Shallow water is very noisy in Marathi Motivational Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | उथळ पाण्याला खळखळाट फार

Featured Books
  • پناہ

    تباہ حال شہروں میں گھر تلاش کرنے کی بجائے۔ لوگوں کے چہروں کا...

  • سرد موسم

    خوشگوار نشہ آور موسم دل کو مائل کر رہا ہے۔ رنگ برنگے پھولوں...

  • ذہن کی گوگل کتاب

    ایمان کے ساتھ زندگی گزارنا آسان ہو جاتا ہے۔ غم کے دنوں میں ہ...

  • زندہ لاش

    زندہ لاش کی لمبی عمر کی دعا نہ کریں۔ تمہیں پوری سزا مل چکی ہ...

  • ساجن کا خط

    محبت بھرا خط لکھنے میں وقت لگتا ہے۔ کچی کلیوں کو کھلنے میں و...

Categories
Share

उथळ पाण्याला खळखळाट फार

एका जंगलात एकमेकांजवळ दोन वृक्ष वाढलेले होते. एक झाड होतं उंचच उंच खजुराचे तर दुसरे झाड होते घेरदार,डेरेदार बेल फळाचे. त्याच जंगला जवळ एक गाव वसलेलं होतं. त्याचे नाव होते सज्जनपूर. सज्जन पूर मध्ये दोन पंडित राहत असत. एकाचे नाव होते कृष्णकांत तर दुसऱ्याचे नाव होते रमाकांत.



कृष्णकांत रोड उंच आणि शिडशिडीत देहाचा होता तर रमाकांत हा जरा स्थूल देहाचा होता.


रमाकांत च्या हाताखाली चार आणि कृष्णकांत च्या हाताखाली चार असे एकूण आठ शिष्य त्यांच्या आश्रमात शिकायचे. रमाकांत ची गालातल्या गालात हसण्याची लकब होती तर कृष्णकांत ची नाकात बोलायची लकब होती. रमाकांत पन्नास वर्षांचा होता तर कृष्णकांत साठीचा होता.



रमाकांत अत्यंत संयमी,नम्र आणि ज्ञानी होता तर कृष्णकांत अत्यंत अहंकारी आणि तिरसट बोलणारा होता. स्थूल असूनही रमाकांत आरोग्यवान होता. रात्री अंथरुणावर पाठ टेकली की त्याला क्षणात झोप यायची याउलट रोड असूनही कृष्णकांत च्या काही ना काही आरोग्याच्या तक्रारी चालायच्या. त्याला रात्री मुळीच झोप लागायची नाही. उद्या कोणाला कसं तिरकस बोलायचं कोणाला कसे टोमणे मारायचे ह्या विचारातच त्याची रात्र सरायची. त्याचं पोट साफ व्हायचं नाही, सतत त्याला अपचन झालं असायचं. त्याचा चेहरा सतत त्रासिक दिसायचा आणि त्याच्या चेहऱ्यावर सतत बारा वाजलेले असायचे. हे जग सगळं मूर्ख आणि आपणच एक शहाणे, आपल्याला किती ह्या लोकांना सहन करावे लागते, आपल्यावरच ज्याला त्याला अक्कल शिकवायची जबाबदारी आहे असे त्याला वाटायचे.



कृष्णकांत ला वाटायचं की त्याच्या एवढा प्रकांड पंडित ह्या उभ्या पंचक्रोशीत शोधून सापडणार नाही. सगळ्यांना तो तुच्छ लेखायचा. अनेकदा तो रमाकांत चा सुध्धा अपमान करायचा. रमाकांत मात्र शांतच राहायचा. अश्या ह्या कृष्णकांत च्या हाताखाली काम करणारे जे चार शिष्य होते पुष्कराज,गौतम, कौशल आणि श्रवण ते त्याचे खुशमस्करे होते. ते शिष्य कृष्णकांत समोर त्याची तोंड फाटेस्तोअर प्रशंसा करायचे आणि एकांतात त्याला मनसोक्त दूषणे द्यायचे. त्यातला पुष्कराज कृष्णकांत समोर असा लाळ घोटे पणा करायचा की काही विचारू नका. त्यामुळे कृष्णकांत चा तो आवडता शिष्य बनला होता.



ह्याउलट रमाकांत चे जे चार शिष्य होते ते म्हणजे कपिल, मानसेन, रूखमांगद आणि तानसेन ते अत्यंत शांत, साधे, सरळ, निष्कपट आणि सदैव आपले आचार्य रमाकांत ची आज्ञा पाळणारे होते. त्यांना रमाकांत ची मखलाशी करण्याची कधीच गरज भासत नसे. आणि आचार्य रमाकांत ना सुध्धा कोणी त्यांची मखलाशी केलेली आवडत नसे.


कृष्णकांत नेहमी त्याची मखलाशी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोड बोलायचा आणि मखलाशी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना धारेवर धरायचा.


अश्या ह्या सज्जनपुरात एकदा सगळ्या पंडितांच्या ज्ञानाची स्पर्धा घेण्याचे ठरले. लांब लांबून लोकं आले. नागपूर चे आचार्य नारायण, कानपूर चे आचार्य काशिनाथ, मानपूर चे आचार्य माधव, तानपूर चे आचार्य तानदेव सगळ्या पंचक्रोशीतील आचार्य सभेत जमले. काही ज्येष्ठ आचार्यांना पंच म्हणून नेमलं होतं. सगळ्या आचाऱ्यांसमवेत कृष्णकांत आणि रमाकांत सुध्धा स्पर्धेत सहभागी झाले. कृष्णकांत ला वाटले हे पंच काय माझी परीक्षा करणार? मी स्वयंपूर्ण स्वयंभू ज्ञानी प्रकांड पंडित असे वाटून त्याने एकदा सर्वत्र तुच्छतेने पाहिले.

पंचांनी संस्कृतमध्ये एक कूट प्रश्न विचारला( वाचकांना समजावा म्हणून तो मी इथे मराठीत देतेय)


असे काय आहे की जे अत्यंत धारदार आहे?


प्रत्येकाने काही ना काही उत्तर दिले. पंचांनी ते ऐकून घेतले. पण त्यांचे समाधान झाले नाही.


त्यानंतर कृष्णकांत ला विचारले.

कृष्णकांत ने उत्तर देण्याआधी स्वतः तो किती मोठा,हुशार,कष्ट करून सगळं मिळवणारा आहे हे पाल्हाळ लावले. पंचांना जांभया येऊ लागल्या. त्यानंतर तोंड वेडंवाकडं करून मारे हातवारे करून त्याने अखेर उत्तर दिलं :- तलवार आणि मोठ्या दिमाखाने सगळीकडे पाहिलं


त्यानंतर रमाकांत चा नंबर आला त्याने अत्यंत नम्रतेने उत्तर दिले


"जीभ, जीभ ही अत्यंत धारदार गोष्ट आहे ज्याने अनेकांचे मन चिरण्याची ताकद आहे. जीभ कधी कुजके कधी तिखट बोलून मनाला घायाळ करते."


पंच खूप खुश झाले आणि त्यांनी रमाकांत ला जागेवर स्थानापन्न व्हायला सांगितले.


त्यानंतर पंचांनी दुसरा प्रश्न विचारला,

" माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोणता? "


सगळ्यांनी उत्तर दिले पण पंचांचे समाधान झाले नाही त्यानंतर कृष्णकांत ला विचारले.


त्याने अर्थातच नमनाला घडाभर तेल ओतलं( म्हणजेच लयच लांबन लावलं कि राव )


मग सांगितलं की ज्या शत्रू जवळ जास्त शक्ती तो सगळ्यात मोठा शत्रू. आणि तो स्थानापन्न झाला.


त्यानंतर रमाकांत ने उत्तर दिले, "अहंकार! अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे जो त्याचा विनाश करतो."


पंच समाधानाने हसले. त्यांनी तिसरा आणि अखेरचा प्रश्न विचारला,

" जगात असं काय आहे जे कधीच संपत नाही? "


अर्थातच नागपूर कानपुर माणपूर आणि ताणपूर मधील आचार्यांनी त्यांच्या माहितीनुसार उत्तर दिलं पण त्याने पंचांचे समाधान झाले नाही.


कृष्णकांत ने उत्तर दिले, "प्रकाश "


पंच म्हणाले, "परंतु रात्री प्रकाश संपतो"


"मग हवा, हवा कधीच संपत नाही ", कृष्णकांत सगळीकडे विजयाने पाहतो


"मग जिथे पोकळी असते ती जागा संपूर्ण निर्वात असते तिथे कुठे हवा असते?", पंचांनी विचारले


त्यावर शांत बसेल तो कृष्णकांत कसला? त्याने पंचांसोबत वाद घातला पण परिणाम काही झाला नाही ती गोष्ट वेगळी. त्याला हार मानून शांत बसावं लागलं.


त्यानंतर रमाकांत ने उत्तर दिलं, " हाव किंवा लालसा! जी कधीच संपत नाही. कितीही मिळालं तरी हाव काही संपत नाही."


हे उत्तर ऐकून पंच उभे राहिले आणि टाळ्या वाजून त्यांनी रमाकांत ला शाबासकी दिली. आणि त्याला विजेता घोषित केले. ते बघून कृष्णकांतचा तीळपापड झाला. त्याने पुन्हा पंचांशी वाद घातला. त्यावर पंचांनी सुंदर उत्तर दिलं


" कृष्णकांत ते तिकडे बघ तुला दोन वृक्ष दिसतील एक आहे खजूरचे तर दुसरे आहे बेल फळाचे. बेलफळ अत्यंत उपयुक्त. बेलाचे झाड बघ ते सहज माणसाला फळ देतात पण खजूरचे झाड बघ उंचच उंच आहे त्यामुळे त्याचा पटकन माणसाला उपयोग होतं नाही. बेलाचे झाड उन्हाने त्रासलेल्या माणसाला सावली देते पण खजूराचे झाड देऊ शकत नाही.

कृष्णकांत तू त्या खजूरच्या झाडासारखा आहे आणि रमाकांत त्या बेलाच्या झाडासारखा.


तू ज्ञानी आहे पण अत्यंत अल्प पण तू दाखवतो खूप. हयाउलट रमाकांत अत्यंत ज्ञानी असून नम्रतेने त्या बेल वृक्षासारखा वाकलेला असतो. तुला एकच सांगावं वाटतेय की


बडा हुआ तो क्या हुआ जैसा पेड खजूर

पंथी को छाया नही फल लागे अतिदूर


किंवा मराठीत म्हण आहेच


उथळ पाण्याला खळखळाट फार


नदीच्या खोल पात्रातील पाण्याचा आवाज येत नाही पण उथळ पात्रातील पाण्याचा फार आवाज येतो. डब्यात भरपूर लाडू असतील तर डबा वाजवला की आवाज येत नाही परंतु डब्यात एखादाच लाडू असेल तर खूप आवाज येतो. म्हणजेच ज्ञानी माणूस कमी बोलतो तर अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला माणूस वाचाळ असतो."


हे सगळं ऐकल्यावर कृष्णकांत चा चेहरा छायाचित्र (फोटो) काढण्यासारखा झाला नसता तर नवल.

************समाप्त************