भक्ति योग
जय श्रीकृष्ण
अर्जुन म्हणाला , जे योगी योग्य रीतीने तुझी भक्ति करतात व तुझ्या निराकार रूपाची उपासना करतात त्यावेळी कोण श्रेष्ठ सिद्ध योगी समजावा.
श्री भगवान म्हणाले, जो माझी मनापासून भक्ति करतो, माझीच उपासना करतो व माझ्या वर पूर्ण श्रद्धा ठेवतो तो उत्तम योगी समजावा.
जे योगी इंद्रियांवर नियंत्रण ठेवून अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य, अचल, स्थिर, अशा माझ्या स्वरूपाची पूजा करतात व सर्वांना समान मानतात व सर्वांच्या हिताचे कार्य करतात ते योगी मला प्राप्त करतात.
अव्यक्त ब्रह्म उपासना ही कष्टाची साधना आहे. सामान्य मनुष्याला ही उपासना करून उन्नत्ति करणे कठीण होते.
जे आपली सर्व कर्मे मला अर्पुन माझे अनन्य भावाने ध्यान करतात, उपासना करतात त्यांना या भवसागरातुन मी मुक्त करतो.
त्यांचा मी जास्त वेळ न दवडता उद्धार करतो. जर तू मन आणि बुद्धि माझ्या मध्ये स्थिर करशील तर निःसंशय
तू मला प्राप्त करशील.
जर तुला मन स्थिर करणे जमले नाही तर तू प्रयत्नाने भक्तियोगाचा अभ्यास करून मला प्राप्त करण्याची इच्छा वाढव.
अभ्यास पण नाही जमला तर तू माझ्यासाठी सर्व कर्मे कर, जर तू माझ्या साठी कर्मे केलीस तर तुला पूर्ण सिद्धि प्राप्त होतील.
कर्म समर्पण करणे पण शक्य नसेल तर आत्मस्वरूपात राहून माझ्या ठायी चित्त ठेवून कर्मफळाचा त्याग कर.
असा अभ्यास जमत नसेल तर ज्ञान मिळव, ध्यान कर किंवा कर्मफळाचा त्याग करणे त्याहून चांगले. त्याने निरंतर शांती प्राप्त होते.
ज्याच्या मध्ये ममत्वाची भावना असेल, अहंकार नसेल व सुखदुःख समान मानेल, समाधानी, संयमी व दृढ निश्चयाने माझी भक्ति करतो असा भक्त मला प्रिय असतो.
त्याचा लोकांना त्रास होत नाही व तो लोकांमुळे उद्विग्न होत नाही. चिंता, भय, दु:ख, रागापासून मुक्त असतो असा भक्त मला प्रिय असतो. जो निरपेक्ष असतो, पवित्र वृत्तीने राहतो, दु:ख न करणारा व ज्याला कर्म फळांचा अहंकार नसतो तो माझा भक्त मला प्रिय आहे.
ज्याला आनंद, दु:ख, द्वेष, इच्छा नसते व शुभ अशुभ अशा कोणत्याही कर्म फळांचा जो त्याग करतो तो मला प्रिय असतो. शत्रु, मित्र ज्याला समान असतात, व मान अपमान तो मानत नाही, थंड, गरम, सुख दुःख समान मानतो, आसक्ति नसते, स्तुती किंवा निंदेने विचलित होत नाही, निरर्थक बोलत नाही व समाधानी वृत्तीने राहतो, जो सर्व विश्व़ आपले घर मानतो, ज्ञानी व भक्ति करणारा मला सर्वदा प्रिय असतो.
जे धर्माप्रमाणे आचरण करतात व श्रद्धेने माझी भक्ति करतात ते मला सर्वाधिक प्रिय असतात.
म्हणजेच श्रीकृष्णाने सांगितलेल्या भक्तियोग मार्गाचे आचरण करतात ते त्यांना अधिक प्रिय असतात.
बारावा अध्याय समाप्त
१३ - क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग.
अर्जुन म्हणाला प्रवृत्ति, पुरुष, क्षेत्र, याचे तत्व जाणू इच्छितो तसेच क्षेत्रज्ञ कोण हेही जाणू इच्छितो.
हे कृष्णा ! मी ज्ञान, ज्ञेय काय आहे हे जाणू इच्छितो.
श्री भगवान म्हणाले !
हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात, जो हे जाणतो त्यालाच विद्वान लोक क्षेत्रज्ञ असे मानतात.
सर्व देहाच्या क्षेत्राचा मी क्षेत्रज्ञ आहे व क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान म्हणजे माझे ज्ञान असे माझे मत आहे.
क्षेत्राचे स्वरूप, त्याची निर्मिती व विकार काय असतात व क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव काय ते मी तुला सांगतो ते तू श्रवण कर.
ऋषींनी, पंडितांनी या विषयावर चर्चा केली आहे. निरनिराळ्या ग्रंथात विविध प्रकारे , विविध मंत्रांनी, विविध रितीने त्याचा हेतू दाखवून क्षेत्र व क्षेत्रज्ञ याचे वर्णन केले आहे.
ऋषींनी, पंडितांनी या विषयावर चर्चा केली आहे. निरनिराळ्या ग्रंथात विविध प्रकारे , विविध मंत्रांनी, विविध रितीने त्याचा हेतू दाखवून क्षेत्र व क्षेत्रज्ञ याचे वर्णन केले आहे.