Don't want animal violence? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | प्राण्यांची हिंसा नकोच?

Featured Books
Categories
Share

प्राण्यांची हिंसा नकोच?

सावधान ; प्राण्यांचा बळी नकोच

आज कोणी गोहत्या बंद करा असा सूर काढतात तर कोणी त्याच्या विरुद्ध बाजूनं बोलतात. खरंच गोहत्या बंदच व्हायला हवी. कारण गाय आपल्याला दूध देते. सरपणासाठी तसेच आपल्या शेतात भरघोष पीक यावे, म्हणून शेण देते. तसं पाहता गाईचे भरपूर उपयोग आहेत.
गाईचे जसे उपयोग आहेत, तसेच उपयोग सृष्टीतील प्रत्येक जीवजंतूंचेही आहेत. लहानसा दही बनविणारा जीव पोटात गेल्यावर आपल्या अन्नाचेही पचन करतो. तशीच लहानशी दिसणारी मधमाशी आपल्याला बहूगुणी शहद देत असते. इवलंसं दिसणारं गांडूळ आपल्याला गांडूळखत देत असते.
काही प्राणी आपलं मनोरंजनही करु शकतात नव्हे तर करीत असतात. जशी. कुत्री, माकड किंवा ऊंट वा बकरी सुद्धा. सर्कशीत लहानशा धाग्यावर चालणारी बकरी, माकड तसंच लहानशा स्टुलवर बसणारा हत्ती आणि ऊंट आपण नेहमीच पाहतो. बिचारे धाकानं अशी अशी कौशल्य करतात की जे कौशल्य पाहून आपण आश्चर्यचकीत होवून जातो. आपण पाहतो की सर्कशीत वाघ, सिंहासारखे अजस्र प्राणीदेखील मोठमोठे कौशल्य दाखवून जातात.
प्राण्याबाबत आपल्याला त्यांचे उपयोग दिसत नाही. आपल्याला दिसते आपल्या जिभेचे चोचले. आपल्याला प्राण्यांचे सर्कशीत कौशल्य आवडत नाही. त्यांनी सर्कशीत आपले केलेले मनोरंजन आपल्यासमोर फिकं वाटतं. कारण आपलं मनोरंजन असतं आपल्या जिभेची चव. मग आपण आपला राष्ट्रीय प्राणी विसरतो. आपण आपला राष्ट्रीय पक्षी विसरतो आणि नाहक आपलं मनोरंजन म्हणून आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी त्यांचा बळी घेतो.
पुर्वीही अशीच प्राण्यांची हत्या व्हायची. यज्ञात पशुबळी म्हणून बैल, घोडा, रेडा दिला जायचा. गाईला माता संबोधून तिचा बळी दिला जात नसे. तसाच राजा हा शिकारीचा हौशी असल्याने आपलं मनोरंजन म्हणून शिकार करायचा. विनाकारण प्राण्यांचा अपराध नसतांना बळी घेतले जायचे. त्यातच कधीकधी प्राण्यांच्या शर्यतीही लावल्या जात असत. यात कोंबड्यांची झुंज, शंकरपटात बैलाच्या शर्यती, काही ठिकाणी रेड्याला व ऊंटाला शर्यतीत लावले जाई. काही ठिकाणी रेडी, बैल, बोकड आणि एडक्यांच्या टकरी होत. हे आपल्यासाठी मनोरंजनच असे. यात जो प्राणी हारला, त्या प्राण्याला सर्रास कापले जाई. त्यात हारजीत ठरलेली असतांना त्या प्राण्यांचा कोणता दोष असायचा की ते प्राणी मारले जायचे?
महत्वाचं सांगायचं म्हणजे आपलं मनोरंजन होते आणि दोष नसतांना विनाकारण त्या प्राण्यांचा बळी जातो. आपले जिभेचे चोचले पुरवले जातात आणि विनाकारण आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी ते प्राणी मारले जातात. विशेष म्हणजे आपल्या मनोरंजनासाठी त्या प्राण्यांचा कोणताही अपराध नसतांना बळी का घ्यावा? याचा विचार कोणीही करीत नाहीत. आपल्याला काय करायचं असा विचार करुन सर्वच लोकं सृष्टीतील हे महत्वाचे घटक कमी करीत आहेत. आपल्याला माहीत नसेल की काल आपल्या दारासमोर येणारा चिमण्यांचा आवाज कमी झाला. कारण काय, तर आपलेच मनोरंजन. आपण आपल्या मनोरंजनासाठी मोबाईल काढला. परंतू आपल्याला माहीत नसेल की याच मोबाईल मधून निघणा-या घातक ध्वनीलहरीनं त्यांच्या शरीरावर परिणाम होवून त्यांचा बळी जातो. आज आपल्याला कावळे, बेडकं आणि सापही दिसत नाहीत. ही मानवतस्करीच आहे. सापाच्या जहरातून घातक असं नशा येणारं इन्सुलिन तयार केलं जातं म्हणून तस्करी. तसंच कावळ्याचंही आहे. आज सापाची व बेडकाची तस्करी झाल्यानं उंदरांची संख्या वाढतांना दिसत आहे. परंतू काही दिवसांनी उंदरंही कमी होतील. कारण अलीकडे कोणत्याही आजारावर औषधांचा प्रयोग करण्यासाठी तो प्रयोग आधी उंदरावर केला जात आहे. जो पुर्वी बेडकावर केला जायचा. परंतू मानवतस्करीच बेडकांची संख्या कमी झाल्यानं आता उंदरं पकडली जातात.
ज्याप्रमाणे निसर्गातील साप, बेडकं कावळे पकडली जातात. तशीच जंगलातील वाघ सिंहाची संख्या आता अतिशय कमी झालेली आहे. बोटावर मोजण्याइतकीच आहे. शिकारीदरम्यान वाघ, सिंहाला मारले गेल्याने त्यांची संख्या कमी होणे साहजीकच आहे.
वाघ, सिंह, कावळे, उंदरं, बेडकं आणि तत्सम त्यासारखे जीव, मग त्यात गांडूळासारखे प्राणी का असेना, हे सर्व जीव सृष्टीतील समतोल राखणारे जीव. ते आहेत म्हणून आपणही आहोत. नाहीतर आपल्याला कोणी कुत्रही विचारणार नाही. आपल्याला माहीत नसेल की आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात. परंतू त्यांचा नाहक बळी जातो. आपले मनोरंजन होते. परंतू त्यात त्यांना किती त्रास होतो. कदाचीत ते विचारच करीत असतील आणि दररोज विधात्याला साकडे घालत असतील की हे विधात्या, आपण एकदा तरी या मानवाला आमचा जन्म दे आणि मानवाचा आम्हाला. मग पाहू. कदाचीत जर त्यांचं विधात्यानं ऐकलं आणि आपल्याला मानव जन्मातून मुक्ती मिळाली आणि त्यांचा जन्म मिळाला तर पाहा, आपली काही खैर नाही. म्हणून एक आपला विचार की आपले मनोरंजन करा. करायला मनाई नाही. परंतू जरा विचार करुन. कारण पुराणशास्र सांगतं की आपला जन्मच मुळात कित्येक योनी फिरुन झाला. त्यामुळंच कधी ना कधी त्यांचाही जन्म आपल्याला मिळणारच. मग आपण जसा त्यांच्याशी या जन्मात व्यवहार केला. तसाच व्यवहार ते त्या जन्मात आपल्याशी करतील यात शंका नाही. म्हणून आपणच आज त्यांच्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार करावा. जेणेकरुन आपल्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा तेही आपल्याशी सौहार्दपूर्ण व्यवहार करतील यातही शंका नाही. म्हणून प्राण्यांचा बळी घेतांना सावधान. मग ते प्राणी गाई, बकरे वा कोंबडे असो वा इतर कोणतेही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०