Geet Ramayana Varil Vivechan - 56 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 56 - गा बाळांनो, श्रीरामायण

Featured Books
Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 56 - गा बाळांनो, श्रीरामायण

सीता देवी वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात एक कुटी बांधून राहू लागल्या. आश्रमातील इतर मुनिस्त्रियांप्रमाणे त्यांचे जीवन व्यतीत होत होते. धार्मिक वातावरणात सीतामाईंच्या कुशीतील गर्भ हळूहळू वाढत होता. आश्रमात आपोआपच उच्च प्रतीचे गर्भसंस्कार त्यावर होत होते. रोज पहाटे उठल्यावर आन्हिक आटोपल्यावर कुलदेवतेची आराधना करताना वेदघोष सीता देवींच्या कानी पडत असत. गोदुग्ध,कंदमुळे,फळं असा आहार करून त्या दिनचर्या पार पाडत असत. वाल्मिकी ऋषींच्या पत्नी व इतर मुनी कन्या ह्यांच्याशी त्यांचा वार्तालाप होत असे. सीता देवी राज्ञी असूनही स्वतःचे कामे स्वतःच करत असत.

इकडे अयोध्येत राज प्रासादात, सिंहासनावर बसून श्रीराम सुद्धा आपले राज धर्माचे कर्तव्य पार पाडत असत. व्यवहरिकदृष्ट्या जरी त्यांनी सीता देवींचा त्याग केला होता तरी मनातून स्मरणातून त्या एक क्षणही त्यांच्यापासून दूर नव्हत्या. जेव्हा जेव्हा त्यांना धार्मिक कार्ये करण्याचा प्रसंग येई तेव्हा तेव्हा ते आपल्या डाव्या बाजूला सीता देवींची सुवर्णाची मूर्ती ठेवून धार्मिक विधी करीत असत. मनातून दुःखी असूनही श्रीराम कर्तव्यकठोरपणे आपले आयुष्य व्यतीत करीत होते. राज्यकारभार व मातेची सेवा ह्यात ते आपला दैनंदिन वेळ सत्कारणी लावीत होते.


यथावकाश सीता माईंना दोन जुळे पुत्ररत्न प्राप्त होतात त्यांचे लव-कुश असे नामकरण केल्या जाते. वाल्मिकी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली ते वाढू लागतात. वेद अध्ययन, युद्ध कला, सगळ्या विद्या ते हळूहळू आत्मसात करतात. हळूहळू लव-कुश बारा वर्षांचे होतात.


वाल्मिकी ऋषींना प्रकर्षाने वाटू लागते की आता ह्या मुलांना ह्यांच्या पित्याची भेट घडवणं आवश्यक आहे. सीता देवींना सुद्धा ते ह्याची कल्पना देतात. एव्हाना त्यांनी ब्रम्हदेवाच्या आदेशाने रामायण लिहून पूर्ण केलं असते. तेच रामायण ते लव व कुश दोघांना गीतरुपात शिकवितात.


एके दिवशी वाल्मिकी ऋषी लव-कुश ला बोलावतात व म्हणतात,


"मुलांनो आता आपल्याला अयोध्या नगरीत जाऊन तुम्हाला हे गीत रामायण ऐकवायचे आहे. ठिकठिकाणी जाऊन,आश्रमात,ऋषी मुनींच्या निवासस्थानी जाऊन,राजांच्या निवासस्थानी जाऊन,गल्ली-बोळातून जाऊन,अयोध्येच्या प्रत्येक मार्गावर जाऊन हे रामायण तुम्हाला गायचे आहे.


रसाळ कंदमुळे आणि फळे खाऊन तुमचा आवाज मधुर झाला आहे. त्याच मधुर स्वराचा उपयोग करून लय तालाचे तारतम्य बाळगून तुम्हाला गायचे आहे.


नगरातून जेव्हा तुम्ही हे रामायण गात जाल तेव्हा नगरवासीयांना तुमचा स्वर ऐकू येईल ते तुमचं गायन ऐकून मंत्रमुग्ध होतील. हळूहळू तुमची चर्चा प्रजेकडून राजाकडे जाईल राजा उत्सुक होऊन तुम्हाला गायनाचे निमंत्रण देईल. राजप्रसादात गेल्यावर रोज थोडे थोडे प्रसंगांच्या क्रमाने रामायण सांगा. संपूर्ण चित्र श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उमटले पाहिजे असे भावपूर्ण गायन करा.


आपले नाव गाव सध्या सांगू नका. कोणी चौकशी केलीच तर वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहोत असे सांगा. स्वरात मधुरता ठेवा व योग्य तेवढेच संभाषण ठेवा. स्वतः राजा श्रीराम जेव्हा हे रामायण ऐकतील तेव्हा नीट अभिनय करून गायन करा. हे काव्य नसून अमृताचा साठा मी आज तुम्हाला दिला आहे तोच राजा श्रीराम पर्यंत तुम्हाला पोचवायचा आहे. तुमच्या तोंडून हे अमृतगीत ऐकून रघुपती श्रीराम तुमचा सत्कार करतील.


त्यांनी काही धन, सोने देऊ केले तर ते स्वीकारू नका कारण धनप्राप्ती हा आपला हेतू नव्हे. दक्षिणा दान सुद्धा घेऊ नका कारण मुनींना ह्या सगळ्या गोष्टींचा लालसा नसते. आपण हे सगळं श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यासाठी केलेलं आहे. बाकी आपल्याला काहीही नको.",एवढे बोलून वाल्मिकी ऋषी लव-कुश यांना काही मुनीकुमारांसोबत गीत गायन करण्यास अयोध्येला पाठवतात. तिथे वाल्मिकी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे ते ठीक ठिकाणी गायन करतात. अयोध्येतील नगरवासीयांना त्यांचे गायन आवडते व लवकरच त्यांची वार्ता श्रीरामांपर्यंत जाते. ते त्यांना एक दिवस गायन करण्यासाठी राज्यसभेत आमंत्रित करतात. त्याचबरोबर श्रीरामांनी राजसूय यज्ञ सुद्धा आरंभला असतो त्यात अनेक राजे ऋषी मुनी ह्यांना आमंत्रित केले असते. त्यात वाल्मिकी ऋषींनाही आमंत्रण असल्याने ते सुद्धा तिथे येतात. सुग्रीव विभीषण,जनक राजा आदी सगळ्यांना आमंत्रित केले असते.


श्रीरामांच्या समोर लवकुश अत्यंत भावपूर्ण स्वरात रामायण गाऊ लागतात. एकेक अध्याय गात असता सगळ्यांच्या डोळ्यासमोर प्रत्येक प्रसंगाचे चित्र उभे राहते. तिथे उपस्थित असलेल्या तिन्ही माता, जनक राजा,भरत-मांडवी, लक्ष्मण-उर्मिला,शत्रुघ्न-श्रुतकीर्ती,हनुमान,सुग्रीव,विभीषण सगळ्यांच्या नयनातून अश्रू वाहू लागतात. शेवटचा अध्याय संपल्यावर श्रीराम व सगळ्यांना कळून चुकते की लव-कुश हे रघुवंशीय असून श्रीरामाचे पुत्र आहेत. श्रीराम आपल्या सिंहसनावरून उठून त्यांना प्रेमाने आलिंगन देतात.


लव-कुश जवळ ते जानकी देवींची चौकशी करतात. वाल्मिकी ऋषी जानकी देवींना घेऊन सभेत येतात. श्रीराम व जानकी देवींना एकमेकांना बघून अत्यानंद होतो ते सद्गदित होतात. सभेतील सगळेजण भावनेने ओथंबून जातात. सीता देवींना पुन्हा श्रीरामांनी स्वीकारावं असं वाल्मिकी ऋषींना वाटते परंतु श्रीराम राजधर्माला अनुसरून अयोध्येच्या जनतेपुढे सीतेने आणखी एकदा शुद्धतेची परीक्षा द्यावी अशी इच्छा जाहीर करतात ते ऐकून सीता देवींचे मन उद्विग्न होते त्या म्हणतात,


"जर श्रीरामच माझ्या मनात असतील, जर श्रीराम सोडून अन्य कुठल्याही पुरुषाचा माझ्या शरीराला मनाला स्पर्श झाला नसेल तर याक्षणी ही धरणी दुभंगेल व मला आपल्या पोटात घेईल",असे सीता देवींनी म्हणताच धरणी दुभांगते व सीता देवींना धरणी देवी आपल्या सोबत घेऊन जाते. सगळेजण आश्चर्याने बघत रहातात. श्रीरामांना अत्यंत दुःख होते आणि धक्का बसतो. लव-कुश घाबरून श्रीरामांना घट्ट बिलगतात.


धरणीतून निर्माण झालेली क्षमाकन्या अखेर धरणीत सामावून जाते. लव-कुशांना आपल्या पित्यापर्यंत पोचवण्याचे कार्य करून सीता देवींचे अवतारकार्य संपते म्हणून त्या निघून जातात.

सगळ्यांना अतीव दुःख होते पण मनावर दगड ठेवून ते आपापले कर्तव्य करत जगत राहतात. लव-कुश हळूहळू मोठे होतात त्यांना राज्याचे दोन भाग वाटून दिल्या जातात. लक्ष्मण,भरत, शत्रुघ्न ह्यांच्या पुत्रांना सुद्धा वेगवेगळे राज्य देण्यात येते. सगळेजण अगदी आदर्शरित्या राज्यकारभार सांभाळतात. सगळयांचे यथावकाश विवाह होऊन सगळे सुखाने संसार आणि राज्य करतात. त्यांच्या राज्यात सगळी जनता सुखात नांदते.


एके दिवशी काळ श्रीरामांना भेटायला येतो व सांगतो की प्रभू आपले अवतारकार्य संपले असून आपण आता इथून निघायला पाहिजे. काळाचे व श्रीरामांचे संभाषण अत्यंत गोपनीय असते. त्यात कोणाचाही अडथळा येता कामा नये आणि आलाच तर त्या व्यक्तीला तुला संपवावे लागेल असे काळ श्रीरामांना सांगतो. त्यानुसार काळ आणि श्रीराम आतल्या दालनात असताना लक्ष्मण दारावर कोणी त्यांना व्यत्यय आणू नये म्हणून उभे असतात. पण काही वेळाने दुर्वास ऋषी येतात आणि ते आत जाण्याचा हट्ट करतात आणि काही ऐकतच नाही तेव्हा लक्ष्मणाला नाईलाजाने आत जावे लागते. ते पाहून श्रीराम नाराज होतात. नियमानुसार त्यांना लक्ष्मणाला संपवावे लागणार असते पण ते म्हणतात की आजपासून लक्ष्मणाचा मी त्याग करतो. एखाद्या व्यक्तीचा त्याग करणे म्हणजे त्याला संपविण्यासारखेच असते. असे म्हणून ते लक्ष्मणाचा त्याग करतात. लक्ष्मण श्रीरामांनी त्याग केल्याने आणि आपले अवतारकार्य संपल्यामुळे शरयू नदीत जलसमाधी घेतात. त्यामागोमाग काही काळाने सगळ्यांचा निरोप घेऊन श्रीराम सुद्धा शरयू नदीत जलसमाधी घेण्यास येतात तिथे अनेक आयोध्यावासी त्यांच्या भक्तीखातर त्यांच्यासोबत जलसमाधी घेतात. सुग्रीव सुद्धा श्रीरामांसोबत जलसमाधी घेतो. हनुमान आणि विभीषण हे चिरंजीवी असल्याने ते जलसमाधी घेऊ शकत नाहीत. अश्या तर्हेने ज्या ज्या लोकांचे अवतारकार्य संपते ते सगळे परलोकात निघून जातात. अश्या तर्हेने रामायण सुफळ संपूर्ण संपन्न होते.

जय श्रीराम🙏🚩 जय श्रीराम🙏🚩 जय श्रीराम🙏🚩


{रामायण असो वा महाभारत त्यातल्या चुका काढण्यापेक्षा त्यात जे जे चांगले आहे ते ते आपल्या सारख्या सामान्य माणसांनी घेतले पाहिजे.

रामायण हे सीतादेवींमुळे किंवा महाभारत हे द्रौपदी मुळे झाले नसून ते रावणाच्या आणि दुर्योधनाच्या अहंकारामुळे,सत्तालोभ आणि परस्त्री लालसा ह्यांच्यामुळे झालेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

रामायणातुन :- राम-लक्ष्मण,राम-भरत ह्यांचे बंधुप्रेम,

श्रीराम-हनुमान,श्रीराम-सुग्रीव,श्रीराम-शबरी,श्रीराम-विभीषण,श्रीराम-निषाद राज ह्यांचे भक्ती प्रेम,

श्रीराम-प्रजा ह्यांच्यातील नाते, राजाचे प्रजेविषयी असलेले प्रेम तसेच प्रजेची राजाविषयी असलेला विश्वास,

श्रीरामांचे मातृप्रेम,पितृप्रेम,

श्रीराम-सीता देवी ह्यांच्यातील एकनिष्ठ प्रेम,त्यागवृत्ती, कर्तव्यपरायणता

ऋषी-मुनींकडून निरलोभी, निःसंग , प्रामाणिक, श्रीरामांप्रति,भगवंतप्रति असलेली समर्पित वृत्ती,


ह्या सगळ्या गोष्टी सामान्य मानवांनी घेण्यासारख्या आहेत.}

★★★★★★★★★★★★★★★★समाप्त★★★★★★★★★★★★★★★★★

(महाकवी ग.दि.माडगूळकर ह्यांनी अत्यंत ओघवत्या प्रभावी शब्दात रामायणातील महत्वाच्या प्रसंगांचे वर्णन केले आहे त्यावर मी विवेचन करण्याचा प्रयत्न केला. काही प्रसंगांचा उल्लेख गीतात नव्हता पण एक कथास्वरूप रामायण पूर्ण करण्यासाठी लहानपणापासून जे रामायण माझ्या कानावर पडले किंवा जे मी दूरचित्रवाणी वर बघितले ते बघून ऐकून त्या त्या प्रसंगाचे वर्णन मी माझ्या शब्दात केले आहे. त्यात काही सुटलं असेल किंवा त्रुटी पण राहिल्या असतील त्याबद्दल क्षमस्व. वाचकांना जर काही सूचना द्यायच्या असतील किंवा 'हे राहील आहे ','हा प्रसंग राहिला आहे ' किंवा 'कथेत हा प्रसंग असा पाहिजे होता','ह्याचा क्रम असा पाहिजे होता' तर जाणकार वाचक ते नक्कीच देऊ शकतात. वाचकांनी हे पौराणिक, धार्मिक साहित्य वाचलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार🙏.

काही वाचकांनी अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत आवर्जून वाचले आणि अभिप्राय सुद्धा दिला त्यांचे विशेष शतशः आभार🙏🙏🙏


महाकवी ग.दि.माडगूळकर ह्यांच्यामुळे अत्यंत सुरस गीतरामायण आपल्याला वाचायला मिळतेय आणि प्रतिभावंत गायक व संगीतकार सुधीर फडके ह्यांच्यामुळे ते आपल्याला ऐकायला मिळतेय त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार🙏🙏🙏)


[चौदा वर्षे श्रीरामांनी केलेल्या प्रवासाची माहिती आपण खालील लिंक वर वाचू शकता:-

https://www.inmarathi.com/56446/during-vanvaas-lord-shreeram-lived-these-places/


तसेच गायक व संगीतकार सुधीर फडके ह्यांच्या स्वरातील गीतरामायण आपण खालील लिंकवर ऐकू शकाल:-

गीत रामायण Vol 1:-https://youtu.be/eJpwek5u6g0


गीत रामायण Vol 2:-https://youtu.be/II2uE3hng3k


गीत रामायण Vol 3:-https://youtu.be/xRUiZT2yMQM


गीत रामायण Vol 4:-https://youtu.be/Ddq6w3wLBa8


गीत रामायण Vol 5:-https://youtu.be/gFW5qZF3Gi4


गीत रामायण Vol 6:-https://youtu.be/l6sTbplV-dc


गीत रामायण Vol 7:-https://youtu.be/X6YJ-DYYhlk


गीत रामायण Vol 8:-https://youtu.be/2LZdJjLqo5g


गीत रामायण Vol 9:-https://youtu.be/bwDf-H-E8eo


गीत रामायण Vol 10:-https://youtu.be/IYjHx-irvGo

]


महाकवी ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे छपन्नावे गीत:-


रघुराजाच्या नगरीं जाउन

गा बाळांनो, श्रीरामायण


मुनिजन-पूनित सदनांमधुनी

नराधिपांच्या निवासस्थानी

उपमार्गांतुन, राजपथांतुनि

मुक्त दरवळो, तुमचें गायन


रसाळ मूलें, फलें सेवुनी

रसाळता घ्या स्वरांत भरुनी

अचुक घेत जा स्वरां मिळवुनी

लय-तालांचें पाळा बंधन


नगरिं लाभतां लोकमान्यता

जाइल वार्ता श्रीरघुनाथां

उत्सुक हो‍उन श्रवणाकरितां

करवितील ते तुम्हां निमंत्रण


सर्गक्रम घ्या पुरता ध्यानीं

भाव उमटुं द्या स्पष्ट गायनीं

थोडें थोडें गात प्रतिदिनीं

पूर्ण कथेचें साधा चित्रण


नका सांगुं रे नाम ग्राम वा

स्वतःस माझे शिष्यच म्हणवा

स्वरांत ठेवा हास्य गोडवा

योग्य तेवढें बोला भाषण


स्वयें ऐकतां नृप शत्रुंजय

संयत असुं द्या मुद्रा अभिनय

काव्य नव्हे, हा अमृतसंचय

आदरील त्या रघुकुलभूषण


नच स्वीकारा धना कांचना

नको दान रे, नको दक्षिणा

काय धनाचें मूल्य मुनिजनां?

अवघ्या आशा श्रीरामार्पण

★★★★★★★★★★★★★समाप्त★★★★★★★★★★★★★

(ही कथामालिका इथेच संपते आहे. धन्यवाद🙏)