What is ritual? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | संस्कार म्हणजे काय

Featured Books
Categories
Share

संस्कार म्हणजे काय

संस्काराचा अन्वयार्थ ; संसार व संस्कार म्हणजे काय?

संस्कार, संस्कार, संस्कार? संस्कार म्हणजे नेमका काय हो? एका स्रीनं विचारलेला प्रश्न. तसं पाहिल्यास संस्कार म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न साहजीकच कोणालाही पडू शकतो.
संस्कार हे बिरुद कोणी आपल्या संसारालाही लावू शकतात. म्हणतात की संस्कार म्हणजे चांगला संसार. ज्या व्यक्तीचा संसार जर चांगला चालत असेल तर त्या व्यक्तीला संस्कारी पुरुष समजतात व त्याच संसाराला संस्कारमय संसार समजतात.
तसं पाहिल्यास आज बर्‍याच लोकांचा संसार चांगला चालतो. त्याला संस्कारमय संसार म्हणता येईल काय? यावर कोणी नक्कीच म्हणतील की होय तर कोणी नक्कीच म्हणतील की नाही. होय, याचा अर्थ आजच्या काळात पती पत्नीचं चांगलं पटणं भाग्याचं लक्षण आहे. ते चांगलं पटतं ना. मग तो चांगले संस्कार आणि नाही याचा अर्थ पती पत्नीचं चांगलं पटून उपयोग काय? असं मानणं. यात पुढं त्याला काही लोकं पुष्टी लावतात. ती म्हणजे पती पत्नीचं चांगलं पटणं हा संस्कार नाही तर ते आपल्या मायबापाची सेवा करतात काय? ते पाहुण्यांचं आदरातिथ्य करतात काय? ते इतर लोकांशी वर्तणुकीतून कसा वर्तनबदल करतात? हे मानणं वा समजणं चांगल्या संस्काराचं उत्तम उदाहरण आहे.
संस्काराबाबतीत सांगायचं झाल्यास संस्काराचे सोळा प्रकार आहेत. ते संस्कार धार्मीक बाबींना धरुन आहेत. ते सोळा संस्कार खालीलप्रमाणे आहेत.
(१) गर्भाधान संस्कार, (2) पुंसवन संस्कार, (3)सीमन्तोन्नयन संस्कार, (4)जातकर्म संस्कार, (5)नामकरण संस्कार, (6)निष्क्रमण संस्कार, (7)अन्नप्राशन संस्कार, (8)मुंडन संस्कार, (9)कर्णवेधन संस्कार, (10)विद्यारंभ संस्कार, (11)उपनयन संस्कार, (12)वेदारंभ संस्कार, (13)केशांत संस्कार, (14)सम्वर्तन संस्कार, (15)विवाह संस्कार और (16)अन्त्येष्टि संस्कार.
हे सर्व संस्कार धार्मीक ग्रंथात आहेत. परंतु या गोष्टींना खरं म्हणजे संस्कार मानावे काय? काही लोकं याही बाबतीत मते मतांतरे व्यक्त करतील. याला संस्कार म्हणता येईल काय? तर याचं उत्तर नाही असंही देता येईल आणि हो असंही देता येईल. नाही असं देतांना त्यात धार्मीक रंग जो भरला जातो. तो लोकांना मान्य नाही. शिवाय आजच्या पुरुषत्ताक कुटूंब पद्धतीत पुरुष मंडळी कान टोचून घेत नाही.
संस्कार हे आपल्या परीसरातील लोकं रुजवत नाहीत. तसेच संस्कार आपले परीजनही करुन घेत असतात. ना शाळा करुन घेत. मग संस्कार कोण रुजवत असतं असाही एक प्रश्न पडतो. संस्कार हे शाळा, परीसर, समाज रुजवून घेत असतो. परंतु त्यासाठी खुद्द आपले आईवडील त्या संस्काराला स्विकार करणारे असावेत. त्यांचा त्या गोष्टीला आक्षेप नसावा. ते बदलाला स्विकार करणारे असावेत. संस्कार रुजवायला प्रतिसाद देणारे असावेत. तरच संस्कार घडतात. जर आपले आईवडील बदलाचा स्विकार करणारे नसतील तर संस्कार मुळात रुजणारच नाहीत. शिवाय आपल्या मुलाचं भवितव्य कसं घडवायचं हे मायबापांनीच ठरवायचं असतं व मायबापांनीच त्यासाठी प्रयत्न करायचा असतो. याबाबतीत आतिशयोक्ती न केलेली बरी.
आपले मायबापच आपल्यावर संस्कार करीत असतात. ते फुलवीत असतात. याबाबतीत एक उदाहरण देतो. आपण थॉमस अल्वा एडीसनचं नाव ऐकलं असेलच. म्हणतात की थॉमस शाळेतच गेला नाही. मग तो शास्रज्ञ कसा झालाय? त्याचं अस्तित्व की त्याच्या आईला त्याला प्रेरणा देण्यासाठी थोडसं खोटंही बोलावं लागलं. यातील थॉमसची कथा अशीच.
थॉमस शाळेतच जात होता. तो शाळेतील शिक्षकांना प्रश्न विचारायचा. ते प्रश्न ऐकून शाळेतील शिक्षकांना आश्चर्य वाटायचं. तसे ते टाळाटाळ करायचे. शेवटी त्याचे ते प्रश्न विचारुन ते कंटाळले व त्यांनी एका चिठ्ठीत काहीतरी लिहून ती चिठ्ठी थॉमसला देवून म्हटलं की ही घेत व आपल्या आईशिवाय कोणालाही देवू नकोस. ती चिठ्ठी घेवून थॉमस घरी आला. त्यानं ती चिठ्ठी आईच्या दिली. त्यानंतर त्याने आपल्या आईला विचारलं, "आई, असं काय लिहिलं आहे चिठ्ठीत?"
ते मुलाचं बोलणं. तशी आई रडली. तिनं आपल्या बाळाला कवटाळून म्हटलं, "बाळ, त्या चिठ्ठीत असं लिहिलं की आपला थॉमस विलक्षण बुद्धीमत्तेचा धनी आहे. आम्ही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. आपणच त्याला शिकवावं. कारण आम्ही तेवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला शिकविण्याच्या लायक नाही."
थॉमसनं ते ऐकलं व त्यानं आपल्या आईवर विश्वास ठेवला व तो आपल्याच आईजवळून शिकू लागला. आता विचार करा की त्याच्या आईनं त्याला काय शिकवलं असेल? एबीसीडी की एखादं अंकगणित की अ आ इ ई. याबाबतीत सांगतांना मी एवढंच म्हणेल की त्या आईनं त्याला वरीलपैकी काहीच शिकवलं नाही. मग काय शिकवलं असेल आईनं? आईनं त्याला शिकवली जिद्द, चिकाटी, निरीक्षण क्षमता, पराभव कितीही वेळेला का होईना, हार न मानणारी वृत्ती, तसेच प्रयत्नांची पराकाष्ठा. याच गोष्टीच्या आधारे थॉमस अल्वा एडीसन शिकले व त्यांना विजेचा शोध लावता आला. तसंच त्यांना जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनता आलं. मात्र त्याच्या आईनं ती चिठ्ठी सांभाळून ठेवली होती संदूकात. जेव्हा त्याची आई मरण पावली. त्यानंतर काही वर्षानं जेव्हा संदूक उघडलं गेलं आणि ती चिठ्ठी उघडली गेली. तेव्हा त्या चिठ्ठीत लिहिलं होतं.
'थॉमस हा एक मुर्ख स्वरुपाचा मुलगा असून त्याला आम्ही शिकवू शकत नाही. त्याची स्वतःची बुद्धीमत्ता तर चालत नाही. व्यतिरीक्त तो आमच्याही बुद्धीमत्तेला सुरुंग लावतो. त्यामुळंच त्याला आम्ही शाळेतून काढून टाकत आहोत.'
आई........आई बाळाची ती प्रेरणा असते की त्या बाळाला ती शुन्यातून शतकापर्यंत नेते. ती आई आपल्या बाळाला झिरोतून हिरोही बनवते. जसं थॉमसच्या आईनं थॉमसचं केलं होतं. ती संस्कारही शिकवते बाळाला. त्याला आपल्या स्वतःचा संसार व्यवस्थीत चालवता यावा यासाठी. परंतु मुलं चांगल्या संस्कारी गोष्टी शिकत नाहीत. ते शिकतात वात्रट गोष्टी. माहीत नसतं मायबापांना ते कोणाची संगत धरतात ते. मग त्याच कुसंगतीचा परिणाम म्हणून एक दिवस ते आपल्या स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करीत असतात.
अलिकडील काळ हा कलिकाळ आहे. थॉमसची आई नक्कीच खोटी बोलली होती. परंतु ती खोटी बोलली आपल्या बाळाचं भवितव्य बनविण्यासाठी आणि ते बनलंही. परंतु अलिकडच्या कलिकाळात चांगल्या गोष्टीसाठी खोटं बोलणारे आईबाप नाहीत. अलिकडच्या काळात आपल्या मुलांवर कुसंस्कार करणारेच मायबाप आहेत असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मला मुलगाच हवा. मुलगी नाही आणि मुलगी झालीच तर सुनेला घरातून हुसकावून लावणारे मायबाप आज आहेत. शिवाय एखाद्या मुलीला बाळ झालं नाही आणि ती जर वांझ असेल तर चक्कं सोडचिठ्ठी मागावयास भाग पाडणारे मायबाप आहेत. याही पलिकडे जावून मुलानं आपलंच ऐकावं, म्हणून त्याचेवर अंधश्रद्धेच्या आहारो जावून भानामती करणारे मायबाप आहेत आणि पुत्रवधू आवडली नसल्यानं पहिल्याच दिवशीपासून तिच्यावर अत्याचार करणारे व करायला लावणारे मायबाप आहेत. शिवाय आपली मुलगी, आपली मुलगी व सुन परायाची मुलगी असा भेदभाव करणारेही मायबाप आहेत.
सुसंस्कार फुलत असतांना कुसंस्कार फुलविण्यासाठी सदैव तत्पर असणारे जसे मायबाप या कलिकाळात आहेत. तशीच मुलंही त्याचप्रकारची कलिकाळात आहेत. अशी मुलं मायबापाचं ऐकून स्वतः विचार न करता जबरदस्तीनं आपल्या पत्नीला विष देतात वा तिच्या गळ्याला गळफास लावून तिचा जीव घेतात. शिवाय या सर्व भानगडीत सुनाही मागं नाहीत. काही ठिकाणी संधी मिळताच सासवांना घराच्या बाहेर काढणाऱ्या सुनांची या जगात वानवा नाही. तसंच आपल्या पतीच्या कधी कानाशी लागून लाडी गोडीनं वा कधी धमकीनं आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या सुनांची काही कमी नाही. खरंच याला संस्कार म्हणता येईल काय? संसार तरी? आजच्या काळात मी, माझी पत्नी आणि माझी मुलं यालाच संसार मानल्या जातो व त्यांचं चांगलं पटत असल्यानं त्याला संस्कारासह चांगला संसारही समजल्या जातो. परंतु तो संस्कार नसतो, तर कुसंस्कार असतो. तो संसारही नसतो, तर कुसंसारच असतो. कारण त्यांचे मायबाप हे वृद्धाश्रमात असतात. ही मंडळी, त्याच विभक्त कुटूंब पद्धतीलाच संस्कारही मानते आणि मायबाप वृद्धाश्रमात पाठवते. जिथं मायबाप कुढत कुढत मरण पावतात. ना कोणी त्यांच्याकडे फिरकत ना कोणी त्यांच्या मयतीलाही जात. मग मरण पावल्यावर सारेच दाहसंस्कार. तेच ते कावळ्याला घास चारणे व तेच ते पिंडदान. कावळा येतोही व सुग्रास अन्न खावून जातोही. तद्नंतर समजलं जातं की मी जरी सेवा केली नसेल तरी मी टाकलेल्या पात्रातील अन्न कावळा येवून खावून गेला. माझ्या मातापित्यानं मला आशीर्वादच दिला. याही व्यतिरीक्त काही लोकांचं सांगतो. काही काही लोकं असे असतात की जे हिंदू धर्मातील सोळाही संस्कार करतात. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीनं करतात आणि मायबाप कुठं? तर ते वृद्धाश्रमात असतात. खरंच अशा महाभागांना संस्कारी माणसं तरी म्हणता येईल काय?
महत्वाचं सांगायचं झाल्यास एखादी मुलगी प्रसंगी देवधर्म पुजत नसेल, डोक्यावर सेव जरी घेत नसेल, केस मोकळे सोडून गावभर फिरत असेल लाली लिपस्टिक लावून. शिवाय अर्धनग्न कपड्यातही फिरत असेल, तर तिला आपण दुषणे देतो. 'काय वाह्यात मुलगी आहे. हिला तिच्या मायबापानं साधे संस्कारही शिकवले नाहीत. महाविद्यालयातही ती तशाच अवस्थेत आली. ही शिक्षण करायला आली की आपले रुपडे दाखवायला' असे सहज उद्गार आपल्या तोंडातून बाहेर पडतात. परंतु ती जर मायबापाची सेवा करीत असेल, म्हाताऱ्या माणसांची सेवा करीत असेल वा अनाथ, अपंगांची ती दया घेत असेल तर तिला तिनं मॉडर्न जरी कपडे परिधान केले वा मॉडर्न पद्धतीनं जरी ती वागली तरी तिला संस्कारी मुलगी म्हणता येईल आणि मानतही येईल. याऊलट जर एखादी मुलगी मॉडर्न जरी वाटत नसली, रोज मंदीरात जात असली, पुजापाठ करीत असली, डोक्यावर पदर (घुंगट) घेवून राहात असली, भांगात कुंकू भरत असली तरी ती जर आपल्या मायबापाची, आपल्या सासूसासऱ्याची, वयोवृद्ध माणसांची तसेच अपंग, अनाथांची सेवा करीत नसेल तर ती संस्कारी नसते आणि तसं समजण्याचं कारणही नाही. तिचा संसार जरी चांगला होत असला तरी ती संस्कारी होवूच शकत नाही यात दुमत नाही.
विशेष सांगायचं झाल्यास संस्कार व संसार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर या दोन्ही बाजू सुसंगत असल्या तरच तो व्यक्ती सुसंस्कारी ठरतो आणि त्या दोन्ही बाजू जर परस्पर विरोधी ठरल्या तर तो व्यक्ती तेवढाच कुसंस्कारी ठरतो. आता आपल्याला ठरवायचंय की आपण साधेभोळे राहून कुसंस्कारी बनायचे की मॉडर्न राहून सुसंस्कारी. हे मात्र आपल्याच हातात आहे. आपण नेहमीच कुसंस्कारानेच वागतो आणि ज्यावेळेस आपल्याला शहाणपण येते व आपण सुसंस्काराने वागायला लागतो, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच अशी वेळ निघून जाण्याच्या पुर्वीच आपण सावधान झालेलं बरं. आपली मॉडर्न जरी वागायची इच्छा असली तरी सुसंस्कार सोडू नये आणि आपली साधी भोळी पद्धत जरी आपल्याला आवडत असली तरी कुसंस्कार धरु नये. शिवाय हिंदू धर्मात सांगीतलेले सोळा प्रकारचे संस्कार हे जरी खरे असले तरी त्याचा केवळ दिखावा करुन प्रदर्शन मांडू नये. त्या पद्धतीनं वागावे, तरंच खऱ्या संस्काराला महत्व प्राप्त होते व संसारही चांगला फुलतो, बसतो. कारण त्याला थोरामोठ्यांचा, पुर्व पिढीचा आशीर्वादच लाभलेला असतो यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०