ANAMIKA in Marathi Short Stories by Nisha Gaikwad books and stories PDF | अनामिका

Featured Books
Categories
Share

अनामिका

 

पहिल्यांदा मला ती दिसली… रेल्वे तिकिटाच्या रांगेत...अक्षरशः कुणाशी तरी भांडत होती...म्हणूच तर माझं लक्ष गेलं....काळी सावळी पण तरतरीत नाकाची आणि मोठ्याला डोळ्यांची ... गर्दीचा गदारोळ वाढला......शेवटी तिने आपला पवित्रा मागे घेतला...आणि शांत होऊन रांगेत शेवटी जाऊन उभी राहिली...मला काही कळेना..मला वाटलं पोरगी मधेच घुसत असावी...म्हणून हे सर्व..... मी दुर्लक्ष केलं....पण का कुणास ठाऊक जाता जाता तिच्याकडे  माझं लक्ष गेलंच....तिच्या मोठ्याला डोळ्यांनी मला बंधिस्त केलं.... काय होत असं त्या डोळ्यात  कि मी इतका अडकलो…

आयुष्य हे फार सरळ असत.. ते आपण जगावं तसं असत....रांगेच्या मध्ये घुसणार्या मुलीचा इतका विचार का करतोय मी ...खरं तर अशी दुसऱ्याला त्रास देणारी माणसं मला कधीच आवडत नाही....मनस्वी तिटकारा येतो मला...जरी ती मुलगी असेल तरीही....पण हीच थोडं वेगळं होत...काहीतरी अदृश्य  जोडलेला धागा होता आमच्या दोघात....जो मला जाणवत होता.... आणि तो मला स्वस्थ बसू देत न्हवता…

काही दिवसा नंतर स्टेशन जवळच्या हॉटेल मध्ये  मी चहा प्यायला गेलो....तीच मृगनयनी माझ्या अगदी समोरच्या टेबलावर एका  वयोवृद्ध  माणसासोबत बसली होती...तो तिचा बाप असावा ..असा आपला माझाच ग्रह ..तो माणूस जेवत होता आणि सोबतच तिला खूप दूषण देत होता....ती मात्र निमूटपणे समोरचा चहा संपवीत होती....शांतपणे फक्त  मान डोलवीत होती...शेवटी तो गृहस्थ “तुला जन्म देऊन मी खूप मोठं पाप केलं “असं जेव्हा  म्हणाला...तेव्हा मात्र मला त्या मुलीचा राग आला.....मी तिकडून तडक निघालो...डोळ्यासमोरून तर  गेली...पण मनातून काही जाईना...मन फार अस्वस्थ ..काय केलं असेल असं तिने बापाने इतकं रागवायला .... रांगेच्या मध्ये घुसून लोकांशी भांडण ..आणि इथे ह्या वयोवृद्ध माणसाला त्रास देणं… का वागत असेल हि अशी ..जाऊन हिच्याशी  बोलावं का..पण मला काय गरज होती...तीच आयुष्य ती बापडी जगत होती...मी तिच्यासाठी नाही म्हंटल तरी एक तिऱ्हाईत होतो.. पण काही केल्या खरंच मनाला मात्र हे पटत न्हवत .. मी प्रेमात तर नाहीना पडलो तिच्या.. फक्त विचार विचार आणि विचार....

मला कुणीतरी आवडलं होत अगदी मनापासून . पण तरीही  अश्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं मला काही पटत न्हवत....निदान आपली आवड अशी कशी ह्याच मलाच आश्चर्य वाटत होत....

तिचा पाठपुरावा करायचं मी ठरवलं...उगीच रोज तिकिटाच्या रांगेत तासंतास तिची वाट पाहू लागलो...त्याच हॉटेलमध्ये तिला मी शोधू लागलो....आणि एक दिवस मात्र मला ती  रेल्वेमध्ये माझ्या समोरच्या महिलांच्या डब्यात दिसली....दाराजवळ उभी स्वतः मध्ये मग्न उगीच स्वतःशीच हसत......मला तिचा फार हेवा वाटला...आज तिच्याशी मी बोलायचं ठरवलं....

ती उतरल्या बरोबर मी देखील उतरलो तिच्या मागे मागे जाऊ लागलो......एका टॅक्सिला तिने हात केला मी देखील दुसरी टॅक्सी पकडून तिच्या मागे…..का असा वागतोय मी तिचा पाठ पुरवठा का करतोय मी.....ती टॅक्सितून उतरून रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका अंधाऱ्या बोळात शिरली...मी देखील तिच्या मागोमाग ….

एका बोळातून दुसऱ्या ...दुसऱ्यातून तिसऱ्या....असं करत ती एका घरासमोर उभी राहिली....तिने कुलूप उघडलं...मी तिच्या दारात जाऊन उभा राहिलो..... एक साधं छोटसं  पण निटनिटक घर ..आत जावं कि जावं....आतूनच आवाज आला..."घरात या"....मी दचकलो.....पण मागे फिरण्याची इच्छा होईना... थोडं मनावर दडपण घेऊनच मी आत गेलो......"बसा"...आतून पुन्हा आवाज......मी शेजारच्या कॉटवर बसलो....ती आतून पाणी घेऊन बाहेर आली...

मी पाण्याकडे आणि तिच्याकडे आळीपाळीने पाहिलं..."पाणी प्या तुम्ही फार थकलेले दिसताय" ती मंद हसत म्हणाली... पटकन पाणी प्यायलो....तिच्याकडे रिकामा ग्लास दिला....ती पुन्हा आत निघून गेली... चोरी पकडली गेली होती....मला तिकडून पळून जावस वाटत होत....तरीही मी तिची ओढ मला तिकडून हलू नकोस असं सांगत होती.....ती पुन्हा बाहेर आली.....आता तिच्या हातात चहाचे दोन कप होते....

"चहा घ्या आवडतो ना तुम्हाला "

"तुला कसं माहित" मी नकळत विचारलं.

त्यावर ती फक्त हसली...

"माझा पाठलाग करताय मला माहित होत.."

"तरीही तू तो करू दिलासा" मी आश्चर्याने विचारलं.

"हो..कारण मला ते आवडत होत ”

"पण मी तुझा पाठलाग करतोय ह्याची भीती नाही वाटली.."आता मी बराच सावरलो होतो...

"नाही...वाटली...अगदी तुम्ही पहिल्या दिवशी मला पाहिलत ना ..तेव्हाच तुम्ही चांगले आहात  हे जाणवलं मला”

"म्हणजे तुझ्याही मी लक्षात होतो तर..."

"हो अगदी हॉटेल मधून माझ्यासमोरून रागाने निघून गेलात तेव्हा देखील तुमची दखल घेतली होती मी कित्तेकदा तुम्हाला चहा घेताना त्या हॉटेलमध्ये बघायचे मी.."

"नाव काय तुझं....तू इथे राहतेस…आणि तुझे वडील.."

"माझं नाव..अनामिका  मी अनाथ आहे एकटीच राहते"

 "मग त्या दिवशी ते म्हातारबा ते कोण होते" मी आश्चर्याने विचारलं....

“ते गृहस्थ ज्यांच्या सोबत तुम्हाला मी त्या हॉटेलमध्ये दिसले होते ते एक मनोरुग्ण होते... मला ते स्टेशनजवळच भेटले …त्यांच्या मुलीमुळे त्यांच्यावर हि वेळ आली होती कदाचित... कारण त्यांनी मला पहिल्या नंतर मला स्वतःची मुलगी समजून खूप दूषणं देऊ लागले...ते खूप दिवसांचे उपाशी होते.. म्हणून त्यांना जेऊ घातलं.... ते माझे कुणीही न्हवते"

अरे वा...दुसऱ्यांची मदत करायला खूप आवडत वाटत तुला..पण मग त्या दिवशी रांगेत लोकांशी भांडत का होतीस..

“त्यादिवशी रांगेत उभी असताना ..एक म्हातारी आज्जी बाई तिला नीट उभं देखील राहवत न्हवत..तिला आधी तिकीट घेऊ द्या असं मी रांगेतल्या माणसांना बोलत होते...पण कुणीही तयार न्हवत तिला मध्ये घ्यायला....आणि कुणी तीच तिकीटही काढून देत न्हवत...माझा नंबर आला  मी तीच  काढून देणार होते ..तर माझ्या मागचा माणूस माझ्यावर  आरडाओरड करायला लागला...शेवटी मी त्या बाईला माझा नंबर देऊन मी शेवटी जाऊन उभी राहिले…”

म्हणजे माझी निवड कुठेही चुकीची न्हवती तर..मी मनोमन स्वतःलाच म्हंटलं....

मला नेमकं तिच्यात  हेच तर वेगळेपण जाणवलं होत.....मला तिच्याशी मैत्री वाढवायची होती...तिच्या बद्दल मला कुतूहल निर्माण झालं होत.... तिने माझ्या आयुष्यात यावं असं मला  वाटत होत....

"तू आवडलीस मला ....अगदी पहिल्या नजरेत..."

"मला माहित आहे .... पण तरीही खरच मी मनापासून तुमची माफी मागते"

"म्हणजे तुला माझ्यात काही उणीव जाणवते का ..मी नाही का आवडलो तुला"

" तुमच्या भावनांचा आदर करते मी.... पण लहानपणापासून माझ्या हक्काच्या माणसांसाठी खूप आसुसलेली असायची...कुणाच्यातरी मायेच्या सावली खाली स्वतःला झाकून टाकावंस वाटायचं मला...मी अनाथ होते ..मला माझं हक्काच असं कुणीच न्हवत... सर्व अनाथ मुलानंसोबत माझं बालपण गेलं...प्रत्येकाला आपापलं दुःख...कोण कोणाला आधार देणार...तेव्हाच ठरवलं...जेव्हा मी लग्न करेल ...तो माझा हक्काचा नवरा तसाच असावा जशी मी वाढले... ज्याला नाती जपता येतील...म्हणजे मला नशिबाने मिळालेलं हक्काच माणूस माझ्यापासून कुणीच हिरावून घेणार नाही.."

 

"चांगला निर्णय आहे तुझा ..पण माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर...."

"मला जाणवतंय ते ..पण तरीही मला भीती वाटते.....माणसं किती वाईट वागू शकतात ..हे स्वतः अनुभवलंय मी ...त्यामुळेच मला माझ्यासारखीच कुणीतरी व्यक्ती हवी ..मला जितकी त्या व्यक्तीची गरज आहे तितकीच त्यालाहि गरज असावी माझी"

"पण मी तुला वचन देतो..तुला मी कधीही अंतर देणार नाही.." मी तिला विनंती करत होतो.

पण  तिला माझं बोलणं जरी पटत असलं तरी तिचा भूतकाळ तिला ते मान्य करू देत न्हवता...

ती माझं बोलणं ऐकत न्हवती आणि तिचा हा निर्णय माझ्यासाठी खरंच  खूप दुःखद होता...कारण मी अनाथ नव्हतो.....मला आई होती..... तीच विश्वच वेगळं होत...आणि तिच्या विश्वात मी तिच्यासाठी एक असा माणूस होतो...जो तिला समजून घेत असला तरी तिचा न्हवतो….

तिचा मी निरोप घेतला..कारण का कुणास ठाऊक मला मी तिला तिच्या निर्णयापासून परावृत्त करू शकलो नाही. .. ती जे बोलून गेली होती....तसा विचार मी आयुष्यात कधीच करू शकलो नसतो... तिचे विचार खरंच खूप चांगले होते.....मी जाताना  “माझी आठवण ठेव …तुझा विचार बदलावा अशी अपेक्षा मी करतो...मी वाट पाहीन तुझ्या निर्णयाची”.. इतकं बोलून बाहेर पडलो..

आयुष्यात अशी पण माणसं भेटतात..ज्यांना बघून असं वाटत… कि आयुष्य हे फार सरळ असत.. ते आपण जगावं तसं असत असं म्हणारा मी आयुष्य खरच आपण म्हणतो तितकं सोपं असत हे प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीच वाटत होत. कि एखाद्या व्यक्तीचा भूतकाळ...ह्या त्याच्या भविष्यावर इतका परिणाम करू शकतो?...मी मनोमन तिच्यासाठी ईश्वराकडे तिची इच्छा पूर्तीची प्रार्थना केली....कारण ती माझ्या आयुष्यात आली आणि तीन मला जिंकलं होत….

 

समाप्त