"बऱ्याच दिवसांचा हा फ्लॅट बंद होता न म्हणून असा वास येत असणार " सुमित कसतरी हसत म्हणाला.
"अं हो, बरोबर आहे." आत्या आणि श्वेता नाकावरचा हात घट्ट करत म्हणाल्या.
"पण सुमित, ती लिफ्ट मधली बाई आपण आपला फ्लॅट 1002 आहे असे म्हंटल्यावर अशी विचित्र नजरेने आपल्याकडे का बघू लागली कुणास ठाऊक?" आत्या.
"हो मलाही जरा ते ऑडच वाटलं " सुपर्णा.
सुमित ही जरा विचारात पडला. ते पाहून सुपर्णा ने विषय बदलला, "चला आता रात्रीच्या जेवणासाठी काय काय पदार्थ करायचे ते सांगा "
"अगं काही विशेष नको.... आपलं काहीतरी साधंच..." असं आत्या म्हणत असताना आतल्या खोलीतून श्वेता च्या जोर्रात ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ श्वेता बाळाला घेऊन धावत बाहेर बैठकीत आली.
"अगं!काय झालं श्वेता? एवढी का घाबरलीयेस तू?" सुमित ने पटकन तिच्या पुढ्यात खुर्ची ओढून ठेवत, तिला बसवत म्हंटल.
सुपर्णा ने तिला पाणी दिलं.
"अरे! तिथे... तिथे.... वर.... " एवढं बोलून श्वेता बोलायची थांबली. तिच्या घशातून आवाज फुटत नव्हता. तिला पाणी पिण्याचे सुद्धा भान राहिले नाही.
"काय झालं बेटा सांग!" आत्या काळजीने म्हणाल्या.
पण बराच वेळ श्वेता दातखीळ बसल्यासारखी शांत राहिली. सुपर्णा ने तिच्या जवळून बाळाला घेतलं. बाळ श्वेता च्या आवाजाने उठले होते. सुपर्णा तिला थापटून झोपवण्याचा प्रयत्न करू लागली.
"मी हिला आत नेऊन झोपवते " असं सुपर्णा म्हणताच श्वेता पुन्हा ओरडली, "नको.. आत नको.."
तिचा पवित्रा पाहून सुपर्णा जागीच थिजली.
"काय झालं श्वेता? सांगशील का? आत का जायचं नाही? तू का किंचाळत आली आतून बाहेर? असं काय पाहिलं तू आत श्वेता? सांग, आम्हाला सांग " सुपर्णा.
"आत एऐ..क बाई.. पंख्याला.. लटकलेली... आहे... फास घेतलाय तिने.." श्वेता अडखळत म्हणाली.
"क्काय!! हे काय बोलतेय तू " सुपर्णा भिंतीचा आधार घेत म्हणाली.
"तेच तर मला विचारायचे आहे की तुमच्या घरात एका बाईने असं केलं आणि तुम्हाला माहित सुद्धा नाही, कमाल आहे! किती भीषण आहे हे सगळं. आई चल आपण जाऊ घरी आणि सुमित-सुपर्णा तुम्ही सुद्धा इथे राहू नका" श्वेता.
"थांब! मी आत जाऊन बघतो " असे म्हणत सुमित हळूहळू आत गेला पण त्याला आत काहीच दिसलं नाही. बाहेर येऊन तो आश्चर्याने म्हणाला, "आत तर कोणीच नाहिये! वाटल्यास आत्या तू पाहून ये."
आत्या, सुपर्णा दोघीही आत गेल्या आणि काही वेळात बाहेर आल्या त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, गोंधळलेले भाव होते.
"नाही गं श्वेता! कोणीच नाहिये तिथे. एकदा पुन्हा तू जाऊन बघून येते का?" आत्या ने असं म्हंटल्यावर श्वेता भीतभीत पुन्हा आतल्या खोलीत जाते तेव्हा तिलाही आश्चर्य वाटते कारण आत खरंच कोणीच नसते.
"अरे पण असं कसं झालं? इथेच.. ह्याच फॅन ला एक बाई लटकलेली होती. खरंच" श्वेता.
"तुला भास झाला असेल बेटा! आणि म्हणूनच मी म्हणते की हॉरर सिनेमे, कथा वाचू नको गं! पण तुम्ही आजकालचे मुलं कुठे आमचं ऐकता? केवढ्याने ओरडली तू श्वेता! ती छोटी चांगली झोपलेली उठली तुझ्या आवाजाने" आत्या.
श्वेता दिग:मूढ अवस्थेत काहीवेळ बसून राहिली आणि मनाशीच बोलली, "भास? पण असा, एवढा खरा वाटणारा भास कसा असेल?"
"काय बाई ह्या पोरीने घाबरून सोडलं! चल सुपर्णा आपण लागू स्वयंपाकाला " असं म्हणत आत्या किचन मध्ये गेल्या.
सुपरणाने बाळाला हॉल मध्येच सोफ्यावर झोपवलं आणि ती ही कामाला लागली. सुमित श्वेता शी काहीतरी गप्पा मारू लागला पण श्वेता चे काही केल्या लक्ष लागेना. ती मधून मधून आतल्या खोलीकडे बघत होती. ते पाहून सुमित म्हणाला, "श्वेता ते डोक्यातून काढून टाक. तो भास होता. It was just hallucination."
क्रमश :