Power of Attorney 2 - 3 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ३

Featured Books
Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ३

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

   भाग ३

भाग २  वरून पुढे वाचा  ....

तुला बँकेच्या  बॅलेन्स शीटचा अभ्यास करावा लागेल, आणि हे एक प्रचंड काम असतं. त्या साठी तू कोणीतरी चांगला CA पकड. इतरही अनेक रेशो आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल, उदाहरणार्थ डेट -इक्विटी रेशो, असेट लायबीलीटी रेशो, वगैरे. पण हे सगळं हळू हळू कर. मन लावून केल्यास, कठीण काहीच नाहीये. थोडक्यात, ऑफिसर झाल्यावर तुला बँक यशस्वी रित्या चालवायची आहे, त्याचं हे शिक्षण आहे. तू हुशार आहेस, केंव्हाच मला मागे टाकून पुढे जाशील.” – साहेब.

“काय साहेब, काहीतरीच काय? तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी शिकतोय. उगाच माझी थट्टा करताय.” किशोर अवघडून बोलला. साहेब हसत होते.

किशोरच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, “ऑल द बेस्ट”

किशोर खुशीतच  घरी आला. आल्यावर नेहमी प्रमाणे साहेबांशी काय बोलणं झालं ते सांगीतलं. माई आणि विभावरी दोघीही आता निश्चिंत झाल्या, आता किशोर ची गाडी ट्रॅक वर आली होती आणि आता ती सुपरफास्ट धावणार होती यात त्यांना तीळ मात्रही शंका नव्हती.

आता रात्री बऱ्याच उशिरा पर्यन्त किशोरचा अभ्यास चालायचा. किशोरचं एक होतं, त्यानी एकदा मनावर घेतल्यावर तो मागे हटायचा नाही. विभावरी पण त्याच्या बरोबर बराच वेळ जागायची आणि त्याला प्रोत्साहीत  करायची.

यथावकाश CAIIB ची परीक्षा झाली. किशोर उत्तम मार्कांनी पास झाला. एक अडसर दूर झाला होता. किशोरच्या ज्ञानात पण खूप भर पडली होती, आता तो बँकेच्या कामकाजा बद्दल अधिकार वाणीने बोलू शकत होता. माई आणि विभावरी दोघी त्यांच्यातला हा बदल बघत होत्या. त्याचा आत्मविश्वास खूप वाढला होता, आणि माई आणि विभावरी दोघींनाही त्याचा आनंद होत होता. CAIIB ची परीक्षा पास झाल्यावर विभावरीने त्याला ट्रीट दिली. त्या दिवशी घरात आनंदाचं वातावरण होतं.

आता बँकेच्या परीक्षेची वाट होती, आणि अभ्यास जोरात सुरू होता. CA कडे जाऊन बॅलेन्स शीट कशी वाचायची याचं ट्रेनिंग घेऊन झालं.

“बॅलेन्स शीट मधे फायनल करतांना बरेच फेरफार केले असतात. ते कसे ओळखायचे आणि त्यातून नेमका अर्थ कसा  काढायचा हे पण शिकून झालं. लोन ऑफिसरला क्लाईंटची बॅलेन्स शीट वाचता आलीच पाहिजे आणि त्या प्रमाणे निर्णय घेता आला पाहिजे. जरूर पडल्यास, क्लायंट च्या जागेवर जाऊन बॅलेन्स शीट कोरिलेट  करता आली पाहिजे.” साहेब सांगत होते. किशोर त्यांचा आवडता शिष्य होता. त्यांच्याच शब्दा मुळे  किशोरला तो नियमात बसत  नसतांना सुद्धा २० लांखाचं कर्ज मंजूर केलं होतं. किशोरला त्यांची खूप मदत होत होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्याचा अभ्यास चालू होता.

विभावरी सुद्धा त्यांची परोपरीने काळजी घेत होती. त्याला अभ्यासाला शांत पणे बसता यावं म्हणून ती त्याचा प्रत्येक शब्द उचलून धरत होती. कुठल्याही वादाला तोंड फुटू देत नव्हती. माई हे सर्व कौतुकाने पाहत होत्या. त्या विभावरीला म्हणाल्यासुद्धा “किशोर जेवढे कष्ट घेतो आहे, त्यापेक्षा कांकण भर जास्तच तू करते आहेस. उत्तम मार्क मिळून पास होऊ दे म्हणजे चीज झालं.”

“नक्कीच होईल. किशोर जेवढं स्वत:ला ओळखतो, त्यापेक्षा मी जास्त ओळखते. तो असामान्य आहे. पण हे त्याला माहीत नाही.” – विभावरी.

“खरं आहे. लहानपणा पासून पाहते आहे मी, एकदा डोक्यात भूत घेतलं की तहान भूक विसरून त्यांच्या मागे धावतो.” माई कौतुकाने म्हणाल्या.

आता परीक्षा जवळ आली होती आणि किशोरचा अभ्यास पूर्ण झाला होता. आता रिवीजन साठी विभावरी त्यांच्या मदतीला आली. ती पुस्तक, नोट्स उघडून काही पण विचारायची आणि किशोर उत्तरं द्यायचा. परीक्षेची घडी जवळ आली. तयारी पूर्ण झालीच होती. पूर्ण आत्मविश्वासाने किशोरने परीक्षा दिली. यथावकाश रिजल्ट लागला आणि किशोर उत्तम रित्या पास झाला. त्या दिवशी सर्वांचाच आनंद गगनात मावेनासा झाला. किशोरने साहेबांना सहकुटुंब जेवायला बोलावलं, आणि आनंद साजरा केला.

आता आणखी एक पायरी शिल्लक होती. ती म्हणजे इंटरव्ह्यु. साहेबांनी सांगीतलं की पेपर मधे येणारे स्टँडर्ड अँड पुअर आणि  स्टॅनली मॉर्गन आणि मुडीज चे अहवाल नीट लक्षपूर्वक वाचत जा. आपल्याला अर्थ नीतीची माहिती पाहिजे. महत्वाच्या देशांचे चलन आणि त्यांचे आपल्या रुपया बरोबर एक्स्चेंज रेट काय आहेत आणि त्यात बदलाची कारणं. हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे.

किशोरचा अभ्यास साहेबांच्या सल्यानुसार सुरू होता. मग एक दिवस इंटरव्ह्युचा  दिवस उजाडला.

इंटरव्ह्यु घेणारे, चार जणांचं पॅनल होत, त्यांच्या पैकी एक जण म्हणाला, “या Mr किशोर, आम्ही प्रथम तुमचं अभिनंदन करतो. किशोर गोंधळला, त्याचं अभिनंदन करण्यासारखं काय घडलं आहे हेच त्याला कळत नव्हतं. तो प्रश्नार्थक  मुद्रेने त्यांच्या कडे पाहत राहिला.

“लग्न ठरलेलं नसतांना सुद्धा तुमच्या बायकोने त्यांची प्रॉपर्टी तुमच्या साठी सिक्युरिटी म्हणून ठेवली. बायका उगाच अश्या कोणावर भाळत नसतात. तुमच्या साठी त्यांनी हे केलं म्हणजे नक्कीच तुमच्यात असं काही आहे, की जे तुम्हाला स्पेशल बनवते आहे. तुमच्या गेल्या पांच वर्षातल्या कामाची आमच्या कडे पूर्ण माहिती आहे आणि आम्ही समाधानी आहोत. तुमच्या तिन्ही साहेबांनी उत्कृष्ट अहवाल दिला आहे. आम्ही तुम्हाला एकच प्रश्न विचारतो.” एक जण बोलला. आणि त्यांनी दुसऱ्याकडे पाहिले. दूसरा सारसावून बसला आणि विचारले.

“तुम्ही इंडस्ट्रीयल एरिया मधल्या ब्रँच चे शाखा प्रमुख आहात. आता तुम्ही नेमकं काय कराल ते सांगा.”

“सर, इंडस्ट्रीयल ब्रांच आहे, म्हंटल्यांवर, सर्वात प्रथम हे पाहीलं पाहिजे की जे जे बँकेचे खाते धारक आहेत, त्यांचे हेल्थ कोड काय ठरवले आहेत. त्या त्या कोड प्रमाणे त्या कंपन्या, जी परिमाणं बँकेने ठरवली आहेत, त्या प्रमाणे काम करताहेत काय? असल्यास काही अडचण नाही, पण नसल्यास त्यांच्या बरोबर चर्चा करून योग्य दिशेने जाण्यास त्यांना बाध्य करावे लागेल. खातेदारांची नीट माहिती घेऊन त्याचा अजून उत्कर्ष कसं होईल ते पाहणे आणि ते साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करणे. जरूर तेंव्हा खेळत्या भांडवलाची मदत करणे आणि पैशाचा योग्य विनियोग होतो आहे यावर बारीक लक्ष्य ठेवणे. जर काही खाती NPA होण्याच्या मार्गावर असतील, तर त्यांच्या अडचणी समजावून घेऊन, त्यावर सोल्यूशन काढता येत असेल तर प्रसंगी, जरूरी पुरता, जास्तीचा अडवांस देण्याची किंवा दिलेल्या कर्जाचे रिफेजमेंट करण्याची रिस्क घ्यावी लागेल, पण कुठल्याही परिस्थितीत खाती NPA होऊ देणं परवडणार नाही. मुळात ज्याची इंडस्ट्री असते, त्याला सुद्धा आपली कंपनी बंद पाडण्यात काहीच स्वारस्य नसतं. अश्या वेळेस जर बँक त्यांच्या मदतीला धावून गेली, तर परिस्थिती नक्कीच सुधारू शकते. खातेदारच्या मनात बँकेविषयी एक प्रकारचा अभिमान वाटू शकतो, आत्मीयता निर्माण होऊ शकते, जी  बँकेच्या निकोप वाढीसाठी एक कॅटॅलिस्ट शाबीत होऊ शकते.” किशोर जरा थांबला, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होत आहे, यांचा अंदाज घेत होता.

“बोला किशोर, बोला आम्ही ऐकतो आहे.” सदस्यांपैकी एक बोलला.

“आपण पगार घेऊन काम करतो आहे, आणि संध्याकाळी बँक बंद झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपला काही संबंध नाही, ही जी मनोवृत्ति असते, तिच्यात मला बदल करायचा आहे. ते नोकरी करत नसून आपापला वाटा उचलताहेत आणि त्याचं मानधन घेताहेत हे त्यांच्या मनावर ठसवायचं आहे. कुठल्याही इंजिनात गजन पिन नावाचा एक छोटासा पण अतिशय महत्वाचा पार्ट असतो. तो आपलं काम बिन बोभाट करत असतो म्हणूनच गाडी सुरळीत चालू असते. बँकेतला प्रत्येक जण हा बँकेसाठी गझन पिनच असतो, आणि त्या प्रमाणेच प्रत्येकाने त्याच काम मनलाऊन करायचं असतं हे मला माझ्या टीम ला पटवून द्यायचं आहे. बँकेतलं वातावरण अत्यंत खेळीमेळीचं असलं पाहिजे, जेणे करून काम हे काम न वाटता, एक इव्हेंट वाटली पाहिजे. जसे खेळाडू आपली टीम  जिंकली पाहिजे ही  इर्ष्या बाळगून खेळतात, तसेच आपली ब्रँच सर्वच बाबतीत समोर असली पाहिजे ही ईर्ष्या काम करतांना मनात असली पाहिजे. अर्थात हे माझं स्वप्न आहे. प्रयत्नही मी त्याच दिशेने करणार आहे. यश मिळेल अशी आशा आहे.” किशोरने आपण काय करू इच्छितो हे सविस्तर सांगीतलं.

इंटरव्ह्यु मधे नंतर, किशोरच्या आईची प्रकृती कशी आहे? जर बदली झाली तर आईची आणि बायकोची तयारी आहे का? वगैरे असेच निरुपद्रवी प्रश्न विचारले गेले.

घरी गेल्यावर विभावरी आणि आई दोघी अतिशय उत्सुकतेने वाटच पाहत होत्या. विभावरीने तर सुट्टीच घेतली होती. किशोरने सर्व सांगितल्यावर त्यांना हायसं वाटलं. तो दिवस आनंदात गेला.

काही दिवस असेच वाट पाहण्यात गेले. उत्सुकता वाढत होती, पण साहेब, निश्चिंत होते, ते म्हणाले, की मुळीच काळजी करू नकोस, निवड होणार यांची मला पक्की खात्री आहे.

एक दिवस संध्याकाळी विभावरी हिरमुसलं तोंड करून आली. माई एकदम धसकल्या. किशोर पण अजून आला नव्हता, विभावरी आली आणि न बोलता सोफ्यावर बसली.

चेहरा खूप उतरला होता. माईंनी काळजीने विचारलं “ अग काय झालं? जरा सांगशील का?”

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.