भाडेतत्वावरील मनोरंजन;संस्कृतीचा तमाशा
भाडेतत्व........ एक विचारणीय तत्व. भाडेतत्वावर सगळंच मिळतं. घर, बस, कार,बैलगाडी, एव्हाना सायकल आणि माणसंही. माणसं मिळतात भाडेतत्वावर, परंतू ती माणसं काम करण्यासाठी........मनोरंजन करण्यासाठी नाही. परंतू जपान नावाचा तो देश. त्या देशात असाही तो व्यक्ती की तो केवळ मनोरंजनासाठी भाडेतत्वावर येतो. शोजी मोरिमोटो असं त्याचं नाव. तो टोकियोमध्ये राहतो. तो भाडेतत्वावर येतो व बदल्यात त्याचा मोबदलाही घेतो.
आज अशी भाडेतत्वावर मिळणारी माणसं काही कमी नाहीत. परंतू ती माणसं कामे करण्यासाठी मिळतात. मनोरंजनासाठी नाही.
अलिकडे जीवनात निरसता आहे. कोणी कोणाला आनंद देवू शकत नाही. कारण त्यांच्याजवळ पुरेसा वेळच नसतो. महागाई वाढली आहे. या महागाईचा सामना करीत असतांना माणसाला नैराश्यपण येतं आणि त्या नैराश्येतून पुढे आत्महत्या.
मनोरंजन ही माणसाच्या आयुष्य जगण्याची एक पुरवणी आहे. मनोरंजन जर नसेल तर ते आयुष्य निराशामय होवून जातं. जीवनात मनोरंजकता आणण्यासाठी माणूस धडपडतो. कारण अलिकडला काळच तसा आहे. माणूस कोणाच्या वाट्याला जरी जात नसेल, कोणाशी भांडण करु जरी इच्छीत नसेल, तरी भांडणं होतात. ती भांडणं विनाकारण असतात. ज्या भांडणातून काहीच निष्पन्न होत नाही. कोणी त्याला नशीबाचा भाग समजतात. तर कोणी त्याला नशीब समजत नाही.
अलिकडे मनोरंजनासाठी लोकं चित्रपटगृहाचा आधार घेतात. कोणी सर्कशीचा तर कोणी बागेचा. लोकांच्या मनोरंजनासाठी सरकारनं बागेची सुविधा करुन दिलेली आहे. तसेच गोव्यासारख्या ठिकाणी मनोरंजनासाठी कसिनोही उघडं करुन दिलं आहे. या कसिनोत मनोरंजन करीत असतांना कित्येक करोडो रुपयाचा जुवा खेळला जातो. त्यातच लाटरी, डान्सबारलाही तिथे उघडपणे सुट दिली आहे. दारुला तर अजीबात बंदीच नाही. अवघ्या देशातील एकंदर राज्यांपैकी या राज्यात दारु स्वस्त आहे. ह्या सर्व साधनांना गोव्यात बंदी नाही. त्याचं कारणही आहे करमणूक. करमणूकीनं आपल्या मनातील नैराश्येची मरगळ दूर होते. तसेच अशा प्रकारच्या मनोरंजक सोयीमुळं लोकं आपलं नैराश्यपण विसरतात. नैराश्येतून आत्महत्या करीत नाही.
सर्कशीत विदूषक आपल्याला हसवतात. हे आपण पाहिलं आहे. परंतू जो हसवतो तो किती दुःखी असतो अंतर्मनात हे आपल्याला माहित नाही. मेरा नाम जोकर नावाचा चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याला हे सगळं कळेल. या चित्रपटात त्या विदुषकाची आई मरण पावलेली असते. तरीही तिकीटं विकली गेल्यानं त्याच्या मालकाला तो खेळ रद्द करता येत नाही. शेवटी आईचं प्रेत तसंच ठेवून तो सर्कशीत उतरतो. तो सर्कशीतून मनोरंजन करतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यात एवढंसंही दुःख नसतं. यामध्ये हे लक्षात घ्या की हा चित्रपट आहे. परंतू ख-या जीवनातही असंच घडतं. ख-या जीवनात जे कलावंत काम करतात. ते कलावंत आपल्या मायबापापासून बरेच लांब असतात. परीवारापासूनही लांब असतात. कदाचित सर्कशीत काम करीत असतांना त्यांच्या परीवारातील कोणाचा ना कोणाचा मृत्यू होतो. परंतू त्याही वेळी त्याला जाता येत नाही. ते केवळ आणि केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी जगत असतात. तेही भांडेतत्वावर.
भारत देश........हा देश संस्कृती प्रदान देश आहे. या देशात मनोरंजनालाही संस्कृतीची झालर आहे. काही काही आदिवासींमध्ये उत्सवाच्या प्रसंगी नाचगाणे होतात. कधी हे नाचगाणे रोपे लावणीवेळी तसेच पीक काढण्याच्या वेळी होतात. यावेळी परीवारातीलच नाही तर गोटूलातील सर्व लोकं थोडी थोडी दारु प्राशन करीत असतात आणि सोबत सोबत नृत्य करीत असतात. परंतू ते सर्व नृत्य संस्कृतीला धरुन संयम ठेवून असतं. अर्धनग्न अवस्थेतील नृत्य नसतं. विदेशात मात्र मनोरंजनासाठी नृत्याचा प्रकार वापरला जातो. या ठिकाणी नृत्यात अर्धनग्नतेचा समावेश होतो. कारण तेथील वातावरण. तेथे दमट वातावरण आहे. ज्या वातावरणानं शरीरावर कपडेच सहन होत नाही. परंतू गोव्याचा विचार केल्यास भारतातही तो प्रकार आता रुढ होवू लागला आहे. परंतू या प्रकाराला गोवा जर सोडला तर बाकी ठिकाणी बंदी आहे. कारण ती आपली संस्कृती नाही. तरीही लपूनचोरुन आजही देशात असे नृत्य भरवले जातात आणि देशाच्या संयमी आणि शिस्तप्रदान संस्कृतीचे धिंडोळे उडवले जातात.
आज याच मनोरंजनाचा विचार केल्यास ज्याप्रमाणे जपानमध्ये शोजी मोरिमोटो नावाचा व्यक्ती लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जातो. तो त्याचा मोबदला घेतो. तशी भाडेतत्वाची सोय याही देशात आहे. परंतू त्याला राजमान्यता नाही. ह्याच भाडेतत्वाचा विचार केल्यास काही कवी मंडळी मनोरंजन करण्यासाठी जातात. ते भाडेतत्वच आहे.
मनोरंजनाचा विचार केल्यास मनोरंजनाचे दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी मनोरंजन आणि दुसरा म्हणजे वाईट गोष्टीसाठी मनोरंजन. चांगल्या मनोरंजनाचा विचार केल्यास कवींचं भाडेतत्वावर जाणं. त्यांनाही मोबदला दिलाच जातो. ते भाडेतत्वच असतं. तसेच वाईट गोष्टीसाठी मनोरंजन म्हणजे एखाद्या नर्तकीला भाडेतत्वावर मनोरंजनाची स्विकृती देणं. पुर्वीचे राजेही अशाप्रकारचं मनोरंजनासाठी भाडेतत्व वापरत असत. त्यांच्या काळात विशिष्ट असा रंगमंच असायचा. याला कलादालन म्हणत. या कलादालनावर राजनर्तकी आपल्या राज्यातील राजे व मंत्रीगणाच्या मनोरंजनासाठी नृत्य करीत असत. बदल्यात तिला पैसे देत. यामध्ये विशेष नाव म्हणजे आम्रपाली हे नाव उल्लेखनीय आहे. तसेच ज्याला आपण दंतकथा म्हणतो. त्या इंद्राच्या दरबारी असलेल्या रंभा, उर्वशी, मेनका आणि तत्सम ज्याला आपण अप्सरा म्हणतो. त्याही अशाच भाडेतत्वावरील असतील हे नाकारता येत नाही.
जपानमध्ये शोजी मोरिमोटो नावाचा एक माणूस मनोरंजनासाठी जाणे म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. असे अनेक देश मनोरंजनासाठी आपल्या देशातील कितीतरी माणसांचा वापर मनोरंजनासाठी करीत असतात हे सांगणे विशेष.
आताची परीस्थिती लक्षात घेता ज्याप्रमाणे पुरुष मनोरंजनासाठी स्रियांचा वापर करतात. त्याचप्रमाणे महिलादेखील मनोरंजनासाठी पुरुषांचा वापर करीत असल्याचे दिसते. एखाद्या स्रीला घरी करमत नसेल तर ती स्री आपल्या फोनद्वारे पुरुषांना बोलावते व त्याच्याकरवी आपलं मनोरंजन करुन घेते. अर्थात त्याचेसोबत फिरायला जाते. चित्रपट बघते. सर्कशीही पाहते. सायंकाळी पती घरी येण्याच्या वेळेवर ती घरी येते. परंतू ही गोष्ट जेव्हा तिच्या पतीच्या निदर्शनात येते. तेव्हा त्यातून घटस्फोट, आत्महत्या आणि खुनासारखे प्रकार होतात. पुरुषही मनोरंजन करण्यासाठी एखाद्या स्रीला बोलावतात नव्हे तर तिच्याबरोबर रासलीला मनवतात. तेही प्रकरण जेव्हा त्याच्या पत्नीला कळतं. तेव्हाही समस्या उद्भवतात.
विशेष सांगायचं म्हणजे घरी पत्नी असतांना पुरुषांनी अशी स्री बोलावून मनोरंजन करु नये. मनोरंजन करायचे असेल तर आपल्या पत्नीसोबतच करावे अर्थात फिरावे. तसेच स्रीनेदेखील परपुरुषांसोबत मनोरंजन करु नये. आपल्या पतीलाच तसा दर्जा प्रदान करावा. हा देश काही विदेशी दमट हवामानाचा देश नाही. आपली संस्कृती काही पाश्चात्य संस्कृती नाही की जिथे दररोजचे पती बदलले जातात. या देशाची वेगळी अशी संस्कृती आहे. ज्या संस्कृतीनुसार एका स्रीला एकच पती असतो. पती हाच परमेश्वर मानला जातो. त्यासाठी पतीनंही तसं वागायला हवं. तसेच ह्या देशात पाश्चात्य संस्कृती विपुल प्रमाणात रुजूही देवू नये. पाश्चात्य संस्कृतीचं तेवढंच घ्यावं. जे चांगलं असेल. जे पाश्चात्य संस्कृतीचं वाईटपण आहे. ते वाईटपण अजीबात घेवू नये. तसेच मनोरंजन करायचे झाल्यास आपल्या मनोरंजनात पाश्चात्यांच्या वाईट गुणांचा शिरकाव होवू देवू नये. आपली संस्कृती जशी महान आहे. तिला महानच राहू द्यावे म्हणजे झालं. मनोरंजनाचा आधार घेवून मनोरंजनासाठी आपल्या महान संस्कृतीच्या चिंधोळ्या उडवू नये. भाडेतत्वावर मनोरंजक साधने सहज मिळतात तरी.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०