Power of Attorney 2 - 2 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग २

Featured Books
Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग २

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

   भाग २

भाग १ वरून पुढे वाचा  ....

विभावरी झोपल्यावर बराच वेळ किशोर जागा होता आणि विभावरीच्या बोलण्याचा विचार करत होता. शेवटी तो एका निष्कर्षावर आला, की विभावरीने त्याला समजून घेतलं आहे तेंव्हा, त्याला सुद्धा तिचं मन राखायला पाहिजे. उद्या पासून अभ्यास करायचा असा मनोमन निश्चय केल्यावर, मगच त्याला शांत झोप लागली.

सकाळी, चहा पितांना माईंनी विचारलं, “काय ग काहीं बोलणं झालं का?”

“तसं म्हंटलं तर बोलणं झालं. पण आता बघायचं की किशोर काय करतो ते, काल काही अंदाज आला नाही.” विभावरी म्हणाली.

“असं गुळमुळीत काही नको. असं काहीतरी  कर की तो परीक्षा द्यायला तयार झालाच पाहिजे.” – माई म्हणाल्या.

“हो काल जसं सुचलं तेवढं समजावलं त्याला, आता बघू काय होते ते आणि मग ठरवू. तुम्ही पण आग्रह करा त्याला.” – विभावरी.

“मी करीनच ग, पण तुझी मोहिनी जास्त आहे ना त्यांच्यावर, म्हणून.” – माई.

विभावरी लाजली, “काहीतरीच काय माई, तुमच्या आदेशा बाहेर नाहीये तो. तुम्ही लावून धरलं ना तर तयार होईल तो.” – विभावरी.

किशोर उठलेला दिसला म्हणून त्या दोघींचं बोलणं थांबलं.

बँकेत जातांना आणि गेल्यावर सुद्धा किशोर, विभावरीच्या बोलण्याचा विचार करत होता. सकाळची घाई गडबड संपल्यावर जेवण्याच्या वेळेस, किशोर मॅनेजर साहेबांच्या केबिन मधे गेला.

“साहेब, थोडं बोलायचं होतं. एक सल्ला हवा होता.” – किशोरनी सुरवात केली.  

“आपण संध्याकाळी बोलू शकतो का? कारण मला आत्ता लगेच झोनल ऑफिस मधे जायचं आहे. मी साधारण पांच वाजे पर्यन्त येईल, मग बँक सुटल्यावर आपण निवांत बोलू शकतो. चालेल ना?” – साहेब.

“हो सर.” – किशोर.

संध्याकाळी बँक सुटल्या नंतर, किशोर साहेबांच्या  केबिन मधे गेला. “येऊ का सर?”

“ये किशोर ये, काय बोलायचं आहे तुला? पर्सनल आहे?” – साहेब.

“हो साहेब. थोडं पर्सनलच आहे. सल्ला हवाय. बोलू का?” – किशोर.

“हूं, नी:संकोच बोल.” – साहेब.

मग किशोरनी त्यांच्या आणि विभावरीच्या मधे काय बोलणं झालं ते सविस्तर सांगीतलं. मग म्हणाला, “आता तुम्हीच सांगा साहेब.”

साहेब थोडा वेळ शांत बसले, किशोर चुळबुळत बसला होता. मग शांत पणे साहेबांनी बोलायला सुरवात केली. “आपला नवरा मोठ्या पोस्ट वर असावा आणि मोठा पगारदार असावा, अशी इच्छा धरणं गैर आहे का?”

“नाही, पण साहेब, परीक्षा पास केल्यावर प्रमोशन  होईल, आणि दूर कुठे तरी बदली पण होईल, मग काय करायचं? तुम्हालाच नाही का दूर जालंधर ला पाठवलं होतं? मग कुटुंबापासून दूर जावं लागेल, अश्या परिस्थितीत प्रमोशनला काय अर्थ उरेल? फॅमिलीच  नसेल तर पैसा आणि हुद्दा घेऊन करू काय?” – किशोरने आपली व्यथा सांगीतली.    

“हे बघ किशोर काही मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. तसंच आहे हे.” – साहेब.

“पण साहेब, मला विभावरी सारखी बायको मिळाली, आता मिळवलेले गमाऊन ज्याची इच्छा नाही, ते मिळवण्याचा प्रयत्न का करायचा ?” – किशोर.

“किशोर, जेवढं मी ओळखतो, त्यावरून मी सांगू शकतो की, विभावरी एक असामान्य मुलगी आहे. कोणीही आपली प्रॉपर्टी दुसऱ्या साठी गहाण ठेवत नाही. तुमच्या लग्नाची गोष्ट सुद्धा नव्हती, तेंव्हा तिने ते केलं आहे. तुझ्यावर ती जीव ओवाळून टाकते. आता जर तिला वाटत असेल की तिचा नवरा ऑफिसर व्हावा तर माझ्यामते तू प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे. ती आनंदी असेल तरच तू सुखी असणार आहेस ही गोष्ट लक्षात ठेव.” – साहेब. “तू हुशार आहेस, इतके सारे सर्क्युलर येतात, पण तू चटकन आत्मसात करतोस, तू परीक्षा अगदी आरामात पास होशील. माझी खात्री आहे. तुला कुठलीही मदत लागली तर मी आहेच, तू निश्चिंत रहा.”

“तुम्हालाही असंच वाटत असेल तर मी आता आज पासूनच तयारीला लागतो. काही पुस्तकं आणली आहेत विभावरीने, ती वाचायला सुरवात करतो. पण साहेब, जमेल ना मला हे?” – किशोर.

“अरे, जमेल म्हणजे काय? १०० टक्के जमेल. हे बघ तू फार चटकन गोष्टी आत्मसात करतोस. जवळ जवळ एकपाठीच आहेस, आणि हे तुलाही माहीत आहे. तुझ्या साठी ही परीक्षा म्हणजे पोरखेळ आहे. चुटकी सरशी पास होशील.” – साहेब.

किशोर लाजला “काय साहेब इतकी तारीफ नका करू हो.”

“दोन वर्षांपूर्वी मी म्हंटलं होतं की JAIIB ची परीक्षा द्या, आपल्याकडचे सहा जण  बसले होते, तू एकटाच पास झालास. आठवते ना. तुझ्यात ती क्षमता आहे. आता एक काम कर, ती पुस्तकं आणली आहेस ती वाच पण मी काय सांगतो ते ऐक.” – साहेब.

“काय?” किशोर.

“प्रमोशन ची परीक्षा जाहीर झाली की त्याचं सर्क्युलर येईलच. पण त्या अगोदर CAAIB ची परीक्षा दे आणि पास हो. या परीक्षेचे अनेक फायदे असतात. बँकेच्या परीक्षेची अर्धी अधिक तयारी होऊनच जाते. परत प्रमोशन च्या वेळेस तुम्ही ही परीक्षा पास आहे म्हंटल्यांवर तुम्हाला सर्वच बाबतीत प्राथमिकता मिळते.” – साहेब.  

वेळोवेळी आलेले सर्क्युलर्स, दुरुस्त्या आणि बँकेची मॅन्यूअल आणि बूकलेट येत असतात, आपले साळवीच बघतात सर्व. त्यांच्या कडून गेल्या ३-४ वर्षातलं साहित्य घे आणि अभ्यासाला सुरवात कर. दर दोन दिवसा आड आपण संध्याकाळी थोडावेळ बसू, म्हणजे तुझा अभ्यास कसा चालला आहे ते कळून येईल.” – साहेब.

किशोरला साहेब, इतकं सहकार्य करताहेत म्हंटल्यांवर किशोरला खूपच आनंद झाला. साळवी ला भेटून त्यांच्याकडून सर्व साहित्य घेतलं आणि आता केंव्हा घरी जातो आणि विभावरीला सांगतो असं झालं त्याला. तो तरंगतच घरी आला.

तो घरी आला तेंव्हा आई देवळात गेली होती आणि विभावरी अजून यायची होती. जरा हिरमोड झाला त्याचा. पण थोड्याच वेळात विभावरी आणि आई दोघीही घरी आल्या. किशोरचा फुललेला चेहरा पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं, त्यांना वाटलं होतं की किशोर अजूनही  रागातच असेल म्हणून. “काय रे एवढा खुश दिसतो आहे आहे काही खास बातमी आहे का ?” आईनेच विचारले.

“नाही खास असं काही नाहीये, पण मी आज साहेबांशी बोलत होतो, त्यांनी तर एकदम उचलच खाल्ली. मला म्हणे आधी एक CAIIB परीक्षा दे आणि मग बँकेची.” किशोर अगदी भर भरून बोलत होता आणि दोघी जणी कानात प्राण आणून ऐकत होत्या. दोघींनाही खूप आनंद झाला होता. गाडी वळणावर आली होती.  त्या दिवशी सगळं किशोरच्या आवडीचं बनलं. रात्री तर विभावरीने कसलीच कसर सोडली नाही. किशोरला स्वर्गाचीच सफर घडवून आणली.

दुसऱ्या दिवसांपासून किशोरच्या अभ्यासाला सुरवात झाली. सर्क्युलर आणि मॅन्यूअल पासून सुरवात झाली. किशोर गेली सात वर्ष बँकेत होता म्हणून त्याला सगळं माहीतच होतं, थोडं रीफ्रेश करावं लागलं एवढंच. दोन दिवसांनी संध्याकाळी साहेबांबरोबर बसला होता.

आधी साहेबांनी त्यांनी काय वाचलं आहे यांचा आढावा घेतला, समाधान झाल्यावर ते म्हणाले. “वा किशोर, चांगली सुरवात आहे. आता बघ, सर्वात प्रथम टाइम्स ऑफ इंडिया आणि इकनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड हे पेपर्स लाव. आपल्या देशाची पॉलिसी, अर्थ मंत्रालया संबंधी बातम्या, रिजर्व बँकेचे वेळोवेळी येणारे निर्णय आणि त्यावर होणाऱ्या  उलट सुलट चर्चा, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. बॅंके साठी महत्वाचे असे बरेच रेशो असतात आणि फार महत्वाचे असतात. त्यांच्या बद्दल सखोल माहिती असणं फार जरुरीचं असतं. कारण परीक्षे मधे आणि इंटरव्ह्यु मधे हे सारे प्रश्न विचारले जाऊ शकतात.” – साहेब.

“कोणचे रेशो  साहेब? काही तर मला माहीत आहेत, म्हणजे रेपो रेट, रिर्वस रेपो वगैरे.” – किशोर.

“CRR म्हणजे कॅश रिझर्व  रेशो, SLR म्हणजे स्टॅचुटरी लिक्विडिटी रेशो. त्यांच्या  व्याख्या, सखोल माहिती, हे कसे ठरवल्या जातात, आणि त्यांचा बँकेच्या धोरणावर आणि व्यवहारावर नेमका काय परिणाम होतो, आणि त्यातून बँकेचा फायदा होईल असे निर्णय कसे घ्यायचे यांचा सखोल अभ्यास करावा लागेल. तुला  बॅलन्स शीटचा अभ्यास करावा लागेल, आणि हे एक प्रचंड काम असतं. त्या साठी तू कोणीतरी CA पकड. बॅलन्स शीट वाचून क्लायन्ट ची आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे यांचा अंदाज यायला हवा. त्या शिवाय टर्म लोन, वर्किंग कॅपिटल किंवा ओवर ड्राफ्ट द्यायचा  की नाही किंवा द्यायचा असेल तर किती हे ठरवता येत नाही. हे फार महत्वाचं आहे. इतरही अनेक रेशो आहेत, त्याचा अभ्यास करावा लागेल, उदाहरणार्थ डेट -इक्विटी रेशो, असेट लायबीलीटी रेशो, वगैरे. पण हे सगळं हळू हळू कर. मन लावून केल्यास, कठीण काहीच नाहीये. थोडक्यात, ऑफिसर झाल्यावर तुला बँक यशस्वी रित्या चालवायची आहे, त्याचं हे शिक्षण आहे. तू हुशार आहेस, केंव्हाच मला मागे टाकून पुढे जाशील.” – साहेब.

“काय साहेब, काहीतरीच काय? तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी शिकतोय. उगाच माझी थट्टा करताय.” किशोर अवघडून बोलला. साहेब हसत होते.

किशोरच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले, “ऑल द बेस्ट”

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.