लंकेतून विभीषणाने दिलेल्या पुष्पक विमानातून श्रीराम,सीता देवी,लक्ष्मण,सुग्रीव व हनुमान अयोद्धेकडे निघाले. निघताना त्यांनी विभीषणाला नवीन राज्यपदासाठी शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण वानर सेनेचे आभार मानून त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. अयोद्धेकडे जाताना प्रवासात त्यांना भारद्वाज ऋषींचा आश्रम लागला तिथे ते थांबले व त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे निघाले त्यांना सुद्धा त्यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले. पुढे आयोद्धेतून वनवासास जाताना जे जे लोकं त्यांना भेटले होते त्या सर्वांना त्यांनी परतीच्या प्रवासात अभिवादन केले. आणि अखेर ते अयोध्येत येऊन पोचले. ते येणार ह्याची वार्ता हनुमानाने जाऊन आधीच भरत यांना सांगितली होती त्यामुळे भरत आणि शत्रुघ्न ह्यांनी मिळून संपूर्ण राजप्रासाद तसेच संपूर्ण अयोध्या सुशोभित केली होती. देवी कौसल्या श्रीराम जानकी व लक्ष्मण यांना औक्षण करण्यास द्वारात उभ्या होत्या. संपूर्ण प्रजेला अत्यानंद झाला होता. सगळेजण श्रीरामांचे गुणगान गात होते. जणू अयोध्या नागरी श्रीरामांना म्हणत होती,
"त्रिवार वंदन रामा तुला त्रिवार वंदन. आज तुझ्यारूपी पुष्पक विमानातून स्वर्गसौख्य अवतरलं आहे. चौदा वर्षे निष्प्रभ असलेली अयोध्या आज एका नववधुप्रमाणे नटली आहे. हे श्रीरामा! आज अयोध्या तुला दीर्घायु,सौख्य,कीर्ती,समाधान,शांती मिळो असा आशीर्वाद देतेय. अहल्या चा जसा तुझ्या चरणस्पर्शाने उद्धार झाला तसाच आज अयोध्येला तुझे पाय लागले आणि अयोध्येचा उद्धार झाला. आज तुझ्या आगमनाने पृथ्वी वायू आनंदाने पुलकित झाले आहेत.
ज्याप्रमाणे स्वयंवरात शिवधनुष्य भंगला त्याप्रमाणे रामाचा व अयोध्येचा विरह भंगला आहे,संपुष्टात आला आहे. आजचा दिवस स्वयंवराप्रमाणे सुशोभित झाला आहे. आज नवोढे समान सुशोभित अयोध्या आनंदाश्रूने तुला दृढ प्रेमाचा हार अर्पण करते आहे.(म्हणजे अयोध्येतील प्रजा अत्यंत प्रेमभराने रामांचे स्वागत करते आहे.)"
पुढे भरत श्रीरामांना आलिंगन देत म्हणतात,
"रामा! तुझ्या भेटीने मधली चौदा वर्षे गळून पडली आहेत. तुझं सिंहासन तुझी वाट पहाते आहे. आजपर्यंत एक सेवक म्हणून मी इथली व्यवस्था बघितली परंतु आता अयोध्येला खरा राजा मिळणार आहे. तुझ्या मस्तकावर सात नद्यांचे जलसिंचन ऋषी मुनींकरवी तुझा राज्याभिषेक करून वडिलांची इच्छा पूर्ण होऊ दे. सीता देवींसह राज्यपदी बसलेला तू कौसल्या मातेला पाहू दे. प्रजेने जे स्वप्न पाहिले होते ते साकार होण्याची वेळ आता अत्यंत निकट आली आहे."
अयोध्येत सगळेजण उत्साहाने भारलेले होते. कौसल्या मातेने औक्षण केलं होतं. श्रीराम,सीता व लक्ष्मण ह्या त्रयींनी कौसल्या माता व सगळ्या ज्येष्ठ मंडळींना वंदन केले.
सगळे प्रजाजन चारही रघुवंशी भावांचे गुणगान गाऊ लागले. राम राज्य आल्यावर चंद्र आणि स्त्रियांचे काजळांनी सुशोभित डोळे सोडले तर कलंकाला यत्किंचितही जागा राहणार नाही ह्याची सर्व प्रजेला खात्री वाटू लागली.
एकदा रामराज्य आलं एकदा राम सिंहासनावर विराजमान झाले की पाऊस वेळेवर पडेल सगळा निसर्ग सगळे मानव आपापले कर्तव्य नीट करत राहतील आणि अयोध्येत नंदनवन फुलेल ह्याची अयोध्येला खात्री झाली होती.
अश्या तर्हेने एका सुमुहूर्तावर सगळ्या ऋषी मुनी संपूर्ण प्रजा,वानरसेना, सुग्रीव,हनुमान विभीषण,जनक राजा ह्यांच्या उपस्थितीत श्रीरामांना राज्याभिषेक झाला व श्रीराम सीता देवींसह सगळ्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून सिंहासनावर विराजमान झाले. सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले.
(पुढील भाग उद्या तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩 जय जानकी देवी🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे बावनांवें गीत:-
त्रिवार जयजयकार, रामा, त्रिवार जयजयकार
पुष्पक यानांतुनी उतरलें स्वर्गसौख्य साकार
तुला चिंतिते सुदीर्घ आयु
पुण्यसलिला सरिता सरयु
पुलकित पृथ्वी, पुलकित वायु
आज अहल्येपरी जाहला नगरीचा उद्धार
शिवचापासम विरह भंगला
स्वयंवरासम समय रंगला
अधीर अयोध्यापुरी मंगला
सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार
तव दृष्टीच्या पावन स्पर्शे
आज मांडिला उत्सव हर्षे
मनें विसरलीं चौदा वर्षे
सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार
तुझ्या मस्तकी जलें शिंपतां
सप्त नद्यांना मिळो तीर्थता
अभिषिक्ता तुज जाणिव देतां
मुनिवचनांचा पुन्हां होउं दे अर्थासह उच्चार
पितृकामना पुरी होउं दे
रामराज्य या पुरीं येउं दे
तें कौसल्या माय पाहुं दे
राज्ञीसह तूं परंपरेनें भोग तुझा अधिकार
प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं
मूर्त दिसे तें स्वप्न लोचनीं
राजा राघव, सीता राज्ञी
चतुर्वेदसे लोक पूजिती रघुकुलदीपक चार
रामराज्य या असतां भूवर
कलंक केवल चंद्रकलेवर
कज्जल-रेखित स्त्रीनयनांवर
विचारांतलें सत्य आणतिल अयोध्येंत आचार
समयिं वर्षतिल मेघ धरेवर
सत्यशालिनी धरा निरंतर
सेवारत जन, स्वधर्मतत्पर
"शांतिः शांतिः" मुनी वांच्छिती, ती घेवो आकार
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★