You are Sarita. in Marathi Fiction Stories by Ketakee books and stories PDF | तू सरिता..

The Author
Featured Books
Categories
Share

तू सरिता..

#तू सरिता..

नुकताच पाऊस पडून गेला होता.. ओलसर मातीत असंख्य छोटी छोटी पाण्याची तळी साचली होती.. अंगणात असंख्य पानांनी जमीन आच्छादून टाकली होती.. ओलसर माती, झाडांची पानगळ, पक्ष्यांचा प्रसन्न किलबिलाट.. सगळेच कसे नाविन्य पांघरलेले..

शर्मिष्ठा म्हणजे अगदी पाऊस आणि समुद्रवेडी होती..

समुद्राच्या लाटांचा खळखळाट तासन् तास ऐकण्यात तिला विलक्षण आनंद वाटायचा. किनाऱ्यावर रेतीत अनवाणी पायाने बसून लाटांचा आवाज ऐकत, ओल्या रेतीवर मनसोक्त चित्र विचित्र आकृत्या काढत तासन् तास बसून राहायची. अनवाणी पायाला होणारा लाटांचा स्पर्श तिला एक अवर्णनीय अशी अनुभूती देऊन जात असे. रेतीवर कोरलेल्या आकृत्या अल्लड अवखळ समुद्राची लाट कधी बागडत बागडत तर कधी सर्रकन येऊन पुसून गेल्यावर नेहमी स्वच्छंदपणे वावरणारी शर्मिष्ठा भावविभोर होऊन जायची.. स्वतःशीच विचार करत बसायची.. आयुष्य, त्यातील प्रत्येक दिवस, दिवसांतील प्रत्येक क्षण देखील असाच क्षणभंगुर असतो नाही !!

पाऊसपण तितकाच लाडका.. आकाशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबाला, कौलारू घरावरून पडत असताना खिडकीतून स्पर्श करताना ते मोती तर नव्हेत असा विचार तिच्या डोक्यात नेहमी यायचा..

अनवाणी पायाने पावसात भिजताना पायाला ओलसर मातीचा आणि चेहऱ्याला जो आकाशगंगेचा स्पर्श व्हायचा तो आनंद शब्दांत पेरण्यासारखा नसतोच कधी..

हिरवीगार वसुंधरा, तिच्या प्रत्येक हरितपर्णावरील दवबिंदू म्हणजे जणू वसुंधरेने ल्यालेली हिरवीगार भरजरी साडी, पक्ष्यांचा मधुर गुंजारव, सप्तरंगी इंद्रधनुष्य, नानाविध रंगांची फुले आणि अंगणातील चिंब ओल्या मातीवर पडलेला पारिजातकाच्या फुलांचा सडा, जणू तारकाच रंगीबेरंगी पोशाख परिधान करून आपल्या भेटीला आल्याचा भास शर्मिष्ठाला होत असे.

ओसरीत आल्यावर तिला पाऊस पडत असल्याचे लक्षात आले. मग काय तिच्यातल्या लहान मुलाला पावसात भिजण्याची, त्याचा मनसोक्त आनंद घेण्याची आयती संधी चालून आली. तिच्याही नकळत ती, पावसात तिच्या आवडत्या गाण्यांना गुणगुणत मुक्त.. स्वैर संचार करत होती.

पाऊस आणि समुद्र म्हणजे जणू ती सरितेशी तासन् तास मनमुराद गप्पा मारत बसत असे. सरिता जी पाऊस आणि समुद्र या दोघांनाही आपलंस करून घेते.

महाविद्यालयीन सहलही असाच एक सुसंवाद, तिचा आणि सरितेचा..

 

मैत्री-कल्लोळ कट्टा नावाचा त्यांचा महाविद्यालयीन मैत्रिणींचा समूह होता. त्यांची आयोजित सहल आणि त्यांनी केलेला कल्ला, त्यांनी संपादित केलेल्या असंख्य आठवणी..

असंख्य खेळ, समुद्रमंथन, समुद्रात बेफिकीर होऊन विलीन होऊन जाण्याचा प्रयत्न, तेवढ्यात लाटेने धावत येऊन दिलेला पाठशिवणीच्या खेळातील धप्पा, सगळंच कसं ओलेचिंब करून जाणारे..

दिवसभर मजा मस्ती झाल्यानंतर शर्मिष्ठा एकटीच सूर्यास्ताच्या वेळी रत्नाकराशी, सभोवताली पसरलेल्या रंगछटांशी एकजीव होऊन क्षिताजाकडे एकटक बघत बसायची..

अशीच त्या दिवशीही ती निसर्गमग्न होऊन बसली होती..

ती, निसर्गाशी इतकी एकरूप झाली होती की तिला आजूबाजूच्या कशाचेही भान राहिले नव्हते.. तिला ऐकू येत होता तो फक्त खळाळणाऱ्या समुद्राचा आणि बागडणाऱ्या लाटांचा आवाज..

तिच्याही नकळत तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते..

कदाचित ती समुद्रात, आणि समुद्र तिच्याtत इतके विलीन झाले होते की तो तिच्या डोळ्यांवाटे पाझरत असावा..

तिच्या मैत्रिणींना तिच्या समुद्रप्रेमाची पूर्ण कल्पना होती.. त्यामुळे त्या कधीही तिचा आणि रत्नाकराचा एकांत भंग करायला जात नसत..

निघण्याची वेळ झाली असल्या कारणाने, नाईलाजाने तिच्या मैत्रिणीने तिला धक्का देऊन जागे केले. तिचे ओले डोळे पाहून तिच्या मैत्रिणीने काय झाले असे खुणेने विचारले.. पण तितक्यात रत्नाकराने येऊन त्या दोघींनाही कवेत घेतले. दोघीही ओल्याचिंब झाल्या आणि खळखळून हसू लागल्या..

काही भावना कदाचित शब्दांत व्यक्त होण्यापलिकडच्या असतात.. त्या फक्त अनुभवायच्या असतात.. म्हणूनच की काय जणू निसर्गाने आपसूकच तो संवाद शब्दांशिवाय पूर्ण केला..

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

त्या शिंपलकुपीतील साठवणीचे एव्हाना मोत्यात रूपांतर झाले होते.. हा पाऊस कदाचित त्या मोत्यांची उधळण करण्यासाठीच आला असावा..