Power of Attorney 2 - 7 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ७

Featured Books
Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ७

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ७    

भाग ६  वरून पुढे वाचा  ....

“त्यांची बायको अमेरिकेत असते आणि त्यांच्या आई ट्रॅवल कंपनी बरोबर कोस्टल कर्नाटक फिरायला गेल्या आहेत. म्हणून कदाचित फोन लागत नसेल. तुमचं काय काम होतं हे सांगितलं तर मी त्यांना कॉनटॅक्ट करायचा  प्रयत्न करेन.” – बाई.

“नाही, तशी काही आवश्यकता आणि अर्जनसी नाहीये, फक्त सगळं ठीक ठाक आहे का अशी चौकशी करायची होती. पण सगळं ठीकच दिसतंय, त्यामुळे  काळजी नाही. बरय धन्यवाद. मी चालतो.” असं म्हणून तो निघाला. परिस्थितीचा उगाच गवगवा करण्यात काही अर्थ नाही असं त्याला वाटलं. हा रीपोर्ट दुसऱ्या दिवशी दरभंगा ब्रँच ला पाठवून दिला.

***

X RAY चा फोटो आल्यावर त्यात दिसलं की गोळ्या नेमक्या कुठे आहेत ते. एक गोळी पोटाच्या बाजूला बरगडीच्या खाली लागली आणि बाहेर पण पडली होती. दुसरी मात्र आत खोलवर शिरली होती आणि आतड्याला लागली होती आणि अडकून पडली होती. आता मुळीच वेळ न घालवता ऑपरेशन जरूरी होतं. डॉक्टरांनी स्टाफला तसे निर्देश दिले, आणि ते बाहेर आले. बाहेर माधवी आणि एक जण बसला होता. डॉक्टरांनी त्यांना अपडेट दिलं, आणि ते पुन्हा आत गेले. रीसेप्शन वरुन  एक मुलगी आली आणि माधवीला म्हणाली, “आत्ता इमर्जनसी ऑपरेशन सुरू करणार आहेत, तेंव्हा तुम्ही फॉर्म  वगैरे भरून द्या.” ती माधवीला उद्देशून म्हणाली की “चला.”

माधवी तिच्या पाठोपाठ गेली. ती मुलगी माधवीला विचारून एक एक गोष्ट त्या फॉर्म मधे भरत होती. जिथे पेशंटशी नातं असा कॉलम होता. तिथे त्या मुलीने न विचारताच बायको असं लिहून टाकलं. आणि सर्व झाल्यावर माधवीला म्हणाली की फॉर्म वर सही करून टाका. माधवीला विचारूनच त्या मुलीने फॉर्म भरला होता, म्हणून माधवीला तो वाचण्याची जरूर वाटली नाही. तिने  न वाचताच सही केली.

एका लोकल चॅनेलचा वार्ताहर, पोलिस स्टेशनला गेला असतांना त्याला बँक रॉबरी ची माहिती मिळाली. इतकी सनसनाटी बातमी म्हंटल्यांवर, तो त्यांच्या टीम सह हॉस्पिटल वर पोचला. कॅमेरा चालू करून आधी त्याने पोलिस स्टेशन वर मिळालेली  माहिती सांगण्यास सुरवात केली आणि नंतर त्याने रिसेप्शनिस्टची जवळ जवळ मुलाखतच घेतली. तिनेच सांगितलं की पेशंटची बायको इथेच आहे म्हणून. हे कळल्यावर त्याने लगेच माधवी मोर्चा वळवला. माधवी कडून पुन्हा सगळी इत्थंभूत माहिती घेतल्यावर, त्याने स्वत:चं स्पीच सुरू केल. “इतकी मोठी घटना घडली आहे, आपल्या प्राणाची बाजी लावून मॅनेजर किशोरने बँकेवरचा हल्ला परतवून लावला. त्याला दोन गोळ्या लागल्या आहेत, आणि त्यांच्यावर इमर्जनसी ऑपरेशन सुरू आहे. इतकी गंभीर घटना असतांना इथे न कोणी बँकेचा वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहे, ना सरकारने याची दाखल घेतली आहे. कोणीही सरकारी उच्चपदस्थ इथे चौकशी करायला आलेला नाहीये, ही देशाच्या दृष्टीने अत्यंत शरमेची गोष्ट आहे.”

लोकल न्यूज चॅनेल वर ही स्टोरी सतत दाखवल्या जाऊ लागली. संबंधित लोकांचे फोन खण खणू लागले, हळू हळू नॅशनल चॅनेल्स वर सुद्धा ही स्टोरी आली, आणि मग मात्र सगळ्यांना खडबडून जाग आली. हॉस्पिटल मधलं वातावरणच  बदलून गेलं. भेटायला येणार्‍याची हॉस्पिटल मधे रिघ लागली. माधवी सगळ्यांना तेच तेच सांगून कंटाळून गेली आणि वरतून तिच्याकडे किशोरची पत्नी म्हणून सगळे अतिशय सहानुभूतीने बघत होते आणि दाखवत पण होते. सगळीच जनता आता माधवी बरोबर होती, आणि लागेल ती मदत करण्याचं आश्वासन देत होती. यातून कसा मार्ग काढायचा आणि आपण किशोरची बायको नाही हे कसं पटवून द्यायचं, हेच तिला समजेनासं झालं होतं.

***

त्या दिवशी रात्री विभावरीने किशोरला फोन केला पण तो स्विच ऑफ लागत होता. किशोरचा फोन स्विच ऑफ लागण्याचं काहीच कारण नव्हतं, या वेळेस तो बँकेत असायला हवा होता. अमेरिकेत रात्र होती, पण तिला काही झोप येत नव्हती. किशोरचा फोन स्विच ऑफ आहे म्हंटल्यांवर तिला काळजी वाटायला लागली. एक अनामिक हुर हुर वाटत होती. केंव्हा तरी उशिरा रात्री झोप लागली पण सकाळी सकाळी सहा वाजताच जाग आली, जागी झाल्यावर आधी तिने किशोरला फोन लावला. स्विच ऑफ. आता मात्र विभावरीचा धीर सुटला. तिने माईंना फोन लावला.

“माई, काल पासून किशोरला फोन लावते आहे, पण स्विच ऑफ येतो आहे. तुमचं काही बोलणं झालं का?”

“अग मी पण त्याला ३-४ वेळा फोन करण्याचा  प्रयत्न केला पण त्याचा फोनच बंद आहे. काही कळत नाही, काय प्रकार आहे तो.” – माई.

“ओके मी बघते आणि कळवते तुम्हाला.” विभावरीने फोन ठेवला. माईंना तिने म्हंटलं होतं की मी बघते, पण काय करायचं, यावर तिची बुद्धी चालेना. तिने तिच्या रूम पार्टनरला उठवलं, आणि सगळा प्रकार तिला सांगीतला. विभावरीचा काळजीने विदीर्ण झालेला चेहरा तिच्या पार्टनरने बघितला आणि प्रसंगाचं गांभीर्य तिच्या लक्षात आलं.

“विभावरी, आपण तिथली न्यूज बघू. कदाचित काही कळेल.” – पार्टनर.

“अग काहीतरीच काय? न्यूज वर मोठ्या घटनांच्या बातम्या असतात.” – विभावरी.

पण तिची पार्टनर जोरात ओरडली, “विभावरी, किशोरची न्यूज आहे. बँक रॉबरी झाली आहे. बघ जरा.”

मग दोघींनी ती बातमी सविस्तर वाचली. विडियो पण बघितले.  आता विभावरीची काळजी अजूनच वाढली. पार्टनर म्हणाली, “ विभा, किशोरची प्रकृती गंभीर आहे, त्याला दोन गोळ्या लागल्या आहेत, पण ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आहे, हे तर कळलं पण त्याची बायको म्हणून कोणी माधवी पुढे आली आहे हे कसं काय?”

“तेच तर मला कळत नाहीये. बँके कडे माझा इंडियातला नंबर असेल म्हणून मला कळवू शकले नसतील, पण माईंना तर कळवायला हवं होतं. आणि वरतून ती कोण कुठली माधवी, ती कशी समोर आली किशोरची बायको म्हणून? काही अंदाजच येत नाहीये.”

“विभा आजच्या आज बॉसशी बोलून तू भारतात जा. हा सगळा प्रकार फार भयंकर आहे.” – पार्टनर.

“हो तसंच करावं लागणार आहे.” – विभावरी.

***

ऑपरेशन थिएटर मधे डॉक्टरांची टीम व्यस्त होती. X RAY मधे बुलेटची नेमकी जागा कळली होती त्यामुळे आता ऑपरेशन ला सुरवात झाली होती. बुलेटच्या लोकेशन प्रमाणे, पोटावर इनसीजन केलं गेलं, आणि आत मधल्या जागेत जे  रक्त साठलं  होतं ते साफ करून बुलेट काढल्या गेली. आतड्याला जी जखम झाली होती ती शिवून टाकण्यात आली. मग आणखी कुठे कुठे जखमा झाल्या आहेत का ते बघून त्याचा बंदोबस्त केल्या गेला. मग सर्व झाल्यावर, पुन्हा एकदा चेक करून सलाईन आणि बिटाडाईनचा वॉश दिला. मग पोटातून एक नळी काढून ती बुलेटनी पडलेल्या एका छिद्रातून बाहेर काढली. एवढं सगळं झाल्यावर पोट  फायनली शिवून बंद केल. सर्व पॅरामिटर व्यवस्थित असल्याने डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी ऑपरेशन यशस्वी झालं आहे असं बाहेर बसलेल्या माधवीला सांगितलं.

“आम्हाला केंव्हा भेटता येईल?” – माधवी.

“आत्ता त्यांना रीकवरी रूम मधे ठेवलं आहे, पण दोन एक तासांनी त्यांना ICU मधे हलवू. तुम्हाला इतक्यात भेटता येणार नाही, पण तुम्ही ICU च्या दारातून पाहू शकता.” डॉक्टर म्हणाले आणि आपल्या केबिन कडे निघून गेले.

थोड्या वेळाने नर्स बाहेर आली, तिलाही माधवीने तोच प्रश्न विचारला आणि तेच उत्तर नर्सने दिलं. तिला अजून काही प्रश्न नर्सला विचारायचे होते, पण तेवढ्यात एक घोळका तिथे आला आणि त्यांनी तिच्या समोर माइक धरला. ती टीव्ही चॅनेल ची टीम होती आणि नंतर बराच वेळ तो गोंधळ चालूच होता. आता माधवीला करण्यासारखं काहीच नव्हतं. दोन तासांनी किशोरला ICU मधे हलवण्यात आलं. तिथे नेताना  माधवी त्याला पाहू शकली. किशोर अजून गुंगीतच होता पण  नर्सने सांगीतलं की सर्व ठीक आहे, काळजीचं काही कारण नाही.

माधवी आता निवांत पणे खुर्चीवर बसली. आता दुपारचे पांच वाजत आले होते, आणि सकाळपासून अन्नाचा एक कण सुद्धा तिच्या पोटात गेला नव्हता. तिला एकदम भुकेची जाणीव झाली. तिच्या बरोबर तिचा बँकेतला सहकारी होता, त्याने जाऊन काही तरी खायला आणलं. खाल्यावर जरा तरतरी आली.

“सकाळ पासून खूप विचित्र घटना घडताहेत, खूपच दगदग झाली. तुम्ही खूप थकल्या असाल, तुम्ही घरी जाऊन आराम करता का? मी थांबतो इथे.” – सहकारी.

“छे,छे. अरे, ज्या माणसाने माझ्या साठी जिवाची बाजी लावली, त्याला सोडून मी घरी जाऊ? माझ्या नवऱ्याच्या नावाला बट्टा लाऊ? शक्य नाही. उलट मी असं म्हणेन की तुझा संसार आहे, तू घरी जा. तुझी बायको आणि मुलगी वाट बघत असतील. मुलगी लहान आहे, त्यामुळे तूच घरी जा. फक्त एक कर, उद्या सकाळी ये, तो पर्यन्त सरांना शुद्ध आली असेल, मग मी घरी जाऊन येईन. सहकाऱ्याने माधवीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण  माधवी ठाम होती. शेवटी तो उद्या सकाळी चहा घेऊन येईन असं सांगून घरी गेला.   

 

क्रमश:.......  ./

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.