हिंमत व आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या बाजू?
हिंमत अशी गोष्ट आहे की माणसाला जगणं शिकवते संकटावर मात करणं शिकवते. ती आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करते आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्याकडून कोणत्याही स्वरुपाचं कठीणात कठीण कार्य घडवून आणते. म्हणतात की ज्याच्यामध्ये हिंमत असेल तर तोच खरा मर्द.
मर्द........मर्द याचा अर्थ माणूस नाही. मर्द याचा अर्थ पुरुषार्थ. ज्याला जीवनाला वा जगण्याला रंगत आणणे असं म्हणता येईल. अशी जीवनाला रंगत आजच्या काळात स्रिया देखील आणू शकतात. मग त्या मर्द नाहीत का? त्याही मर्दच असतात. म्हणूनच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई बाबत म्हटलं जातं की खुब लडी मर्दानी वह तो झाशी वाली रानी थी आणि ते सत्य आहे. जी अशी अशी मर्दासारखी कामं करीत असेल तिला मर्दानीच म्हटलं जातं व अशा इतिहासात बऱ्याच स्रिया झाल्या की ज्या मर्दानी ठरल्या. त्याचं कारण आहे हिंमत. मग कोणताही कठीणात कठीण प्रसंग का उद्भवेना.
इतिहासात वर्णीत असलेल्या महाराण्यात वर्णन करतांना झाशीची राणी लक्ष्मीबाईच झाली नाही तर, राणी पद्यावती, राणी संयोगिता, राणी येशुबाई, राणी ताराबाई, राणी चांदबिबी, राणी अहिल्याबाई व राणी चेन्नम्मा याही राण्या झाल्या की ज्या सत्तेवर असतांना ज्यांनी राज्यकारभार व्यवस्थीत चालवला. यात गुरु गोविंद सिंहाच्या आईचाही म्हणजेच माता गुजरीचाही समावेश आहे. तसं पाहता बऱ्याच स्रिया आजही शुरवीर आहेत. परंतु त्या हिंमत दाखवत नाहीत. तसंच इतिहासात असेही बरेच राजे झाले की ज्यांनी हिंमत दाखवली व स्वराज्यासाठी नाही तर आपल्या राज्यासाठी हिंमत दाखवली व हिंमतीच्याच भरवशावर राज्य टिकवून दाखवलं. तसंच केवळ हिंमतीच्या भरवशावर राजेच झाले नाही तर काही सामान्य लोकंही झाले की ज्यांनी हिंमतीच्या भरवशावर राज्य राखण्यास मदत केली. ज्यात शिवरायांच्या काळात झालेला शिवा काशिद आणि गुरु गोविंद सिंहाच्या काळात झालेला संगत सिंह. आज शिवा काशिद महाराष्ट्रापुरता मर्यादीत आहे व संगत सिंह पंजाब पुरता. त्यांना परप्रांतात गवगवा नाही. याच अनुषंगाने कवी कलश, मदारी मेहतर, बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी, धनाजी, संताजी यांचंही बलिदान वाखाणण्याजोगं आहे.
स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यसमरात तर लहान लहान मुलांनी बलिदान दिलं. त्यात नंदूरबारचे शिरीषकुमार, घनश्यामदास, सुखदास आणि इतर देशातील बऱ्याच मुलांचा समावेश आहे. हे सगळं कसं घडलं याबाबत अभ्यास केल्यास नक्कीच जाणवेल की यात हिंमतीनं महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्या स्वातंत्र्य समरात तर लोकं स्वतः होवून देशासाठी बलिदान द्यायला तयार होत होती. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास जालियनवाला बागेतील हत्याकांडाचं उदाहरण देता येईल की ज्यात जनरल डायरनं बेछूट गोळीबार केला होता. तसंच आपला जीव जाईल हे माहीत असूनही लाला लजपतराय यांनी सन १९२८ मध्ये सायमन कमीशनला गो बॅक म्हणत स्वतः मिरवणूक काढली व स्वतः मरण आपल्या अंगावर ओढवून घेतलं.
हिंमत.....हिंमतीच्या बाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास हिंमतीनं संकटावर केवळ मातच करता येत नाही तर हिंमतीतून आपलं अस्तित्वही स्थापीत करता येतं. याच हिंमतीच्या जोरावर औरंगजेबाच्या लाखो सैन्याचा केवळ शिवरायांनी धुव्वा उडवला नव्हता तर त्याच हिंमतीच्या भरवशावर पुढं मराठ्यांनी औरंगजेबाचं पानीपत करुन दाखवलं होतं, आपल्या मुठभर सैनिकांच्या भरवशावर. तेच गुरु गोविंद सिंहानंही करुन दाखवलं होतं केवळ मुठभर चाळीस खालसा सैनिकांच्या मदतीनं. यात शंका नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास हिंमत माणसात असावी. नसेल तर ती ठेवावी. कारण ती जर नसेल तर आपला कार्यभाग बुडतो आणि आपला कार्यभाग बुडाला तर आपण पुर्णच बुडतो असं म्हणता येईल. ज्यात हिंमत निर्माण झाली तर आत्मविश्वासही त्याच्या पाठीमागं निर्माण होते. मग आपल्या हातून कठीणात कठीण कार्यही घडून येते यात दुमत नाही.
हिंमत आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात शंका नाही. हिंमत आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण हिंमत नसेल तर आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही व आत्मविश्वास नसेल तर हिंमतही निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच हिंमत आधी आपल्या मनात निर्माण करावी. मग आत्मविश्वासही आपोआपच आपल्या मनात निर्माण होत असते. तो निर्माण होवू द्यावा. कारण त्याच आत्मविश्वासाच्या भरवशावर आपला, आपल्या परीसराचा व आपल्या देशाचा विकास होवू शकतो हे तेवढंच खरं. आत्मविश्वास नसेल तर हिंमतीला काहीच अर्थ उरत नाही आणि हिंमत नसेल तर आत्मविश्वासाचाही काहीच उपयोग नसतो. आत्मविश्वासही व्यर्थ असतो व हिंमतही व्यर्थ ठरत असते.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०