Is there a god? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | देव आहे का?

Featured Books
Categories
Share

देव आहे का?

खरंच देव कुठे आहे हो!

देव आहे वा नाही हे माहित नाही.पण देवाच्या बाबतीत एक सत्य गोष्ट ही की याच देवाच्या नावावर कित्येत वर्षापासून अस्पृश्यांना छळले जात होते.स्रीयांनाही छळले जात होते.देव शिक्षा देतो तुम्ही पतीच्या चितेवर सती जर नाही गेले तर.......असे म्हणून पतीला परमेश्वर समजून जाणूनबुजून सती जाण्यासाठी बाध्य करणारा समाज हा अस्पृश्यांना मंदीर प्रवेश देत नव्हता.यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्म स्विकारावा लागला.त्यावेळी बै.सावरकरांसारख्या शिकलेल्या मंडळींनीही त्यांची टिंगल उडवली.नंतर बाबासाहेबांनी त्यांना प्रतिउत्तरही दिलेच.यातूनच त्यांना बावीस प्रतिज्ञा घ्याव्या लागल्या.मी देव मानणार नाही.दगडाला देव मानणार नाही.राम क्रिष्णाला देव मानणार नाही.अर्थात कोणत्याच ठिकाणी अगरबत्ती वा फूल चढविणार नाही.कोंबडे बकरे पाळणार नाही अर्थात देवाच्या नावावर बळी देणार नाही.
देव........काही लोकं म्हणतात आहे.काही लोकं म्हणतात नाही.देव आहे आणि नाही हा त्या त्या धर्माचा श्रद्धेचा प्रश्न.कोणी त्याला देव,कोणी अल्ला,कोणी गॉड,तर कोणी मसीह म्हणतात आणि कोणी परमात्मा म्हणून संबोधतात.देव आहे असे मानणा-याला काही नास्तीक मंडळी चिडवतात.कारण त्यांना तशी अनुभूती आलेली नसते.अनुभूती येतेही पण ते समजू शकत नाहीत.कारण देव येतही असेल.पण तो प्रत्यक्ष स्वरुपात दिसत नसल्यानं कोणी ओळखू शकत नाही.हा देव प्रत्येकजण मानत नसला तरी याचा अर्थ तो नाही असा होत नाही तसेच देव प्रत्येकाचा वेगळा आहे.कोणी जीवंत माणसात देव पाहतात.कोणी दगडात देव पाहतात.कोणी जनावरात देव पाहतात तर कोणी वृक्षातही देव पाहतात.कोणी चंद्र सुर्यालाही देव मानतात तर कोणी साध्या किड्यामुंग्यांनाही.महत्वाचं म्हणजे लोकांनी देव मानावे किंवा मानू नये.पण कोणाच्या देवांवर टिका करु नये.हं प्रथेवर मात्र नक्की टिका करता येईल.याच दृष्टिकोणातून कोणी माना किंवा नका मानू. देवाबद्दलची भुमिका मांडण्याचा प्रयत्न करतो.
तथागत भगवान गौतम बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी वनात गेले.त्यातच त्या तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.तब्बल बारा वर्षानी.ते सिद्धार्थाचे महाबोधी बनले.हे ज्ञानप्राप्त होणं म्हणजे काय तर त्यांना ज्ञानरुपी देव मिळाला.त्याला तथागतांनी देव मानलं नाही.कारण ते ज्ञान त्यांना निव्वळ बोधीवृक्षाखाली बसल्यानं समजलं नाही.तर सतत विचार केल्यानं समजलं.त्यांना ते ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यापुर्वी जी दगडाच्या देवाला पुजण्याची प्रथा होती.ती वाईट वाटली.त्यांनी त्यानंतर त्याच गोष्टीचा प्रसार केला.
एक प्रसंग स्वामी विवेकानंदाचा सांगतो.स्वामी विवेकानंद हे जेव्हा तरुण होते.तेव्हा रस्त्यानं जात असतांना एक मुलगा घोडागाडीखाली येत होता.त्या मुलाला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी वाचवले.हा विवेकानंद त्या प्राण वाचणा-या मुलासाठी देवच.
कित्येकदा आपले लक्ष नसतांना व आपण रस्त्यानं जात असतांना आपला पाय एखाद्या सापावर पडत असतांनाच कोणीतरी सांगतात.'अहो पुढे साप आहे.जरा मागे फिरा' तेव्हा घाबरुन आपण मागे फिरतो.हा सांगणारा व्यक्ती आपल्यासाठी देव नाही का? त्सुनामीच्या वेळी एक अशी हिरोईन की त्या त्सुनामीत सर्वजण मरण पावले असतांना ती वाचली.कित्येकदा भुकंप झाल्यानंतर जमीनीच्या ढिगा-यात तीन दिवसानंतर मुले सापडलेली आहेत.तसेच माळीण गाव दुर्घटनेत ढिगा-याखाली एक लहान तीन वर्षाचं मुल चक्क बाराव्या दिवशी वाचलेलं मिळालं आहे.अशाच घटना हिरोशिमा व नागासाकी बाँबस्फोट झाल्यानंतर घडल्या.कित्येक लोकं जपानमध्ये घरे बांधतांना पायवे करतांना जमीनीत सापडलीत.
एखाद्या दिवशी आपल्याला पैशाची फार गरज असते.आपल्याजवळ पैसा नसतो.तेव्हा कोणीतरी अचानक अनोळखी आपल्याकडे येवून पैसा देवून जातो.तसेच पूर,भूकंप,वादळात सारं समाप्त होते.पण अशावेळी एखादा वाचतोच.तेव्हा आपणच म्हणतो,किती भाग्यवान आहे हा.एवढ्या विपदेत वाचला आणि एखादा व्यक्ती रात्री प्रवासाला निघत असेल आणि कोणी जावू नको असे टोकत असूनही तो गेल्यावर दुर्घटना झालीच तर त्याला काय म्हणावं? ह्यावरुन देव अस्तित्वात असल्याच्या कल्पना येतात.
अचानक सापावर पाय पडत असतांना कोणी आपल्याला सुचना देणे.अचानक गाडी अंगावर येतांना कोणीतरी आवाज देणे.तसेच कोणतेतरी संकट येण्यापुर्वी कोणीतरी अडवणूक करणे ह्या तत्सम गोष्टी देव असल्याची अनुभूती देतात.महत्वाचं म्हणजे देव आहे.पण तो मानण्यावर आहे.समजण्यावर आहे.
काही लोकं देव मानतात.मानायला पाहिजे.पण त्याचा बाऊ करीत असतात.काही जे नास्तीक असतात.ते देव मानत नाहीत.नका मानू.पण निदान टिका तरी करायला नको.पण नास्तीक, आस्तीक दोघेहीजण एकमेकांशी देवाच्या मुद्यावर भांडत असतात उगाचंच वाद करीत असतात.धर्माच्या नावाची एखादी पोस्ट आली रे आली की पूर्ण न वाचताच केवळ शिर्षकांवरच त्यांच्या प्रतिक्रिया सुरु होत असतात.तो लेख समजूनच घेत नाहीत.त्यात लेखकाला काय अभिप्रेत आहे हे समजून न घेता उगाच वाद निर्माण करीत असतात.ज्या वादातून बाकीची मंडळीही त्यावर विचार न करता मेंढरागत आपल्या प्रतिक्रिया देत असतात.मात्र यालाही दुसरं अंग असतं.त्या दुस-या अंगाचा कोणी विचार करीत नाहीत.
नाण्यालाही दोन भाग असतात.तसे देव आहे व देव नाही हे मानणा-याचेही दोन गट.ठीक आहे धर्म व देव मानावा किंवा मानू नये.पण आपले विचार हे इतर कोणावरही थोपवू नयेत.हं प्रथांचा नक्कीच विरोध करावा.कोणाच्या अंगात देव येत असेल आणि तो आपल्या अंगात देव आणून कोणाची दिशाभूल करीत असेल.लुटत असेल तर नक्कीच विरोध करावा.कोणी कोणत्याही दगडाला देव मानून त्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचा बळी देत असेल तर अशा दगडाच्या मुर्तीलाही देव मानू नये.कारण देव काही कुणाचा बळी मागत नाही.कोणी गुप्त धनासाठी देवाचा सहारा घेवून त्या ठिकाणी नरबळी द्यायला भाग पाडत असेल तर नक्कीच विरोध करावा.तसेच ज्या ठिकाणी देवासाठी दासी म्हणून देवदासी वाहण्याची प्रथा असेल तसेच धर्माच्या नावावर किंवा देवाच्या नावावर स्रीचा विटाळ,दलितांचा विटाळ मानला जात असेल तर अशावेळी तो धर्म व तो देव न पुजलेला बरा.जे डॉक्टर बाबासाहेबांनी केलं.
केशवेपण,बालविवाह,विधवेचा विवाह न होवू देणे तसेच सतीप्रथा ह्या वाईट प्रथा होत्या.त्या केव्हाच्याच बंद झालेल्या असून आज समाज सुधारला आहे.पण आज त्याचं स्वरुप बदलून आलं आहे.आज कित्येक ठिकाणी देव अंगात येतो हे बहुतःश धर्मात दर्शवलं जातं.ज्याच्या अंगात येतो.त्याच्याभोवती लोकं गोळा होत असतात.तसेच त्यानं सांगीतलेल्या गोष्टी सर्रास केल्या जातात.हे काही बरोबर नाही.याचा विरोध व्हावाच.कारण तो देव नाही.मुख्यतः देव हा रंजल्या,गांजल्या लोकांत आहे.दीन दुःखी माणसात आहे.हे जे संतांनी सांगीतलं ते खरे आहे.त्यामुळं जमेल तेवढी मदत अशा रंजल्या गांजलेल्यांना करायला हवी.त्याचबरोबर हा अस्तित्वात असलेला देव पापाची शिक्षाही नक्कीच देतो.हेही तेवढेच खरे आहे.फरक एवढाच की ती शिक्षा हा देव कोणाला उशीरा देतो तर कोणाला लगेच.खुन किंवा बलत्कार करणारा माणूस ते कृत्य तर करुन जातो.न्यायालयही त्याला जामीनावर सोडतं.त्यानंतर ते कृत्य तो विसरतोही.पण जी नियती आहे.ती त्याला प्रत्यक्ष जीवनात सोडत नाही.ते कृत्य त्याचे विसरलेले असले तरी त्याची शिक्षा नियती त्याला देत असते.प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रुपाने.जसे सापाला काट्यावर फेकणा-या भिष्मालाही बाणाच्या शय्येवर झोपावे लागले.त्यामुळं जमेल तेवढी मदत रंजल्या गांजलेल्या लोकांना करायला हवी.जेणेकरुन आपण देव नाही मानला तरी आपले चांगले होईल.त्याचबरोबर मायबापाचीही सेवा करायला हवी.कारण तेच आपले खरे देव आहेत.तेच जग दाखवतात.
काही लोकं मात्र मायबापांना नक्कीच त्रास देत असतात आणि इतर लोकांची सेवा करीत असतात.करायला हवी.पण ज्याच्या उदरातून जन्म घेतला,ज्यानं आपल्याला देव दाखवला.ते विसरुन व त्यांची सेवा करणे सोडून इतरांची सेवा केल्यास पुण्य कसं मिळेल.पाप पुण्याला तर आपण मानायलाच हवं.कारण ते जर मानलं नाही तर विश्वात अनाचार माजेल.अहंकारात वाढ होईल नव्हे तर याच अहंकारातून विनाशही होवू शकतो.शेवटी एकच की देव आहे पण तो मुर्तीत नाही वा दगडातही नाही तर चांगल्या विचारात आहे.तुम्ही चांगले विचार ठेवा.तसे वागा.देव तुमचं चांगलं करेल.तो तुमच्या चांगल्या वाईट कृत्याचा नक्कीच हिशोब ठेवतो. कृत्याची नक्कीच शिक्षाही देतो.अन् तो जेव्हा शिक्षा देतो,तेव्हा ती ओळखायला वेळही मिळत नाही.कारण पश्चातापानं सर्व धुतल्या जातं.पण पश्चातापाची आठवण आपल्याला येईल तेव्हा ना.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०