मला स्पेस हवी भाग ४-
मागील भागात आपण बघीतलं की रंजना नेहाची मैत्रीण तिला समजवायचा प्रयत्न करते पण नेहा तिचं म्हणणं ऐकून घेत नाही.पुढे काय होईल बघू.
रात्री जेवताना शांतता होती. ऋषीची बडबड चालू होती पण एरवी सारख्या गप्पा रंगत नव्हत्या. सुधीर आणि नेहा दोघेही गप्प गप्प होते. सुधीरच्या आईने नजरेने सुधीरच्या वडलांना या दोघांना काय झाले विचारलं. त्यांनी मान माहीत नाही अशी हलवली .शेवटी सुधीरची आई बोलली,
"काय आज जेवताना मौनव्रत घेतलंय का दोघांनी?"
आईच्या बोलण्याकडे सुधीरचं लक्ष नव्हतं
"नेहा काय झालं? आज तुम्ही दोघंही शांत शांत आहात? वादावादी झाली का दोघांमध्ये?"
"नाही. आई रोजच्या सारखंच तर बोलतेय मी."
"अगं मला कळतात आता माणसं. सांग काय झालं आहे ? आम्ही दोघं काही मदत करू शकतो का ?"
थोडावेळ नेहा काहीच बोलली नाही तिच्याकडे बघत ऋषीने विचारलं
,'आई तुला काय झालं? तू थकली का? तुझं डोकं दुखतंय का? थांब मी जेवण झाल्यावर तुझ्या डोक्याला बाम लावून देईन."
ऋषीचं हे बोलणं ऐकून सुधीर मनातून कळवळला मनातच म्हणाला
"ऋषी नको इतका जीव लावू रे तुझी आई आता दगड झाली आहे. ती तुझ्या प्रेमाने विरघळणार नाही."
सुधीर एकदा ऋषीकडे आणि एकदा नेहाकडे बघत होता.
"नेहा खरच तुझी तब्येत ठीक नाहिये का ?"
सुधीरच्या आईने पुन्हा विचारलं.
"मला बरंय.आई मला प्रमोशन मिळालय."
"अरे वा ही तर आनंदाची बातमी आहे. मग एवढी गंभीर का?"
"प्रमोशन घेतलं की मला बंगलोरला जावं लागेल."
"हो का! ते जमणार आहे का?"
सुधीरच्या आईने विचारलं.
"किती वर्षासाठी ?" सुधीरच्या बाबांनी विचारलं.
"सध्या तरी दोन वर्ष"
नेहा म्हणाली.
"तू एकटी जाणार?" सुधीरच्या आईने विचारलं.
"हो."
"ऋषी कसा राहील?"
"आई तुम्ही आहात नं सगळे ."
'तू काय दर आठवड्याला येशील का?"
"बघीन. सुट्टी मिळायला हवी."
"तशी आलीस तर ऋषी इथे राहील. मध्येच एखाद्या आठवड्यात सुधीर आणि ऋषी तिकडे येतील."
सुधीरच्या आईने असं म्हटल्यावर नेहाने काहीच उत्तर दिलं नाही. नेहा काहीतरी बोलेल म्हणून सुधीरची आई तिच्याकडे बघत होती.
"नेहा तुझा प्रमोशन घेण्याचा निर्णय पक्का झाला का?"
नेहा काहीच बोलत नाही बघून सुधीरच्या बाबांनी विचारलं.
"हो."
"तिथे गेल्यावर सुरवातीला राहशील कुठे?"
सुधीरच्या बाबांनी विचारलं.
"कंपनी घर बघणार आहे. जोपर्यंत घर मिळत नाही तोपर्यंत हाॅटेलमध्ये राहीन."
"ऐ..मस्त आई तुझ्या बरोबर मीपण हाॅटेलमध्ये येतो राह्यला."
ऋषी आनंदाने ओरडला. नेहा ऋषीच्या बोलण्याने दचकली.
"ऋषी असं कोणालाही हाॅटेलमध्ये राहू देत नाही. आई त्या कंपनीत नोकरी करते नं म्हणून तिलाच फक्त तिथे राहू देतील."
सुधीरने बाजू सावरली पण नेहाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. नेहा खाली बघून जेवत होती.
"का असं का मी मुलगा आहे नं तिचा."
"हो तू मुलगा असलास तरी कंपनीचा तसा नियम असतो. जे लोक कंपनीत काम करतात त्यांचीच हाॅटेलमध्ये राहण्याची सोय करतात."
सुधीर सगळं बळ एकवटून बोलला.
नेहाला आता हे प्रेमाचं आवरण नकोनकोस झालं होतं ती अगदी गप्प होती.सुधीरच्या आईवडिलांना नाही म्हटलं तरी नेहाचं वागणं विचीत्र वाटलं
"सुधीर तुला पटलं नाही का नेहाचं बंगलोरला जाणं."
सुधीरच्या बाबांनी विचारलं.
"फारसं पटलं नाही."
सुधीर ने आत्ताही नेहाकडे रागाने बघतच ऊत्तर दिलं
"नेहा ऋषीसाठी म्हणून परत एकदा विचार कर"
सुधीरची आई म्हणाली
'नाही आई मला जायला हवं माझ्या करियरचा प्रश्न आहे."
"कळतंय आम्हाला तुझ्या करियरचा प्रश्न आहे पण ऋषी लहान आहे अजून .आठवडाभर तो राहू शकेल का तुझ्या शिवाय?"
"सुरवातीला एक आठवडा नाही राहणार मग होईल त्याला सवय."
नेहाचं इतकं निर्विकार आवाजातील उत्तर ऐकून सुधीरचे बाबा चकीत झाले.
"ठीक आहे जे तुम्हाला ठीक वाटेल तसं करा."
नेहाने कोणाचाही विचार न करता माझं जेवण झालं असं म्हणून आपलं ताट घेऊन नेहा सरळ उठली आणि स्वयंपाक घरात गेली ताट तिथे ठेऊन आपल्या खोलीत निघून गेली. सुधीरचे आईबाबा नेहाचं हे वागणं बघून चकित झाले. रोजच्यासारखी नेहाने मागची आवराआवर पण केली नाही. सुधीर खाली मान घालून अन्न चिवडत बसला होता.
"सुधीर नेमकं काय झालं तुमच्या दोघांत ?"
सुधीरच्या बाबांनी विचारलं.
"काही नाही.तिला जायचयं जाऊ द्या. तिचं करीयर तिला आपल्या घरापेक्षा जास्त महत्वाचं वाटतंय.जाऊ द्या तिला."
सुधीरने या प्रमोशन मागचं खरं कारण सांगितलं नाही कारण समोर ऋषी बसला होता.
सुधीरचे आईबाबा हे सगळं ऐकून विचारात पडले.
नंतर ते मुकाट्याने जेऊ लागले. ऋषीला काय हवं नको ते सुधीरच्या आईने विचारलं.सुधीर कसंबसं जेवण आटोपून तिथून उठला.
"ऋषी आज तू माझ्याजवळ झोप बाळा" सुधीरची आई ऋषीला म्हणाली.
"का?"
ऋषीने काही न समजून विचारलं
"अरे तुझ्या आईला बरं वाटत नाही नं. ऊद्या ऑफीस आहे. तू खूप बडबड करतोस त्याने अजून तिला त्रास होईल म्हणून आज तू आमच्या जवळ झोप"
.सुधीरची आई म्हणाली
"आजी गोष्ट सांगशील?"
"हो सांगीन हं गोष्ट चल आता पटकन जेवण आटोप पण घाईने जेवायचं नाही बत्तीस वेळा घास चावून खायचा. का माहिती आहे नं?"
"हो आजी मी रोज बत्तीस वेळा घास चावतो"
"शहाणं माझं बाळ"
सुधीरच्या आईने ऋषीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मनात मात्र काळजी होती.
सुधीरच्या आईने चिंतातूर नजरेने सुधीरच्या बाबांकडे बघीतलं. त्यांनी नजरेनेच शांत रहा सांगीतलं.
***
सुधीर आत आला तर नेहा पलंगावर लोळत होती. मोबाईल वर काहीतरी बघत होती. सुधीर आल्याबरोबर तिने मोबाईल ठेवला आणि डोळे मिटून घेतले.
सुधीरला आज त्या पलंगावर तिच्या बाजूला झोपणं नको वाटलं रोज त्याला नेहाच्या स्पर्शाची असोशी असायची. आज तोच स्पर्श त्याला अनोळखी वाटला. नेहाकडे पाठ करून तो पलंगावर आडवा झाला. डोळ्यातून घळघळ अश्रू वहात होते.आपलं काय चुकलं असावं याचा तो शोध घेत होता.
इतक्या वर्षात नेहाला आपल्या बरोबर राहताना काही उणीव भासत असेल असं त्याच्या स्वप्नातही कधी आलं नाही. संसार करताना प्रत्येक वेळी आपण तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या इच्छा, अपेक्षांचा आदर केला. तरी कुठेतरी तिच्या मनाला कंटाळा येईल असं काही घडण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली असावी या विचारांचा प्रश्न सर्प सुधीरच्या मनाला दंश करत होता.
सुधीर मनाच्या तळापासून हलला होता. झोप तर केव्हाच उडाली होती. आजतर सुधीरचं ऑफीसमध्ये लक्षच लागत नव्हतं. निशांत त्याचा कलीग आणि बेस्ट फ्रेंड आहे. सुधीरची मनस्थिती त्याच्या लक्षात आली. गेली दहा वर्ष दोघं बरोबर काम करत असल्याने दोघं एकमेकांना खूप चांगलं ओळखायचे.
लंचटाईम मध्ये निशांतने सुधीरला विचारलं
" सुधीर काय झालं?"
" काही नाही.
" मग इतका अस्वस्थ का दिसतोय?"
"अरे! काल नीट झोप झाली नाही."
सु
धीरने असं म्हणताच निशांत मिष्कीलपणे हसत म्हणाला,
"अच्छा वहिनींच्या मुलायम सहवासात अख्खी रात्र अशीच झोपेविना सरली वाटतं. वा भिडू मस्त"
निशांतचा एकेक शब्द सुधीरच्या मनाला टोचत होता. एरवी त्याने असं चिडवताच सुधीर पण मिष्कील उत्तर द्यायचा. पण आज सगळंच विपरीत घडलं होतं. सुधीरच्या मनात आलं निशांतला सांगू का? पण कसं?
सुधीर निशांतच्या बोलण्यावर काही न बोलता उठला.
" बडी जर तुझ्या मनाला काही टोचत असेल तर मला बिनधास्त सांग.काय टोचतय ते आपण शोधू आणि त्याचं टोचणं दूर करू."
सुधीरने काही न बोलता निशांतने त्याचा धरलेला हात सोडवला आणि डबा घेऊन कॅंटीनच्या बाहेर पडला.
सुधीरकडे बघत निशांत स्वतःशीच बोलला
" काहीतरी गडबड आहे. त्याशिवाय सुधीर इतका गंभीर होणार नाही.त्याच्या मनाला काय टोचतय ते शोधली पाहिजे. जर अशीच टोचणी ठेऊन हा जगत राहीला तर बरबाद होईल. मी हे होऊ देणार नाही."
समोर असलेला चहा पीत निशांत सुधीरचाच विचार करू लागला. सुधीरच्या चहाचा कप तसाच होता. त्या अर्ध्या रिकाम्या कपाकडे बघत निशांतच्या मनात आलं
"काय रिकामं आहे याच्या मनात? ही कसली पोकळी आहे? शोधायलाच हवं"
चहाचा रिकामा कप टेबलवर ठेवून निशांत अस्वस्थ पणे उठला आणि कॅंटीनच्या बाहेर पडला.
______________________________
सुधीर निशांतला सगळं सांगेल का? सुधीरच्या मनाला काय टोचतय हे निशांतला कळेल का? बघू पुढील भागात.