सीता देवीचे डोहाळे ऐकून लवकरच आपण ते पूर्ण करू असे श्रीराम वचन देतात.
आपला दैनंदिन राज्यकारभार पाहत असताना श्रीरामांनी अयोध्येत आपले हेर पेरून ठेवले होते जेणेकरून प्रजेच्या मनातील विचार आणि हाल हवाल कळावे म्हणून. एके दिवशी श्रीरामांचा हेर भद्र श्रीरामांना भेटून प्रजेचा वृत्तांत सांगतो.
"बोल भद्रा! आपल्या राज्यातील प्रजा सुखात आहे न? काही अडचण तर नाहीये न त्यांना?",श्रीराम
"नाही राजन! सगळी प्रजा सुखात आहे कुठेही काही दैन्य नाही, सगळीकडे समृद्धी, समाधान नांदत आहे. परंतु....",असे म्हणून भद्र खाली मान घालून गप्प बसतो.
"परंतु काय भद्रा? निःशंकपणे सांग!",श्रीराम त्याला आश्वस्त करतात.
"प्रभू सांगायलाही संकोच वाटतो पण काही ठिकाणी माणसांच्या घोळक्यात मी काही अप्रिय विषय बोलताना ऐकले!",भद्र
"काय झालं ते सगळं स्पष्ट सांग!",श्रीराम
"प्रभू! काही जण बोलत असताना मी ऐकलं की त्यापैकी काही जण आपण सेतू बांधला रावण वध केला त्याबद्दल आपले कौतुक करून आपले आभार मानत होते तर काही जण सीता देवींबद्दल....",भद्र
"जानकी देवींबद्दल काय बोलत होते ते? बोल भद्रा! बोल असा शांत राहू नको. तुझी शांतता मला असह्य होते आहे.",श्रीराम
"ते म्हणत होते की जानकी देवि एवढा काळ लंकेत राहिल्या तरीही श्रीरामांनी त्यांना कसे काय स्वीकारले?
त्यांनीच असं जर केलं तर सामान्य प्रजा त्यांचाच आदर्श ठेवून वागेल आणि बायका कशाही वागतील त्यांना काही धरबंद राहणारच नाही.",भद्राचे हे बोलणे ऐकून श्रीराम दिगमूढ झाले. त्यांनी ठरवलं की आज रात्रीच आपण वेष पालट करून प्रजेमध्ये मिसळायच आणि त्यांनी अगदी गुपितपणे त्या रात्री वेष पालट केला आणि ते एका वृक्षाआड राहून काही लोकांचे बोलणे ऐकु लागले.
"काय झालं रे तू तुझ्या बायकोला घराबाहेर का काढलं?",एक इसम
"बाहेर काढू नको तर काय? अरे काल दिवसा माझी बायको सरपण आणायला गेली आणि रात्रभर ती घरी आलीच नाही. खूप पाऊस होता म्हणून येता आलं नाही म्हणे. काहीही सांगते. काय खरं आणि काय खोटं! आपल्याला नको अशी चारित्र्यहीन बायको. मी काही श्रीरामांसारखा उदार नाही की आसक्त नाही.",दुसरा इसम(तो रजक म्हणजे धोबी असावा असं प्रचलित आहे.)
त्या रजकाचे बोलणे ऐकून श्रीरामांना खूप धक्का बसला. ते प्रासादात येऊन त्यांच्या दालनात विचार करू लागले.
' राजा बद्दल ह्यांचं असं जर मत असेल तर मला माझ्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल. सीता शुद्ध आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे ते मला माहिती आहे पण ह्या अज्ञानी प्रजेला समजावून कसे सांगणार? ते शक्य नाही. माझ्या नावाचा आधार घेऊन हे वाटेल तसे वागतील त्यामुळे मला कर्तव्य कठोर व्हावं लागेल. राजा आधी प्रजेचा विचार करतो मग स्वसुखाचा. माझा जन्म फक्त सत्त्वपरीक्षा देण्यासाठीच झाला आहे की काय? राज्य त्याग करून सीतेसह वनात जावं तर माझ्या राजकर्तव्याला मी पाठ फिरवल्यासारखे होईल. असे वागणे राजधर्माला अनुसरून नाही. जनतेच्या विचारांची पर्वा न करता सीतेसह राजप्रसादात राहावं तर जनता वाईट अर्थ काढतेय. आज काही जण बोलतात उद्या सगळेजण बोलतील. काय करावं? ',असा विचार करता करता श्रीराम एका निर्णयाला येतात.' तसंही सीतेला वनात जाण्याचे डोहाळे लागले आहेत तर आता तिला वनात पाठवणे योग्य ठरेल म्हणजे आपोआपच तिचा त्याग केल्या सारखाच होईल आणि प्रजेमध्ये जी उलटसुलट चर्चा सुरू आहे ती सुद्धा बंद होईल. ', असा विचार करून श्रीराम दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मणाला सीता देवींना वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सोडायला सांगतात. त्या निर्णयामागचे कारणही सांगतात. ते ऐकून लक्ष्मणाला धक्का बसतो पण श्रीराम त्यांना गुप्तता बाळगण्यास सांगतात तसेच ही राज आज्ञा असून तुला ती मोडता येणार नाही किंवा त्यास विरोध करता येणार नाही असे सांगतात. सीता देवींनाही डोहाळे पूर्ण करण्यासाठी आपल्याला वनात जायचे आहे असे वाटते आणि त्या आनंदित होतात. सगळ्यांचा निरोप घेऊन त्या रथात स्थानापन्न झाल्या. वाटेत लक्ष्मणाची चर्या पाहून सीता देवींना जरा अस्वस्थ वाटते. त्या लक्ष्मणास खरे कारण विचारतात तेव्हा त्यांच्या अतिआग्रहामुळे लक्ष्मण त्यांना सत्यपरिस्थिती कथन करतात. ते ऐकून सीता देवींच्या मनावर वज्राघात होतो. त्या अतीव दुःखाने आणि निराशेने म्हणतात,
"लक्ष्मणा श्रीरामांनीच माझा त्याग केला तर मी जाणार कुठे? त्यांच्या चरणांचे दर्शन,त्यांचा सहवास मला आता कधीही लाभणार नाही. करुणा मूर्ती असलेले श्रीराम आज कठोर झाले आहेत. जणू सूर्याला अंधाराने गिळले आहे. अग्नीवर पाणी पडताच अग्नी विझतो पण आज अग्नीने पाण्याला जिंकले आहे. जे शाश्वत चिरंतर राहणार आहे तेच अस्थिर झाले आहे.
आता असे वाटते की माझ्या माता पित्याने मला व्यर्थ जन्म दिला. आज न मी कुणाची कन्या आहे न कुणाची भार्या! आज कुठलेच नाते मला उरले नाही. तपस्या करून सिद्धी प्राप्त होते पण आज सिद्धीलाच तपस्येचा कंटाळा आला असे चित्र उभे राहिले आहे.
एवढी मी अग्निपरीक्षा दिली. स्वतः अग्नीने माझ्या पावित्र्याची ग्वाही दिली तो अग्नी सुद्धा आज खोटा ठरवला गेला आहे जणू देवानेच त्याच्या निस्सीम भक्ताला नास्तिक ठरवावं. पतिव्रता असून आज मी परित्यक्ता झाली आहे. हे पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकते आहे.
माझा प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडण्यासाठी धडपडतोय. विनाकारण माझे प्राण ह्या शरीराचा भार वाहत आहेत. माझे जगणे व्यर्थ आहे. सीता म्हणून मी आज मृत झाली आहे. आता फक्त मी माता आहे. माझ्या गर्भातल्या अंशासाठी मला जगावेच लागणार आहे. वनात राहून श्रीरामांचा अंश मी लहानाचा मोठा करेन त्यांना सगळे संस्कार देईल. ह्या आयुष्यातुन तर मी उठलेली आहे पण श्रीराम सुखाने राहोत असे मी अभिष्टचिंतन करते.
लक्ष्मणा! जा माझा हा निरोप आयोध्यानरेषांना सांग! आजपासून ते माझ्यासाठी माझे पती नसून अयोध्येचे राजा आहेत. इथूनच मी सगळ्या मातांना,श्रीरामांना वंदन करते. तू सुद्धा सहकुटुंब सुखी राहा असा मी तुला आशीर्वाद देते. आता यापुढे आणखी बोलणे मला शक्य नाही. श्रीराम श्रीराम श्रीराम.. वाल्मिकी ऋषींचा आश्रम निकट आला आहे तेव्हा इथेच मी तुझा निरोप घेते",असे म्हणून सीता देवी लक्ष्मणाचा निरोप घेऊन जड अंतकरणाने आश्रमाकडे प्रस्थान करतात. लक्ष्मण सुद्धा रुद्ध कंठाने साश्रु नयनांनी परतीची वाट धरतात.
{ह्या प्रसंगातून सीता देवींचा साध्वी पणा व पातिव्रत्य दिसते. पतीने त्याग केला तरीही मन संतुलित ठेवून त्यांनी आपल्या मुलांसाठी आयुष्य व्यतीत केलं आणि अखंडपणे त्या पतीचे नामस्मरण करत राहिल्या.}
(पुढचा भाग उद्या तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩 जय सीता देवी🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे पंचावन्न वे गीत:-
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें?
कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे
व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे
अग्नी ठरला असत्यवक्ता
नास्तिक ठरवी देवच भक्ता
पतिव्रता मी तरि परित्यक्ता
पदतळीं धरेसी कंप सुटे
प्राण तनुंतून उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती?
बाहतसे मज श्रीभागीरथी
अडखळें अंतिचा विपळ कुठें?
सरले जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हें, सुमन मिटें
वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे
जाइ देवरा, नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हा ही जीभ थटे
इथुन वंदिते मी मातांना
प्रणाम पोंचवि रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे
श्रीराम.. श्रीराम.. श्रीराम..
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★