Bhagwadgita - 17 in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | भगवद्गीता - अध्याय १७

Featured Books
Categories
Share

भगवद्गीता - अध्याय १७

सतरावा अध्याय
श्रद्धात्रयविभागयोग
अर्जुन म्हणाला हे कृष्णा ! जे लोक श्रद्धेने पुजा करतात पण त्यांना शास्त्र माहित नसते त्यांच्या मनाची स्थिती त्रिगुणांपैकी कोणती समजावी सत्व, रज कां तम ?.
श्री भगवान म्हणाले, माणसाच्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा असते.
त्याचा जसा गुण असतो तशी त्याची श्रद्धा बनते. सात्त्विक मनुष्य देवाची भक्ति, पुजा करतो, राजस मनुष्य यक्ष राक्षसांची पुजा करतात तर तामसी भूत प्रेत आदिंची पुजा करतात. अहंकारी वृत्तीने, दांभिक पणे, काही इच्छा बाळगु शास्त्राचा आधार न घेता जर कोणी तप करीत असेल तर तो स्वत:च्या देहातील इंद्रियांना कष्ट देतो व देहात कसणाऱ्या मलाही यातना देतो.
तो असुर समजावा.
माणूस जे भोजन (अन्न) घेतो तेंही त्याच्या गुणांनुसार तीन प्रकारचे असते. यज्ञ, तप व ज्ञानाचे तीन प्रकार आहेत ते मी तुला सांगतो.
मनाला शुद्ध करणारे, आरोग्य वाढविणारे, प्रेम ताकद व सुख वाढवणारे,
तसेच टिकाऊ , स्निग्ध, चविष्ट, समाधान व आनंद वाढवणारे असे अन्न सात्त्विक लोकांना आवडते.
राजस प्रकृती च्या माणसाला कडू, आंबट, खारट , कोरडे , उष्ण व तिखट अन्न आवडते पण ते अनेक रोगांचे म्हणजे दु:खाचे कारण असते.
तीन तास आधी शिजवलेले, शिळे, बेचव , अपवित्र व उष्टे अन्न तामसी लोकांना बरे वाटते.
यज्ञ करणे म्हणजे एक कर्तव्य आहे असे समजून मनापासून, विधीपूर्वक, अपेक्षा न ठेवता यज्ञ करतो तो सात्त्विक.
हे अर्जुना ! दांभिक पणे व फळाची अपेक्षा बाळगून जरी विधियुक्त यज्ञ केला तरी तो राजस गुणाचा समजावा. कोणताही विधी नसलेला, मंत्र, दक्षिणा व अन्नदान नसलेला व श्रद्धा नसताना जो यज्ञ करतो तो तामस समजावा.
जो ब्राह्मण गुरूची व देवाची पूजा करणारा असतो व पवित्रतेने राहणारा, सौजन्याने वागणारा व अहिंसा व ब्रह्मचर्य यांवर विश्वास ठेवणारा असतो त्याला शारीरिक तप म्हणतात.
कोणाला दुखावणार नाही असे सत्य पण हितकर गोड बोलणे, वेदपठण करणे यास वाचिक तप म्हणतात.
सौम्य प्रसन्नतेने वागणे, संयम, गंभीरपणा व शुद्ध स्वभाव हे मानसिक तप. जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने, आकांक्षा रहित असे त्रिविध तपाचे आचरण करतो त्याला सात्त्विक तप म्हणतात.
जो मनुष्य मानसन्मान मिळवण्यासाठी दांभिक पणे तप करतो तो राजस गुणाचा असतो व ते क्षणिक असते व फलदायी नसते. दुराग्रहाने, मुर्खपणाने स्वत:लाच असे व जे दुसऱ्याला त्रासदायक अथवा दुसऱ्याचे वाईट चिंतुन केलेले तप हे तामसी जाणावे.
दान करणे हे कर्तव्य समजून, उपकाराची भावना न ठेवता योग्य वेळी योग्य व्यक्तीस केलेले दान सात्त्विक समजावे.
परतफेडीची भावना ठेवून म्हणजेच कांहीं अपेक्षा ठेवून व अनिच्छेने केलेले दान राजस समजावे. अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी व अयोग्य व्यक्तीस अपमान जनक रितीने दिले गेलेले दान हे तामस समजावे.
ॐ तत् सत् या शब्दांनी परब्रह्माचे वर्णन केले आहे. ब्राह्मणानी यज्ञांमध्ये ही अक्षरे परब्रह्माच्या प्रसन्नेता करीता उच्चारिली.
ॐ या शुभ शब्दानी यज्ञ, तप, दान व इतर शास्त्रोक्त कर्मांचा आरंभ केला जातो.

जे मोक्षार्थी असतात म्हणजेच मोक्षाची इच्छा करणारे लोक तत् चा उच्चार यज्ञ, तप, दान करतांना प्रथम करतात कारण तत् मधुन निरपेक्ष भावना दिसते. सत् याचा अर्थ चांगले असणे असाही होतो. त्यातून सात्विकता प्रकट होते.
जी कोणती चांगली कर्मे, कार्ये केली जातात त्याला सत् शब्द जोडला जातो, ( सत्कर्म ). सद्भभावना व भक्तिभावाने सत् चा उच्चार केला जातो. यज्ञ, तपस्या, ज्ञान यामध्ये मग्न असणे यालाही सत् असे म्हणतात व यज्ञ, तपस्या, दान याकरिता कर्तव्य भावनेने केलेले कर्मही सत् मानले जाते.
श्रद्धा नसताना केलेले तप किंवा केलेला यज्ञ तसेच अयोग्य माणसाला केलेले दान असत् ( चांगले नसलेले ) समजावे, व असे ( खोटे पणाने ) केलेले यज्ञ, तप, दान हे इहलोकांत पण फल देत नाही तर हे पार्था ! त्याला परलोक ( स्वर्ग ) कसा मिळेल ?.
सतरावा अध्याय पूर्ण.