Thirty five percent in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | पस्तीस टक्के वाले

Featured Books
Categories
Share

पस्तीस टक्के वाले

आम्ही पस्तीस टक्के वाले

नुकताच दहावी बारावीचा निकाल लागला व गुणवत्ता यादी जाहीर झाली. त्या यादीनुसार गुणवत्ता यादीत मुलांची नावं झळकली. ही गुणवत्ता यादी जशी स्टेट बोर्डातील झळकली, तशीच ती सी बी एस सी चीही झळकली. त्यातच ही गुणवत्ता यादी काही विद्यालय महाविद्यालयांनी तर झळकवलीच. व्यतिरीक्त ही गुणवत्ता यादी काही मातब्बर शिकवणी वर्गानंही झळकवली. त्यावरुन ती यादी पाहिली असता विचार आला आणि प्रश्न पडला की कोण होते या गुणवत्ता यादीत? या गुणवत्ता यादीत होते अगदी श्रीमंतांची मुलं. जी कितीतरी प्रमाणात गुणवत्ता यादीत आपल्या मुलाला आणण्यासाठी पैसा खर्च करीत असतात. लाखो रुपयाच्या शिकवण्या लावून देतात. कितीतरी पैसा त्या मुलांच्या शिकविण्यावर खर्च करतात. पुरेपूर साधनं उपलब्ध करुन देतात आपल्या मुलांना. घरीही त्या मुलांचा अभ्यास घेत असतात.
ही गुणवत्ता यादी. या गुणवत्ता यादीत गरीबांची मुलं शक्यतोवर दिसत नाहीत. कारण त्यांच्याजवळ अशा शिकवण्या लावायला पैसाच नसतो. त्यांना शाळेतही बरोबर फिडबॅक मिळत नाही. कारण शाळेतील शिक्षक शिकविण्या शिकविण्यात लिप्त असतात. आजच्या काळातील या शिक्षकांना माहीत असते की आजची मुलं शिकवणी लावतातच. शिवाय नसेल लावली तर लावावी. म्हणूनच ते वर्गात शिकविण्यावर जास्त भर देत नाहीत. कारण समजा एखादा मुलगा वा दोनचार मुलं जर नापास झालीही, तरीही त्यांचं काय जातं? त्यांना बरोबर बढती आणि इतर भत्ते ठरलेलेच असतात. त्यांचे वेतनही निकाल हा निष्कर्ष गृहीत धरुन कापले जात नाहीत आणि त्यांचे वेतन आणि भत्तेही कमी होत नाही. कारण बरेचसे शिक्षक आज अशा नोकरीवर नातेवाईक असतात.
आजच्या काळात शिकवणी वर्गाचं शाळेशी संधान असतं. कोणाला मेरीट आणायचं. कोणाला नाही हेही ठरलेलं असतं. ते सर्वच मुलांना गुणवत्ता यादीत आणत नाही. तसा संशय निर्माण होवू शकतो. तशीच जेवढी मुलं त्या शिकवणी वर्गाची गुणवत्ता यादीत येईल. तेवढी त्यांच्या शिकवणी वर्गाची फी वाढत असते. म्हणून शिकवणी वर्गाचे अशा मुलांना गुणवत्ता यादीत आणण्याचे प्रयत्न. कारण त्या गुणवत्ता यादीनुसार त्या शिकवणी वर्गाचं महत्व वाढतं ना.
मागे अशाच एका प्रसिद्ध शिकवणी वर्गाचं बिंग फुटलं. तो शिकवणी वर्ग सर्रासपणे तसं सेटींगच करीत होतं गुणवत्ता यादीत आणण्यासाठी. परंतू वाईट ते वाईटच. खोटेपणा कधी ना कधी बाहेर येणारच. तसं ते बिंग फुटलं. आज त्या शिकवणी वर्गाचं नावच कुठं दिसत नाही. परंतू आज असे बरेचसे शिकवणी वर्ग आहेत की ज्या शिकवणी वर्गातील मुलांना शाळेत जावेच लागत नाही. फक्त शिकवणी वर्गाला जावे लागते. पैसे ठरलेले असतात. आता कोणी म्हणतील की मुलं जर गुणवत्ता यादीत पैशानं येतात तर त्यांना शिकवणी वर्गात जाण्याची काय गरज आहे? याबद्दल सांगायचं झाल्यास गरज आहे असं म्हणता येईल. कारण पुर्णच मुलांचे पेपर शिकवणी वर्ग आपल्या हातानं सोडवून देणार नाहीत. तसंच शिकवणी वर्ग काही स्वतः पेपर सोडविण्याच्या सेंटरवर जाणार नाहीत. पेपरमध्ये काही ना काही तर विद्यार्थ्यांना सोडवावेच लागेल ना. त्यामुळंच त्या मुलांना पेपर सोडवावा लागत असल्यानं ते विद्यार्थी शिकवणी वर्गाला जात असतात.
आज अशीच सारी व्यवस्था. गुणवत्तेसाठी रस्सीखेच. आज विद्यार्थ्यांना शाळेत वा महाविद्यालयात जाण्याची गरज नाही. सारं साच्यात टाकल्यासारखं. शिक्षणासाठी पै पै पैसा खर्च केला जातो आणि अशांचीच मुलं पुढे जावून डॉक्टर, इंजिनीअर बनतात किंवा मोठ्या हुद्यावर जात असतात. अशा मुलांचा सत्कार होतो. ती गुणवत्ता यादीत येतात तेव्हाही आणि ती मोठ्या हुद्द्यावर पोहोचतात तेव्हाही. त्यांच्या मुलांना पुरस्काराच्या नावावर मोठमोठे बक्षीस मिळत असतात. काही बक्षीस हे पैशाच्या स्वरुपाचे असतात. याचाच अर्थ असा की पैशाच्या जागी पैसा जातो. ज्या पैशाची निकड गरीब मुलांना असते.
गरीबांची मुलं. ती मागेच पडतात. कारण त्यांच्याजवळ पुरेशी शिकवणी लावायला पैसा नसतो. शाळेतही ढंगाचं शिकायला मिळत नाही. एवढंच नाही तर ती मुलं जेव्हा शिकत असतात. तेव्हाही त्यांना पोट भरायला जवळ पैसा नसल्यानं ती मुलं कामाला जात असतात. पोटाची गरज म्हणून पोट भागविण्यासाठी काम करुन पैसाही कमवीत असतात आणि शिकतही असतात. अशावेळेस अशा परिस्थितीत अशा मुलांना किमान जर पस्तीस प्रतिशत गुण मिळालेच तर ते गुण वाखाणण्याजोगे असतात.
खरं तर त्यांचा सत्कार व्हायला हवा. परंतू तसा सत्कार त्यांचा कोणीच करीत नाहीत. कारण आजचा काळ हा पैशाचा आहे. दिखावूपणाचा आहे व भ्रष्टाचाराचा आहे. आजच्या काळात गरीबांना वाव नाही. तसंच गरीबांच्या लेकरांच्या गुणवत्तेलाही वाव नाही.
महत्वाचं म्हणजे अशा पस्तीस टक्के गुण मिळविणा-या मुलांचाही सत्कार व्हावा. त्यांना दुषणं देवू नये. कारण ते पास होतात काबाडकष्ट करुन. त्यांच्या घामातून ते गुण पडत असतात. याची जाणीव आपल्याला असायला हवी. हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०