युवराज आदित्य व पांढरा पक्षी
पहाट कधीच उलटून गेली होती. चांदीच्या रत्नजडीत पलंगावर राजकुमार आदित्य निवांत झोपले होते. बाजूलाच एक दासी मोरपंखांच्या पंख्याने वारा घालत मंचकावर बसली होती. मध्येच राजकुमार झोपेतच हसले. दासीलाही हसू आल. कदाचित राजकुमार एखाद गोड स्वप्न बघत असावेत.
" अग, रोहिणी अजून आदित्याला उठवलं नाहिस? "
महाराणी निलवंती घाईघाईत आत येत म्हणाल्या.
" राणी साहेब, राजकुमार गोड स्वप्नात गुंग आहेत. त्यांना कस उठवायच?" रोहिणी हसत म्हणाली.
" गोड स्वप्न म्हणे..! अग आज राजकुमारांचा पंधरावा वाढदिवस आहे.काही वेळातच आचार्य धर्मानंद येतील... ओवाळून ...कुंकुम तिलक लावायचा आहे.....बाळ आदित्य.. आदित्य उठा..."
आदित्य धडपडून जागा झाला.आळस देत त्याने विचारले...
" काय झाल..आईसाहेब...?"
"आज तुझा वाढदिवस आहे ना?"
" खरच की...!"
राजकुमार आदित्य पळतच स्नानगृहात गेले .झटपट तयारी करून ते आपल्या महालात परतले . ते पूर्वेकडच्या सज्जात उभे राहिले. समोर मुख्य रस्त्यावरून लोकांची वर्दळ सुरू झाली होती सोनेरी कोवळे ऊन झाडांवर पडले होते. पक्षी किलबिल करत उडत होते. बाजाराच सामान घेवून बैलगाड्या चालल्या होत्या. बैलांच्या गळ्यातले घुंगर लयबद्ध ध्वनी निर्माण करत होते. यापूर्वी हे दृश्य राजकुमाराने पाहिले नव्हते. त्याला वाटले बाहेरचे जग किती सुंदर आहे. बाहेर एकट्याने मुक्तपणे फिरायला किती मजा येईल? पण हे शक्य नव्हते. तो राजउद्यानात गेला तरी सोबत शिपाई असत.
एवड्यात एक पांढराशुभ्र पक्षी उडत आला आणि सज्ज्याच्या कोरीव लाकडी चौकटीवर बसला. त्याच शरीर छोट होत पण त्याची शेपटी त्याच्या शरीराच्या पाचपट मोठी होती.त्याच्या डोक्यावर काळा तुरा होता.त्यानं एक छान गिरकी घेतली.
" राजपुत्रा, तुला बाहेरच जग बघायच ना?" पक्ष्याने विचारल.
" होय. पण खरच तस होईल?"
" होईल, पण त्यासाठी ही वस्त्र...हे उंची अलंकार उतरून ठेवावे लागतील." पक्षी म्हणाला.
" पण शिपायांच काय?" राजकुमाराने विचारल.
" ते माझ्यावर सोपव.. तू सायंकाळी उद्यानात ये."
आदित्य खुष झाला.सायंकाळी त्याने उद्यानात जाण्याची परवानगी आईकडून घेतली.
सायंकाळी आदित्य उद्यानात गेला. सोबत शिपाई होतेच. उद्यानात तो एका आम्रवृक्षाखाली बसला.उद्यानाच्या चारही दिशांच्या प्रवेशद्वारापाशी शिपाई उभे राहिले. आदित्य उत्सुकतेने पक्ष्याची वाट बघत होता.एवड्यात त्याच्या खांद्यावर हलकेच कुणीतरी स्पर्श केला.तो शुभ्र पक्षी अलगद त्याच्या खंद्यावर बसला होता.त्या पक्ष्याने मधुर स्वरात गायला सुरूवात केली.सारे शिपाई तिथे जमा झाले....डोलू लागले. मधुर आवाजाने झोपी गेले.
" राजपुत्रा चल हिच वेळ आहे. आपल्याला निघाचय..अंगावरचे कपडे बदल...चल" पक्षी म्हणाला.
आदित्याने आपल्या अंगावरचे अलंकार उतरवले.साधे कपडे परिधान केले .डोक्याला मुंडासे बांधले. तो गुपचूप बाहेर पडला. सायंकाळचे सोनेरी किरण आसमंत उजळून टाकत होती. नदीवरील गार वारा मन प्रसन्न करत होता.पक्षी किलबिलत घरट्याकडे परतत होते. शेतकरी आपल्या गाई-बैलांना हाकत घरी येत होते. शेतात मुले खेळत होती.कुणी पतंग उडवत होता...काही जण विटी-दांडू खेळत होते. शेतकरी धान्याला वारा देत होते.आदित्य भान हरपून सार बघत होता. चालत -चालत तो बराच दूरवर आला.आता झाडांचे शेंडे सोनेरी रंगाने चमकत होते. आकाश नारिंगी रंगाने सजले होते.
" राजपुत्रा काही वेळातच अंधार होईल..आपल्याला आसरा शोधला पाहिजे. " पक्ष्याने सुचविले.
"होय, आपण बराच वेळ चाललोय.." आदित्य म्हणाला.
डोंगरालगतच शेतात एक झोपडी त्यांना दिसली. आदित्य झोपडीत गेला. स्वच्छ सारवलेली जमीन होती. खुंटीवर एक कांबळे होते.बघता बघता काळोख झाला. वर चमचम करणार्या चांदण्या.....दूरवर शेतकर्यांच्या झोपडीत टिमटिमणारे दिवे...वेळूच्या बनातून शिळ घालत येणारा वारा...झाडांवर चमकणारे किडे...हे अस वातावरण आदित्याने केव्हाच बघितल नव्हते. तो बराच वेळ हे दृश्य बघत बसला.पण पोटात कावळे ओरडू लागले. समोरच्या शेतात..पेरू व द्राक्षे त्याने बघितली होती.आता चंद्र उगवला होता.तो फळ काढण्यासाठी शेतात जावू लागला.
" थांब राजपुत्रा! शेतकर्यांच्या परवानगीशिवाय किंवा त्याला मोबदला दिल्याशिवाय फळ काढणं योग्य नाही"
पक्ष्याने त्याला सावध केल.
" पण मी तर राजपुत्र आहे..मी सर्व राज्याचा मालक आहे."
" होय, तू भावी राजा आहेस...म्हणूनच तूलाच प्रथम नियम पाळले पाहिजेत." पक्षी समजावत म्हणाला.
आदित्य मागे वळला तो घोंगडी पांघरून झोपण्याचा प्रयत्न करू लागला. राजवाड्यात मऊ मुलायम गादीवर झोपण्याची सवय...आणि पोटातले ओरडणारे कावळे यामुळे सुरूवातीला त्याला झोप येईना.रात्री उशिराने त्याला झोप आली.सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटान त्याला जाग आली. बाहेर पूर्व दिशा तांबूस रंगाने सजली होती.
"चल तू तोंड धुऊन घे. पलिकडे एक झरा आहे.आपण पुढे जाऊया." पक्षी म्हणाला.
आदित्याने आपली तयारी केली.दोघेही पूढे निघाले.आदित्याला खूप भूक लागली होती.भूक म्हणजे काय ते त्याला पहिल्यांदा कळल.त्याचे पाय थरथरत होते.
एवड्यात रस्त्याच्या बाजूने वाहणार्या नदीवर काहीजण बांध घालत होते.आदित्य त्या शेतकर्यांजवळ गेला.
" मला..मला खूप भूक लागलीय काही खायला द्याल का?"
" इथे फुकट काहिच मिळत नाही....काम करशील?"
आदित्याने मान हलवली.
" तूला जमतील असे दगड या बांधांवर टाक." त्यातला एक प्रौढ गावकरी म्हणाला. आदित्य दगड टाकू लागला.त्याच अंग घामाने भिजले. राज्याचा भावी राजा स्वतः कामगार बनला होता.
" अरे...कोवळं लेकरू आहे..त्यात भूकेलेल...ये बाळ मी देते तूला कांदा-भाकर." एक म्हातारी सर्वांवर वैतागली.
म्हातारीने त्याला जोंधळ्याची भाकरी व कांदा दिला.नेहमी साजूक तूपातल जेवणार्या आदित्याला ती भाकर खाऊ की नको असा प्रश्न पडला.पण भूकमुळे त्याने घास तोंडात घातला. त्याला तो घास खूपच गोड लागला.त्याने ती सगळी भाकरी खाल्ली.त्या प्रौढ माणसाने त्याला मजुरी म्हणून एक तांब्याच नाण दिल.आपल्या घामेजलेल्या मुठीत त्याने ते नाणे घट्ट पकडले. नाण्याचा उबदार स्पर्श त्याला सुखावू लागला.झाडावरून हे सगळं बघणारा पांढरा पक्षी हसला व उडून त्याच्या खांद्यावर बसला.
" चल , आपल्याला पुढे जायचंय.. " तो पक्षी म्हणाला.
दोघ पुढे निघाले.वाटेत हिरवी शेत..झुळझुळणारे झरे..विविध वेष परिधान केलेले नागरीक ये-जा करत होते. कुठे देवळात पूजा-अर्चना सुरू होती.दुपारच्या वेळी ते ऐका निर्जन पायवाटेने चालले होते.अचानक चार चोरांनी आदित्याला घेरले. त्यांच्या हाती लाठ्या व धारदार सुरे होते.आदित्याने मूठीतल नाण घट्ट पकडले.
" काय आहे मुठीत? दे इकडे..." त्यातला एक म्हणाला.
"नाही...नाही हे नाण मी देणार नाही. " आदित्य निर्धाराने म्हणाला.
" जीव घेईन पोरा तूझा!" चोरट्याने ते घामेजलेल नाणे हिसकावून घेतले.
" नको...मी कमावलेल पहिले नाण आहे ते...! त्या ऐवजी ..हे....हे घ्या." आदित्याने पैरणीच्या आत चुकून राहिलेला..रत्नजडीत हार काढला व त्यांना दिला. त्या चमकणार्या हारामुळे चोरांचे डोळे दिपले. जन्मातही कमवू शकणार नाही एवढे घन आपल्याला मिळालंय हे ओळखून त्यांनी तो हार घेऊन पळ काढला.
आदित्य नाण हातात धरून समाधानाने हसला.
सायंकाळी ते एका घनदाट जंगलात शिरले. अचानक झाडांवरून सरसरत कही तगडे इसम खाली उतरले.हातात नंग्या तलवारी घेतलेले ते क्रूर डाकू होते.त्यांचा सरदार डाकू जालिमसिंग हा नावाप्रमाणे जालीम होता.सार्या राज्यात त्याने धुमाकूळ घातला होता. त्याला पकडून देणार्यास किंवा ठार मारणार्यास मोठ बक्षिस जाहीर केल होत.
" पकडा याला. आयताच सापडलाय आपल्या देवीला बळी देवूया. देवी या जालिमसिंगला वरदान देईल." जालिमसिंग खदाखदा हसत म्हणाला.
चार डाकूंनी त्याला घेरले. तेवढ्यात पांढरा पक्षी आदित्याच्या जवळ आला व आपले एक लांब पिसं त्याच्या पायांजवळ टाकले. क्षणात त्या पिसाची एक लांब रूंद तलवार बनली.आदित्याने चपळाईने तलवार उचलली. शस्त्र कलेत तो तरबेज होता.झपकन त्याने तलवार फिरवली दोन डाकूंची मनगटे तुटून पडली. डाकू दचकून मागे सरकले. येवढ्यात मघा भेटलेले भुरटे चोर लाठ्या काठ्या घेवून आदित्याच्या मदतीला आले. त्यानीं व आदित्याने डाकूंवर प्रतिहल्ला चढवला. या धामधूमीत जालिमसिंग जखमी होवून जमिनीवर कोसळला.
उरलेले डाकू पळून गेले.
" तुम्ही इथे कसे आलात?" आदित्याने त्या भुरट्या चोरांना विचारले.
"खर म्हणजे आमची आम्हालाच लाज वाटली. स्वतः कमावलेल्या एका नाण्यासाठी तू जीवाची पर्वा केली नाहीस..त्याऐवजी आम्हाला हा अनमोल हार दिलास. हार परत देण्यासाठी आम्ही तूझ्या मागावर येत होतो. पण तूला संकटात पडलेलं बघून आम्ही तूझ्या मदतीसाठी धावले.
तेवढ्यात आदित्याला शोधण्यासाठी सैनिक घेवून बाहेर पडलेले सेनापती विक्रमसिंग तिथे आले.पळणार्या डाकूंना त्यांनी जेरबंद केल होत.जमिनीवर तडफडणार्या जालिमसिंगला पाहून ते आवाक झाले.
" युवराज हे..हे काय आहे?"
" सेनापती...या चौघांनी जालिमसिंगाला पकडण्यास मदत केलीय.ते बक्षिस यांना द्या आणि हे शूर आहेत यानां आपल्या सैन्यात भरती करा."
भुरटे चोर आदित्याकडे आश्चर्याने बघत राहिले.
तेवढ्यात तो पांढरा पक्षी आदित्याजवळ आला म्हणाला...
" आज तूला काही धडे मिळाले...त्याचा उपयोग पूढे जनतेच्या कल्याणासाठी कर. तूला अनुभव मिळावा म्हणून मी मुद्दाम तूला बाहेरच जग दाखवलं."
" होय. मी काहीच विसरणार नाही. प्रजेला सुखी ठेवण्यासाठी मी जीवापाड प्रयत्न करेन..पण..पण.मित्रा तू मला सोडून जावू नकोस."
" तू हाक मारल्यावर मी निश्चित येईन." अस म्हणत पांढरा पक्षी गिरकी घेत उडून गेला.
आदित्याने आपुलकीने हात हलवत पक्ष्याला निरोप दिला.
------*--------*---------*--------*---
समाप्त.
बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी.