मानवता जपुया
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०
मानवता जपुया म्हणत सगळी जनमाणसं कामाला लागतात.कार्य करतात.सुरुवातीला त्यांचं कार्य सामाजिक असतं.परोपकार असतो.पण जसजसे दिवस जातात.तसतसा त्यांच्यात बदल होतो.त्यांच्यात पुढे मानसिक विकृती निर्माण होत असते.स्वार्थी वासनांध नजर,ही त्यांच्यात शिरते.सामाजिकतेच्या पैलुला छेडले जाते.ह्या पैलुंना एका बाजुला ठेवुन निरपेक्ष निःस्वार्थ सामाजिकतेची जागा ही स्वार्थीपणाने घेते.मग याच सामाजिकतेतुन पुढे पैशाला महत्व येते.
पैसा जरी महत्वाचा नसला समाजसेवेपुढे.....तरी समाजसेवा विणा पैशाने होत नाही असं वदणारी मंडळी आजच्या काळात कमी नाही.खरं तर ज्या साधु संतांवर आपण विश्वास ठेवतो.तेच साधु आजच्या काळात कसे वागत होते.हे राम रहीम,आसाराम,राधे माँ इत्यादी सर्वांकडुन दिसुन येते.एवढेच नाही तर नर्मदा बचाव साठी आमरण उपोषण करणारा साधु मरण पावला.त्याला समाजसेवक म्हणता येईल.पण स्वस्वार्थासाठी व नावासाठी काळ्या धनाविरोधात उपोषण करणारा रामदेव बाबा मात्र भीत भीत स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळाला.ह्याला समाजसेवा करणे म्हणता येईल काय?जो खरा समाजसेवक असेल,त्याला मृत्युचे भय नसते.तो दिवसरात्र समाजसेवेचाच विचार करत असतो.समाजसेवेसाठी माणुसकी जपत असतो.पण जो व्यक्ती खरा समाजसेवी नसतो.त्याला मृत्युची भयता वाटते.काल काळ्या धनाविरोधात बोलणारा रामदेव आज मात्र मौनव्रत धारण करुन आहे.काळे धन कुठे गेले?
काल संसारावर ब्रम्हचर्यावर प्रवचन देणारे साधु आज जेलमध्ये आहेत.कारण त्यांनी ब्रम्हचर्यावर प्रवचन तर दिलं,पण स्वतः ब्रब्रम्हचर्याचं पालन केलं नाही.
समाजसेवा करणारी व मानवतेचा मंत्र जपु म्हणणारी मंडळी आधीही होती.संत रविदास,चोखामेळा ज्ञानेश्वर,एकनाथ नामदेव,तुकाराम अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला.रुढी परंपरेला छेद दिला.पण असे जरी असले तरी त्यांच्या बोलण्याने अंधश्रद्धा दूर झाल्या नाहीत.कारण त्यांना राजाश्रय प्राप्त नव्हता.त्यामुळे त्यांनी जे खरं सांगितलं,त्याला विरोध करुन लोकांनी समाजात अराजकता पसरवली.लोकांचे डोळे उघडु दिले नाही.नव्हे तर या वाईट प्रथेतुन जो असुरी आनंद प्राप्त होत होता.तोच आनंद टिकविण्यासाठी या मार्तडांनी हवं तर त्या परोपकारी संतांचा खुन केला.लहाणपणीच संत ज्ञानेश्वरांना समाधीसाठी मजबुर केलं गेलं.तुकारामाचाही........पण मृत्युसय्येवर जातांना ही संत मंडळी कचरली नाही.त्यांना संत म्हणता येईल.नाहीतर आज संतगिरीच्या नावावर दुकानं मांडल्याचं निदर्शनास येतं.त्या संतांनी समाजातील प्रथा नष्ट करतांना प्राणांची आहुती दिली.पण प्रथा नष्ट झाल्या नाहीत.त्या इंग्रजांनी नष्ट केल्या.अतिशय काळीज फाडुन टाकणा-या प्रथा होत्या त्या.
कोणकोणत्या प्रथा होत्या?*इंग्रजांना वाईट का म्हणून बोलावे ?
अर्धवट इतिहास माहिती असणारे लोक इंग्रजांना खूप वाईट म्हणतात व त्यांना अतिशय घाणेरडे शिव्या शाप देतात. परंतु आपल्या समाजात जन्मलेले 'महान क्रांतिकारक महात्मा फुले' यांनी सांगितले होते की, ओबीसी(शुद्र) व अतिशूद्र लोकांसाठी इंग्रज भगवान बनून आलेले आहेत... ते जो पर्यंत आपल्या देशात आहेत तोपर्यंत आपण सुरक्षीत आहोत, तेव्हा जास्त प्रमाणात शिक्षण घ्या.याचा अर्थ असा की एस सी,एस टी,ओबीसी यांचे खरे दुश्मन इंग्रज नाहीत तर मनुवादी आहेत. ज्यांनी ह्या लोकांना हजारो वर्ष सत्ता, संपती, सन्मान यापासून दूर ठेवून शोषण केले आहे. अतिशुद्राना यांच्या धार्मिक गुलामी पासून मुक्ती पाहिजे असेल तर वर्ण वादाने थोपविलेल्या अनिष्ठ रूढी, परंपरा याची चिकित्सा करून त्या नाकारणे योग्य ठरेल. असे सांगीतले.
इंग्रजांनी किती कर्मकांड व पाखंड यावर बंदी घालण्यात कसे यश मिळवले. प्रथा-परंपरा ह्या कशाप्रकारे माणसाला जनावरा प्रमाणे वागणूक देत होत्या..त्यांचे प्राण घेत होत्या. हे इंग्रजांना मानवतेच्या दृष्टीने योग्य वाटत नव्हते...!कारण कोणालाही त्या प्रथा योग्य वाटणार नाहीत.
१)रथयात्रा : जगन्नाथ पुरी मध्ये तीन वर्षातून एकदा हि रथयात्रा काढली जाते, स्वर्ग पाहण्याच्या नादात किती लोक त्या रथाच्या चाकाखाली येवून मरत होते, हे कायदा बनवून बंद केले .
२) काशीकर बट :काशी धाम मध्ये ईश्वर प्राप्ति करण्यासाठी विश्वेश्वर मंदिर जवळ तलावात उडी मारून लोक मरण पत्करत होते, हे बंद कण्यात आले .
३) चरक पूजा :काली मातेचे मोक्षाभिलाषी उपासक पाटीच्या कण्यात लोखंडाचा हुक अडकवून व वरती लटकवून चर्खी मध्ये जोरजोरात फिरवले जात होते जोपर्यंत त्याचे प्राण जात नव्हते हे पाखंड १८६३ ला कायदा बनवून बंद केले.
४) गंगा प्रवाह :जास्त वेळ होऊनही मुल होत नाही म्हणून गंगा नदीला नवस बोलणे व पहिले झालेले निष्पाप मुल त्या गंगा नदीत सोडून देणे, किती निर्दयी व कठोर काम हे १८३५ मध्ये कायदा बनवून बंद केले.
५) नरमेध यज्ञ :ऋग्वेदाचा आधार घेवून अनाथ किंवा निर्दयी मुलांना यज्ञ मध्ये बळी द्यायची भयानक व अघोरी प्रथा १८४५ मध्ये एक्ट २१ बनवून बंद केले.
६) महाप्रस्थान : पाणी मध्ये जलसमाधी घेणे किंवा स्वतःला अग्नी मध्ये उडी घेवून ईश्वर प्राप्तीच्या इच्छे मुळे आपले जीवन संपवून टाकणे ही प्रथा कायदा बनवून बंद केली.
७) तुषानल :कोणत्याही पापाचे प्रायश्चीत्त करण्यासाठी लाकडी भुसा किंवा गवताच्या आगीत जाळून भस्म होणे या प्रथेला कायदा बनवून बंद केले.
८) हरिबोल :ही परंपरा बंगाल मध्ये प्रचलित होती. मरणासन्न व्यक्तिला लाथाबुक्यांनी मारणे व हरीबोल च्या घोषणा देणे, जो पर्यंत तो माणूस मरत नाही तो पर्यंत मारणे, जर तो माणूस मेला नाहीच तर त्याला तेथच तडफडत सोडून येत होते.अशा माणसाला पुन्हा घरात घेत नसत.१८३१ मध्ये कायदा बनवून ही परंपरा बंद केली.
९) नरबळी :आपल्या इच्छाप्राप्ती साठी आल्या इष्टदेवतेला प्रसन्न करण्यासाठी मानवाची सरळ बळी देण्यात येत असे, ही भयानक प्रथा इंग्रजांनी बंद केली. परंतु काही ठिकाणी आजही ही प्रथा जीवंत आहे. “बळी” मात्र बदलला आहे.बकरा कोंबड्यांचा बळी दिला जातो.रेडे मेंढेही कापले जातात.
१०) सतीदाह : पती मेल्या नंतर पेटत्या प्रेतावर पत्नीने उडी घेणे व “सती” जाणे ही भयानक परंपरा राजा राम मोहन राय यांच्या प्रयत्नाने लार्ड विल्यम बेंटीक यांनी १८२९ मध्ये बंद केली.पण त्याला कायदेशिरपणे बंद व्हायला १८४१ साल उजाळले.
११) कन्यावध :उडीसा व राजपूताना मध्ये कुलीन क्षत्रिय कन्या जन्म घेताच मारून टाकत होते. कारण त्यांना भीती वाटत होती की पुढे सासरा किंवा मेव्हणा बनावे लागेल, ही परंपरा १८७० मध्ये कायदा बनवून बंद केली.
१२ )भृगुत्पन्न :ही प्रथा गिरनार व सतपुडा येथे प्रचलीत होती, माता नवस करायची की, हे महादेव,मला झालेलं पहिलं संतान मी तुल अर्पण करेन, यानुसार पुढे नवीन युवक डोंगरावरून उडी मारून आपला जीव देत असे.ही प्रथा कायदा बनवून बंद केली.
ह्या परंपरा वर्ण धर्मानुसार बनविलेल्या होत्या, त्या इंग्रजांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून बंद केल्या.आपण विचार करायला हवा की एवढा अत्याचार आपले लोक सहन का करीत होते...काय होती ही गुलामी.....
आजही समाजात अजुनही अनिष्ट प्रथा सुरु आहेत.त्या संपलेल्या नाहीत.त्या संपवायच्या असतील तर माणुसकीचा मंत्र जपायला हवा.समाजात आजही नवश म्हणुन कोंबडे बकरे कापणे.हिंसा करणे.गुप्त धन काढण्यासाठी लहान मुले कापणे,पती मरताच स्रीयांचं सौंदर्य नष्ट करणे.पांढरी साडी जरी दिसत नसली तरी भांगाचा कुंकू,मंगळसुत्र वापरण्यास बंदी,तसेच विवाह करतांनाही विवाहप्रसंगी त्या स्रीयांनीच भांगात कुंकू भरणे,मंगळसुत्र वापरणे.नव-याने कितीही पत्नी सोेडल्या,केल्या तरी चालेल.तिला बंधन घालणे,तिचा तीन दिवसाचा विटाळ मानणे.तिला शनिमंदीर प्रवेशाची परवानगी न देणे,दलितांनाही आजही विटाळाने छळणे,त्यांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करणे.एवढेच नाही तर बोलक्या देवाला सोडुन मातीच्या मुर्तीला पुजणे.जनावरांची पैज लावणे.ह्यासारख्या अनेक प्रथा समाजात आहेत.त्या संपविण्याची गरज आहे.पण आज खरे संत नाहीत.खरे किर्तनकारही नाहीत.आजचे किर्तनकार समाजाची दिशाभुल करतात.स्वतःला संत मानणारे कोवळ्या पोरीवर बलत्कार करतात.न्याय देणारे न्यायाधिकारी फक्त वकीलाच्या वकीलीपणावर विश्वास ठेवतात.सत्य न्यायालयातुन बाहेर येत नाही.खोट्यावर व पैशावर खटला चालतो.गरीबांना न्याय नाही.खरं तर यामुळेच समाज मन सुन्न होते आहे.आज काळवीट मारुनही सिद्ध होवुनही जमानत मिळते.टाडात लटकुनही व्यक्ती सुटतो.कसाबाला बिर्याणी मिळते.सलमानला काँफी मिळते.तर लालुला जेलमध्ये आरामाची जिंदगी मिळते.
खरंच देशात काय चालले आहे?निव्वळ माणुसकीचा धिंगाणा चालला आहे असे वाटते.त्यामुळे ह्या अशा देशाशी लढण्यास लेखक साहित्यीकांनाच सामोरे यावे लागेल.बाबासाहेब महात्मा फुले यांनी जसं लेखन करुन अनिष्ट गोष्टींना उजेडात आणले.नव्हे तर त्यामुळे जनहित जागुन त्या प्रथा बंद करण्यासाठी जनता पुढे सरसावली.तेच आपणा साहित्यीकांना करावे लागेल.त्याशिवाय अनिष्ट प्रथा बंद होणार नाही.दलित,वंचित,शोषीत,स्रीया, बालके या सर्वांना न्याय मिळणार नाही.
त्यासाठीच सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.लढण्याचीही गरज आहे.माणुसकीचा मंत्र जपण्याची गरज आहे.लेखनी तळपविण्याची गरज आहे.केवळ स्पर्धेसाठी लिहिण्याची गरज नाही.