आरक्षण त्यांनाच का? आम्हाला का नाही?
आरक्षण त्यांनाच का? आम्हाला का नाही? असे दोन प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचं कारण आहे. त्यावेळचं लोकांचं वागणं. त्यावेळचे लोकं हे त्यांच्याशी चांगले वागत नव्हते. त्यांना हीन समजायचे. त्यांची हेळसांड करायचे आणि तोही समाज सामाजिक बदलाच्या कोसो दूरच होता. समाजाच्या वागण्याची त्यांनाही चीड येत होती. परंतु परिस्थितीच अशी होती की ते काहीही करू शकत नव्हते. त्यातच समाजाची बांधणी अशी होती की त्यांनी जर समाजाच्या वागण्यावर ताशेरे ओढले की त्यांची हत्याच केली जात होती व त्यातच त्या हत्येबद्दल ज्यांनी हत्या केली, त्यांना काहीही होत नसे. अशीच परिस्थिती होती. म्हणूनच अस्पृश्य असणाऱ्या जाती कितीही प्रमाणात भेदभाव असला तरी त्या भेदभावावर ताशेरे ओढत नसत वा ओढू शकत नसत.
अस्पृश्य व इतर लोकांना शिकण्याचीही परवानगी नव्हती. ज्यावेळेस इंग्रज भारतात आले. तेव्हा त्या इंग्रजांना येथील बोलीभाषा समजायची नाही. शिवाय त्यांना व्यवहार करायचा होता. त्यामुळं त्यांनी येथील जनतेला व्यवहार करता यावा म्हणून शाळा काढल्या. त्यांच्या त्या शाळेत भेदभाव तसा नव्हताच. सर्वांना परवानगी होती. परंतु त्यांच्या शाळेत शिकवणारे जे शिक्षक होते. त्यांना भेदभाव होता व त्यांच्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी व पालकांच्या आग्रहाखातर ते भेदभावाचंच वातावरण देत असत. जरी इंग्रजांच्या शाळेत भेदभावयुक्त वातावरण नसलं तरी.
बाबासाहेब जेव्हा लहान होते आणि ते जेव्हा शाळेत जाऊ लागले होते, तेव्हा त्यांच्याशीही शाळेत भेदभावाचं वातावरण होतं. शिक्षकासह विद्यार्थीही भेदभावानं सामोरे येत होते. परंतु शिक्षणाच्या त्या प्रवाहात डॉ. बाबासाहेबांना ती इंग्रजांची शाळा असल्यानं काढता येत नव्हतं. त्या इंग्रजांच्या शाळेमुळच डॉ. बाबासाहेबांना पुढं शिकता आलं व उच्च शिक्षण घेता आलं. तसंच आपल्या समाजालाही उच्च प्रवाहात आणता आलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंग्रजांच्या वरदहस्तानं ज्या शाळा भारतात निघाल्या होत्या. त्यानं ते शिकले. त्यानंतर त्यांनी भेदभाव दूर करीत असतांना समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. परंतु तसा प्रयत्न करीत असतांना काही लोकं त्यांना विरोध करीत असत व म्हणत असत की बाबासाहेब राहू द्या तुमची जनजागृती तुमच्याचजवळ. आम्हाला गावातच राहावं लागणार आहे. आम्ही जर तुमचं ऐकून गावाच्या मताच्या बाहेर गेलो तर गाव त्याचा बदला अवश्य घेईल व आम्हाला एकतर गावातून बाहेर काढेल किंवा आमचा जीव तरी घेईल.
डॉ. बाबासाहेबांची जरी जनजागृती खरी असली तरी लोकांची मानसिकता बरोबर नव्हती. कारण त्यावेळची परिस्थितीच तशी होती. त्यातही काही लोकं बाबासाहेबांच्या बाजूनं उभे राहिले. त्यांनी स्वतः गावात राहून भेदभावाला विरोध केला व आपल्या उत्थानाचा मार्ग शोधला. ज्यातून त्यांनी विद्रोह केला. असा विद्रोह करीत असतांना त्या समाजानं काही स्पृश्याचे पाण्याचे स्रोत बाटवले. अर्थात पाण्याच्या स्त्रोताला हात लावला. त्या माणसांनाही दिवसातून चार वेळा हात लावला. त्यांच्या जीवनावश्यक व खाण्यायोग्य वस्तूंनाही सतरावेळा स्पर्श केला. तेही एकत्र येवून. ज्यातून त्यांना राग यायचा. परंतु तसा राग जरी येत असेल तरी ती मंडळी काहीही करु शकत नसत. कारण इंग्रजांच्या कायद्याचा धाक त्या मंडळींना होता. पुढं बाबासाहेबानं जेव्हा संविधान लिहिलं. त्यात अशा अशा कलमा टाकल्या की ज्या कलमानं जातीच्या भेदभावाला पुर्णतः कात्रीत पकडलं गेलं व जातीचा भेदभाव काहीसा मिटला. आजही भेदभाव पुर्णतः गेला असे नाही. काही अंशी बाकीच आहे. तो कधीकधी मनामनातून उन्मळून येतोच.
अस्पृश्यांनी जातीचा असलेला भेदभाव मिटवला. परंतु त्यांनी जे भोगलं ते विसरता येत नाही. त्यातच त्यांच्याशी जेव्हा भेदभाव सुरु होता, त्यावेळेस ज्यांना आज आपण स्पृश्य म्हणतो. त्या सर्व जाती त्यांना भेदभावावर आधारीतच वागणूक देत होत्या. शिवाय जातीगत भेदभाव मिटवणं ही साधी गोष्ट नव्हती. शिवाय असा जातीवर आधारीत भेदभाव मिटवणं आवश्यक बाब होती. व्यतिरीक्त त्या समाजाला वरच्या टप्प्यात आणणंही आवश्यक होतं. त्यासाठी आरक्षण आवश्यक होतं. त्याशिवाय ती मंडळी वर येवू शकत नव्हती. म्हणूनच आरक्षण. परंतु ते आरक्षण इतर समाजाला व तमाम जातीला दिलं गेलं नाही. त्याचं कारण होतं. इतर जातीनं अस्पृश्यांशी केलेला व्यवहार. अस्पृश्य जाती व जमाती यांनी असंख्य वेदना भोगल्या होत्या. त्यांचे हालहाल झाले होते स्पृश्यांच्या वागण्यानं. म्हणूनच त्यांना आरक्षण दिलं गेलं. परंतु आज आम्हाला आरक्षण का नाही? असं म्हणत जो तो समाज आरक्षण मागतांना दिसत आहे. त्यांची जात जरी मागासली नसली तरी आमची जात मागासली आहे असा बडवा करुन जी ती जात आज आरक्षण मागतांना दिसत आहेत. आता यात विशेष सांगायचं झाल्यास जात ही मागासली राहू शकत नाही. मागासले राहू शकतात लोकं. कारण गरीबी श्रीमंती ही ठरलेली असते. काल जे गरीब होते. आज ते गरीब असतीलच असे नाही. आज ते श्रीमंतही बनतात. मग जातीला मागासली जात आहे असं का म्हणावं? तसंच ती जात मागासली समजून त्या जातींना आरक्षण का द्याव? हं, व्यक्तीगत आरक्षण दिलं तर ठीक. कारण व्यक्ती हा मागासला होवू शकतो. जात नाही. तसंच काल जी उच्च प्रवाहात वावरलेली जात. ती जात आज मागासली कशी होवू शकते? हाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे.
महत्वपुर्ण बाब ही की आरक्षण त्यांनाच का? आम्हाला का नाही? असा विचार जो तो करीत असला तरी त्याबाबत लोकांनी आपल्या मनात रास्त विचार करावा. विचार करावा की काल त्यांनी जे भोगमान भोगले, ते आपण भोगले काय? आज त्यांना आरक्षण रुपानं सुख आहे, त्यावर आपल्या मनाचा आपण जळफळाट होवू द्यावा का? आपण त्यांची जात आतातरी सुधारत आहे. यावर आनंद व्यक्त करावा की आपणच त्यांना आरक्षण आहे म्हणून त्यांना का आरक्षण? आम्हाला का नाही? असं म्हणत आणि मानत आरक्षण मागत फिरावं?
खरं तर आम्ही आज आरक्षण मागूच नये आमच्या जातीसाठी. आम्ही आनंदीत राहायला पाहिजे आणि विचार केला पाहिजे की त्यांची जात आज मुख्य प्रवाहात व विचारधारेत येत आहे. परंतु आम्ही तसं करणार नाही. कारण आम्हाला आम्हाला असलेल्या सुखात आनंद वाटत नाही तर दुसऱ्याला दुःख देण्यातच आनंद वाटते. हीच आजची वास्तविकता आहे. यात दुमत नाही. म्हणूनच आम्ही त्यावेळेस आम्ही काहीच भोगमान भोगलेले नसतांनाही आरक्षण मागतो व त्यासाठी आंदोलन करतो अन् नाही मिळाल्यास स्वतःच दुःखी होतो. कारण आम्ही कुणाला मिळत असलेला आनंद पचवू शकत नाही हीच वास्तविकता आहे व ही वास्तविकता आज नाकारता येत नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०