सहावा अध्याय
आत्म संयम योग
श्रीभगवान म्हणाले, जो फळाची अपेक्षा न करता कर्म करतो तोच योगी असतो. योग आणि संन्यास एकच आहे. जो कर्म करत असूनही अनासक्त असतो तोच खरा योगी असतो म्हणजे अध्यात्मवादी.
तो अग्निहोत्र आणि कर्म न करणारा नसतो. इंद्रिय कर्म करीत असली तरी फळाची आसक्ती नसते, स्वत: स्वत:स ऊद्धरणारा असतो. आत्मा त्याचा मित्र व तो त्याचाच शत्रू असतो. भगवान म्हणाले जो मन जिंकतो तो मनाचा मित्र व जिंकले नाही तो मनाचा शत्रु होतो. त्यांच्या मनात आपला परका मित्र शत्रू अशा भावना राहत नाहीत. सुखदुःख, थंड-गरम, मान-अपमान या भावना रहात नाहीत. तो ज्ञानाने संयमी व अध्यात्मात स्थिर झालेला असतो.
त्या योग्याला सोने, ढेकुळ, दगड एकच वाटते. भावभेदाच्या कल्पना राहत नाहीत. आसक्ती उरलेली नसते. त्याच्या दृष्टीने अधम, उत्तम समान असतात. तो तल्लीन होतो त्याला सर्वब्रह्ममय असल्याची अनुभूती येते. तो जागृत असतो पण त्यांनी लालसेचा त्याग केलेला असतो. असा योगी जो असतो त्याने आपले मन एकाग्र करून परमेश्व़राचे चिंतन करावे. त्यांनी एकांतात राहून मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. त्यांनी सर्व इच्छांचा त्याग करून माझे पणाची भावना सोडली पाहिजे.
गवतावर मृगाजीन व मऊ कापड ठेवून शांत ठिकाणी बसावे. बसण्याचे ठिकाण जास्त उंच किंवा सखल असू नये. मन एकाग्र करून आत्मशुद्धीसाठी योगाचे आचरण करावे. शरीर, मस्तक, मन स्थिर करून नाकाच्या टोकावर दृष्टी ठेवून बाकी सर्व विसरून शांत निर्भय राहून ब्रह्मचर्य पाळून चित्त स्थिर व संयम ठेवून माझे ध्यान करावे व मला जीवनाचे ध्येय समजावे म्हणजे त्याला मोक्ष मिळेल.(श्री युक्तेश्वर गुरुजी म्हणतात की नाकाच्या उगमस्थानावर दृष्टी ठेवावी. नाक दोन भुवयांमध्ये बिंदूतून उगम पावते तो बिंदू म्हणजेच दिव्य दृष्टीचे स्थान होय.)जो अती खातो किंवा खूप कमी खातो अथवा खूप झोपतो किंवा कमी झोपतो तो योगी होऊ शकत नाही. जो योग्य रीतीने सर्व गोष्टी करतो म्हणजेच भोजन ,भ्रमण योग्य काळी व योग्य रीतीने करतो तोच शिस्तबद्धतेने योगाभ्यास करून सर्व भौतिक सुखांचा सामना करतो. जो योगी आपल्यासर्व मानसिक क्रियामध्ये शिस्त आणि सर्व भौतिक सुखाचा त्याग करून राहतो तो योगी म्हणून घेण्यास योग्य असतो. त्याला (त्याच्या मनाला) खरेतर
गाभा-यातील शांत दिपकळी हीच उपमा योग्य आहे. योगी योगाभ्यासाने आपले मन विषयांतून काढून आत्म्याचे अवलोकन करुन आत्म सुखात संतोष मानतो. दिव्य इंद्रियां द्वारे प्राप्त झालेल्या सुखांत मग्न होतो व या सुखात असताना तो विचलित होत नाही. इंद्रियांना न कळणारे पण बुद्धीला जाणवणारे असे जे महान सुख त्या सुखात असताना योगी विचलित होत नाही. असे सुख मिळाल्यानंतर याहून कोणताही इतर लाभ खास नाही असे मानतो. मोठी दुःखे पण अशा योग्यास विचलित करु शकत नाहीत.अशा दुःखाचा स्पर्श नसलेल्या सुखाला योग म्हणावे. दृढ निश्चयाने व उत्साहाने योगाचा अभ्यास करावा.
सर्व इच्छांचा त्याग करून संकल्पाने , मनाने सर्व इंद्रियांना चहुबाजूंनी रोखून
धरून , धैर्य युक्त बुद्धी ने हळू हळू आवरून अन्य चिंतने सोडून मन आत्म्यामधे गुंतवावे. मन हे मूळचेच चंचल असल्याने ते भरकटत असेल तर त्याला खेचून आत्म्याशी बांधावे. त्याने रजोगुण शांत होऊन मन:शांती प्राप्त होते,व योगी पापमुक्त होऊन त्यास परम सुख लाभते. मन आत्म्यामध्ये स्थिर करणाऱ्याचे पाप संपते. तो भगवंताच्या सेवेमध्ये परमसुख मिळवतो. जो योगयुक्त होतो त्याची दृष्टी समभावी होते, त्याला सर्वत्र मीच दिसतो व तो सर्वत्र मलाच पाहतो, त्याला मी किंवा मी त्याला कधीच दुरावत नाही. सर्वांभूती असलेला परमेश्व़र व मी एक रूप समजून जो माझी भक्ती करतो व संसारात राहूनही माझी भक्ति करतो , व हे अर्जुना ! जो सर्व प्राणिमात्रांना स्वतःसारखेच मानतो व त्यांचे सुख दुःख स्वतःसारखेच मानतो तो योगी श्रेष्ठ जाणावा.
अर्जुन म्हणाला, हे मधुसुदना ! तुम्ही हा सम दर्शन योग सांगितला ( साम्य बुद्धी ने प्राप्त होणारी योगपद्धत)पण माझ्या चंचल मनात तो टिकेल असे दिसत नाही. हे अर्जुना, मन हे बलवान असून संयमी नसेल त्याला योग दुर्लभ आहे पण जो संयमी असेल त्याला प्रयत्नाने ते शक्य आहे. अर्जुन म्हणाला हे कृष्णा, श्रद्धा असूनही जो आपल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही व ज्याला योगसिद्धी मिळत नाही तो कोणत्या गतीला जातो. हे श्रीकृष्णा मोहाने अस्थीर झालेला असा तो मोक्षमार्गी जसा आकाशात ढग विरून जातो तसा तो नष्ट होतो का? . ही शंका निवारण्यासाठी तू आणि तूच समर्थ आहेस.
श्री भगवान म्हणाले, हे पार्था, इहलोकात किंवा परलोकात त्याचा नाश होत नाही. मित्रा, जो शुभ कामे करतो त्याचे अकल्याण होत नाही. स्वर्गलोकांत पुण्य फळे भोगुन शुद्ध कुळात जन्म घेतो अथवा बुद्धिमान अशा योग्याच्या घरी जन्म घेतो.
पुर्व संस्कारांमुळे त्याच्या बुद्धीला चेतना मिळते. व तो सिद्धी मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. पूर्वीचा अभ्यास त्याला योगमार्गाकडे आकर्षित करतो. तो योग जिज्ञासू कर्मकांडास भेदून जातो. योगी आपल्या प्रयत्नांनी आचरण करून पापातून शुद्धि पावतो. अनेक जन्मानंतर सिद्धी मिळून मोक्ष मिळवतो. तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मयोगी यांच्यापेक्षा योगी श्रेष्ठ म्हणूनच अर्जुना तू योगी हो. सर्व योग्यामध्ये जो माझी श्रद्धेने भक्ति करतो व माझ्या अंत:करणात राहतो तो श्रेष्ठ योगी असतो.
श्रीकृष्ण अर्जुन संवादातील आत्मसंयम योग नावाचा सहावा अध्याय.