God will give childhood in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | बालपण देगा देवा

Featured Books
Categories
Share

बालपण देगा देवा

बालपण देगा देवा

बालपण माणसाला फार आवडत असते. कारण बालपण एकदाच मिळत असते आणि ते रम्य असते.
अलिकडे मोबाईलचा काळ अाहे. या काळात लहान मुलं ही खेळण्याऐवजी फक्त मोबाईल पाहण्यात जास्त वेळ घालवत असतात. या लहान मुलांच्या मोबाईल खेळण्याच्या नादामुळं त्यांचे मायबापच नाही तर लहान मुलंही जास्त परेशान असतात. ते लहान मुलांवर ओरडतात. तरीही ते ऐकायला तयार नसतात. तरीही ते अल्लड जीवन सर्वांना आवडत असतं.
आम्ही जेव्हा लहान होतो. जेव्हा आम्हाला कोणी आमच्यावर ओरडलेलं आवडत नसे. आम्हाला त्यावेळी असं वाटायचं की मोठेपण चांगलं असतं. परंतू आम्ही जेव्हा मोठे झालो आणि जेव्हा आमच्यावर जबाबदारी आली. तेव्हा कळलं की मोठेपण चांगलं नाही तर लहानपणच चांगलं असतं.
आमचं लहानपण अतिशय रम्य होतं. ते रम्य बालपण आम्हाला आजही आठवतं. त्या लहानपणातील ते दिवस अजूनही आठवतात. अन् आठवतात लहानपणीच्या आठवणी. ज्या आठवणी आज आठवता आठवता संपत नाहीत.
त्या आठवणी रम्यच होत्या. कारण त्या आठवणी आजही जीवनात ओलावा आणत असतात. तशाच त्या आठवणी मन अगदी प्रसन्न करुन टाकतात.
आम्ही जेव्हा लहान होतो, त्यावेळी मोठी शिकोटी बांधून राणातल्या चिचबिलाई आणि चिंचा तोडायला आम्ही जात होतो. त्यातच त्या चिचबिलाईची झाडे एखाद्या शेतक-याच्या शेतीला लागून असल्या की बस ओरडण्यासारखी स्थिती व्हायची. कारण त्या चिचबिलाई तोडता तोडता केव्हा शेतमालक यायचा आणि आम्हाला त्या झाडाला बांधून ठेवायचा ते कळायचं नाही. सायंकाळ होताच आम्ही घरी यायचो. परंतू ही गोष्ट आम्ही कदापिही मायबापाला सांगत नव्हतो. कारण ते माहित होताच बाप एवढा मारायचा की अंगावर वळं यायचे. आई मग रात्री झोपतांना त्या वळांना तेल लावून द्यायची आणि समजवायची की उद्यापासून काही चिचबिलाया तोडायला जायचं नाही. परंतू त्या आईनं कितीही समजावलं तरी त्या चिचबिलाया तोडायचा नाद जायचा नाही. दुसरा दिवस उजळला की पुन्हा मायबाप कामाला जाताच परत चिचबिलाया तोडायला जायचं म्हणजे जायचं. हा आमचा नित्यक्रमच झाला होता.
चिचबिलाया तोडणं, चिंच तोडणे अन् आंबे तोडणे हा आमचा बालपणाचा उद्योग. आंबेही तोडायचे असले की सगळं मित्रमंडळ मिळून रानात जात होतो. त्यात काही मुलीही असायच्या. घरातलं तिखट मीठ घेवून अगदी रानात जात होतो. कै-या तोडत होतो आणि त्या कै-या तिखट मीठासोबत आवडीनं खात होतो. त्या खातांना दाताची पुरती वाट लागायची. दातं आंबट होत.,खावंसं वाटत नव्हतं. तरीही त्या खात होतो. अगदी त्या बाल्यावस्थेत मैत्रीणीसोबत. ते मैत्रीणीवरचं निरतिशय प्रेम असायचं. परंतू त्या प्रेमात संदर्भ नसायचे. कारण आमच्या भावना मेलेल्या असायच्या.
संत्र, बोरं अशी चोरुन तोडण्यात मजा वाटायची. त्यातच काटे रुतत असतांनाही त्या चिचबिलाईच्या झाडावर अगदी शेंड्यावर आम्ही चढत होतो. त्यातच मालक येताच अगदी वरुनच खाली उड्या मारत होतो. त्यात अंगालाही खरचटत असे. परंतू त्याचं काहीच वाटायचं नाही.
लहानपणी ज्याप्रमाणे आंबे, चिंचा तोडण्याची मजा वाटायची. त्याचप्रमाणे कंचे, भोवरा, टायर चालविण्यात आमचा वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. त्या खेळण्यात आमची तहान भूक हरवून जायची. भूक लागायची नाही. त्यातच भूक लागलीही, तरी ती जाणवायची नाही.
आम्हा सर्वांची आई चांगली होती. आई आमच्या पाठीमागं फिरायची. शोधायची. परंतू आम्ही सापडत नव्हतो. सापडायला आम्ही गावात नसायचो. आम्ही तर रानात गेलेलो असायचो. कशासाठी तर कै-या आणि चिचबिलाई तोडण्यासाठी. त्यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. साप आणि भूत म्हणजे काय, ते जाणवायचं नाही. मात्र हे जेव्हा आमच्या मायबापाला माहित व्हायचं. तेव्हा ते साप आणि भूताची भीती दाखवायचे.
लहानपण ते........त्या बालपणात माकडं हाकलण्यात मजा यायची. पंधरा पंधरा भड्यांचा कळप यायचा. भडे म्हणजे नर माकडं. त्या माकडांना गुलेरच्या साहाय्यानं दूर दूर हाकलून लावण्यात आम्ही पटाईत होतो. काही मुलं तर त्यांना दगडं मारत.
दगडं मारण्यात आम्ही पटाईत होतो. आमचे दगडाचे निशाणे अगदी निशाणावर जात. आम्ही या दगडाच्या निशाणानं आंबे पाडण्याचा पराक्रम करायचो. तोच पराक्रम आम्ही माकडं हाकलण्यात करीत होतो.
लहानपणचे हे आमचे पराक्रम. केव्हा बालपण सरलं आणि केव्हा तरुणपण आलं ते समजलंच नाही.
आजही आठवतं ते बालपण. परंतू ते बालपण परतून येणार तरी आहे का? निश्चीतच नाही. हे आम्हाला माहित आहे. त्यावेळी मायबाप जरी आमच्यावर ओरडत असले तरी स्वतंत्र्य होतो आम्ही. मायबाप कितीही रागावत असले तरी थोडेसे रडलो की ते अगदी जवळ घ्यायचे. लाड करायचे आमचा. सर्व राग आवळून. कारण त्यांना वाटायचं की आमची मुलं चोर निघू नयेत. इमानदार निघावेत. ते त्यांचे संस्कार होते.परंतू त्यावेळी ते समजायचे नाहीत. आज मात्र सगळं समजतं. म्हणून आता वाटतं की लहानपण अजून एकदा मिळावं. परंतू कसं मिळेल? म्हणून देवालाही नित्य मागतो आम्ही की लहानपण देगा देवा. परंतू देव ते ऐकेल तेव्हा ना. कारण आज जगात देवच नाही. देवाचा दगड उरला आहे देव्हा-यात केवळ.
हेच आमचं बालपण. अगदी रम्य होतं. म्हणून सांगावसं वाटतं की ह्या मोबाईल युगात रमण्यात काही अर्थ नाही. मोबाईलच्या सतत वापरानं सारं नुकसानच आहे. डोळ्यांचे आजार होतात. कर्णबधीरपणा येतो नव्हे तर रक्ताभिसरण न झाल्यानं ह्रृदयाचे रोग होतात. आज लहान लहान मुलांना लकवा, पक्षाघात व इतर अनेक प्रकारचे रोग होतात. कारण व्यायाम होत नाही. मैदानी खेळ बंद झाल्यानं व व्यायाम बंद झाल्यानं सळसळतं रक्त नाही. जे सळसळतं रक्त असायला पाहिजे ते नसल्यानं आज लहान लहान मुलांचं अकाली निधन होतं.
विशेष म्हणजे लहान मुलांनी तरी मस्त आणि मुक्तपणे खेळायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे. परंतू ते कसे करणार व्यायाम. त्यात त्यांचा नाही तर आमचा दोष आहे. आम्हीच त्यांना मोबाईल देतो खेळायला. कारण आम्हाला त्यांना कुठेतरी गुंतून ठेवावसं वाटतं. कारण आम्हीच आज मोबाईलमध्ये गुंतलेले असतो आणि आम्हाला डिस्टर्ब होवू नये म्हणून त्यावर आम्हीच हा ती मुलं अगदी लहान असतांना उपाय काढलेला असतो. हळूहळू ती आमच्या या महान उपायामुळं त्यांना मोबाईलची सवय लागलेली असते. मग ती सवय अशी जडते की पुढे आम्ही त्यांना मोबाईल नको पाहा म्हटले तरी ती आमचं ऐकत नाहीत. मग आमची फजीती होते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही आज मुलांना सुधरविण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा आमच्या स्वतःतच सुधारणा करायला हवी. आम्हीच स्वतः व्यायाम करायला हवा. तसेच आम्हीच मोबाइल कमी पाहायला हवा. जेणेकरुन ती आमचं अनुकरण करणार नाही व मोबाइल कमी पाहतील तसेच टिव्हीही. कारण लहान मुलं ही अनुकरणीय असतात. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार करतांना प्रथम आम्हीच संस्कारी आहोत हे त्यांना दाखवायला हवं. जेणेकरुन ती स्वतःच संस्कारी बनतील. जे संस्कार त्यांना कधीच शिकवावे लागणार नाही. ते स्वतःच शिकतील यात काही दुमत नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०