Silence Please - 16 in Marathi Detective stories by Abhay Bapat books and stories PDF | सायलेन्स प्लीज - प्रकरण 16

Featured Books
Categories
Share

सायलेन्स प्लीज - प्रकरण 16

प्रकरण १६
न्यायाधीश.वज्रम स्थानापन्न झाले होते.धूर्त आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यासक अशी त्यांची ख्याती होती.त्यांच्या समोर हेरंभ खांडेकर , सरकारी वकील.जाड जूड धाटणीचे.रुंद छाती,जाड मान, ते बसले की उगाचच दोन तीन माणसांची जागा अडवाल्यासारखे बसत. समोर बसलेल्या पाणिनी पटवर्धन कडे ते खाऊ की गिळू नजरेने बघत होते, धावण्याच्या स्पर्धेत आपण कायम पुढे आहोत याची जाणीव असणारा धावपटू ज्या विश्वासाने पळत असतो आणि शर्यत संपत येताना मागून येणारा धावपटू आपल्याला ओलांडून पुढे जातो आणि शर्यत जिंकतो तेव्हा हरणाऱ्याचा चेहेरा कसा होईल तशा चेहेऱ्याने ते पाणिनी कडे बघत होते.त्यांचा सहाय्यक, समीरण भोपटकर त्यांच्या बाजूलाच बसला होता.तो तरुण,शिडशिडीत,होता.आपल्या चष्म्याच्या रिबीन शी बोटाने चाळा करत होता.
पटवर्धन च्या जवळ विहंग खोपकर अस्वस्थ पणे नखे खात बसला होता आणि त्याच्या किंचित मागे त्याची होणारी पत्नी,लीना माईणकर. ती बिचारी ओढून ताणून हसू आणून विहंग ला धीर द्यायचा प्रयत्न करत होती.
“ कोर्टाचं काम चालू करा.खांडेकर, तुम्हाला प्रास्ताविक करायचं आहे का? ” न्या.वज्रम म्हणाले.
खांडेकर आपला अवजड देह सावरत उभे राहिले. “ मी फार शब्दच्छल करत बसणार नाही,न्यायाधीश महाराज.मी फक्त सरकार पक्ष काय सिध्द करू इच्छित आहे त्याचे निवेदन करतो.” उगाचच कोर्टातील प्रेक्षकांवर आपली नजर फिरवत ,जरा भाव खात, खांडेकर नी सुरुवात केली. “ या महिन्याच्या तेरा तारखेला आरोपी विहंग खोपकर त्याच्या मोठया घरात त्याच्या इतर नातलग आणि नोकर मंडळींसह रहात होता.त्याची भाची आर्या, सावत्र भाऊ राजे, सिहोर मधील अॅड.दुर्वास, विहंग चा धंद्यातला भागीदार मरुद्गण, विहंग ची सेक्रेटरी प्रांजल वाकनीस असे सगळेच त्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला तिथे होते. आम्ही दाखवू इच्छितो की,चौदा तारखेला पहाटे आरोपी विहंग त्याच्या सावत्र भावाच्या खोलीत गेला आणि त्याला भोसकले. आम्हाला दाखवून द्यायचंय की विहंग ला माहिती नसताना राजे आणि मरुद्गण यांनी आपल्या खोल्या एकमेकात बदलून घेतल्या होत्या. मरुद्गण आणि आरोपी विहंग यांच्यात वैर होतं.” खांडेकर क्षणभर थांबले.पाणी प्याले आणि पुन्हा बोलू लागले.
“ आम्ही सिध्द करू की मयताचा मृत्यू सुरा खुपसल्यामुळे, पहाटे तीन च्या सुमाराला झाला. सुरा खुपसला जाताच लगेचच मृत्यू आला.अगदी याच वेळी विहंग खोपकर हा खुनात वापरला गेलेला चाकू हातात घेऊन,अनवाणी मरुद्गण च्या खोलीच्या,म्हणजे ज्यात राजे झोपला होता,त्या खोलीच्या बाहेरील बाजूने जाताना साक्षीदारांना दिसला आहे.हाच चाकू आरोपीच्या उशीखाली सापडला , त्याच्या पात्याची तपासणी करताना हे स्पष्ट झालंय की त्याच चाकूने खून झालाय. ”
“ आम्हाला दाखवायचं आहे की आरोपीला अटक केल्यावर त्याने स्वतः कबूल केलंय की त्याला रात्री झोपेत चालण्याची सवय जडली होती. आम्ही क्रमशः दाखवून देऊ की मृत्यू झाला त्या वेळी चाकू आरोपीच्या ताब्यात होता. मृत्यू झाला त्या वेळीच थोडं आधी आरोपीला मयत व्यक्तीच्या बेडरूम च्या दिशेने जात असताना बघितलं गेलंय .आरोपी विहंग ला मरुद्गण ला मारण्यासाठी सबळ कारण होत.तोच त्या खोलीत आहे असे समजून आरोपीने त्याला भोसकलं परंतू प्रत्यक्षात आरोपीचा सावत्र भाऊ त्यात मारला गेला.”
“ बचाव पक्षाचे पाणिनी पटवर्धन या कोर्टाला कदाचित झोपेत चालायच्या सवयी बद्दल सविस्तर भाषण देतील,पण आम्ही सिध्द करणार आहोत की हा गुन्हा घडण्या आधी एक वर्षं आरोपीने एक अणुकुचीदार चाकू मिळवला होता.......”
पाणिनी पटवर्धन हे वाक्य ऐकताच उठून उभा राहिला. “ न्यायाशीश महाराज, एक वर्षापूर्वी आरोपीने काय खरेदी केलं याचा संदर्भ काढून टाकण्यात यावा.तसेच बचाव पक्ष काय म्हणू शकतो हे वाक्य सुध्दा काढून टाकावे.”
“ आम्ही पुराव्यानिशीच बोलतोय.” खांडेकर गुरगुरले. “ आपल्याला झोपेत चालायची सवय आहे याचे ज्ञान विहंग ला वर्षापूर्वीच झाले होते, तो त्यातून बरा झाला होता पण नंतर पुन्हा त्याला तो त्रास सुरु झाला आणि पटवर्धन यांचा हाच बचाव असणार आहे की झोपेत खून झाला. पण वस्तुस्थिती अशी आहे की विहंग ने त्यातून बरा होण्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केले नाहीत..कारण..... ”
न्या.वज्रम यांनी हातोडा आपटला. “ बचाव पक्ष काय विचार करेल हे प्रास्ताविकात बोलायचे आणि कोर्टाचे मन कलुषित करायचा सरकारी वकीलांना अधिकार नाही.एक वर्षापूर्वी चा प्रसंग या गुन्ह्यात स्वीकारायचा का हे वेळ येईल तेव्हा ठरवू. अत्ता पटवर्धन यांची हरकत मी मान्य करतोय. खांडेकर यांच्या प्रस्ताविकातील हे दोन्ही संदर्भ काढून टाकावेत.”
खांडेकर खजील झाले पण सावरून पुन्हा बोलू लागले. “ आरोपीच्या भाचीला आर्या ला,गुन्हा घडण्यापूर्वी दोन दिवस आधी आरोपीच्या उशीखाली खुनात वापरला गेलेला चाकू सापडला होता.... या पुराव्याच्या आधारे आणि इथून पुढे सादर होणाऱ्या पुराव्याच्या आधारे ,आरोपीला खुनी म्हणून जाहीर करून सजा दयावी.” आपले मोठे भाषण संपवून खांडेकर खाली बसले.
“पटवर्धन, तुम्हाला प्रास्ताविक करायचं आहे?” वज्रम नी विचारलं
“ अत्ता नाही.माझी केस मी मांडायला सुरुवात करे पर्यंत प्रास्ताविक नाही करणार.” पाणिनी म्हणाला
“ बरं, सरकारी वकिलांनी त्यांचा पहिला साक्षीदार बोलवावा.” –वज्रम
“ खून झालाय हे सिध्द करणेसाठी मी प्रथम मरुद्गण ला बोलाऊ इच्छितो” -खांडेकर
मरुद्गण ने शपथ घेतली.
“ तुझं नाव ब्रिजेश मरुद्गण आहे आणि तू सिहोर ला राहतोस? ” – खांडेकर
“ हो.”
“ तेरा तारखेच्या रात्री आणि चौदा तारखेच्या पहाटे तू आरोपीच्या घरी उपस्थित होतास? ” –खांडेकर
“ हो.”
“ आरोपी आणि मिस्टर राजे यांचं नातं आहे का हे तुला माहीत आहे? ” –खांडेकर
“ ते सावत्र भाऊ आहेत ”
“ तू आरोपीच्या घरी तेरा तारखेच्या आधीपासूनच राहिला आहेस का? ” -खांडेकर
“ मी दहा तारखेलाच आलोय.” मरुद्गण म्हणाला.
“ चौदा तारखेला सकाळी राजे ला भेटायचा योग आला होता? ”
“ आला होता.”
“ कुठे भेट झाली नेमकी? ”
“ त्याच्या बेड रूम मधे ” मरुद्गण म्हणाला.
“ तो जीवंत होता की मेलेला? वर्णन कर कशा स्थितीत दिसला तुला तो.”
“ तो पलंगावर उताणा पडला होता.चादर माने पर्यंत ओढून घेतली होती.चादरीतूनच चाकू आत खुपसण्यात आला होता.चादर रक्तानं भिजली होती.राजे मेला होता.”
“ युअर ऑनर,” खांडेकर म्हणाले. “ अत्ता पुरता मी याना मोकळं करतो.पुन्हा गरज लागेल तेव्हा बोलावून घेईन.खून झाला हे सिध्द करण्यापुरते अत्ता त्यांना बोलावले होते.”
“ ठीक आहे.” -वज्रम “ पटवर्धन, तुम्हाला विचारायचं आहे यांना काही? ”
“ हो, युअर ऑनर,”
“ करा सुरु.” –वज्रम
“ तू म्हणालास की तेरा तारखेला सायंकाळी तू आरोपीच्या घरात होतास? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ आणि चौदा तारखेच्या पहाटे? ”
“ हो ” मरुद्गण म्हणाला.
“ चौदा तारखेला सकाळी प्रथम ते घर कधी सोडलंस ? ” पाणिनी म्हणाला.
“ हे महत्वाचं आहे? ” खांडेकर नी विचारलं
“ मला वाटतं तसं ” शांतपणे पाणिनी म्हणाला.
“ तर मग मी हरकत घेतो या प्रश्नाला.” खांडेकर ओरडले. “ या कारणास्तव ,की हा प्रश्नच मुळी गैरलागू, संदर्भहीन आहे.ही उलट तपासणी बरोबर चाललेली नाही.”
“ तुमच्या दृष्टीने.” पाणिनी, फक्त खांडेकर आणि वज्रम यांना ऐकू जाईल असं पुटपुटला.
वज्रम ना हसू फुटले.
“ मी वेगळ्या पद्धतीने विचारतो हा प्रश्न.” पाणिनी म्हणाला “ चौदा तारखेला सकाळी राजे चा मृत्यू झाल्याचे कळण्यापूर्वी तू त्या घरातून किती वाजता बाहेर पडला होतास ? ”
“ हा प्रश्न उलट तपासणीच्या कक्षेत बरोब्बर बसतोय आता. ” –वज्रम
“ मी मुळीच बाहेर पडलो नव्हतो.” मरुद्गण म्हणाला.
“ पहाटे तीन वाजता तू घरातून बाहेर गेला नव्हतास? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.”
“ तेरा तारखेला सायंकाळी तू तुझ्या खोलीत किती वाजता गेलास? ” पाणिनी म्हणाला.
“ अंदाजे रात्री साडे नऊ वाजता.”
“ खोलीत गेल्या गेल्या झोपायला गेलास ? ”
“ नाही, माझा वकील दुर्वास माझ्या बरोबर खोलीत होता.आम्ही खूप वेळ बोलत बसलो होतो.” मरुद्गण म्हणाला.
“ चौदा तारखेला सकाळी किती वाजता उठलास? ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही आणि डॉक्टर खेर कोण मेलं आहे हे बघण्यासाठी माझ्या खोलीत घुसलात आणि मला उठवलत ” मरुद्गण म्हणाला.
“ कोण मेलं आहे हे बघण्यासाठी हा साक्षीदाराचा हा अंदाज आहे . उत्तरातील हा भाग वगळण्यात यावा.” पाणिनी म्हणाला
“ मान्य आहे.” वज्रम म्हणाले.
“ किती वाजता आलो होतो आम्ही? ” पाणिनी म्हणाला.
“ सकाळी आठ च्या सुमारास ”
“ तुला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का, की तेरा तारखेला संध्याकाळी तू खोलीत गेल्या पासून चौदा तारखेला सकाळी आठ वाजे पर्यंत तू घरातच थांबला होतास ? ” पाणिनी म्हणाला.
“ घरात रेंज येत नाही म्हणून तू पहाटे तीन वाजता घराच्या बाहेर पडून पब्लिक फोन बूथ वरून शेफाली खोपकर ला खांडवा शहरात फोन लावला नाहीस? ” पाणिनी म्हणाला.
साक्षीदाराने आपले ओठ घट्ट दाबून धरले. आणि नकारार्थी मान हलवली.
“ तू मोठ्याने उत्तर दे.कोर्टाला ऐकू जाईल अशा आवाजात. ” पाणिनी म्हणाला
“ मी नाही गेलो बाहेर कुठेच.”
“ गेला नाहीस ? ” पाणिनी पटवर्धन आश्चर्याने म्हणाला. “ तू तीन वाजता जागा झाला होतास? ”
“ नाही, मी जागा सुध्दा झालो नव्हतो.” मरुद्गण ठाम पणे म्हणाला.
“ तुझ्या वकिलाशी म्हणजे दुर्वास शी तू पहाटे तीन वाजता बोलत नव्हतास?”
“ बिलकुल नाही.” मरुद्गण पुन्हा म्हणाला.
“ तीन वाजताच असं नाही पण तेरा तारखेच्या रात्री बरा ते चौदा तारखेच्या पहाटे पाच पर्यंत ? ”
“ नाही.” मरुद्गण म्हणाला.
“ संपली माझी उलट तपासणी.”
खांडेकर नी त्या नंतर ड्राफ्टस्मन ला पाचारण करून खोपकर च्या घराचे नकाशे सादर करून पुरावा म्हणून जमा केले.संबंधित पोलिसांना बोलावून मृत्यूची वेळ पहाटे अडीच ते साडेतीन च्या दरम्यान असल्याची नोंद करून घेतली.पाणिनी ने या कशालाच हरकत घेतली नाही आणि कोणाची उलट तपासणी पण घेतली नाही.त्या नंतर होळकर आला.त्याने विहंग खोपकर च्या उशीखाली सापडलेला चाकू ची ओळख पटवताना त्या च्या धारदार पात्याला रक्ताचे डाग असल्याचे कथन केले.
“ उशीचा आभ्रा आणि अंथरुणाचे काय? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही माहिती.”
“ तुला माहिती नाही ? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.मला सांगण्यात आलं की घरातल्या नोकराने ते धोब्याकडे टाकलं.”
“ त्याने तो पुरावा जपून नाही ठेवला? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.” -होळकर
“ मग तू का नाही तो पुरावा म्हणून सादर केलास? ”
“ मला गरजेचं वाटलं नाही.”
“ उशीच्या आभ्र्यावर आणि बेड शीट ला रक्ताचे डाग च नव्हते , बरोबर आहे ना? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत तसं असेल . रक्त लागलं असेलच त्याला.मला आठवत नाही आता.” - होळकर
“ जर त्यावर रक्त लागलं असतं तर ते पुरावे म्हणून सादर करावेत असं तुला वाटलं असतं . बरोबर का?” पाणिनी म्हणाला.
“ ऑब्जेक्शन ! ” खांडेकर ओरडले. “ वादाचा मुद्दा आहे हा.”
“ साक्षीदाराने सांगितलंय की त्याला आठवत नाहीये की त्या दोन वस्तूंना रक्त लागलं होत की नाही ते.त्याच्या आठवणीला जरा उजाळा देण्यासाठी मी हा प्रश्न विचारला.” पाणिनी म्हणाला
“ साक्षीदाराला उत्तर देऊ दे ” न्या.वज्रम म्हणाले.
“ माझं उत्तर आहे की मला माहीत नाही.” होळकर म्हणाला. “ पटवर्धन तुम्हालाच माहिती आहे याच उत्तर. तुम्हालाच तो चाकू सापडला.”
कोर्टात खसखस पिकली.वज्रम यांनी हातोडा आपटून लोकांना शांत केले.
“ ठीक ,ठीक, तुमच्या दोघांत वाद नकोत. वकिलांनी योग्य प्रश्न विचारावेत आणि साक्षीदाराने समर्पक उत्तरे द्यावीत.” वज्रम उद्गारले.
“ आणि, उशीचा आभ्रा आणि बेडशीट दोन्हीलाही न लागलेलं रक्त....” पाणिनी आवाज चढवून आणि आपले बोट होळकर वर रोखून म्हणाला, “ ही बाब, सरकार पक्षा ला जे सिध्द करायचं आहे,त्याच्या विरोधात जात असल्यामुळे, होळकर तू स्वतः या दोन्ही गोष्टी धोब्याकडे त्वरित धुवायला जातील याची व्यवस्था केलीस. तूच त्या वेळी सर्व प्रसंगाचा पोलीस प्रमुख म्हणून ताबा घेतला असल्यामुळे ते कपडे आम्ही बचाव पक्षाने पुरावा म्हणून आणू नयेत यासाठीच तू ती व्यवस्था केलीस.हो की नाही? ” पाणिनी कडाडला.
खांडेकर गुरगुरत त्याच्या मदतीला धावले.आरडा ओरड करत प्रश्नाला हरकत घेतली. पाणिनी फक्त हसला.
“ साक्षीदाराने पटवर्धन च्या प्रश्नाला उत्तर द्यावं ” वज्रम म्हणाले. “ हा प्रश्न साक्षीदाराच्या मनाचा कल दाखवणारा आहे.”
“ मला त्या बेड शीट

आणि अभ्र्याशी काहीच देण घेण नव्हतं.” होळकर म्हणाला.
“ पण तू घरकाम करणाऱ्या बाईला सुचवलस की त्या दोन्ही गोष्टी तू धोब्याकडे धुवायला टाकलेल्या बऱ्या म्हणून ? ” पाणिनी म्हणाला.
“ कदाचित म्हणालो असेन मी.” होळकर म्हणाला.
“ आणि पुन्हा बिछाना तयार कर असंही सांगितलस? ” पाणिनी म्हणाला.
“ बहुतेक ” होळकर म्हणाला.
“ दॅट्स ऑल युअर ऑनर ” खुष होऊन पाणिनी म्हणाला.
खांडेकर त्यांच्या सहाय्यकाच्या म्हणजे भोपटकरच्या कानात कुजबुजले. भोपटकरउठला. “ आम्ही दुर्वास ला साक्षी साठी बोलवू इच्छितो ”
दुर्वास आनंदाने पिंजऱ्यात आला. शपथ, ओळख वगैरे झाल्यावर भोपटकरने त्याची चौकशी चालू केली.
“ विहंग खोपकर , या खटल्यातला आरोपी तुझ्या ओळखीचा आहे? ”
“ हो. माझ्या अशीलाचा, ब्रिजेश मरुद्गण चा तो भागीदार आहे.” –दुर्वास
“ या महिन्याच्या तेरा तारखेला आणि चौदा तारखेला काही काळ तुम्ही विहंग च्या घरी होतात?” –भोपटकर
“ होतो आमची एक महत्वाची मिटिंग त्या घरी झाली, मी, पाणिनी पटवर्धन , विहंग खोपकर, त्यांची सेक्रेटरी प्रांजल, ब्रिजेश मरुद्गण आणि डॉक्टर खेर असे सगळे होतो.” – दुर्वास
“ तुम्ही कधी मोकळे झालात ? ”- भोपटकर
“ मीटिंग संपल्यावर बाकीचे निघून गेले, मी आणि ब्रिजेश मरुद्गण रात्री अकरा वाजे पर्यंतक बोलत होतो. ”
“ तुम्हाला त्या नंतर विहंग खोपकर दिसले का रात्री मिटिंग नंतर? ” –भोपटकर
“ चौदाच्या पहाटे मला दिसले.” –दुर्वास
“ किती वाजता? ”
“ पहाटे तीन ला.”
“ कुठे दिसले? ” भोपटकर
“ घराच्या फरशी घातलेल्या अंगणात.”
“ पुरावा म्हणून दाखल केलेल्या या नकाशात नेमके कुठे दिसले ते खूण करून दाखवाल का? ” भोपटकरने विचारलं
दुर्वास ने दाखवलं.
“ याच नकाशात तुम्ही झोपलात ती खोली कुठे आहे दाखवा.” –भोपटकर
दुर्वास ने दाखवली.
“ आणि या तुमच्या बेड रूम मधून तुम्हाला आरोपी अगदी स्पष्ट पणे दिसला? ”
“ अगदी व्यवस्थित.” –दुर्वास
“ पहिल्यांदा कधी दिसला? ”
“ माझ्या डोळ्यावरून एक सावली पुढे सरकल्याचा भास मला झाला आणि मला जाग आली.मी उठून पाहिलं तर मला घरा बाहेरच्या कमानीतून कोणीतरी जाताना दिसला.मी उठून उभा राहिलो आणि घड्याळात पाहिलं.खिडकी पाशी गेलो तर विहंग खोपकर दिसला,त्याच्या हातात चाकू होता.अंगणातल्या एका टेबला जवळ तो थांबला आणि कमान ओलांडून पलीकडच्या दाराने दिसेनासा झाला.”-दुर्वास
“ पलीकडचं दार म्हणजे उत्तर बाजूचं ? म्हणजे नकाशावर या बिंदू जवळचं ? ” भोपटकरने नकाशावर एका बिंदूवर बोट ठेऊन विचारल.
“ बरोबर.” –दुर्वास
“ आणि तुम्ही उल्लेख केला,ते टेबल कुठे आहे या नकाशात दाखवा,खूण करून.” –भोपटकर
दुर्वास ते दाखवलं
“ उठल्यावर तुम्ही घड्याळ पाहिलंत तेव्हा किती वाजले होते ? ” –भोपटकर
“ पहाटेचे तीन ”
“ तुम्ही दिवा लावला होता का घड्याळ बघायला? ”-भोपटकर
“ नाही. काटे फ्लुरोसंट मुळे चकाकत होते. दिव्याची गरज नाही.”
“ तुम्ही आरोपीला पाहण्यापूर्वी घड्याळात बघितलं की नंतर? ”
“ दोन्ही वेळेला.”
“ नंतर काय केलेत ? ” –भोपटकर
“मी माझ्या खोलीचे दार उघडून कॉरीडॉर मधे आजू बाजूला,वर,खाली पाहिले.कोणीच नव्हते.एकदा विचार आला की खाली जाऊन पहावे पण नंतर वाटलं आपण आपल्या विरोधकाच्या घरात राहिलोय.त्यामुळे नसत्या भानगडीत पडू नये.म्हणून मी चूप चाप आत आलो आणि झोपून गेलो. ”
“ उत्तरातला विरोधकाच्या घरात हा शब्द खोडून टाकावा. कारण तो साक्षीदाराचा अंदाज आहे.शिवाय त्यातून त्याची मनोवृत्ती सिध्द होते. त्यामुळे आमचे ऑब्जेक्शन आहे.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे काढला जाईल तो शब्द ” वज्रम म्हणाले.
“ तुम्ही उलट तपासणी घेऊ शकता.” भोपटकर पाणिनी पटवर्धन ला म्हणाला. “ कदाचित तुम्हाला विचारायचं असेल की दुर्वास पुन्हा का झोपला.”
वज्रम नी हातोडा आपटला. “ भोपटकर, ठीक आहे. शांत व्हा ”
“ मिस्टर भोपटकर मी अगदी हेच विचारतो पहा दुर्वास ला.” पाणिनी म्हणाला.
“ एवढ सगळ बघितल्यावर सुध्दा मी झोपायला गेलो कारण मी दमलो होतो, संध्याकाळ भर मी तुमची बडबड ऐकत होतो.” दुर्वास म्हणाला.
“ मिस्टर दुर्वास मी तुम्हाला कोणताच प्रश्न विचारला नाहीये अजून. तुम्ही कोणत्या प्रश्नाला हे उत्तर दिलंत ? ” पाणिनी म्हणाला.
“ का.. म्हणजे तुम्ही मी का झोपलो पुन्हा......” दुर्वास म्हणाला आणि अडखळला. तो उत्तर देऊन फसला होता.
“ मी हा प्रश्न विचारीन असे भोपटकरम्हणाला होता आणि मी त्याला उद्देशून म्हणालो होतो की मी तोच प्रश्न विचारीन म्हणून.पण प्रत्यक्षात मी तो प्रश्न विचारलाय कुठे?” पाणिनी म्हणाला
कोर्टात हशा पिकला.वज्रम नी हातोडा आपटला. “ सायलेन्स प्लीज.” ते म्हणाले. “ दुर्वास तुम्ही वकील आहात.साक्षीदाराने कसे वागायला हवे तुम्ही जाणता.”
“ सॉरी ,सर.” दुर्वास म्हणाला.
“ पटवर्धन, चालू ठेवा तुमची उलट तपासणी” वज्रम म्हणाले
“ युअर ऑनर, साक्षीदाराने दिलेलं उत्तर आहे तसं मान्य करायला मी तयार आहे.कोणताही भाग त्यातला वगळला जाऊ नये ” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे.तुम्हाला घ्यायची तशी घ्या क्रॉस ”
“ तर मग दुर्वास, माझ्या संध्याकाळच्या बोलण्यामुळे तुम्ही दमला होतात म्हणून तुम्ही पुन्हा झोपायला गेलात. बरोबर? ” पाणिनी म्हणाला
“ तेच तर म्हणालो ना मी.”
“ संध्याकाळी आपल्या मिटींग नंतर तुम्ही आपापल्या खोल्यात गेल्यावर तुम्ही तुमच्या अशीलाशी तासभर बोललात?”
“ हो.”
“ माझ्या बोलण्यामुळे तेव्हा तुम्हाला झोप आली नाही , तुमच्या अशीलाशी बोलताना ? ” पाणिनी म्हणाला.
“ आम्ही चर्चा केली ”
“ आणि रात्री अकराच्या सुमाराला झोपायला गेलात? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ आणि त्या नंतर चार तास झोपून सुध्दा माझ्या बोलण्याचा प्रभाव एवढा पडला तुमच्यावर की हातात चाकू घेऊन तुमच्या जवळ फिरत असलेल्या आकृती मुळे तुमची झोप चाळवली गेली नाही? ” पाणिनी म्हणाला
“ मी जागा झालो होतो पटवर्धन. मी कॉरिडॉर मधे सर्वत्र पाहिलं कोणी आहे का.”
दुर्वास म्हणाला.
“ आणि पुन्हा झोपायला गेलात? ”
“ हो.” दुर्वास म्हणाला.
“ काही मिनिटातच? ” पाणिनी म्हणाला.
“ काही मिनिटात ”
“ आणि तुम्ही शपथेवर सांगितलंय की असं होण्याचं कारण म्हणजे माझ्या संध्याकाळच्या बोलण्यामुळे थकावट आली होती?” पाणिनी म्हणाला.
“ मला तेच वाटत होत.” -दुर्वास
“ तुम्हाला काय वाटत होत हे मला आणि कोर्टाला समजायचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे तुम्ही सांगितलं तर.” पाणिनी म्हणाला “ प्रामाणिक पणे सांगा दुर्वास त्या संध्याकाळी मी आपल्या मिटींग मधे खूप कमी वेळ बोललो की नाही? ” पाणिनी म्हणाला
“ किती मिनिटे बोलत होतात ते मी मोजत बसलो नव्हतो.” -दुर्वास
“ मी प्रत्येक वेळी तुमची मागणी अमान्य आहे एवढेच बोलत होतो की नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत आपण त्या विषयात अत्ता पडावे.”
“ पण तरीसुद्धा जेव्हा तुम्ही म्हणताय की माझ्या बोलण्यामुळे थकून जाऊन तुम्हाला झोप आली तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जरा अतिशयोक्ती करताय . बरोबर आहे ना? ” पाणिनी म्हणाला
“ मी झोपायला गेलो हे खर आहे.”
“ तुम्ही जाग आल्यावर पुन्हा झोपायची तयारी केलीत याचा अर्थ तुम्हाला ती आकृती जेव्हा प्रथम दिसली तेव्हा त्याचं तुम्हाला फारसं नवल वाटलं नाही.खरं की नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ हातात चाकू घेतलेली आकृती फिरताना दिसणं हे नक्कीच भयानक वाटलं मला तरी.तुम्हाला वाटलं असतं की नाही देव जाणे.” – दुर्वास
“ आता कसं बोललात ! जर तुम्हाला हातात चाकू घेतलेली आकृती रात्री तीन वाजता फिरताना दिसली असती, खरंच, तर तुम्ही पोलिसांना कळवलं असतं किंवा घरातल्या माणसांना उठवलं असतं. ” पाणिनी म्हणाला
“ हे पहा, मला आकृती दिसली.मला चाकू दिसला.मी पुन्हा झोपायला गेलो.” –दुर्वास
“ मी वेगळ्या पद्धतीने विचारतो, अशीच वस्तुस्थिती आहे की नाही की तुम्हाला स्पष्ट पणे चाकू दिसला नव्हता ? ” पाणिनी म्हणाला.
“ मला दिसला होता.” –दुर्वास
“ हाच चाकू? ” पुरावा म्हणून सादर केलेल्या रक्ताळलेल्या चाकू कडे निर्देश करत पाणिनी ने विचारलं
“ हाच चाकू.” दुर्वास ने पटकन उत्तर दिलं
पाणिनी दुर्वास कडे बघून हसला. काहीच बोललं नाही.त्याच्या हसण्यात असे भाव होते की कसा सापडलास माझ्या जाळ्यात असं त्याला म्हणायचं होतं. दुर्वास च्या ते लक्षात आलं तो पटकन म्हणाला,“ अगदी याच चाकू सारखा दिसणारा ”
पाणिनी ने आपल्या ब्रीफ केस मधून एका कागदात गुंडाळून आणलेला चाकू बाहेर काढला. “ मी तुला हा चाकू हातात देतो.मला सांग त्या आकृतीच्या हातात तुला दिसलेला चाकू हाच होता ना? ”
“ नाही,नाही.हा नाही.” – दुर्वास
“ कशावरून म्हणतोस हा नाही म्हणून? ” पाणिनी म्हणाला.
“ मला वाटत नाही , हा आहे म्हणून.”
“ तुला कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का की त्या आकृतीच्या हातात तुला दिसलेला चाकू इतका स्पष्ट पणे दिसला होता की तू ओळखू शकशील?” पाणिनी म्हणाला.
“ अगदी ओळखू शकणार नाही पण सर्वसाधारण वर्णन करता येईल.” –दुर्वास
“ आणि तुझी खात्री आहे की हा चाकू तो नाही अशी ? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत तोच आहे.”
“ हा तो नाही याची खात्री आहे? ” पाणिनी म्हणाला.
“ अर्थात एवढया लांबून खात्री देता येत नाही.” –दुर्वास
“ तर मग पुरावा म्हणून सादर केलेला चाकू हा तोच आहे ,जो त्या आकृतीच्या हातात होता याची तुला खात्री नाही , खरं ना? ”
“ अं.... न.... नाही देता येणार.” –दुर्वास
“ माझी कोर्टाला विनंती आहे की मी अत्ता आणलेला चाकू हा बचाव पक्षाचा पुरावा क्र.ए म्हणून दाखल करून घेण्यात यावा.” पाणिनी कोर्टाला म्हणाला.
“ आमची हरकत आहे याला.” खांडेकर ओरडून उभे रहात म्हणाले.” या चाकूचा खुनाशी काहीही संबंध नाही.साक्षीदाराचा गोंधळ उडवण्यासाठी पटवर्धन ने केलेलं कारस्थान आहे..... मी सिद्ध करू शकतो की खून झाल्यानंतर कितीतरी दिवसांनी एका हार्डवेअर च्या दुकानातून या चाकुची ...”
पाणिनी काही बोलण्या पूर्वीच वज्रम म्हणाले, “ ठीक आहे मिस्टर खांडेकर, तो चाकू कुठून आणला गेला या बद्दल तुम्ही काय सिध्द करू शकता ते बाजूला ठेवा, या माणसाने साक्ष दिल्ये की त्या आकृतीच्या हातात असलेला चाकू पुरावा क्र.२ म्हणून तुमच्या कडून दाखल झालेल्या चाकुशी खूपसा मिळता जुळता आहे. दुसरा चाकू साक्षीदाराला दाखवून त्या बद्दल प्रश्न विचारणे यात अयोग्य काहीच नाही.शिवाय ते प्रश्न विचारले जात असताना तुम्ही हरकत घेतली नाही.आता पटवर्धन तो चाकू त्यांच्या तर्फे पुरावा म्हणून दाखल करून घ्यायला सांगत आहेत ,जेणे करून ,ज्या चाकू बद्दल प्रश्न विचारले गेले त्याचा संदर्भ म्हणून उल्लेख करता येईल.अगदी योग्य दिशेने चालू आहे उलट तपासणी. बचाव पक्षातर्फे हा दुसरा चाकू पुरावा क्र. ए म्हणून दाखल करावा.”
न्यायाधिशांच्या या आदेशानंतर खुष होऊन पाणिनी अत्यंत सहज पणे बोलल्या सारखे दुर्वास ला म्हणाला, “ आकृती दिसल्यानंतर तुम्ही पुन्हा लगेच झोपायला निघालात याचं कारण त्याच्या हातात चाकू नव्हताच हे आहे , बरोबर ना? ”
“ त्याच्या हातात काहीतरी होतं आणि मला ते चमकताना दिसलं होतं.” –दुर्वास
“ पण ती वस्तू म्हणजे चाकू होता असं तुम्हाला वाटलं नाही त्यावेळी, जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी खून झाल्याचं लक्षात आलं तेव्हा तुम्हाला वाटायला लागलं की त्याच्या हातातली वस्तू म्हणजे चाकूच असला पाहिजे.” पाणिनी म्हणाला
दुर्वास काही बोले पर्यंत पाणिनी ने पुन्हा सरबत्ती सुरु केली, “ अंगणातून तुम्हाला फक्त एक पांढऱ्या काकपड्यातली व्यक्ती जाताना दिसली ना? तुम्हाला तेव्हा असंच वाटलं ना की कोणीतरी झोपेत चालतंय ? मग आपण कशाला मधे पडावं ? म्हणून तुम्ही दाराला आतून कडी घालून पुन्हा झोपलात? ”
“ माणूस झोपेत चाळत होतं असं मी काही म्हणालेलो नाही.” –दुर्वास
“ पण मी विचारलं तुम्हाला ,की तशीच वस्तुस्थिती होती ना? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ आणि पुन्हा तुम्ही झोपायला गेलात याचं एकमेव कारण म्हणजे त्या माणसाच्या हातात तुम्हाला जी वस्तू दिसली ती चाकूच असावी असं तुम्हाला वाटलं नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही वाटत तसं.” –दुर्वास
“ थोडं अधिक स्पष्ट कराल का? ” पाणिनी म्हणाला.
“ मला चाकू दिसला.”
“ बर, तर मग तो माणूस अंगणातल्या टेबला पाशी गेला? ” पाणिनी म्हणाला.
“ हो ”
“ त्याला टेबलाचा टॉप उचलताना तुम्ही पाहिलात का? ”
“ हो.” –दुर्वास
“ नंतर तुम्ही पाहिलं की तो माणूस टेबला पासून दूर गेला आणि पलीकडच्या दाराने दिसेनासा झाला? ” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर.”
“ जेव्हा तो टेबला पासून लांब निघून गेला तेव्हा त्याच्या हातात चाकू होतं का? ”
“ हो, अर्था.... नाही... म्हणजे मला नाही सांगता येत.” –दुर्वास
“ त्याच्या हातात चाकू नव्हता असं म्हणाल का तुम्ही? ”
“ मी दोन्ही पैकी काहीच म्हणू शकणार नाही ”-दुर्वास
“ असं झालं असायची शक्यता आहे का की त्याने टॉप वर करून आतल्या कप्प्यात तो चाकू ठेवला? ”
“ मला सांगता येणार नाही.”
“ टेबला जवळ येण्यापूर्वी त्याच्या हातात चाकू होता या बद्दल खात्री वाटते तुम्हाला? ” पाणिनी म्हणाला.
“ आमची हरकत आहे या प्रश्नाला. दहा वेळा विचारून झालाय हा प्रश्न आणि उत्तर ही देऊन झालंय ”- खांडेकर
“ साक्षीदाराने उत्तर देऊ दे ” वज्रम पुढे झुकत , उत्सुकता दाखवत म्हणाले. ते आता दुर्वास कडे निरखून बघत होते.
“ हो.तेव्हा होता त्याच्या हातात.”-दुर्वास
“ त्या माणसाची ओळख खात्रीलायक पणे तुम्ही पटवू शकाल?” पाणिनी म्हणाला.
“नक्की.”
“ तो आरोपी होता? ” पाणिनी म्हणाला.
“ हो आरोपीच होता.”
“ त्याचा वेष कसा होता? ”
“ नाईट ड्रेस मधे होता.” –दुर्वास
“ पायात काही नव्हते?” पाणिनी म्हणाला.
“ नव्हते.अनवाणी होता.”
“ तुम्ही त्याला नीट पाहिलंत तेव्हा तो किती अंतरावर होता? ”
“ माझ्या खोलीच्या खिडकी वरूनच तो पुढे गेला.”- दुर्वास
“ आणि त्याची सावली तुमच्यावर पडली? ”
“ बरोबर.”
“ पण तेव्हा तुम्ही गाढ झोपेत होतात आणि त्यामुळे तुम्हाला तो माणूस नीट दिसला नसल्याची शक्यता आहे? ”
“ बरोबर” _दुर्वास
“ तर मग जेव्हा व्यवस्थित दिसला तुम्हाला त्यावेळी तो किती अंतरावर होता?” पाणिनी म्हणाला.
“ ते नीट नाही सांगता येणार ”
“ या नकाशावर दाखवता येईल?”
“ हो येईल.” –दुर्वास म्हणाला आणि त्याने नकाशावर एका ठिकाणी खूण केली.
“ नकाशावर खोलीची जागा दाखवा ”
दुर्वास ने ती दाखवली.
“ नकाशावरील मापे विचारात घेता, साधारण पस्तीस फूट दूर अंतरावरून त्याला पाहिले तुम्ही.” पाणिनी म्हणाला
“ असू शकेल.”
“ आणि तुमच्या कडे त्याची पाठ होती?”
“ हो”
“ तरीही तुम्ही ओळखलं त्याला? ”
“ ओळखलं ”
“ तुम्हाला साक्षीतल्या खरे पणाच्या महत्वा बद्दल सांगायची गरज नाही ना? ” पाणिनी म्हणाला. “ आणि या खटल्याच्या महत्वा बद्दलही? ”
“ मला जाणीव आहे
“तरीही तुम्ही शपथेवर सांगता की जी व्यक्ती,तुम्ही फक्त पाठमोरी बघितली, नाईट ड्रेस मधे पाहिलीत आणि पस्तीस फूट लांब अंतरावरून फक्त चंद्राच्या प्रकाशात पाहिलीत , ती आरोपीच होती?” पाणिनी म्हणाला.
“ हो. ”
“ जाग आल्यावर प्रथम तुमचं लक्ष घड्याळाकडे गेलं? ”
“ हो ”-दुर्वास
“आणि पुन्हा झोपायला जाण्यापूर्वी घड्याळ पाहिलं? ” पाणिनी म्हणाला.
“ हो, मला वाटत तसं ”
“ प्रथम पाहिलं तेव्हा किती वाजले होते? ”
“ बरोबर तीन ”
“ आणि पुन्हा पाहिलंत तेव्हा ? ”
“ तेवढेच.म्हणजे या सगळ्यात अर्ध्या मिनिटापेक्षा अधिक वेळ गेला नाही.”-दुर्वास
“ पुन्हा झोपायला जाण्यापूर्वी घड्याळ पाहिलंत तेव्हा काट्याकडे नीट पाहिलं होतं?”
“ हो”
“ तीन ऐवजी सव्वा बरा वाजले नसतील कशावरून? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही. तीनच वाजले होते.”
“ पोलिसांना जेव्हा प्रथम जबाब दिलात तेव्हा सव्वा बरा वाजले असं सांगितलंत तुम्ही.” पाणिनी म्हणाला
“ असेल”
“ तुमच्या आठवणी त्यावेळी अधिक ताज्या होत्या अत्ता आहेत त्यापेक्षा? ”
“ नाही.तसं नाहीये.” –दुर्वास
“ याचा अर्थ जसजसा काळ पुढे जातो तशा तुमच्या स्मृती अधिक ताज्या होत जातात असं तुम्हाला म्हणायचं आहे? ”
“ या घटनेच्या बाबत तरी तसं घडलंय ”
“ जेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं की खून तीन च्या सुमाराला झाला असायची शक्यता आहे तेव्हा तुम्ही मनातल्या मनात घड्याळाचे काटे उलटे फिरवलेत आणि सव्वा बाराचे तीन वाजवलेत? जेणे करून तुम्ही आज कोर्टात एकदम स्टार विटनेस व्हाल? ” पाणिनी म्हणाला. कोर्टात खसखस पिकली.
न्या.वज्रम यांनी हातोडा आपटला. “ सायलेन्स प्लीज! ” ते म्हणाले. “ पटवर्धन स्टार विटनेस वगैरे शब्द काढून टाकतोय मी.”
“ युअर ऑनर, मी साक्षीदाराचा हेतू कोर्टाच्या नजरेस आणून देऊ इच्छित होतो.” पाणिनी म्हणाला
“ असलं काहीही नाहीये.तीनच वाजले होते तेव्हा.सव्वा बरा वाजले असायची बिलकुल शक्यता नाही.” दुर्वास ओरडला.
“ तुमची दृष्टी चांगली आहे?” पाणिनी म्हणाला.
“ उत्तम आहे.”
“ चौदा तारखेच्या पहाटे सुध्दा ती चांगली होती?” पाणिनी म्हणाला.
“ अर्थात.”
“ तुम्ही चष्मा लावता नाही का? ”
“ गेली पस्तीस वर्षं लावतोय”-दुर्वास
“ तुमच्या साक्षीत जो कालावधी समाविष्ट झालाय त्या कालावधीत तुम्ही सवयी प्रमाणे चष्मा लावलाय?”
“ हो.”
“ जेव्हा तुम्ही उठलात आणि खिडकी बाहेर पाहिले तेव्हा चष्मा लावला होता? ”
“ हो, म्हणजे लावलाच असेल ”
“ का लावलात? ” पाणिनी म्हणाला.
“ नीट दिसावं म्हणून, अर्थात ” कोर्टात हशा पिकला पण पाणिनी पटवर्धन च्या चेहेऱ्याकडे नजर जाताच लोक आपोआपच गप्प झाले.
“ म्हणजे जाग आल्यावर पाहिली गोष्ट तुम्ही काय केली तर चष्मा लावलात कारण काय तर खिडकीतून दिसणारी व्यक्ती नीट दिसावी ?” पाणिनी म्हणाला.
“ त्यात चूक काय आहे मग? ” –दुर्वास
“ मी तुम्हाला विचारतोय असंच घडलं ना?” पाणिनी म्हणाला
“ हो ”
“ याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला माहिती होत की चष्मा न लावता तुमचे डोळे हे बिन कामाचे आहेत.” पाणिनी म्हणाला
“ मी तसं म्हणालेलो नाही.” –दुर्वास
“ शब्दात नाही म्हणालात पण तुमच्या देह बोली वरून ते कळतंय” पाणिनी म्हणाला
“ मला नीट दिसावं म्हणून चष्मा लावला.” –दुर्वास
“ चष्म्याशिवाय लांब अंतरावरचं तुम्हाला दिसतं नाही हे तुम्हाला माहीत होत म्हणून चष्मा लावलात?” पाणिनी म्हणाला.
“ तो लावला की चांगलं दिसतं”
“ तो चष्मा एकदम योग्य आहे तुमचा? ”
“ अगदी योग्य”
“ तसं असेल तर सरकारी वकीलांना आणि पोलिसांना जबाब दिल्या नंतर त्यांनी तुम्हाला तातडीने डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जायचा सल्ला का दिला? ” पाणिनी कडाडला.
“ त्याला आम्ही असला काहीही साल्ला दिलेला नाही.” खांडेकर ओरडले.
“ का गेलात तुम्ही डॉक्टर कडे? ” पाणिनीने खांडेकर च्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत दुर्वास ला विचारलं
“ मला जायचं होत म्हणून ” दुर्वास म्हणाला.
“ पण का जायचं होत? ” पाणिनी म्हणाला.
“ बरेच दिवस जाईन जाईन असं ठरवत होतो.पण कामामुळे जमत नव्हतं ते जमवलं. तुम्हाला माहिती आहे ना, मी फार व्यस्त असतो कामात, मिस्टर पटवर्धन.”
“ मग याचा अर्थ असा की तुमच्या व्यग्रतेमुळे चष्म्याचा विषय कित्येक दिवस दूर ठेवावा लागला? किती दिवस दूर ठेवावा लागला?”
“ मला नाही आठवत नक्की.”-दुर्वास
“ चौदा तारखे पूर्वी तुम्ही कधी चष्मा लावला होता शेवटचा ? ” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही सांगता येणार.”
“ पाच वर्षापूर्वी? ”
“ नाही आठवत ”
“ दहा वर्षापूर्वी? ”
“ नाही,एवढं नाही.” -दुर्वास
“ तुम्हाला रात्री काय दिसलं हे सरकारी वकील आणि पोलिसांना सांगितल्यावर सगळ्यात पाहिली गोष्ट तुम्ही काय केली तर डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घेतली.बरोबर? ”
“ अगदी पाहिली गोष्ट ती नाही केली.”
“ पण साधारण पणे इतर जे काही केलंत त्यात हे नक्कीच केलं? ” पाणिनी म्हणाला.
“ सांगता येत नाही.”
“ त्याच संध्याकाळी हे केलं? ”
“ हो, त्याच दिवशी सायंकाळी.” -दुर्वास
“ डॉक्टर तुम्हाला त्याच संध्याकाळी भेटले? ”
“ हो.”
पाणिनी हसला .“ डॉक्टर तुम्हाला त्याच संध्याकाळी भेटले याचं कारण मिस्टर दुर्वास, तुम्ही त्यांना आधी फोन करून त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती. ”
“ मी नव्हता केला फोन.”
“ अरे ! ” पाणिनी नाटकी पणाने म्हणाला. “ मग कोणी केला होता फोन ? ”
भोपटकरएकदम उठून उभा राहिला. “ ऑब्जेक्शन ! संदर्भहीन, अवाजवी प्रश्न आहे. काय फरक पडतो, कोणीही अपॉइंटमेंट घेतली असेल तर? ”
“ फरक पडतो.नक्कीच. ज्या प्रकारे साक्षीदार उत्तर देताहेत, त्यावरून माझा मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे. साक्षीदार हे वकील आहेत.त्यांना कशी उत्तरं द्यायची आणि स्वतःला अडकू द्यायचं नाही हे चांगलंच कळतय. त्या विशिष्ट वेळी त्यांनी जे पाहिलं असा त्यांचा दावा आहे ,त्या वेळी त्यांची दृष्टी कशी होती हे तपासून पहायचा मला अधिकार आहे.” पाणिनी म्हणाला
“ या साक्षीदाराने मान्य केलंय की त्याला चष्म्याची गरज होती, आणि हे ही मान्य केलंय की त्याने त्या रात्री डोळ्यावर चष्मा घातला होता पण तो पुरेसा नव्हता.त्या वेळी नव्हता आणि त्या पूर्वी ही नव्हता, बरीच वर्षं.”
“ त्याने दिलेल्या उडवा उडविच्या उत्तराच्या पार्श्वभूमीवर मला त्याचं मन पूर्वग्रहदूषित आहे हे कोर्टासमोर आणायचं होतं.” पाणिनी म्हणाला
“ मी दुर्वास ला उत्तर द्यायचा आदेश देतो. दुर्वास बोला, कोणी केलं फोन? ” वज्रम म्हणाले.
दुर्वास गडबडला. अळंटळं करू लागला.
“ बोला दुर्वास. ” पाणिनी पटवर्धन म्हणाला.
“ मिस्टर भोपटकर.” अत्यंत बारिक आवाजात, जेमतेम पटवर्धन ला ऐकू येईल असं दुर्वास म्हणाला.
“ साक्षात सरकारी वकील भोपटकर यांनी फोन केलं तुमच्या डॉक्टरांना? ” पाणिनी नाटकी पणाने उद्गारला , “ ज्यांनी माझ्या प्रश्नाला, संदर्भ हीन, अवाजवी प्रश्न म्हणून हरकत घेतली ते मिस्टर भोपटकर! ”
कोर्टात हास्याची लकेर पसरली. पण यावेळी न्या.वज्रम यांनी सायलेन्स प्लीज म्हणून लोकांना शांत केलं नाही.ते स्वत: चक्क हास्यात सामील झाले.
“ कोर्टाचं आजचं कामकाज थाबवू या आपण. उद्या साडे दहाला पुन्हा चालू करुया. ” ते म्हणाले आणि उठून आपल्या खोलीत जायला निघाले.
( प्रकरण १६ समाप्त)