मांडल्या. त्यांना आवडल्या ऊद्या संचालक मंडळाने फक्त या विषयावरच चर्चा करायला मिटींग ठेवली आहे."

"मॅडम काॅन्ग्रॅज्युलेशन."

"थॅंक्यू. एक काम कर. मला जरा दोन तीन वर्षांतील जाहिराती किती सेंकदाच्या टिव्ही वर आल्या. त्यात कोण सेलिब्रिटी होते. त्यांचं मानधन किती दिलंय आणि टीव्हीवरचे किती चार्जेस लागले हे जरा मला कागदावर लिहून पाठवा. तसंच प्राईम स्लाॅटसाठी किती चार्जेस आहेत. कोण कोणत्या पेपरमध्ये जाहिराती येतात.त्यात किती चार्जेस आहेत ते सांग."

"हो मॅडम लगेच आणून देते."

अपर्णा नंतर राजेशला फोन लावते

"राजेश सर नेहा बोलतेय"

"गुड मॉर्निंग मॅडम"

"गुड मॉर्निंग. ऐका आज ताम्हाणे सरांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या कल्पना संचालक मंडळासमोर ठेवल्या.संचालक मंडळाला त्या आवडल्या आहेत."

"काॅन्ग्रॅज्युलेशन मॅडम."

"थॅंक्यू. मला जरा दोन वर्षांच्या मोठ्या ट्रइपचए डिटेल्स द्या आणि दोन वर्षांत छोटे टूर आखले असतील तर त्यांचे डिटेल्स मला कागदावर लिहून आणून द्या. आजच लंचटाईमच्या आधी हे काम करा. ऊद्या संचालक मंडळासमोर मला या नवीन कल्पनां वर डिटेल्स देऊन बोलायचं आहे.म्हणून प्रायोरिटीवर हे काम करा. ओके"

"हो मॅडम मी अर्ध्या तासात तुम्हाला हवी ती माहिती देतो."

"ठीक आहे."
"ओके मॅडम."

नेहा फोन ठेवते पण अजून तिचा स्वतःवर विश्वास बसत नाही की आपल्या कल्पना संचालक मंडळाला आवडल्या आहेत. जाहीराती संबंधी तिला पुण्याला असतानाच या कल्पना सुचल्या होत्या पण तिच्याकडे तेव्हा जाहीरात विभाग नव्हता म्हणून या कल्पना तिच्या डोक्यातच राहिल्या.

पुण्याला असताना ती टूर प्लॅन करत असे.त्यात तिच्या कल्पना तिने राबवल्या. आता जाहिरातीत सुद्धा तिच्या कल्पना तिला राबवता येतील पण त्या व्यवस्थितरित्या संचालक मंडळासमोर मांडाव्या लागतील तेव्हा त्या कल्पना संचालक मंडळाला पटतील . त्या जर पटल्या तर प्रत्यक्षात उतरणार होत्या.म्हणून उद्याची मिटींग नेहासाठी आणि तिने मांडलेल्या कल्पनांसाठी महत्वाची असल्याने नेहा मिटींगच्या तयारीला लागली.

****

नेहा उद्याच्या कामातच होती की तिचा फोन वाजला. फोनच्या स्क्रीनवर तिच्या आईचं नाव झळकलं.नेहाला आईचा फोन घेण्याची अजिबात इच्छा नसूनही तिने फोन ऊचलला.

"हॅलो"

"मला वाटलं आजपण तू फोन ऊचलणार नाही."

"असं का वाटलं तुला?"

"कालचा तुझं वागणं बघता मला असं वाटलं."

"आई काल एक तास मिटींग चालली.तुझा फोन कशी घेणार मी?"

"तू बंगलोरला गेल्यापासून एकही फोन केला नाहीस का तुला फोन करून तू नीट पोचलीस हे सुद्धा कळवावसं नाही वाटलं?"

"आई वेळ नाही मिळाला नवीन ठिकाणी आल्यामुळे सगळं बस्तान नीट बसवण्यात वेळ गेला.?"

"कळतंय मला पण एक मेसेज तर करू शकत होतीस."

"समजा मी मेसेज केला असता तर तेवढ्याने तुझं समाधान झालं असतं?"

"निदान पोचली आहे एवढं तरी कळलं असतं."

"तुझं तेवढ्याने समाधान होणार नाही हे मला माहीत होतं म्हणून मेसेज केला नाही."

"मी आई तुझी हे लक्षात येतय का?"

"अगं तू माझी आई आहे हे जगजाहीर आहे. ते लक्षात कशाला ठेवायला हवं?"

"उत्तर देऊ नकोस त्यातील भावना लक्षात घे."

"घेतली पुढे बोल?"

"पुढे बोल काय मी तुला कथा सांगत नाही."

"तू कथा सांगू शकत नाही. तू फक्त चुका दाखवून उपदेश करू शकतेस"

"काय म्हणावं या मुलीला?"

"आई मला एक फोन येतोय तू मला ऑफिसटाईम मध्ये फोन करत नको जाऊ.ठेवते."

"अगं'

आईचं बोलणं पूर्ण होऊ न देताच नेहा फोन कट केला.

फोन टेबलवर ठेवून ती खुर्चीवर मागे डोके टेकवून डोळे मिटून शांत बसली.

तिच्या मनाचा संताप होत होता. सतत तिला उपदेश करणा-या आईसकट सगळ्यांचा संताप येत होता. तिला गंमत वाटली की लोकांना स्वतःच्या आयुष्याकडे डोळसपणे बघण्याची गरज वाटत नाही का सतत दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून बघतात? काय गरज असते याची?

माझ्या घरच्यांना मी अजूनही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे असं वाटतंच नाही. काय करावं. मेंदू बधीर झाला आहे.

नेहा कितीतरी वेळ अशीच बसली होती.

"मॅडम हे घ्या डिटेल्स."
आवाज ऐकून नेहाने डोळे उघडले.

"अं"

अपर्णा नेहाने सांगीतलेले सगळे डिटेल्स घेऊन आली होती.

"मॅडम तुम्हाला बरं वाटत नाही का?"

"अगं बरंय.जरा डोळे शिणल्या सारखे वाटले म्हणून जरा वेळ डोळे मिटून बसले. बाकी काही नाही."

"मॅडम तुम्ही ज्या सूचना आणि बदल सुचवले ते संचालक मंडळाने ऊद्या मान्य करावे अशी देवाला प्रार्थना करतेय"

"थॅंक्यू अपर्णा या जाहिराती मधील कल्पना पुण्यात असल्यापासून माझ्या डोक्यात आहे. तेव्हा हा विभाग माझ्याकडे नव्ह्ता आता आलाय म्हणून लगेच मी या कल्पना मांडल्या."

"मॅडम तुमची ही स्पर्धा घेण्याची कल्पना मला फारच आवडली. "

"मला चार्जेस आणि वेळ यांचे डिटेल्स हवे होते ते कुठे आहेत?"

"हे इथे आहे. हा हा बघा या कागदावर लिहीलय."
"अच्छा "

नेहा टिव्ज्हीवरच्या जाहिरातींचे स्लाॅट आणि किंमत बघत होती.

"ठीक आहे जा तू. मला काही अडचण आली तर मी तुला विचारीन."
नेहा अपर्णाला म्हणाली.

"ठीक आहे."

अपर्णा आपल्या जागेवर गेली

नेहा काळजी पूर्वक सगळे डिटेल्स बघत होती तेव्हाच राजेश नेहाला हवेत डीटेल्स घेऊन आला.

"मॅडम हे डिटेल्स."

"हं ठेव मी बघते."

"मी गेलो तर चालेल?"

राजेशने विचारलंं.

"हो."

नेहाने हो म्हणताच राजेश आपल्या जागेवर गेला.

****

नेहा टूर आणि जाहीरात यांचे डिटेल्स बघत तिच्या नोट्स काढत होती.

तिच्या दृष्टीने ऊद्याचा दिवस महत्त्वाचा असल्याने ती पूर्ण पणे तयारीत गुंतली.

***
मॅनेजर ताम्हाणे यांचा फोन वाजला.

"हॅलो गुड मॉर्निंग सर."

"गुडमाॅर्निंग ऊद्या त्या नवीन मॅडमच्या कल्पनांवर चर्चा करण्यासाठी आपण मिटींग सकाळी दहा वाजता ठेवली आहे ती जर लंचटाईम नंतर ठेवता आली तर मला येता येता येईल. इतरांना विचारून बघा."

"ठीक आहे सर.'

"जर सगळ्यांना जमत असेल तर ठीक नाहीतर मग ठरल्या वेळी मीटिंग घ्या फक्त मी उपस्थित राहू शकणार नाही."

"सर तुमची तब्येत ठीक आहे नं?"

"हो. तब्येत एकदम छान आहे. मला थोडं पर्सनल काम आहे. त्यासाठी मला जायचय."

"ठीक आहे सर मी विचारतो सगळ्यांना आणि तुम्हाला कळवतो. ठीक आहे. बाकी नवीन मॅडम मध्ये स्पार्क आहे ताम्हाणे. वेगळा विचार करण्याची ताकद आहे त्यांच्यात."

"हो सर ."

"ठीक आहे. इतरांना विचारून मला कळवा."

"हो सर."

ताम्हाणेंनी फोन ठेवला. इंटरकाॅम वरून नेहाला त्यांनी फोन लावला.

"हॅलो सर'

"नेहा मॅडम उद्याची मिटींग सकाळी दहाची मिटींग पोस्टपोन होऊ शकते किंवा ठरल्याप्रमाणे दहा वाजताच होऊ शकते."

"असं अनिश्चित का आहे ?"

"दातार सरांना जरा पर्सनल काम आहे त्यामुळे ते दहा वाजता हजर राहू शकणार नाहीत.त्यामुळे लंच नंतर ठेवता आली तर बघा म्हणाले. मी इतरांना फोन करून विचारतो. कोणाला जमतय ते बघतो. मी कळवतो तुम्हाला."

"ठीक आहे सर."

नेहाच्या मनात वेळेबद्दल अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे जरा धाकधूक निर्माण झाली. तरी तिने न सोडता छान तयारी करायची असं स्वतःच्या मनाला बजावलं.
___________________________________
संचालक मंडळालाच्या मिटींग मध्ये काय होतं बघू पुढील भागात.