हे अंगदाचे मर्मभेदक असे बोलणे ऐकून रावण स्वत: बोलला. तू राजवाड्याच्या दरवाजाच्या मार्गाने न येता दुसऱ्याच मार्गाने आलास यामुळे आम्ही मौन राहिलो होतो. असे चुकीच्या मार्गाने आलेल्याशि संभाषण करणे आम्हाला दुषणास्पद आहे. अंगदाला हे बोलणे ऐकून हसू आले व तो म्हणाला समोरच्या व्यक्तिचे अवगुण तुम्हाला दिसतात पण स्वत:चे अवगुण दिसत नाहीत. खरे तर चोरी करणे अधर्म आहे, त्यातून परदारा हरण हे तर मोठें पाप आहे. तू पापी आहेस. तुझी तिन्ही लोकांत दुष्किर्ती झाली आहे. अंगद रागावलेला पाहून रावण घाबरला. राक्षस म्हणू लागले की हे तर मोठे संकट आहे. पहिल्या ने होळी केली आणि हा तर त्याहूनही बलवान वाटतो. राक्षस चळचळा कांपू लागले. अंगद शेपटीचे उंच आसन करून त्यावर बसला. डोळे मिचकावत फळे खाऊ लागला.
यावर रावण म्हणाला, रामाचा धिक्कार असो. तुझ्या बलवानपणाचा धिक्कार असो. ज्याने पित्याचा वध केला आहे त्याचा दूत असे स्वतःला म्हणवतोस. ज्याने तुझ्या पित्याचा फसवून वध केला असा जो वाईट असा रघुनाथ त्याचा मी दूत आहे असे निर्लज्ज पणे म्हणत आहेस. अंगदा ! तुझ्या सारखा निर्लज्ज मला दुसरा कोणी दिसत नाही. तू खरेतर सागरात जीव दे, विहीरीत जीव दे किंवा पोटात सुरी मारून घे. तू मोठेपणा काय सांगतोस तू निंदनीय आहेस. मला असे वाटते की तू पितृकार्यासाठी आला आहेस. तू स्वतःला रामदूत म्हणवत असलास तरी मला तू शरण आला आहेस. राम लक्ष्मण व सुग्रीवाला मारून तुला किष्किंधा नगरीचे राज्य देईन. मी हे खरे बोलत आहे. विचार कर.
दशानन असे बोलल्यावर अंगद खोंचकपणे हसून काय उत्तर देत आहे ते लक्षपूर्वक ऐका. तू स्वयंवराच्या वेळी धनुष्याला बाण लावताना उलथून पडला होतास, तू कसला शूर . मी तुला कसा शरण येईन. तुझे बोलणे खुप ऐकले. तू दहा तोंडाचा किडा आहेस. बळी राजाने तुझ्याकडे पाहिलेही नाही. तू एखाद्या घुंगुरट्या सारखा आहेस. कोणतरी विचित्र प्राणी दिसतोय असे वाटून माझ्या पाळण्याला सोन्याच्या साखळीने तुला बांधले होते. माझ्या पायांचे ( मारलेले वळ ) तुझ्या मुखावर अजून दिसत आहेत. तू अतिशय हीनदीन आहेस. तू सिंहासनावर बसला आहेस पण तू रामाशी युद्ध करण्यास समर्थ नाहीस.
अंगदाचे वाग्बाण रावणाच्या ह्रदयात खोंचले गेले. तो म्हणाला हे वानरा सभेत बसून तू किती बडबड करीत आहेस. तुझ्या तोंडाला प्रतिबंध नाही. तू अजून या दशशिराला ओळखले नाहीस. माझा पराक्रम ऐक. मी सुर-गणांना बंदीवासात टाकले. माझ्याशी युद्ध करणारा हा बापुडा राम कोण ? इंद्र, चंद्र इत्यादि देवांना मी चाकर केले आहे. माझ्या भयाने ते थरथर कापतात. अहोरात्र माझ्याकडे राबत आहेत. राम तर मनुष्य आहे. आमचे एका घासाचे खाद्य आहे. वानर तर वनचर आहेत, ते तर संग्रामात मरतीलचं पण मुख्य भक्ष्य राम लक्ष्मण आहेत. माकडे म्हणजे कोशिंबीर आहेत. कुंभकर्ण एका घासात सर्वांचे भक्षण करील.
अंगद म्हणाला,
अरे दुर्बुंद्ध रावणा ! तू दुष्ट बुद्धिचा आहेस. श्री राम ज्ञानस्वरूप , चैतन्य स्वरूप आहेत. त्यांना तू मनुष्य म्हणत आहेस. श्रीरामांचा सेवक "हनुमंत" हा एकटाच असून त्याने तुझे वन जाळले होते. रामाला शरण गेलास तरचं तुझे प्राण वाचतील नाहीतर तुझे मरण निश्चित आहे. तू जर सीतेला श्रीरामाना परत दिले नाहीस तर तुला कोण वाचवणार ?. मीच तुझा प्राण घेईन. रावणा तुझी डोकी मी नखांनी कापीन. पण तू ती शिवाला (महादेव) वाहिलेली असल्याने मी ते पाप करू शकत नाही. अंगद रावणावर धावून आला. अंगदाची निष्ठूर वाक्ये ऐकून व अंगद रावणावर धावून गेल्याने रावण कासावीस झाला व रागाने प्रधानांना म्हणाला, या वानराला पकडा व मारा, सभेमध्ये कोणतीही भीड न धरता हा माझे तोंड काळे म्हणत आहे याचे तुकडे तुकडे करा.
रावणाचे बोलणे ऐकून रावणाचे सेनानी गर्जना करीत उठले व अंगदावर धावून गेले. तेव्हा अंगदाने त्यांना हातात, कमरेवर, शेपटी मधे धरले व तो सर्वांसह आकाशात उडाला. व अंतराळात गेल्यावर अंग झाडले तसे राक्षस जमीनीवर पडून त्यांची रांगोळी झाली. आपण रावणाला मारू नये म्हणून त्याने रावणाला पायाखाली दाबून त्याचा मुकुट काढून घेऊन वेगाने उड्डाण केले , त्याच्या डोक्यावर मंडप उचलला गेला हे त्याच्या लक्षात आले नाही. मंडप डोक्यावर बघून रघुनाथ रागावले ते म्हणाले हा अधर्म आहे. लंकेचे राज्य बिभिषणाला दिले असलेने मंडप आणणे बरोबर नव्हते. अंगद म्हणाला मी जोरात उड्डाण केल्याने मला कळले नाही व त्याने मंडप परत लंकेत नेऊन ठेवला. श्रीरामाने मुकुट घेऊन बिभिषणास बोलावून तो मुकुट त्यांच्या डोक्यावर ठेवला.
समाप्त.