तरंच यशस्वीपणाचं पाऊल टाकता येईल?
काही लोकांना सवय असते, नुसते उपद्रवी कारनामे करायची. आपल्या बुद्धीचा वापर ते अशाही पद्धतीनं करीत असतात. परंतु बुद्धी आहेच तर नुसते उपद्रवी उद्योग करण्याऐवजी कामधंदे करावे. असे काहींचे मत आहे. जेणेकरुन कामात लक्ष लागून सुकार्य कार्य घडेल. उपद्रवी कार्य घडणार नाही. परंतु कधीकधी उपद्रवी कार्य करणंही शुभ लक्षण ठरु शकते. उदाहरणार्थ थॉमस अल्वा एडीसन.
थॉमस अल्वा एडीसन हे असे व्यक्तीमत्व होते की त्यांनी आपल्या शेतीतच असलेल्या धानाच्या गंजीला आग लावली होती. ते उपद्रवीच कार्य होतं. दुसऱ्या त्यांच्या कार्याबाबत बोलायचं झाल्यास त्यांनी रेल्वेत केलेले प्रयोग. त्या प्रयोगानंतरही रेल्वेगाडीला आग लागली होती. परंतु ते जरी उपद्रवी कार्य असलं तरी त्यातून वीज निर्माण होणं हे हे उपयोगी कार्य घडलं. त्यामुळंच कोणत्याही कार्याला उपद्रवी कार्य म्हणताच येत नाही.
कार्य कोणतंही असो, मग ते उपयोगी असो की उपद्रवी असो, कार्य कार्यच असतं. कधी त्या कार्याला कोणी वाईटही ठरवतात तर कोणी त्या कार्याला चांगलंही मानतात. काल वाईट असलेली कृती कदाचीत प्रदीर्घ कालावधीनंतर चांगलीही वाटू शकते आणि काल चांगली असलेली कृती कोणाला प्रदीर्घ कालावधीनंतर वाईटही वाटू शकते. तसं पाहिल्यास आज राजालाही शिव्या हासडणारे भरपूर आहेत. जरी त्याचं कार्य चांगलं असलं तरी. उदाहरण द्यायचं झाल्यास हापकिन या शास्रज्ञाचं देता येईल. ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेग पसरला होता. त्यावेळेस हापकिन या शास्रज्ञाने प्लेगवर अथक परिश्रम करुन प्लेगची लस शोधून काढली होती. मग ती लस कोणीच घेईना. कारण लोकांचा त्या लसीवर विश्वास नव्हता. मग काय, आपण सुरक्षीत लस तयार केली आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सार्वजनिकरित्या आधी स्वतःला इंजेक्शन टोचून दाखवले. ही हापकिनची कृती उपद्रवीच होती. परंतु तद्नंतर तीच कृती जगाच्या दृष्टीनं कल्याणकारी ठरली. दुसरं उदाहरण कैकेयीचं देता येईल. तिनं रामाला वनवासात जा म्हणणं ही कृती उपद्रवीच होती. परंतु त्यातून चांगलं कार्य घडत गेलं. ते कार्य म्हणजे जगाला त्रास देणाऱ्या तमाम घटकाला नष्ट करता आलं. महाभारताचंही तेच उपहासात्मक विनोदाचं उदाहरण म्हणजे नरो वा कुंजरवा. तिही उपद्रवीच कृती. परंतु त्यानं द्रोणाचार्यसारखा व्यक्ती मारला जाणं हे पांडवांच्या दृष्टीनं चांगलं कार्य होतं.
एक महान व्यक्ती जेव्हा घडतो. त्याच्या विचारांची पुनर्बांधणी होते, तेव्हा त्याला बऱ्याच कृती कराव्याच लागतात. कधी समाज रोषाला समोरे जावे लागते. परंतु तसं जात असतांना जरी त्याचं काही चूकत असेल तर चूक मानून पुढचं पाऊल टाकावंच लागतं. जर ते टाकलं नाही तर कार्यभाग संपतो. समाजात असेही घटक असतातच की जे कोणी पुढे जात असेल तर त्यांची पावले थांबवतात. कोणी जीवंत समाधी घ्यायला भाग पाडतात. नंतर त्यांचा उदोउदो करतात. कोणी इंद्रायणीत संबंध गाथाच बुडवतात. मग तीच गाथा पाण्यावर तरंगत होती हेही सिद्ध करतात.
एक शास्त्रज्ञ वा महान व्यक्ती तोच बनू शकतो की जो समाजाचा रोष सहन करतो. स्वतः संकटं झेलतो. लोकांचे बोलणे ऐकतो आणि आपली वाटचाल करीत असतो. सावित्रीबाईंनी ज्यावेळेस महिला वर्गाला पुण्यात शिकवलं, तेव्हा तिच्यावर शाळेत शिकवायला जात असतांना शेणाचा व धसकटाचा मारा झाला व तो त्यांना सहन करावाच लागला. याचाच अर्थ महान जर बनायचं असेल तर 'कुत्ते भोके हजार, हाथी चले बाजार' असं वागायलाच हवं महान बनणाऱ्यांनी. कारण कधी कधी कुणाचे समज हे गैरसमज ठरु शकतात. कोणी स्वतःला श्रेष्ठ समजण्याच्या नादात दुसऱ्यांना कनिष्ठ समजत असतात. वैचारीक स्वतंत्र्यता असूनही त्यानं असं वागावं, त्यानं तसं वागावं असं सांगीतलं जातं. मग विचारांच्या फैरी व वादाच्या फैरी झडत असतात. त्यामुळंच त्या गोष्टीचा विचार जास्त करुन न केलेलाच बरा. महाभारतातील युद्धादरम्यान नरो वा कुंजरवा या प्रसंगाच्या विनोदात्मक लेखनावर एक मित्र म्हणतो,
"विनोद म्हणजे निखळ मनोरंजन. समोरच्याला न दुखवता, वाईट न वाटू देता त्याच्या चेहर्यावर हास्य फुलविणे म्हणजे विनोद होय. पण या लेखात विनोदाची सांगड तू चुकीच्या प्रसंगाशी जोडली आहे. कोणाचा मुत्यू किंवा त्याची बातमी हा विनोद असूच शकत नाही. रणांगणावर अश्वत्धामाचा मृत्यू झालेला आहे, हा विनोद नसून ती अफवा होती. हवं तर ते पांडवांनी रचलेलं षड्यंत्र होते. कारण त्यांना माहिती होतं की आचार्य द्रोणाचार्य हे सर्वश्रेष्ठ योध्दा आहे, पण त्याही आधी ते एक वडील आहेत. कारण कोणत्याच पित्याला त्याच्या मुलाच्या मृत्यूची अथवा विरहाची बातमी ऐकून आंनद अथवा विनोद होणारच नाही. तेव्हा तू दिलेला संदर्भ, उदाहरण है विनोद या शब्दाच्या व्याख्याला अनुसरून नाही. हवं तर तू दुसरं समर्पक असं उदाहरण दे, जेणेकरून ते या लेखाला उचीत न्याय देईल."
विनोदात्मक भाषेत सांगायचं झाल्यास विनोद हे पाहात नाही की पुढील व्यक्ती हा मृत्यू पावलेला आहे की जीवंत आहे. कधीकधी मृत्यूच्या वेळेसही लोकं विनोद करुन जातात. मग म्हणावं लागतं की चूप बसा, नाहीतर कोणी ऐकून घेईल. विशेष म्हणजे मृत्यू हा घटक जर सुखदता देणारा असो वा नसो विनोद हा अगदी सहजच घडून येत असतो.
महत्वाचं सांगायचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात. आपण फक्त एकच बाजू समजून घेतो. दुसरी बाजू लक्षातच येत नाही. तसेच कोणतेही प्रसंग कुणासाठी थांबत नाही. जर एखादा वाईट प्रसंग घडलाच तर लागलीच त्यावर दोन पाऊल मागं टाकून पुढची वाट धरावी लागते. त्याचा बाऊ करीत कार्य करणं सोडून द्यावं लागत नाही. तरंच जीवनात यशाच्या शिखरावर जाता येतं. पश्चातापाचे अश्रू निरंतर रडत वा गात बसावे लागत नाही. कारण काळ हा कुणासाठीही थांबत नाही. तो पुढे पुढे सरकत असतो. म्हणूनच कार्य करतांनाही माणसानं
हेच लक्षात घ्यायचं असतं. मग ते कार्य उपयोगी का असेना वा ते कार्य उपद्रवी का असेना. त्याची समीक्षा समाज करेलच. कारण विधात्यानं बरंवाईट म्हणणाऱ्यांचाही एक वर्ग बनवला आहे. तो वर्ग वाईट म्हणणारच नसेल तर बरंवाईट कसं कळेल. त्यामुळंच कोणी काहीही म्हणोत. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं हसणं, आपलं लिहिणं संपवायचं नसतं. कारण ही सृष्टी आहे. या सृष्टीतही एक दिवस कोणीतरी मरणार आहे आणि कोणीतरी नवीन जन्म घेणारच आहे. म्हणूनच समाजाच्या कोणत्याही कृतीचा बरावाईट परीणाम स्वतःवर होवू देवू नये. कार्य निरंतर करीत राहावे. मग ते कार्य चांगले असो वा नसो. समाज आहे त्याची समीक्षा करायला. तो समाज बरेवाईट म्हणणारच आहे. त्याचा एवढा विचार करु नये व कधीच मनाला लावून घेवू नये. कारण काल रामाची कृती जरी चांगली असली तरी आज त्या रामावरही लांच्छन लावणारे जगात कमी नाहीत. यात शंका नाही. म्हणूनच कार्य करीत राहावे. स्वतःला कार्यात गुंतवून ठेवावे व पुढे जाण्याची दिशा ठरवावी. मागचे काही घडलेले बरेवाईट विसरावे. जेणेकरुन पुढची पायरी चढता येईल. यशस्वीपणानं आणि तेवढ्याच ताकदीनं पाऊलही टाकता येईल हेही तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०