पुर्वीच्या शिक्षा कामाच्या होत्या काय?
अलीकडे शाळेत शिकवितांना विद्यार्थ्यांना मारता येत नाही. तसंच न मारता त्यांना चांगलं शिकवावं लागतं. जे शक्य होत नाही. तरीही आपला विद्यार्थी चांगला घडावा. म्हणून त्याला न मारता शिकवावं लागतं. तसं पाहता ती तारेवरची कसरतच असते.
आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आमच्यावर आमच्या गुरुजींचा धाक असायचा. गुरुजी आम्हाला शिक्षा करायचे. त्या शिक्षेत आम्हाला कोंबडा बनवणे, बाकावर उभे राहणे, अंगठे धरुन राहणे, कान पकडून उभे राहणे, तोंडावर बोट ठेवणे, भिंतीकडे तोंड करुन उभे राहणे, वर्गाबाहेर उभे राहणे, गुडघे टेकवणे, हात वर करुन उभे राहणे, कोणताही पाठ दहा वेळा वाचणे, शाळा सुटल्यावर थांबणे, वर्ग स्वच्छ करणे, उठबैठका काढणे, एवढंच नाही तर पाटीदप्तर घेवून घरी पाठवणे व मायबापाला आणल्याशिवाय वर्गात बसू न देणे. इत्यादी शिक्षा होत असत. तसंच कधीकधी मारही पडायचा. मायबाप शाळेत आणताना समस्या निर्माण व्हायच्या. कारण एकतर मायबाप शाळेत येत नसत आणि आलेच तर तेही मारायचे गुरुजीच्या नजरेसमोरच आणि शिक्षकांनाही मारायला सांगायचे. मग शिक्षकही मनमानीपणानं झोडपायचे. कोणीच अडवायचे नाही. त्यामुळे विशेष समस्या. असं करीत करीत आम्ही शिकलो. मार सहन केला, शिक्षकांचाही आणि मायबापाचाही. परंतू आज तसं होत नाही. आज मायबापाचाही धाक नाही आणि शिक्षकांचाही धाक नाही. सगळे आपल्या आपल्या परीनं चांगले असतात तरीही.
मुख्यतः आज मला सांगता येते की त्या शिक्षा होत्या, म्हणून आम्हीही चांगले संस्कार घडलो. आजही काही मुलं जे शिकलेले नाहीत, त्यांच्यामध्ये आजही संस्कार टिकून आहे. त्या शिक्षेतून आमच्यात जणू संस्काराचं बिजारोपनच झालं.
महत्वाचं म्हणजे बाकावर उभे राहण्यातून आम्ही मोठं स्वप्न कसं पाहावं ते शिकलो. कान पकडण्यातून आम्ही लक्षपूर्वक कोणतीही गोष्ट कशी ऐकायची ते शिकलो. तोंडावर बोट ठेवण्यातून पोकळ बोलणं कसं टाळायचं हे शिकलो. अंगठे धरुन उभं राहण्यातून आम्ही परिवर्तनशिलता शिकलो. भिंतीकडे तोंड करुन उभं राहण्यातून आम्ही आमच्या चुका कशा शोधाव्या हे शिकलो. त्यातच पाठ दहा वेळ वाचण्यातून आम्ही चुका वारंवार करुच नये हे शिकलो. वर्गाबाहेर उभे राहण्यातून जगाचं निरीक्षण करणं शिकलो. हात वर करुन उभे राहा यातून संयम शिकलो.
विशेष म्हणजे आपलं चुकलंच नाही तर कोणी आपल्याला काही म्हणेल काय, कोणीही काहीही म्हणणार नाही. आमचं त्या लहानग्या शिकत्या वयात काही चुकत होतं. म्हणून आम्हाला आमचे शिक्षक शिक्षा करायचे हे आता आम्हाला कळतं. आम्ही त्यांच्या मारण्याच्या वा शिक्षा करण्याच्या विरोधात कालही नव्हतो आणि आजही नाही.
आम्ही त्यांच्या शिक्षा करण्याच्या विरोधात कालही नव्हतो आणि आजही नाही. परंतू मग सरकारणं वा न्यायालयानं मारण्यावर वा शिक्षा करण्यावर बंदी का आणली? ती आणायला नको होती. तर त्याचं उत्तर आहे की जननसंख्या. पाश्चात्य विचार सरणीचा देशात प्रवेश झाला. त्याचबरोबर लोकांनी वाढत्या लोकसंख्येवर पर्याय काढण्यासाठी कुटूंब नियोजन आणलं. त्यामुळे त्यानंतर लोकांनी एक किंवा दोनच अपत्य ठेवली. ती अपत्य लाडाची होती. त्या अपत्याचा लाड करता करता लोकं हे विसरले की आपली मुलं बिघडत चालली आहेत. त्यातच शाळेची संख्याही वाढली. परंतू विद्यार्थी संख्या कमी झाली. या सर्व गोष्टीचा परिणाम शिक्षण व प्रगतीवर झाला. त्यामुळे आजची पिढी पाहिजे त्या प्रमाणात सक्षम दिसून येत नाही. ती अगदी भावूक स्वरुपाची दिसत आहे. त्यामुळे आज असं वाटायला लागलं आहे की पुर्वीच्या शिक्षा कामाच्याच होत्या. असं म्हणण्यात काहीच गैर नाही. कारण आज लोकं एवढे भावूक आहेत की ते आत्महत्या करायला लागले आहेत. त्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. शिक्षा बंद झाल्या. कारण त्या शिक्षा करतांना काही काही शिक्षक शिक्षण देतांना विद्यार्थ्यांना बेदम मारत असत. त्यातून विद्यार्थ्यांना ग॔भीर स्वरुपाची दुखापत व्हायची. म्हणून शिक्षा न करणे हा पर्याय त्यासाठी निवडला गेला व शिक्षा बंद झाल्या.
विशेष म्हणजे आज आपण विचार करायला पाहिजे की ज्या शिक्षा पुर्वी होत्या, त्या असाव्यात. त्याशिवाय सक्षम अशी पिढी तयार होणार नाही. आत्महत्याही थांबणार नाहीत. परंतू करण्यात येणा-या शिक्षा ह्या सौम्य असाव्यात म्हणजे झालं.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०