Recent courses in secular or proselytizing in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | अलिकडील अभ्यासक्रम धर्मनिरपेक्ष की धर्मांतरीत

Featured Books
Categories
Share

अलिकडील अभ्यासक्रम धर्मनिरपेक्ष की धर्मांतरीत

अलिकडील अभ्यासक्रम धर्मनिरपेक्ष की धर्मांतरीत?
*अलिकडील काळात अभ्यासक्रम हा धर्मनिरपेक्ष आहे की धर्मांतरीत हे ओळखणे कठीणच आहे. कारण आज ना संयोगीतेचा इतिहास शिकवला जात. ना राजा दाहीरचा. ज्यांनी खरंच देशासाठी कार्य केले. उलट आज असा अभ्यासक्रम शिकवला जातो. जो धर्मनिरपेक्षतेला बाधक ठरत असतो.*
आजच्या काळात जगात वावरतांना धर्माचं स्तोम माजलेच आहे. धर्माला लोकं जास्तीत जास्त महत्व देत आहेत. धर्माच्या नावावर लोकं एकमेकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही देश मात्र धर्मनिरपेक्ष आहेत तर काही देश हे कट्टर धर्मवादीच आहेत. ते कट्टर राष्ट्रवाद पसरवीत असतांना दिसत आहेत.
कालही धर्म होताच व कालही धर्म हाच प्रगतीचा आधार मानल्या जात होता. त्याच आधारावर साम्राज्यवाद उफाळला. साम्राज्यवादालाच प्रगती समजलं गेलं. ज्यातून साम्राज्यविस्तारवादी धोरण अवलंबलं गेलं आणि त्यातूनच हिंसा आली. कारण हिंसाच केली गेली नाही तर साम्राज्यविस्तार कसा करता येईल? हा प्रश्न होता.
साम्राज्यविस्तारवादी धोरण राबवीत असतांना त्याकाळातील सत्ताधिशांनी हिंसेला प्रथम प्राधान्य दिलं. मग हवं तेव्हा युद्ध व्हायचं. हवा तेव्हा अत्याचार. ना युद्धांना विराम असायचा ना सैनिकांना आराम. ना सैनिकांच्या परिजनांना आराम. सैनिकांना गुलाम समजत त्यांच्यावर अत्याचार केले जायचे. सर्वांचं जगणं कठीण झालं होतं. शिवाय सैनिकांच्या विधवा स्रियांवर व त्यांच्या मुलींवर बळजबरीने बलात्कार केले जायचे आणि मुलांवर तेवढेच शारिरीक अत्याचार. त्यांना दुःख म्हणजे काय हे अगदी लहानपणापासूनच समजायचं. व्यतिरीक्त त्यांचा केव्हा जीव जाईल, याची शाश्वती नसायची. नरबळीत तर जबरदस्तीनं त्यांच्याच लेकरांचा सर्रासपणे वापर केल्या जायचा. काही सत्ताधीश सत्ता आल्यानंतर अगदी निरंकुशपणे वागायचे.
काही काही शासक जेव्हा भारतात आले, तेव्हा त्यांनी येथील मुळ प्रजाजनांवर अत्याचारच केला. येथील संस्कृती मिटविण्याचा प्रयत्नही केला. येथील धर्मही मिटविण्याचा प्रयत्न केला. येथील लोकांमध्ये धर्माबाबत तेढ निर्माण व्हावी व आपल्याला राज्य करता यावं म्हणून येथे धर्माबाबत भांडणं लावली. एवढंच नाही तर या जाती कनिष्ठ व या जाती उच्च अशा स्वरुपाचीही भांडणं लावली. पुस्तकी ज्ञान हे चांगलं असल्यानं लोकं ते वाचून सन्मार्ग पत्करतील असा दृष्ट हेतू मनात आल्यानं येथील बरीचशी विद्यापीठं जाळली व ज्ञान मिटविण्याचा प्रयत्न केला. हे सर्व अरबी शासकांच्या काळात घडलं.
मुघली शासक जेव्हा भारतात आले. तेव्हा त्यानीही येथील जनतेवर अत्याचारच करणे सुरु केले होते. त्यांनी तर येथील गुलाम झालेल्या सैनिकांना आपल्या राज्यातील सांडपाणी वाहायला लावलं. एवढंच नाही तर त्यांनी आपला धर्म प्रसविण्यासाठी येथील धार्मिक गोष्टी नष्ट केल्या. धर्मांतरण केलं. त्यासाठी हिंसा केली. माणसांची आणि प्राण्यांचीही हत्या केली. त्यांचा काहीही दोष नसतांना.
ज्ञान........साधनांच्या दृष्टीकोनातून ज्ञानाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. पुस्तकी ज्ञान व मुखोद्गत असलेलं ज्ञान. पुस्तकी ज्ञान हे कधीही हिंसा प्रसारीत करीत नाही. कारण त्याला बंधन असतं. मात्र मुखोद्गत ज्ञान हे कधीकधी हिंसा पसरवीत असते. पुस्तकी ज्ञान हे फक्त सांगत असतं की अमुक अमुक केल्यानं अमुक अमुक नुकसान झालं होतं. ते सांगत असतांना तसं तुम्ही करु नये, वागू नये. हाच संदेश देत असते पुस्तक. मुखोद्गत ज्ञान हिंसेचाच आदेश देत असते कधीकधी. तर कधीकधी ते ज्ञान शांतीचाही प्रसार करीत असते. काल तथागत गौतम बुद्धांनी त्यांना प्राप्त असलेलं ज्ञान मुखोद्गत करुनच प्रसारीत केलं. पुढं ते ज्ञान विलोपास जावू नये म्हणून तथाकथित राजे रजवाड्यांनी भित्तिपत्रकावर कोरलं. काहींनी ताम्रपटावर कोरलं तर काहींनी भुर्जपत्रावर. आजही अजिंठा आणि वेरुळ सारख्या लेण्यातून ते ज्ञान दिसून पडतं व तेच ज्ञान वृद्धींगत झालं. आजही असं ज्ञान इमारतीसाठी खोदकाम करीत असतांना त्यात सापडलेल्या ताम्रपटावरुन दिसून येतं. ताम्रपटं जमीनीत गाडली गेल्यानं नष्ट करता आली नाही वा भिंतीवर लिपीत ते ज्ञान कोरलं गेल्यानं व ती लिपी समकालीन शासनकर्त्यांना समजली नसल्यानं त्या लिपीतील ज्ञान नष्ट करता आलं नाही. काही ज्ञानाचे स्रोत हे कोरले गेले नाही. कारण तसं कोरणं कठीण काम होतं. त्यामुळंच ते दगडात वा ताम्रपटावर कोरता न आल्यानं यातील काही ग्रंथही भोजपत्रावर लिहिल्या गेले होते. जे विद्यापीठात ठेवले गेले होते. परंतु तत्कालीन शासकांनी त्यांच्या धर्मप्रसाराच्या ते ज्ञान अडसर वाटल्यानं त्यांनी ते ज्ञान नष्ट करण्यासाठी जाळून टाकलं व कितीतरी पटीचं अनमोल असलेलं ज्ञान असं जाळण्यातून नष्ट झालं.
आज अशाच ज्ञानाची गरज आहे लोकांना. लोकं अभ्यासक्रमाची मांडणी करुन असं ज्ञान जगाला शिकवीत आहेत. परंतु हे सर्व ज्ञान शिकवीत असतांना त्या ज्ञानालायक सत्ताधीश राजसत्तेवर बसणे गरजेचे आहे. जसा सत्ताधीश तसं ज्ञान व तशीच विचारसरणी व तसाच अभ्यासक्रम. खरं तर अभ्यासक्रम हा कोणत्याही धर्माचं तत्वज्ञान मांडणारा नसावा. खरं तर अभ्यासक्रम हा धर्मनिरपेक्ष स्वरुपाचा असावा. परंतु कालपर्यंत जो अभ्यासक्रम बनवला गेला व राबवला गेला. तो अभ्यासक्रम त्या त्या शासकांनी आपल्याला शासन आपल्या पद्धतीनं चालवता यावं, अशाच पद्धतीनं तयार केला व राबवला. ज्यातून जातीभेद, धर्मभेद तयार झाला. ज्यातून असंख्य लोकांचे विनासायास प्राण गेले. आजही अभ्यासक्रमाचं अगदी तसंच आहे. आज अभ्यासक्रम अशी अफुची गोळी आहे की आजच्या या अभ्यासक्रमातून गुलामीच प्रसवली जात आहे असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. हा अभ्यासक्रम शिकविणारे शिक्षकच स्वतःला शासनाचे गुलाम समजून त्यांच्यावर होणारा अन्याय सहन करुन शिकवतात. त्याचं कारणही देतात. ते म्हणजे वेतन मिळणे. त्यांना असं वाटते की माझ्यावर होणारा अन्याय मी जर चार लोकांना दाखवला तर माझं वेतन बंद होईल. वेतन देणाऱ्या सरकारचे ते गुलामच असल्यागत वागत असतात. मग ते काय न्याय देतील आपल्या शिकविण्याला. शिवाय यातूनच शासन त्यांना अभिप्रेत असणारा अभ्यासक्रम, मग तो त्यांना आवडो की न आवडो, तो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या लायक असो की न असो, तो अभ्यासक्रम धर्मनिरपेक्षता न करणारा असो वा नसो आणि तोच अभ्यासक्रम जातीभेद पसरविणारा असो की नसो, तो राबवावाच लागतो. इथं जरी धर्मनिरपेक्षतेचा अभ्यासक्रम तयार केल्या गेला असला तरी या अभ्यासक्रमानं विदेशी असलेल्या सर्वच साम्राज्यवाद्यांचा विस्तार त्याची आपल्याला आवश्यकता नसूनही अगदी उत्कृष्टपणे मांडला आहे आणि इथेच जन्मलेल्या राजा दाहीरचा इतिहास पुस्तकात नाही, फक्त एकच ओळ पुस्तकात आहे. तो एक उत्कृष्ट राजा असूनही. ही शोकांतिकाच आहे. तो राजा येथील लोकांना माहीतच नाही. येथील इतिहासानं पृथ्वीराज चव्हाणांना एका पॅरेग्राफमध्ये समाप्त केले आहे. त्याचा मित्र कवी चंदवरदाईचा इतिहास गहाळच केला आहे. शिवाय येथील अभ्यासक्रमात ना संयोगीतेचा इतिहास आहे ना दाहीरच्या मुलींचा. यावरुन वाटतं की आज जरी आपण स्वतंत्र असलो तरी समस्त मुघल सत्तेचेच गुलाम आहोत वा स्वतंत्र असलो तरी समस्त इंग्रजांचेच गुलाम आहोत. कारण मुघलांचा व इंग्रजांच्याच इतिहासाचा भरणा आज पाठ्यपुस्तकात जास्त आहे. शिवाय आणखी सांगायचं झाल्यास आमचे शिक्षक आजही जसे सरकारचे गुलाम आहेत. तसेच ते संस्था चालविणाऱ्या खाजगी संस्थाचालकांचेही गुलाम असल्यासारखे वागतात. जरी बांबासाहेबांनी संविधान लिहून त्यांना कायद्याचं पाठबळ दिलं तरीही........
आज गुलामी व स्वतंत्र्यतेमध्ये बराच फरक आहे. आज व्यक्तिस्वातंत्र्य असलं तरी व्यक्ती स्वतंत्र नाहीच. कारण व्यक्ती जर स्वतंत्र असता तर मतदान करतांना त्यानं बराच विचार करुन मतदान केलं असतं. एक साधा अडाणी व्यक्तीही मतदान करतांना काळजीपूर्वक विचार करतो. प्रचार करायला येणाऱ्या नेत्यांना तो थेट प्रश्न करतो व मतदान करतांना कोणतीही बटन दाबत नाही. उदाहरण देतांना एका सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्याचं देतो. गतकाळात लोकसभा व विधानसभेचं मतदान एकाच दिवशी होतं. त्यावेळेस मतदानाच्या बटन दाबायच्या मशिना दोन होत्या. म्हाताऱ्याला ते कळत नसल्यानं त्यानं एक बटन दाबलं. त्यानंतर बीपचा आवाज आलाच नाही. तेव्हा तो अडाणी असल्यानं त्यानं विचारलं की हा बीपचा आवाज का येत नाही? मग सगळा संभ्रम. का येत नाही? याबद्दल धावाधाव. नंतर कळलं की असं का झालं असावं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास अडाणी व्यक्तीही मतदान करतांना जागृत असतो. परंतु शिकलेला व्यक्ती जागृत नसतो. शिकलेला व्यक्ती जागृत नसतो हे सांगतांना मी एवढंच सांगेन की शिकलेल्या व्यक्तीची निवडणूकीत ड्युटी लागते. तसं पाहिल्यास त्याला पोस्टल मतदान करता येतं आणि मतदान हा लाखमोलाचा आपला अधिकारही आहे. परंतु बरीचशी शिकलेली मंडळी निवडणूकीत ड्युटी करतात. परंतु पोस्टल मतदान करीत नाहीत. यावरून शिकलेला व्यक्ती अडाणीच आणि तेवढाच गुलामच असल्यासारखा वाटतो. तो स्वतंत्र वाटत नाही. आज तर ते पोस्टल मतदानही गायब होणार की काय? अशीही भीती वाटत आहे. म्हणूनच काल जसे राज्यकर्ते अडाणी असलेल्या वा पराभूत झालेल्या लोकांवर वा सैनिकांवर अत्याचार करीत. तसेच आजही हेच राज्यकर्ते आपल्याच शिकलेल्या परंतु शिकूनही अडाणीच माणसांपेक्षाही बढतर आयुष्य काढणाऱ्या वा वागत असलेल्या माणसांवर अत्याचार करतात. तेच अत्याचार पाहात असतांना असं जाणवतं की त्यांची अवस्था आजच्या काळात महाभारत काळातील द्रोणाचार्य सारखीच आहे. बिचाऱ्या द्रोणाचार्यला जसा राजकुलाच्या भयानं मनात इच्छा असूनही एकलव्याला शिकवता आलं नव्हतं आणि त्याला त्या काळात बदनाम केलं गेलं. शिवाय त्या राजकुलाच्या भयानं नाईलाजानं द्रोणाचार्यंना एकलव्य योग्य शिष्य बनू नये म्हणून त्याला अंगठाही मागावा लागला होता. हे विसरता येत नाही.
मुळात सांगायचं झाल्यास आजचा अभ्यासक्रमही तसाच आहे. आजच्याही अभ्यासक्रमात राजकुलाच्या भयानं कित्येक द्रोणाचार्य कित्येक एकलव्याचे अंगठे मागून स्वतःची बदनामी करुन घेतात. तसे अंगठे मागतांना ते अंगठे मागायची त्यांची इच्छा नसतेच. परंतु काय करणार? पोटाचा प्रश्न आड येतो द्रोणाचार्यसारखा. मग अंगठा मागितलाच जातो एकलव्याचा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर. कारण राजसत्तेतील अभ्यासक्रम रुपी अर्जुनाला जिंकवायचे असते. शेवटी सांगायचं म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या नावावर वेगळाच अभ्यासक्रम राबवून एकप्रकारे धर्मच प्रसवला जातो असे म्हटल्यास काही गैर नाही. कारण अलिकडील काळात तसाच अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न करतात आहे राज्यकर्ते आणि तसाच अभ्यासक्रम राबवला जात आहे. आताही नवीन शैक्षणिक धोरणातीलही अभ्यासक्रमातील आकृतीबंध व अभ्यासक्रम तोच आहे. त्यात किंचीतही अंतर पडलेले नाही. फक्त माणसं बदलली. साधनं तीच आहेत. असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. हे तेवढंच खरं आहे. यावरुन असं वाटतं की अलिकडील काळातील अभ्यासक्रम हा धर्मनिरपेक्ष राहील की धर्मांतरीत हे ओळखणे सोपे जाईल काय? यात खरंच आपल्या देशाचा अभिमान असलेल्या राजा दाहीरला पुस्तकात समाविष्ट करता येईल काय? तसंच महाराणी संयोगीता व राजा दाहीरच्या मुलींना पाठ्यपुस्तकात स्थान मिळेल काय? व्यतिरिक्त इतर उपेक्षीत असलेल्या ऐतिहासिक पात्रांना स्थान मिळेल की तेच ते घटक बळजबरीनं इतिहास शिकण्यासाठी बाध्य राहतील? हे प्रश्न अधांतरीत आहेत. जर यावर उत्तर मिळालंच आणि अभ्यासक्रमातून सत्य बाहेर आलंच तर मिळवलं यात शंका नाहीच.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०