जांबुवंताने हनुमानाच्या शक्तीचे वर्णन केल्यावर हनुमानाचे बाहू स्फुरण पाऊ लागले. बघता बघता हनुमानाने विराट रूप धारण केले. आणि महेंद्र पर्वतावरून त्याने लंकेकडे उड्डाण केले.
तो महाकाय समुद्र ओलांडताना मध्येत एका मगरीच्या रूपातील राक्षसीने त्यांना अडविले. परंतु आपल्या बुद्धी चातुर्याने हनुमान तिथून सुटले आणि पुढचा प्रवास करू लागले. पाहता पाहता हनुमान लंकेच्या द्वारापर्यंत पोचले. तिथे सर्वत्र अक्राळ विक्राळ राक्षसांचा पहारा होता. कुठूनही जायला जागा नव्हती तेव्हा हनुमानाने सूक्ष्म रूप धारण करून राक्षसांची नजर चुकवून लंकेत प्रवेश केला.
संपूर्ण ती अजस्त्र लंका हनुमानाने नजरेखालून घातली. रावणाच्या अंतःपुरात पण जाऊन पाहिले पण सीता देवी कुठेच नव्हत्या. मग हनुमान अशोक वाटीकेत एका उंच वृक्षावर बसला. तेथून त्याला एका भागात एका वृक्षाखाली एक सुस्वरूप पण चिंतेने मलिन झालेली स्त्री दिसली. रामाने केलेल्या वर्णनाशी मिळती जुळती अशी स्त्री लंकेत प्रथमच हनुमानाला दिसली होती. ते पाहून हनुमानाने ओळखले की ह्याच श्रीरामांच्या स्वामिनी आहेत. आणि हनुमान सीता देवी ज्या वृक्षाखाली बसल्या होत्या त्या वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसतात. आणि मनाशीच विचार करतात,
जशी चंद्र नसताना रोहिणी(चंद्राची पत्नी) मलूल दिसते,जशी वाघाच्या तावडीतील हरिणी गलितगात्र झालेली असते,जशी काट्यात फसलेली पक्षिणी हतबल असते तशीच ही वृक्षाखालील स्त्री दिसतेय.
जशी अतिथंड प्रदेशातील नदी तिचा प्रवाह थांबवून गोठलेली असते,जशी शिशिर ऋतूत चंपक पुष्प लता गारठून गेली असते,तशीच ही स्त्री मलिन, हताश,उदास आणि अशक्त दिसतेय तरी सुद्धा जसा धुराने जरी वेढलेला असला तरी अग्नी तेजस्विच दिसतो तशी ह्याही अवस्थेत ही स्त्री सुंदर दिसतेय. (ह्या गीतातून हे स्पष्ट होते की सामान्यतः कोणतीही परिस्थिती असो स्त्रीचे फक्त सौदर्य च पाहिले जाते. आणि पुरुषाचा पराक्रम च पहिला जातो.) राक्षसिणीच्या ह्या कळपात ही एकच स्त्री सुंदर दिसतेय ह्याचाच अर्थ हीच श्रीरामांची राज्ञी देवी सीता आहे.
जवळून बघितल्यावर हनुमानाला जाणवते की ही स्त्री एखाद्या व्रतस्थ योगिनी प्रमाणे,साध्वी प्रमाणे भासते आहे. ह्या स्त्रीचे डोळे रडून रडून सुजलेले आहेत. गालावर अश्रू वाळलेले आहेत. चेहरा चिंताक्रांत दिसतोय जसे ह्या स्त्रीने अनेक रात्री रडून जागून काढल्या असा हिचा चेहरा ओढलेला दिसतोय. श्रीरामांच्या विरहात अशी अवस्था झालेल्या ह्या सीता देवी शिवाय दुसऱ्या कोणी असूच शकत नाही.
सतत पतीचे चिंतन करणारी ही स्वाभिमानी स्त्री चिखलात मालिन झालेल्या पद्मजे समान (लक्ष्मीसारखी) दिसतेय. ही नक्कीच भूमीकन्या सीता देवीचं आहे. किती हा दैवदुर्विलास आहे. किती बिकट ह्या स्त्रीची अवस्था आहे. सुवर्णासमान कांती असलेली ही स्त्री काळजीने काळवंडलेली आहे. निराश अवस्थेत ही चंद्रमुखी जगाचं भान हरवून बसली आहे.
रामांनी जे प्रवाळ(पोवळ्याची) मुद्रिका,बाजूबंद कुंडले आभूषणे दाखवून वर्णन केले होते ती हीच स्त्री आहे. हीच जनक राजाची कन्या सीता आहे. हीच रामांची प्रिया सीता आहे. अशी अखेर हनुमानाला खात्री पटते. आता लवकरच श्रीराम व सीता एकमेकांना भेटणार ह्याचा हनुमानास आनंद होतो.
( ह्यात सीतेच्या दीन अवस्थेचे वर्णन करताना व त्याही परिस्थितीत ती अलौकिक स्त्री असल्याने किती सुंदर दिसत होती हे स्पष्ट करण्यासाठी ग.दि.माडगूळकरांनी हनुमानाच्या मुखी हे सगळे शब्द योजलेले आहेत.)
[रावणाने पळवून नेताना सीता देवींनी रामांना आपण कुठे जातोय हे कळण्यासाठी आपले काही दागिने खाली टाकले होते ते ऋषयामुख पर्वतावर काही वानरांना सापडले ते बघून रामांना सीता मिळेल अशी आशा वाटू लागली त्यांनी आनंदाने ते लक्ष्मणाला दाखवत म्हंटले होते,"पहा लक्ष्मणा हे तिचे पैंजण, हे तिचेच बाजूबंद, रत्नाहार, कुंडले,आहेत बघ !", त्यावर लक्ष्मणांनी श्रीरामांना म्हंटले ," श्रीरामा! ह्यात जोडवे असतील तर मी ओळखू शकेन कारण देवी सीता व आपणाला मी जेव्हा वंदन करीत असे तेव्हा मी सीता देवीचे जोडवे पाहिले आहेत पण बाकीच्या अलंकारविषयी मी काही सांगू शकणार नाही.]
{वरील घटनेतून आपल्याला काय बोध मिळतो की लक्ष्मण हा किती उच्च दर्जाचा पुरुष होता ज्याने नमस्कार करताना दिसतात म्हणून सीता देवीचे म्हणजेच त्यांच्या वाहिनीचे फक्त पाय बघितले. कधीही नजर वर करून सीता देवींना बघितलं नाही. असे उच्च विचारांचे पुरुष त्याकाळी होते. आताच्या भाभीजी घर पे है ह्या विचारसरणीच्या लोकांच्या बुद्धीची पोहोच तेथपर्यंत जाणारही नाही.}
(पुढे रामायणात काय होईल ते पाहू उद्याच्या भागात तोपर्यंत जय श्रीराम🙏🚩)
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील हे आडोतीसावे गीत:-
हीच ती रामांची स्वामिनी
चंद्रविरहिणी जणू रोहिणी
व्याघ्रीमाजी चुकली हरिणी
श्येन-कोटरी फसे पक्षिणी
हिमप्रदेशी थिजे वाहिनी
मलिन, कृशांगी तरी सुरेखा
धूमांकित की अग्नीशलाका
शिशिरी तरि ही चंपकशाखा
व्रतधारिणि ही दिसे योगिनी
रुदने नयना येइ अंधता
उरे कपोली आर्द्र शुष्कता
अनिद्रिता ही चिंताक्रान्ता
मग्न सारखी पती-चिंतनीं
पंकमलिन ही दिसे पद्मजा
खचित असावी सती भूमिजा
किती दारुणा स्थिती दैवजा!अपमानित ही वनी मानिनी
असुन सुवर्णा, श्यामल, मलिना
अधोमुखी ही शशांक-वदना
ग्रहण-कालिची का दिग्ललना
हताश बसली दिशा विसरुनी
संदिग्धार्था जणू स्मृती ही
अन्यायार्जित संपत्ती ही
अमूर्त कोणी चित्रकृती ही
पराजिता वा कीर्ती विपिनी
रामवर्णिता आकृति, मुद्रा
बाहुभूषणे, प्रवाल-मुद्रा
निःसंशय ही तीच सु-भद्रा
हीच जानकी जनकनंदिनी
असेच कुंडल, वलये असली
ऋष्यमुकावर होती पडली
रघुरायानी ती ओळखिली
अमृत-घटी ये यशोदायिनी
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★