विकसीत भारत, समृद्ध भारत?
*शाळा....... शाळेला मंदीराचं नाव दिलं आहे. खरं तर ते ज्ञानमंदीरच आहे. कारण ज्या मंदीरातून भक्त जागृत होतात. ज्ञान पदोपदी, नसानसात वाहात व त्याच ज्ञानाच्या भरवशावर आपण भवसागर पार करुन जातो. ते ज्ञान, ज्ञानमंदीरातच मिळतं, देवमंदीरात मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच गोष्टीसाठी सांगीतलं होतं की जाती आधारीत धंदे सोडा, तरच विकास संभव आहे. नाही तर नाही. कारण त्यांना विकसीत भारत, समृद्ध भारत बनवायचा होता. आज तसा भारत बनलाही. परंतु हाच दर्जा पुढं टिकून राहिल काय? यावर आज प्रश्नचिन्हं लागलेले आहे. कारण आज शाळेतून कौशल्यधिष्ठीत ज्ञानाच्या आधारावर जातीविषयक शिक्षण शिकवले जात आहे. ही शंका नाही तर वास्तविकता आहे.*
आज देशात राममंदीर बनलं. एक चांगली गोष्ट झाली. कारण संस्कार जो लोप पावत चालला होता. तो वृद्धिंगत व्हायला चालना मिळाली. परंतु त्याचबरोबर एक हा ही परिणाम झाला, तो म्हणजे शाळेतून भजन शिकवलं जाणं. ती बाब काही बरोबर नाही. ज्यांच्या मनात आज शाळेमध्ये भजनाचे कार्यक्रम शिकवले जात आहेत, शिक्षीका भजनाच्या तालावर नाचतांना दिसतात. मुलं टाळ आणतात. कारण संस्कार पेरायचाय. असंच चित्र दिसत आहे.
खरं सांगायचं झाल्यास शाळेतून भजनाचे कार्यक्रम शिकवले जावे काय? त्या निरागस विद्यार्थ्यांना केवळ आरती, पुजा करण्यापुरतं सीमीत केलं जावं काय? शिवाय त्याच्या मनातील शास्त्रज्ञ बनायचे आहे व नवनवे शोध लावायचे आहे. ही भावना काढायची आहे काय? हे ओळखणं आजच्या काळात कठीण होवून बसलंय. धार्मिक भावना नक्कीच जोपासली पाहिजे. परंतु ती शाळेतूनही जोपासायची काय? तर त्याचं उत्तर होय असं देता येईल. त्याचं कारण म्हणजे शाळेत विविध धर्माचे लोकं असतात. त्या लोकांना एकमेकांच्या धर्माबद्दल आदर वाटावा म्हणून. ठीक आहे. ते बरोबर आहे. परंतु धर्माबाबत बोलतांना एकच म्हणता येईल की शाळेमध्ये तरी अशा धार्मिक पणाला रंग देवू नये. कारण शाळेत विविध धर्माचे मुलं असतात. धार्मिक कार्यक्रम घेतल्यानं इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात. कारण शाळेत कार्यक्रम घेण्यालाही मर्यादा असतातच.
अलिकडील काळात मात्र तिळगुळ, गोपाळकाला, गुरुपौर्णीमा यासारखे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात, तेही शाळेतून. ते बरोबर नाही. शिवाय भजन? तेही शिकवणं बरोबर नाही. कारण त्यानं ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत होत नाहीत. फक्त वाढते ती धार्मिक तेढं.
शाळेत जशी आजची शिक्षीका भजन गायन करुन शिकवते. तसंच शिकवलं जातं कुंभारकाम. माती आणा. बैल बनवा. कापड आणा, शिलाई करा. बॅग बनवा. टोपली बनवा. वेतकाम करा. गवंडी काम शिका. ज्याला कौशल्यविकास हे नाव दिलं. ज्यातून पैसा कसा कमवता येईल हा उद्देश ठेवला आहे व ही शिकविण्याची पद्धती भविष्यात मुलांना त्या काळात नेत आहे की ज्या काळात बारा बलुतेदार पद्धती होती. लोकांना आपल्या जातीचं काम आपल्याच बिरादरीत शिकता येत होतं. कामाचं कसब वाढत होतं. भेदभाव नव्हताच त्या काळात. परंतु जसं कामाचं कसब वाढलं. तसा भेदभावही वाढला. धंद्यावरुन हिन धंदा व चांगला धंदा असे प्रकार पडले. ज्ञानाच्या कक्षेत खंड पडला.
आज आपल्याला दिसतेय की खरं ज्ञान शाळेत शिकवलंच जात नाही. कौशल्य ज्ञानावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे आणि उद्देश ठरवला गेला आहे की लोकांनी फक्त आपलं पोट भरावं यासाठी असंच कौशल्यधिष्ठीत शिक्षण शिकावं व तेच शिक्षण शिकविण्याची गरज आहे. बाकीच्या गोष्टी शाळेतून शिकविण्याची गरज नाही.
पुर्वी असं नव्हतंच. ज्ञान विकसन्यावर आधी जास्त भर दिल्या जायचा. जेणेकरुन मुलांना ततंज्ञ कसं बनवता येईल. हा हेतू होता. अलीकडील शिक्षणातून तसा उद्देश दिसूनच पडत नाही. कारण आजचं शिक्षण तसं वाटत नाही. त्या शिक्षणातून चिकीत्सक बुद्धी वाढेल वा वा वृद्धिंगत होईल असे वाटत नाही. कारण मुलांना आज, शाळेत कुंभारकाम, पसबागकाम शिकवलं जात आहे. मुलं कुंभारकाम, परसबागकाम. गवंडी काम, सुतारकाम यात पारंगत होत आहेत. व्यावसायिक शिक्षणानं ते आपलं पोट भरणार आहेत. त्याचबरोबर लोकांचंही ते पोट भरु शकतील. जे गरीब असतील. ते नक्कीच जास्त शिक्षण घेण्यापेक्षा व्यावसायिक शिक्षण घेवून आपलं पोट कसं भरता येईल याचाच विचार करतील. त्थाकडे लक्षही देतील. आपल्या कौशल्यधिष्ठीतते शिक्षणाकडे अधिक लक्ष नक्कीच देतील. ते जास्त शिकणारच नाहीत. मधातच शिक्षण सोडतील. कारण त्यांना कळलेलं असेल की जास्त शिकूनही नोकरी मिळणार नाही. फक्त पोट भरण्यापुरतंच शिकावं. ते पारंगत तर होतीलच. परंतु कशात? व्यवसायात की देशाला दर्जा मिळवून देण्यात? साधी मुंगीही अन्न गोळा करण्यात पारंगत असते. पण तिच्या अन्न गोळा करण्याच्या शैलीचा काही उपयोग तरी होतो काय? शक्यता नाकारता येत नाही.
आज खरं तर देशाला ज्या गोष्टीची गरज आहे. त्या गोष्टी देशाला दुसऱ्याच देशाकडून घ्याव्या लागतात. जरी देशाची लोकसंख्या एवढी अफाट असली तरी. शिवाय एका शाळेतील शिक्षीकेचे आपल्या मुलांना भजन शिकविणे. ही गोष्ट देखील आपल्याला हेच शिकवते की देश प्रगतीकडे जात नाही तर अधोगतीकडे जात आहे. आपल्या डोक्यातल्या कल्पक गोष्टीचा व बुद्धीमत्तेचा वापर करुन जो दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला देश आज आकाशातील तारे मोजायला निघालाय आपल्या तंत्रज्ञानविषयक पाठ्यक्रमाच्या माध्यमातून. ते आपआपल्या शाळेत तंत्रज्ञानविषयक शिक्षण शिकवतात व अभ्यासक्रम राबवतात. अन् आपण चक्कं मुलांच्या कल्पक बुद्धीमत्तेकडे दुर्लक्ष करुन त्यांना व्यवसायीक शिक्षण शिकवतो. तेही जातीचे. हे काही बरोबर नाही ह्यानं देश विकसीत होणार नाही. विकसनशीलच राहिल.
खरंच मोठमोठ्या गोष्टी करणार्या देशात आगामी काळात तंत्रज्ञानविषयक गोष्टी शिकविण्यावर भर दिला जाईल की काय की शाळेतून यापुढे भजन किर्तनासारख्या गोष्टी शिकविण्यावर भर दिला जाईल. यावर तुर्तास तरी विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानविषयक गोष्टी शिकविण्यावर मर्यादा पडत आहेत. जे ज्ञान पुर्वी अर्थात मध्यंतरीच्या काळात शिकवल्या गेलं. ज्यातून आज जग एका सेकंदात जगालाही प्रदक्षिणा घालू शकतं व देश एका सेकंदात पादाक्रांत करु शकतं. जे मध्यंतरीच्या काळानं घडवलं. यात शंका नाही. देशानं यावर सखोल विचार करावा. आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करावे. विकसीत भारत, समृद्ध भारत.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३४५९४५०