प्रकरण 14
पाणिनी ने खोपकर च्या घराची बेल दाबली.ती दाबताच क्षणी इन्स्पे.होळकर ने दार उघडले.पाणिनीच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. “ कामावर फार लौकर हजर झालास काय आज? ” त्याला खवळवण्याच्या हेतूने पाणिनी म्हणाला..
“ ही लौकर ची वेळ आहे आणि मी कामावर आहे.” इन्स्पे.होळकर ने उत्तर दिलं. “ काय हवंय तुला इथे? ”
“ माझ्या केस च्या दृष्टीने मला साक्षीदारांना प्रश्न विचारायचेत आणि हा परीसर जरा नजरेखालून घालायचाय. तुझी काय हरकत? ” पाणिनी म्हणाला..
“ सरकार पक्षातर्फे साक्षीदारांना समन्स काढलं गेलंय तुला त्यात काही लुडबूड करता येणार नाही.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ मी काही छेड छाड करणार नाहीये , फक्त प्रश्न विचारायाचेत.”
“ तसं असेल तर ये ” दार उघडून त्याला आत घेत इन्स्पे.होळकर म्हणाला.
पाणिनी आत येताच आर्या पुढे आली आणि पाणिनी शी हस्तांदोलन केलं. “ बोला पटवर्धन, काय म्हणताय? काय काम होतं? ”
“ ती आमची साक्षीदार आहे , लक्षात ठेवा.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ सरकारी साक्षीदार झाली म्हणजे ती तुमची खाजगी संपत्ती झाली नाही.खटला कोर्टात येईल तेव्हा तुमच्याच काही साक्षीदारांना मी माझा साक्षीदार म्हणून समन्स बजावीन. साक्षीदारच काम हे सत्य सांगणं आहे. मी मिस आर्या शी खाजगीत बोलू इच्छितो आणि बोलू शकतो.” पाणिनी म्हणाला.
“ तिने काय साक्ष दयावी हे तू सांगू शकत नाहीस तिला.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ आणि मी तिला काय सांगायचं हे तू सांगू शकत नाहीस मला.” पाणिनी म्हणाला.
त्याने आर्या चा दंड पकडला. “ आपण तुझ्या खोलीत जाऊन बोलू ” पाणिनी म्हणाला.
इन्स्पे.होळकर ने हातात फोन घेतला.
“ काय करतोय तो? ” आर्या ने विचारलं
“ सरकारी वकीलांना फोन लावतोय.” पाणिनी म्हणाला. “ किती वेळ झाला त्याला इथे येऊन? ” पाणिनी म्हणाला..
“ साडेसात वाजल्या पासून आहे इथे.”
“ तूच बोलावलंस ना त्याला, आपलं ठरल्या प्रमाणे? पाणिनी म्हणाला..
“ हो.मी तुमच्याशी फार ओळख असल्या सारखं दाखवणार नाही.आपण संगनमताने काही करतोय असं वाटता कामा नये, बरोबर ना? ” तिने विचारले.
“ बरोबर. तू चाकू बरोबर ठेवलास ना? ” पाणिनी म्हणाला..
“ हो.”
“ किती वाजता ? ”
“ अकरा वाजता.” ती म्हणाली
“ ड्रॉवर लॉक केलास ना नीट? ”
“ केला.”
“ किल्ली कुठाय? ” पाणिनी म्हणाला..
“ माझ्याकडे आहे.व्यवस्थित ठेवली आहे.”
“ तुझी खात्री आहे ना फक्त तुझ्याच कडे त्याची किल्ली आहे आणि एकमेव किल्ली आहे म्हणून? ” पाणिनी म्हणाला..
“ अर्थात. का बर विचारताय पुन्हा पुन्हा? ”
“ कधी पासून तू लॉक करत्येस ड्रॉवर ? ” पाणिनी म्हणाला..
“ मला चाकू सापडल्याच्या दुसऱ्या दिवसा पासूनच.”
“ हे तुला कसं माहीत की त्याची एकच किल्ली आहे, आणि ती फक्त तुझ्याकडेच आहे? ”
“ कारण किल्ली ड्रॉवर मधेच असायची.मी तिथूनच घेतली आणि लॉक लावलं.तिथे एकच किल्ली होती.” ती म्हणाली.
“ आणि दिवस भरात ड्रॉवर ला कधीच लॉक लावलं जात नव्हतं? ”
“ नाही. ”
“ पण काल रात्री लॉक लावलं गेल्याची तुला खात्री आहे? ” पाणिनी म्हणाला..
“ अर्थातच. तुम्हीच मला लॉक लावायला सांगितलं होत.”
“ तुला बघितलं नाही ना कोणी? म्हणजे चाकू ठेवताना किंवा लॉक लावताना? ” पाणिनी म्हणाला..
“ कोणीच नाही बघितलं.” आर्या म्हणाली.
“ नंतर पुन्हा तो ड्रॉवर उघडायची वेळ नाही ना आली तुझ्यावर? ”
“ नाही आली.पण असं का विचारताय तुम्ही? ”
“ कारण एखाद्या वेळी तुझ्या स्वयंपाक्याला , बल्लव ला काहीतरी हवं असू शकत त्या ड्रॉवर मधलं असं मला वाटलं. ” पाणिनी म्हणाला.
“ नाही नाही, मी लॉक केला ड्रॉवर तेव्हा उशीर झाला होता,बल्लव झोपायला गेला असेल तेव्हा.”
“ मस्त. आता इन्स्पे.होळकर चा फोन होई पर्यंत इथेच थांब फोन झाला की बाहेर जा आणि त्याला भेटून सांग की पटवर्धन मला काही प्रश्न विचारणार असेल तर तुम्ही,तिथे माझ्या बरोबर उपस्थित रहा. म्हणजे मला काही अडच निर्माण व्हायला नको.” पाणिनी म्हणाला. “ थोडा प्रामाणिक पणाचा आणि इन्स्पे.होळकर वर विश्वास दाखवल्याचा अभिनय कर. जमेल ना ? ”
“ वा वा ! मला आवडेलच असं काही करायला.” आर्या खुष होऊन म्हणाली.
इन्स्पे.होळकर चे बोलणे संपले आणि तो चिडून त्या दोघांच्या दिशेने आला तेव्हा अचानक आर्या पाणिनी पासून दूर झाली आणि घाबरून इन्स्पे.होळकर कडे पाहून त्याच्या जवळ गेली. पाणिनी इच्छा दिशेने सरकला तेव्हा त्याला थोपवत ती उद्गारली, “ नाही, नाही मिस्टर पटवर्धन, नाही ! ” नंतर इन्स्पे.होळकर ला उद्देशून म्हणाली, “ मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे.”
इन्स्पे.होळकर ते ऐकून तिच्या कडे सरकला आणि मानेने त्याने तिला बोलायची खूण केली.
“ पटवर्धन ना माझी मुलाखत घ्यायची आहे, पण तुम्हाला ते योग्य वाटत नाहीये असं दिसतंय ,तर मला वाटत की पटवर्धन मला प्रश्न विचारताना तुम्ही ते ऐकाल का? ” आर्या म्हणाली.
“ त्याला ते ऐकायचा काही अधिकार नाहीये ” पाणिनी रागावल्याचा अभिनय करत म्हणाला. “ तुझ्याशी खाजगीत बोलायचं मला पूर्ण हक्क आहे.”
“ पण त्यांना वाटतंय की त्याने ते ऐकायला हवं.” ती पाणिनी ला म्हणाली.
“ त्याला काय वाटतंय त्याला मी दमड्या एवढी किंमत देत नाही.” पाणिनी गुरगुरला. “ तुझं मामावर खरं प्रेम असेल तर तुला सहकार्य करावंच लागेल ”
“ आहे प्रेम पण मला कळतचं नाहीये मी काय करू.” ती म्हणाली
“ माझ्या सल्ल्या प्रमाणे वाग.” पाणिनी म्हणाला.
“ आर्या, , तुला जर असं वाटत असेल की मी तिथे असायला पाहिजे तर जगातली कुठलीही शक्ती मला रोखू शकत नाही, तुझ्या बरोबर राहण्या वाचून . तू एकदम बरोबर भूमिका घेतली आहेस.त्याच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नकोस.”
“ पटवर्धन मला वाटत की असचं करणे ठीक राहील. शेवटी इन्स्पे.होळकर यांनी ऐकू नये असे तुम्हाला काही विचारायचे असेल मला, असं वाटत नाही मला. बरोबर ना? ” आर्या म्हणाली.
“ हा तत्वाचा प्रश्न आहे ” पाणिनी म्हणाला.
“ पण इन्स्पे.होळकर ला जर ऐकायचं असेल तर तुम्ही नाही का म्हणताय? ”
“ मला त्या टेबलाच्या ड्रॉवर बद्दल माहिती हवी होती आणि त्याची किल्ली कुठे होती त्याबद्दल.” पाणिनी म्हणाला.
“ माझ्या मनगटाला रबर बॅंड अडकवून त्यात ठेवली होती.”आर्या उत्तरली.
“ का? अशी मनगटाला का? पर्स मधे वगैरे का नाही? ” पाणिनी म्हणाला..
“ कारण सकाळी ड्रॉवर उघडायचा राहील आणि मला टीके ची धनी व्हावे लागेल अशी मला काळजी वाटत होती.” ती म्हणाली. “ आणि खर सांगायचं तर एवढं करून ही मी ड्रॉवर उघडायला विसरलेच. मी अंघोळीला गेले तेव्हा किल्ली बाजूला काढून ठेवली होती. माझा विचार होता की सकाळी उठल्या उठल्याच ड्रॉवर उघडून ठेवायचा.”
होळकर खुष झाला.“ थोडक्यात, दुसऱ्या माणसाकडे किल्ली असल्या शिवाय, तुम्ही झोपायला गेल्या नंतर तो ड्रॉवर उघडला जाणे अशक्य होतं. ”
तिने मान डोलावून होकार दिला.
“ तू ड्रॉवर ला लॉक लावलंस तेव्हा चाकू ड्रॉवर मधे होता असं तू गृहित धरते आहेस.” पाणिनी म्हणाला.
“ तो तिथे नसेल तर त्याचा अर्थ विहंग खोपकर ने झोपायला जाण्या आगोदर तिथून गायब केला ! ” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ मला किल्ली पाहायची आहे.” पाणिनी म्हणाला.
तिने आपली पर्स उघडून विशिष्ठ आकाराची मोठी किल्ली बाहेर काढली.
“ ही तू तुझ्या बरोबरच बाळगते आहेस? ” पाणिनी म्हणाला..
“ हो मला वाटलं की तेच बरोबर आहे.” ती म्हणाली.
“ पण अत्ता ड्रॉवर लॉक केलेला नाही? ”
पाणिनी म्हणाला..
“ आहे ना ! लॉक केलेलाच आहे. काल रात्रीच मी लॉक केला ” आर्या उत्तरली.
“ का लॉक केलास रात्री ? पाणिनी म्हणाला..”
“ नाही...माहीत नाही... उदास झाले होते मी,म्हणून असेल.” ती म्हणाली. “ म्हणजे आजुबाजूला कोणीतरी वावरतंय या विचाराने निराश होते.” ती म्हणाली.
“ चल, बघूया लॉक ची स्थिती.” पाणिनी ने सुचवलं
“ तुझं अस्थिर मन जर शांत होणार असेल तर तुला आधीच सांगतो,” इन्स्पे.होळकर म्हणाला. “ एका तज्ज्ञ माणसाकडून आम्ही आधीच ते लॉक तपासून घेतलंय.त्यावर कुठेही तोडफोडीच्या खुणा नाहीत,बळजबरीने किल्ली किंवा तत्सम टोकदार हत्यार आत घुसवल्याच्या खुणा,ओरखडे नाहीत.थोडक्यात,म्हणजे लॉक शी कोणीही झटापट केलेली नाही.”
पाणिनी पटवर्धन ने आपले खांदे उडवून इन्स्पे.होळकर च्या म्हणण्याचा आपल्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे दाखवले. “ मी बघून घेणारच आहे एकदा ए लॉक.” तो म्हणाला.
ते तिघेही त्या टेबला जवळ गेले.पाणिनी ने आधी हाताने ड्रॉवर हलवून ,पुढे मागे ढकलून पहिला. गुढग्यावर बसून, ड्रॉवर आणि टेबलाची कड यातील फटीचे निरीक्षण केलं.तो हे सर्व करत असताना इन्स्पे.होळकर विजयी मुद्रेने पाणिनी कडे बघत होता.
“ उघड ड्रॉवर ” पाणिनी आर्या ला म्हणाला. तिने किल्ली आत घालून कप्पा उघडला.पाणिनी तिरक्या नजरेने इन्स्पे.होळकर कडेच पहात होता. त्याच्या चेहेऱ्यावर कोणतेही भाव पाणिनी ला दिसले नाहीत. कप्पा बाहेर ओढताच आतल्या वस्तू हेंदकाळून पुढे मागे झाल्या आणि त्या क्षणीच आर्या च्या घशातून अस्फुट किंकाळी निघाल्या सारखा आवाज आला.आत एक भारी कापडात गुंडाळलेला चाकू आणि काटा ठेवण्याच्या साच्यात चाकू आणि काटा दोन्ही असायला हवे होते तिथे फक्त काटा होता ! पाणिनी पटवर्धन त्याचे जवळून निरीक्षण करतोय असे दाखवण्यासाठी ड्रॉवर जवळ वाकला आणि तो काय करतोय हे बघण्यासाठी इन्स्पे.होळकर पण जवळ गेला.तिथे काही ठेवायची पाणिनी ला संधी मिळू नये हा त्याचा उद्देश होता. आर्या ने घाबरून पाणिनी चा हात एकदम आपल्या हातात घेऊन दाबून धरला.
“ काल रात्री ड्रॉवर ला लॉक लावताना तू आत पाहिलं होतंस ना? ” पाणिनी ने आपलं आवाज शक्यतो सहज बोलल्या सारखा ठेवत विचारलं.
तिने मानेने संमती दिली.तिचे डोळे मात्र विस्मयाने विस्फारले होते.
“ माझं इथलं काम झालंय.एवढंच बघायचं होत मला. आता मला इतर साक्षीदारांशी बोलयच आहे.” पाणिनी म्हणाला.
“ इतर म्हणजे कोण उदाहरणार्थ? ” इन्स्पे.होळकर ने विचारलं
“ मरुद्गण, दुर्वास वगैरे.”
“ या दोघांना ही समन्स पाठवलाय.आज सकाळीच दंडाधिकाऱ्या समोर हजर व्हा म्हणून.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ त्या मुळेच मला बोलायच आहे त्यांच्याशी.” म्हणाला
“ त्यांना बोलायची इच्छा असेल तरच तू बोलू शकतोस त्यांच्याशी.” इन्स्पे.होळकर म्हणाला.
“ मी विचारीन त्यांना,ते बोलणार आहेत का माझ्याशी म्हणून.” म्हणाला
“ तू नाही, मी विचारीन.” इन्स्पे.होळकर ने स्पष्ट केले. “ त्यांची तयारी नसेल तर तुला मी परवानगी नाही देणार.” एवढे बोलून तो घराच्या डावीकडच्या भागात जायला वळला. पाणिनी ने आर्या ला हाताला धरून आपल्या दिशेने वळवले. “ तू नाही ना तो ठेवलास? ” आतुरतेने म्हणाला.
“ हो.मीच ठेवला.”
“ म्हणजे तुला म्हणायचय की काळ रात्री ड्रॉवर ला लॉक लावलस तेव्हा तो इथे होता? ” म्हणाला.
“ हो.”
“ कोणी पाहिलं का ठेवताना? ”
“ कोणीही नाही.” आर्या म्हणाली
“ पण कोणीतरी नक्कीच घेतला असला पाहिजे.” म्हणाला
तिने मानेने पाणिनीच्या म्हणण्याला मुक संमती दिली.
“ मी काय ठरवलं होत करायचं ते जाणून, माझ्यावर कुरघोडी करण्या साठी.” म्हणाला
“ पण कुणी केलेलं असू शकतं हे? ” तिने घाबरून विचारलं
“ तू आणि मी सोडून आपण डुप्लीकेट चाकू तिथे ठेवणार होतो हा विषय फक्त दोघांनाच माहीत ”
होता. म्हणजे , तू तिसऱ्या कोणाला सांगितला नसशील तर.” म्हणाला
“ मी कोणालाही सांगितला नाही.विश्वास ठेवा.”
“ तुला तिथे चाकू ठेवताना बघितलं होत का कोणी? ” म्हणाला.
“ कोणी बघितलं नाही, मला खात्री आहे.” आर्या म्हणाली.
“ काळ रात्री ड्रॉवर ची किल्ली कुठे ठेवली होतीस? ” म्हणाला.
“ मी लपवून ठेवली होती.”
“ पण कुठे? ”
“ एका जुन्या बुटाच्या टाचेत.” ती म्हणाली. “ तुम्हाला ती किल्ली किती महत्वाची वाटत होती मला जाणवत होतं. म्हणूनच मी.......” ती बोलता बोलता एकदम थांबली.इन्स्पे.होळकर लांब लांब ढांगा टाकत त्यांच्याकडे येत होता.
“ पटवर्धन, तुझ्याशी कोणीच साक्षीदार बोलू इच्छित नाहीत. ”
पाणिनी ने त्याच्यावर गुरगुरण्याचा पवित्रा घेतला होता पण नंतर विचार बदलला. नाईलाज झाल्या सारखे आपले खांदे उडवले आणि घरातून बाहेर पडला.त्याच तिरमिरीत आपल्या गाडीत बसला आणि एखादी रेसर कार सुरु होताना जसा आवाज करून सुसाट सुटते, तशी आपली गाडी झटक्यात वळवली आणि रस्त्यावर आणली. वाटेत थोडा वेळ थांबून ओजस ला फोन लावला.तो लागला नाही म्हणून त्याच्या ऑफिसात फोन लावला.ओजस नव्हता.त्याच्या रिसेप्शनिस्ट ने फोन घेतला. “ ओजस बाहेर आहेत आणि रेंज मधे नाहीत.” तिने उत्तर दिलं.
“ तो आला की त्याला माझा निरोप दे, की खोपकर च्या घरात त्याच्या माणसांना पाठव.खुनात वापरल्या गेलेल्या चाकूचा डुप्लीकेट चाकू, जो टेबलाच्या ड्रॉवर मधे असायला हवा होता,तो गायब झालाय. तो शोधायचाय त्या लोकांनी. आणि तो सापडायलाच हवा.कंगव्याने केस विंचरतात ना तसे संपूर्ण घर विंचरून काढा म्हणावं त्यांना.तो सापडण्याची एक शक्यता म्हणजे, फारशी घातलेल्या अंगणात जे कॉफी टेबल आहे त्याचा टॉप काढला तर खालच्या पोकळीत.” पाणिनी ने एका दमात सूचना दिल्या.याला खात्री होती की कनक ओजस येताच लगेच त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल.
ऑफिसात सौम्या त्याची वाट बघत होती.
“ काय घडलंय ? तुरुंगात जाऊन आलात ना? विहंग वर कसले पेपर बजावण्यात आलेत? ” तिने भुवया उंचावून विचारलं.
“ शेफाली खोपकर ने विहंग चे बॅंक खाते गोठवलयं ” म्हणाला
“ म्हणजे? ”
“ विहंग ला, कोर्टाच्या पुढील आदेशा पर्यंत कोणत्याही मालमत्तेची विक्री करता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिलाय. तिने मालमत्तेच्या रक्षणासाठी व वाटणीसाठी रिसिव्हर नेमावा असा अर्ज कोर्टाला केला आहे.”
“ अरे बापरे, असं कसं करू शकते ती? ” सौम्या म्हणाली. “” म्हणजे विहंग आता त्याच्या खात्यातून ना तुमची फी देऊ शकेल, ना कनक ची.”
पाणिनी ने मान डोलावली.
“ आणि रिसिव्हर नेमला जाईल का? नेमला गेला तर ? ”
“ सौम्या, ते सर्व रिसिव्हर कोण असेल त्यावर आणि न्यायाधीशांवर अवलंबून राहील.”
“ पण विहंग खोपकर चे अनेक व्यवसाय आहेत.याची खाती गोठवली तर सगळेच व्यवहाअडचणीत येतील.” सौम्या म्हणाली.
“ तिने दावा केलंय की विहंग खोपकर ने तिची संपत्ती हवी तशी उधळली.फ्रॉड करून दुसऱ्यांच्या नावाने मिळकती वर्ग केल्या. तिचं म्हणणं ऐकून घेणारा न्यायाधीश तिला मिळाला.”
“ थोडक्यात तिच्या निरागस चेहेऱ्याला तो फसला ? ”सौम्या ने विचारलं
“असं म्हणू नकोस.न्यायाधिशांच्या दृष्टीने ती केवळ एक निराधार महिला आहे.ती तिच्या अर्जात असं नमूद करत्ये की पोटगी सुध्दा पुढे देण्यात येऊ नये कारण घटस्फोटाची केसच मुळात खोट्या माहितीवर आणि गृहितकावर लावण्यात आली होती. ” म्हणाला
“ थोडक्यात पोटगी सोडायची आणि त्या बदल्यात खोपकर ची सगळीच संपत्ती हडप करायची असा तिचा डाव आहे.”
पाणिनी कडवट हसला. “ दुर्दैवाने हे खरं आहे. ती कोर्टात असं काही भासवेल की घटस्फोटाचा अर्ज देण्यासाठी तिला उगाचच उद्युक्त केलं गेलं.माझा नवरा गरीब बिचारा आहे, मानसिक पातळीवर तो खचला आहे आहे त्याला खरी गरज आहे ती माझ्या आधाराची , मला तो नवरा म्हणून हवाय,त्याची पोटगी नकोय. तिच्या या अविर्भावापुढे न्यायाधीश प्रभावित होईल आणि विहंग मात्र आपला प्रभावच काय पण आपलं म्हणणं सुध्दा न्यायाधीशांपर्यंत पोचवू शकणार नाही.”
“ तुम्ही तिला कोर्टात जाऊन उघडी का करत नाही? ” - सौम्या
“ परवडण्या सारखं नाही आत्ताच्या घडीला.एकीकडे खोपकर वर खुनाच्या प्रकरणाची टांगती अलवार आहे, त्यात त्याची खाती गोठवून त्याला आर्थिक दृष्टया दुर्बल केलं गेलंय,अत्ता तरी त्याने तिच्याशी तडजोड करणेच व्यावहारिक राहील.”
“ आणि तुम्ही हे सर्व बघत राहणार? तिची सरशी होऊन देणार? ” - सौम्या
“ धीराने ,विचाराने डाव टाकायला लागेल मला. तूर्तास तरी मी तिला खरेदी करायच्या विचारात आहे.” म्हणाला
“ मरुद्गण ला जास्त रक्कम मिळवून देण्याचा तिचा प्लान असू शकतो? ”
“ तडजोड करण्यापूर्वी मी तिला मरुद्गण बद्दल खरी हकीगत सांगायला भाग पाडीन हा माझा शब्द आहे.” म्हणाला
“ म्हणजे? ” – सौम्या
“ म्हणजे मी तिला कबूल करायला लावीन कोर्टात की मरुद्गण ने तिला रात्री ३ वाजता फोन केलं होता.”
“ तुम्हाला वाटतं की मरुद्गण ते नाकारेल? ”
“ शंभर टक्के तो नाकारेल.” म्हणाला
“ कारण काय? ”
“ ती दुर्वास आणि मरुद्गण दोघांना खेळवत्ये. दुर्वास मूर्ख आहे ,त्याला वाटतय आपण त्या दोघांचे मित्र आहोत , वकील आहोत, खर तर ती दुर्वास चा वापर आपल्या विरुध्द करत्ये. आपल्याला धक्का देऊन झाला की ती मरुद्गण ला सुध्दा दूर करेल स्वत:ला हवं ते पदरात पडल्यावर. ” म्हणाला
“ तुम्ही तिला कधी भेटणार आहात? ” –सौम्या
“ उद्या त्याच्या वर खुनाचं आरोप पत्र सादर होईल कोर्टात.सरकारी वकील लगेच खटला चालू करायचा आग्रह धरतील न्यायाधीशांना. मी याला संमती देईन. मरुद्गण आणि दुर्वास त्यांच्या साक्षीत बऱ्याच गोष्टी सांगतील.मी नंतर मरुद्गण ला फाडून खाईन ,याला विचारीन की पाहटे ३ वाजता तो कुठे होता आणि काय करत होता . एक तर तो उत्तरच देणार नाही किंवा खोट बोलेल. मग मी लगेच शेफाली खोपकर ला बाहेर भेटून तिला तडजोड करायला भाग पाडीन.तिला सांगेन की मरुद्गण ने रात्री ३ ला तुला फोन केल्याचं मी सिध्द केलं की विहंग सगळ्याच अडचणीतून बाहेर येईल आणि तुला मोठी रक्कम रोख स्वरुपात तडजोड म्हणून मी मिळवून देईन कारण विहंग ती आनंदाने देईल तेव्हा मरुद्गण ने फोन केलं होता तुला रात्री ३ वाजता या गोष्टीला तू पुष्टी दे त्यात तुझा खूप मोठा फायदा आहे. मग मी हर्षद ला पण साक्षी ला बोलवीन आणि त्याच्या कडून मरुद्गण ने शेफाली ला रात्री ३ ला फोन केल्याचे वदवून घेईन.मग स्वतः शेफाली सुध्दा तिच्या साक्षीत हेच सांगेल.अशा प्रकारे मरुद्गण खोटारडा आहे हे सिध्द होईल. ” म्हणाला
“ यात एक तांत्रिक मुद्दा आड नाही का येणार? ” सौम्या ने विचारलं. “शेफाली ला शपथेवर सांगावे लागेल की ती फोन वर मरुद्गण शीच बोलत होती.कारण तिने त्याचा आवाज पहिल्यांदाच ऐकला होता ना? ”
“ तांत्रिक दृष्टया हो. व्यवहारात नाही .” म्हणाला “ मला एवढंच करावं लागेल की आधी हर्षद ला त्याचे सर्व म्हणणे सांगायला लावायचे, म्हणजे त्याने तिच्या घरावर नजर ठेवली होती, रात्री फोन आला वगैरे. नंतर शेफाली ला साक्षीला बोलावायकचे आणि ती विरोधी साक्षीदार आहे म्हणजे होस्टाईल विटनेस आहे असा कंगवा निर्माण करायचा.मी तिला विचारीन की मरुद्गण ने तुला ३ वाजता फोन केलं नव्हता का?, सरकारी वकील त्याला हरकत घेईल आणि म्हणेल की हा साक्षीदाराचा अंदाज आहे.मग में विचारीन की एका माणसाने तुला रात्री ३ वाजता फोन केला नव्हता का? आणि त्याने आपण मरुद्गण बोलतोय असे सांगितले नव्हते का? माझ्या या प्रश्नावर ते पुन्हा हरकत घेतील.कोर्ट कदाचित ते मान्य करेल पण तिने जर सांगितले ,ठाम पणाने की तो मरुद्गण च होता तर कोर्ट हरकत अमान्य करेल.मग मी एकदम हवालदिल झाल्याचा आव आणीन.एकदम तिला विचारीन,बाई, खून झाला त्या वेळी तुम्ही काय करत होतात?, म्हणजे जेव्हा खून होत होता त्यावेळी हातात फोन घेऊन तुम्ही दूर वरच्या एका माणसाशी बोलत होतात की नाही? या वर ती नाईलाजाने आणि अगदी अस्पष्ट आणि त्रोटक पणे हो असं म्हणेल.न्यायाधीशांना एवढे बास आहे.! ” मग मी तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यातून बाहेर जायला सांगेन.तिची उल तपासणी घेण्याचे धैर्य सरकारी वकीलांना होणार नाही. मग मी फोन कंपनी चे रेकोर्ड सादर करीन .” पाणिनी ने कोर्टात तो काय करणार याचा अंदाज सौम्या ला दिला.
“ या तडजोडी नुसार विहंग ला किती नुकसान होईल? ” –सौम्या
“ त्याने मला पंधरा लाख पर्यंत मुभा दिली आहे.”
“ तेवढया रकमे पर्यंत जावे लागेल तुम्हाला ? ” -सौम्या
“ वाटत नाही तसं पण ती फार लोभी आहे. मी तिला माझा प्रस्ताव लगेच सांगणार नाही जरा वेळ घालवून मगच सांगेन.” म्हणाला
“ तुम्ही तिच्याशी तिच्या वकिला मार्फत बोलणार? ”
“ अर्थात.” म्हणाला
“ पण ते अधिक खर्चिक होईल.”
“ होईल ना.”
“ पण मग थेट तिच्याशीच का नाही बोलणार? ” -सौम्या
“ ते नैतिक दृष्टया बरोबर नाही.”
“ का कोण जाणे पण स्वतःच्या उत्पन्नातली बऱ्यापैकी रक्कम आपल्या वकिलासाठी खर्च करावी अशी मनोवृत्ती असणारी ती बाई असेल असं मला वाटत नाही.” -सौम्या
पाणिनी काहीतरी बोलणार , तेवढ्यात फोन वाजला. सौम्या ने तो घेतला आणि थोडा वेळ ऐकल्यावर पाणिनी ला उद्देशून म्हणाली, “ बाहेर शेफाली खोपकर आल्ये.ती म्हणत्ये की तिने तिच्या वकीलांना काढून टाकलंय.त्यामुळे आता तिला कोणीही वकील नाहीये.”
पाणिनी ने एकदम शीळ वाजवली.
“ मग, काय करायचं आपण? ” सौम्या ने विचारलं
“ हुशार आहे ती बया. भेटू आपण , बोलव तिला आत.” म्हणाला
“ ती काय बोलेल ते सगळ मी लिहून घ्यायचं ना? ”
“ हो,हो. तू लायब्ररीत बस.मी इथला मायक्रोफोन चालू ठेवीन म्हणजे तुला तिथे बसून आमचं बोलणं ऐकता येईल.” पाणिनी म्हणाला. “ सौम्या, तू तिला बघितलं नाहीयेस ना आधी? ”
“ नाही.”
“ ती आत येईल तेव्हा तिला बघ.पण तिच्या नजरेला तू पडणार नाहीस याची काळजी घे.” म्हणाला
सौम्या आपली वही घेऊन बाहेर गेली. ती दार उघडत असतानाच पाणिनी म्हणाला.“ तिला सांग ,फक्त पाच मिनिटे वेळ दिलाय पटवर्धन नी तुम्हाला. ”
पाणिनी ने एक सिगारेट शिलगावली आणि मुद्दामच काही कागद पत्र चाळत बसला.ती आत येईल तेव्हा तिच्याकडे लक्ष द्यावे लागू नये म्हणून.
ती आत आली.पाणिनी चे लक्ष नाहीसे बघून खाकरली.पाणिनी ने मान वर न करता केवळ डोळे वर करून तिला खुणेनेच खुर्चीत बसायला सांगितलं आणि पुन्हा कागद पत्र वाचत बसला.
ती खुर्चीत न बसता त्याच्या टेबला जवळ गेली. “ तुम्ही कामात असाल तर मी त्रास नाही देणार तुम्हाला.”
“ नाही,ठीक आहे. एक मिनिट मला जरा त्रास नका देऊ..मी बोलतो तुमच्याशी.” म्हणाला
ती उठून याच्या अधिक जवळ गेली. “ मी मित्रत्वाच्या नात्याने आल्ये इथे.” तिचा आवाज हळुवार आणि पुरुषांना उत्तेजित करणारा होता.
“ सोफ्यावर बसा.” पाणिनी ने निक्षून सांगितलं.आणि परत तो वाचनात गढला.
नाईलाजाने ती बसली.पूर्ण मिनिट भर पाणिनी ने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.नंतर म्हणाला, “ बोला, आणि सगळ बोला, मी मधेच प्रश्न विचारून तुम्हाला बोलते करायची वाट पाहू नका. ”
“ मी माझ्या वकीलांना काढून टाकलंय.” ती म्हणाली.
पाणिनी गप्प बसला.ती पण पुढे बोलायचे चिन्ह दिसेना.
“ त्यांचे फी चे पैसे दिलेत? ” म्हणाला.
“ त्याने काही फरक पडेल? ”
“ पडेल, त्याच्याकडे तुझे काही कागद,दस्त, असतील तर नक्कीच पडेल.” पाणिनी म्हणाला
“ आमच्यात व्यवस्थित समझोता झालाय.”शेफाली म्हणाली
“ मग काम काय आहे? ”
“ मला बोलायचं आहे तुमच्याशी ” शेफाली म्हणाली
“ ऐकतोय मी.”
“ तुमच्या चे कधी लक्षात आलंय का, की माझ्या हातात हुकमी पत्ते आहेत.”शेफाली म्हणाली
पाणिनी शांत होता
“ बोला ना ” शेफाली म्हणाली
“ बोलायला तुम्ही आला आहात आणि ते ही पाच मिनिटात.” पाणिनी म्हणाला
“ मी जर साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन असं सांगितलं की विहंग ने हातात अणुकुचीदार चाकू घेऊन मला ठार मारायचा प्रयत्न केला, विहंग म्हणेल की तो झोपेत असताना ही करिती त्याच्या हातून घडली असावी परंतू तो खोटं बोलतोय;तर काय होईल तुमच्या केस चं ?अर्थात मला तसं करायचं नाहीये,मला मदतच करायची आहे त्याला, पण तो जर भांडणार असेल तर मी ही भांडेन. ”
पाणिनी काही बोलत नाही चे पाहून ती पुढे म्हणाली. “ मी माझा विचार करत्ये ”
पाणिनी पुन्हा गप्प.
“ माझी काय स्थिती राहणार आहे यात? ” शेफाली म्हणाली.
पाणिनी ने खांदे उडवले
“ तुम्ही विहंग चे वकील आहात. सांगा ना.”शेफाली म्हणाली
पाणिनी तरीही बोलला नाही.
“ मला माहीत आहे विहंग चा स्वभाव. तो मोठा ताण सहन नाही करू शकत. तो लगेच तडजोड करायला तयार होईल.” शेफाली म्हणाली
आता ती मुद्द्यावर आली होती.
“ तुम्हाला रोख रक्कम हव्ये की उपन्नातला वाटा? ” पाणिनी ने तोंड उघडले.
“ दोन्ही नको. मला हवंय की विहंग ने पुन्हा मला पत्नी म्हणून स्वीकारावे.त्याच्या या अडचणीच्या काळात मी त्याच्या पाठीशी असावं, त्याने मला त्याच्या पत्नीचा मान पुन्हा द्यावा ”
“ अलंकारिक भाषण ! ” पाणिनी म्हणाला “ त्याने असं तुमच्या मनाप्रमाणे केलं म्हणजे काही दिवसा नंतर तुम्ही पुन्हा घटस्फोटासाठी परिस्थिती निर्माण करणार,त्याला अर्ज करायला लावणार आणि आणखी जास्त पोटगी घशात घालायला बघणार.”
“ मिस्टर पटवर्धन फारच कुचकट पणे बोलताय तुम्ही.तसा काही अधिकार नाहीये तुम्हाला.मला तसं काहीही करायचं नाहीये.त्याने माझी पत्नी म्हणून स्वीकार करावा हेच मला हवय.”
“ तो प्रेमात पडलाय, लग्न करणार आहे त्याच्या प्रेयसीशी, तुम्हाला वाटतंय की या अवस्थेत तुमची कटकट पुन्हा मागे लागू नये म्हणून तो त्याच्या स्वातंत्र्याची जास्त किंमत मोजायला तयार होईल ! ” पाणिनी म्हणाला
तिने पर्स मधून रुमाल काढून आपले कोरडे डोळे ,पुसले. हमसा हमाशी रडण्याचं नाटकं केलं.पाणिनी पटवर्धन वर त्याचा काहीही असर पडला नाही.
“ रोख किती रक्कम घेणार ? ” त्याने रुक्ष पणे विचारलं
“ नाही, नाही, रक्कम नको मला.” ती मुसमुसत म्हणाली.
“ दरमहा किती हवेत? ”
“ मला विहंग हवाय.” शेफाली म्हणाली “ मला साक्षीत सांगायचंय की तो मानसिक दृष्टया अस्थिर आहे. मला मदत करायची आहे त्याला.”
“ तुझ्या कडे अजून विहंग च्या घराच्या किल्ल्या आहेत? ” पाणिनी म्हणाला.
“ आहेत ना. अर्थात, वर्षं भरात त्या वापरण्याची वेळ आली नाही. पण का विचारताय तुम्ही तसं?”
“ खास कारण नाही.सहजच ”पाणिनी म्हणाला.
“ त्यामुळे काही फरक पडणार आहे? ” शेफाली म्हणाली.
“ फारसा नाही.” पाणिनी म्हणाला. “ मरुद्गण बद्दल तुझं काय मत आहे? ”
तिने आश्चर्याने आपल्या भुवया उंचावल्या. “मरुद्गण ? ..... मरुद्गण... माझ्या लक्षात येत नाहीये .कोण आहे हा? ”
“मरुद्गण कंपनी तुला माहीत असेल ना !” पाणिनी म्हणाला.
“ हो,हो. माझ्या वकिलाने माझ्या नवऱ्याच्या एका मालमत्तेचा शोध घेतला तेव्हा हे नाव ऐकले होते. मरुद्गण कडे लाखो रकमेचे एक पेटंट होते आणि ही माहिती विहंग ने मुद्दामच लपवली होती माझ्या पासून, कारण त्याला भासवायचे होते की तो फार श्रीमंत नाही.म्हणजे पोटगी जास्त द्यायला लागू नये म्हणून. ” शेफाली म्हणाली
“ पण वैयक्तिक तुझ्या मरुद्गण ओळखीचा नाही? ” पाणिनी म्हणाला..
“ अजिबात नाही.”
“ आणि दुर्वास? त्याचा वकील? ” पाणिनी म्हणाला..
तिने उत्तर काहीच दिले नाही पण तिच्या तोंडा वरील आश्चर्य तिला काय म्हणायचं होत ते दाखवत होत.
“ मला वाटलं की मरुद्गण शी तू फोन वर बोलली आहेस.”
“ का बरं? तुमची अशी समजूत का झाली ? ” शेफाली म्हणाली.
पाणिनी ने खांदे उडवले. “ दे सोडून.”
“ नाही नाही.मला माहिती व्हायलाच हवं.मला वाटतंय कोणीतरी माझ्या बाबत खोटं बोलतोय. त्यामुळेच विहंग ची माझ्या बद्दल गैरसमजूत झाल्ये.” शेफाली म्हणाली
लायब्ररीचं दार अचानक उघडलं गेलं.अंगात फर चा कोट आणि हातात मोजे घातलेली सौम्या सोहोनी उभी होती.तिने बिचकत एक पाऊल आत टाकलं. पाणिनी चं तिच्याकडे लक्ष जाताच तो तिच्या दिशेने ढांगा टाकत गेला. “ अरे, मिस सोहोनी ! तुम्ही आत कशा काय आलात ? मी कामात आहे.तुम्ही असं आत येणं अपेक्षित नव्हतं . मी तुमची अपॉईंटमेंट विसरलो नाहीये.”
सौम्या ने आत येऊन पाणिनी ला म्हंटले, “” माफ करा, मिस्टर पटवर्धन, मी मधेच घुसले म्हणून पण मला महित्ये,तुम्ही अपॉईंटमेंट बाबत किती कडक असता.तुमच्या रिसेप्शनिस्ट ने सांगितलं मला लायब्ररीत बसायला.पण मी तिच्यावर विश्वास नाही ठेवला, कारण मी बरोबर मला दिलेल्या वेळेच्या अंदाजानेच आले होते.मला दिलेल्या वेळेत मी दार उघडून आत आले.”
“ हो, मिस सोहोनी, पण अचानक नवीन नवीन विषय निघत गेले ... आणि...” पाणिनी शेफाली कडे बघत सौम्या ला म्हणाला. शेफाली उठून उभी राहिली.
“ मला माझ्या वेळे बद्दल जागरूक राहिलंच पाहिजे.तुम्ही फोनवर मला सांगितलं होतं की मला थांबावं लागणार नाही.”
“ मला, माफ करा मिस शेफाली, तुम्हाला मी म्हंटलं होतं ना, मी जास्तीत जास्त पाच मिनिटं देऊ शकतो तुम्हाला, त्याचं कारण याच बाई आहेत.”पाणिनी म्हणाला.
“ असू दे मिस्टर पटवर्धन. मी नंतर येईन.” शेफाली म्हणाली
पाणिनी ची नजर सौम्या ने वेधून घेतली. सौम्या शेफाली कडे वळून म्हणाली, “ माफ करा मला, पण मला घाई होती.”
“ माफी मागायची गरज नाही मिस सोहोनी.” शेफाली म्हणाली “ मला कल्पना आहे पटवर्धन किती कामात असतात ते.मला काय वाटत की माझी परिस्थिती त्यानी समजावून घ्यावी ... आणि.... ”
“ मी तुम्हाला पुन्हा कुठे भेटू शकतो? ”पाणिनी म्हणाला..
“हॉटेल लीला पेंटा ” शेफाली म्हणाली “ मी दोन तीन दिवस तिथे असणार आहे.”
“ अरे !! आश्चर्य आहे, योगायोगच आहे, मिस सोहोनी, तुम्ही त्याच हॉटेलात उतरलाय नाही का? ” पाणिनी म्हणाला..
“ हो, मी पण तिथेच उतरल्ये” सौम्या म्हणाली.
पाणिनी ने शेफाली ला बाहेर काढण्याच्या दृष्टीने दार उघडले. “ सॉरी, मिसेस खोपकर, त्या मिस सोहोनी ने असे दार उघडून एकदम आत यायला नको होतं. पण मीच त्यांना अपॉईंटमेंट दिली होती ना ! शेवटी असं आहे, त्या माझ्या अशील आहेत आणि एकदम श्रीमंत अशील ! ” पाणिनी म्हणाला.
“ ठीक आहे, पटवर्धन. मी समजू शकते .शेवटी आपण मित्र तर होवू शकतो ना.” शेफाली म्हणाली.
पाणिनी पटवर्धन ने तिच्या खांद्यावर थोपटल्या सारखं केलं.आणि दार लावून आत आला.
“ कसं झालं माझं काम? ” –सौम्या
“ माझ्या अपेक्षेपेक्षाही मस्त.” पाणिनी म्हणाला.
“ काय भानगड करायची होती तुम्हाला? ” –सौम्या
“ सौम्या, लीला पेंटा हॉटेल ला जा. शेफाली शी संबंध वाढव. पुन्हा पुन्हा तोच पाढा वाच की तू अचानक त्या खोलीत यायला नको होतंस, त्या बद्दल तुला दु:ख होतंय.”
“ सर असे संबंध वाढवले म्हणून ती माझ्याशी थोडीच मैत्री करणार आहे आणि ती तिच्या खाजगी गोष्टी आपल्याला सांगणार आहे, ज्या आपल्याला आपल्या केस मधे उपयोगी पडतील? ” -सौम्या
पाणिनी ने तोंडाने चक -चक केले.
“ या विहंग खोपकर ची केस घेण्य पूर्वी आपल्याकडे , मायरा देसाई नावाच्या मुलीची केस आली होती आठवतंय तुला? एका छान दिसणाऱ्या तरुणाने, तिच्याशी लग्न ठरवून पन्नास हजाराला तिला फसवले होते आणि लग्न न करता तो फरार झाला होता, प्रियदर्शन गोरक्ष असं त्या तरुणाच नाव होत. ? ” पाणिनी म्हणाला..
“ हो आठवलं. तुम्ही ती केस घेतली नव्हती,
पण त्या मायरा देसाई ने नंतर त्या तरुणाला शोधलं होत. ते एक रॅकेट असल्याचं लक्षात आलं होत. ” -सौम्या
“ मी केस घेतली नव्हती तरी त्या मुलीला सल्ला दिला होता की लगेच पोलिसांकडे न जाता नजिकच्या काळात प्रियदर्शन गोरक्ष पुन्हा एखादा मोठा मासा गळाला लावेल तेव्हाच त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन रंगे हात पकडून दे.” पाणिनी म्हणाला.
“ या सल्ल्याची फी तुम्ही घेतली नव्हती, त्यामुळे मायरा देसाई ला फार आनंद झाला होता पण अवघडल्या सारखं झालं होत. ” -सौम्या
“ सौम्या , तिचा नंबर मिळवून तिला विचार की ती आपल्याला मदत करेल का.”पाणिनी म्हणाला.
“ नक्की करेल, मी सांगते.” -सौम्या
“ तू एक गोष्ट जमवून आण सौम्या, मायरादेसाई ची भेट घेऊन तिला सांग की प्रियदर्शन गोरक्ष ने तिला जो गंडा घातलाय तो वसूल करायची आणि त्याला धडा शिकवायची वेळ आणि संधी आता तिला आल्ये. त्याच्याशी काहीतरी कारण काढून भेट ठरव . तू खूप श्रीमंत असल्या सारखे भासव.आणि त्याला नंतर लीला पेंटा वर बोलावून त्याची आणि शेफाली ची ओळख करून दे की ती एक अति श्रीमंत अशी विधवा आहे. शेफाली तर दिसायला छान आहेच पण हा गोरक्ष पण एखाद्या ग्रीक युवक सारखा देखणा आहे अस ऐकतोय.” सूचक पणे पाणिनी म्हणाला.
“ थोडक्यात त्या दोघांचं झेंगट जमेल अशी व्यवस्था आपण करायची म्हणजेच प्रियदर्शनला नवीन बकरा आपणच शोधून द्यायचा शेफाली च्या रुपाने.म्हणजे त्याच्याशी ती मन मोकळं करेल ,त्याच्या बदल्यात तो तिचे पैसे लुटेल, आणि त्याच वेळी मायरा देसाई पोलिसांना त्याची खबर देऊन रॅकेट उध्वस्त करेल. ” -सौम्या.
प्रकरण 14 समाप्त