Bhagwadgita - 14 in Marathi Spiritual Stories by गिरीश books and stories PDF | भगवद्गीता - अध्याय १४

Featured Books
Categories
Share

भगवद्गीता - अध्याय १४

भगवद्गीता -अध्याय चौदावा.
गुणत्रय विभाग योग
श्री भगवान म्हणाले, मी तुला पुन्हा एकदा सर्व ज्ञानातले श्रेष्ठ असे ज्ञान सांगतो जे जाणून सर्व मुनींना परम सिद्धि मिळाली.
हे ज्ञान मिळवून जो आपल्या आध्यात्मिक गुणांचा विकास करतो तो माझ्यासारखे दिव्य स्वरूप प्राप्त करतो.
असा‌ मनुष्य सृष्टीआरंभी न जन्म घेतो न प्रलयाच्या वेळी मरण पावतो.
सर्व महद् ब्रह्म म्हणजेच सृष्टि ही माझी योनी असून मी तिथे गर्भ ठेवतो व सर्व प्राण्यांची उत्पत्ति हे अर्जुना ! त्यातूनच होते.
हे कौंतैया , सर्व योनींमध्ये जे जे देह प्रकट होत असतात ती योनी म्हणजे प्रकृति असून त्या सर्वांचा पिता मी आहे.
प्रकृति चे तीन गुण सत्व, रज, तम.
ते या जीवाच्या देहामधे जेव्हा तो प्रकृतिशी बद्ध होतो तेव्हा प्रवेश करतात.
सत्व गुण हा निर्मळ असून ज्ञानाचा विकास करणारा असून त्यामुळे सुख व ज्ञानाची मनाला बंधने पडतात.
इच्छा, वासनांमुळे रजोगुण उदभवतो,
हे कौंतेया तो या देहधारी मनुष्याला कर्मानै बांधतो.
अज्ञानातून तम जन्माला येतो व तो जीवांना मोह, दुराचार, आळस या पाशात बांधतो.
सत्व गुण सुखाच्या पाशात, रजोगुण सकाम कर्माच्या पाशात तर तमोगुण हा ज्ञानाला झाकतो व मनुष्य मुढतेशी‌ बांधला जातो.
हे अर्जुना ! रजोगुण व तमोगुणाला मागे टाकून कधी कधी सत्वगुण वाढतो, तर कधी सत्वगुण व तमोगुणापेक्षा रजोगुण वाढतो, तर कधी रज आणि सत्व गुणापेक्षा तमोगुण वाढतो.
जेव्हा सर्व इंद्रियामध्ये ज्ञानरूपी प्रकाश दिसतो व देहाला तेज प्राप्त होते तेव्हा सत्वगुण वाढला असे समजावे.
जेव्हा माणूस ‌कर्माकडे प्रवृत्त होतो तसेच त्याच्यामध्ये इच्छा , वासना, लोभ वाढतो तेव्हा हे अर्जुना ! रजोगुण वाढला आहे असे समजावे. माणूस आळशी, निष्क्रिय पणे वागतो, मोह वाढतो,
कोणत्या तरी नशेत ( अहंकार, व्यसन ) वावरु लागतो, मुर्खपणाची वागणूक करतो तेव्हा तमोगुण वाढला आहे असे समजावे.
सत्वगुणाचा प्रभाव असतांना मृत्यू आला तर त्या मनुष्याला उत्तम लोक प्राप्त होतो.
तो तिथे महर्षि, ज्ञानी लोकांच्या सहवासास पात्र होतो. रजोगुणाच्या प्रभावात मृत्यू आल्यास तो परत कर्माविषयी आसक्ति असलेल्या मानव जन्मात परत येतो, परंतु तमोगुणाच्या प्रभावात मरण आल्यास मनुष्याला हिन, पशु जन्म मिळतो.
सत्व गुणांमुळे होणारी सात्त्विक कर्मे माणसाला शुद्ध करतात. रजोगुणामधील कर्मे दु:ख देतात. तमोगुणाभधील कर्मे अज्ञानमुलक असतात.
सत्वगुणामुळे ज्ञान मिळते, रजोगुणामुळे लोभ उत्पन्न होतो, तमोगुणामुळे मोह, प्रमाद, उत्पन्न होतो. सात्त्विक गुणांची माणसे स्वर्गलोकी जातात, रजोगुणी व्यक्ति पृथ्वीवरच राहतात तर तमोगुणी लोक अधोगतीला जातात.
ज्याला या त्रिगुणांखेरीज कर्ता कोणी नाही हे कळते , आणि परमेश्र्वर या त्रिगुणांपलीकडे आहे हे जाणतो तो मला प्राप्त करू शकतो. देहाच्या उत्पत्तीस कारण झालेल्या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन जन्म, मृत्यू, म्हातारपण या दुःखातून मुक्त झालेमुळे मोक्ष मिळतो.
अर्जुन म्हणाला ! त्रिगुणातीत मनुष्याची लक्षणे कोणती, तो कशाप्रकारे आचरण करतो व त्रिगुणांचे पलीकडे जाऊ शकतो ते मला सांग.
श्री भगवान म्हणाले हे पांडवा ! , प्रकाश, प्रवृत्ति, मोह ही जी त्रिगुणांची कार्ये किंवा फले आहेत ती मिळाली असता असता त्यांचा अव्हेर करत नाही किंवा मिळाली नाहीत तरी आकांक्षा करीत नाही.
गुणांच्या प्रभावा विषयीं उदासीन राहतो, गुण त्यांचे कार्य करतात असे समजून विचलित होत नाही.
सुख दुःख समान मानतो. दगड, माती, सोनं, यांकडे समान दृष्टीने पाहतो.
त्याला मित्र, परके, प्रिय, अप्रिय हे समान असतात.
स्तुतीने अथवा निंदेने विचलित होत नाही. जो सकाम कर्माचा त्याग करतो त्यास गुणातीत समजावे. (वरील सर्व गुण ज्याच्यात आहेत तो.).
जो निष्ठेने माझी भक्ति करतो तो, गुणातीत होवून ब्रह्म पद पावतो. हे अर्जुना, अमर्त्य, अव्यय ब्रह्माचे, धर्माचे व परम सुखाचे मी आश्रयस्थान आहे.
चौदावा अध्याय पूर्ण.
जय श्रीकृष्ण.