Aadhaar card mandatory for students? in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य?

Featured Books
Categories
Share

आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य?

आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य. त्यासाठी........?

*आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य. मग त्यासाठी काय यंत्रणा सरकार उपलब्ध करून देत आहेत? तर याचं उत्तर काहीच नाही असं म्हणता येईल. कारण आधारकार्ड काढत असतांना वा अपडेट करीत असतांना आधारकार्ड केंद्रावर एवढी भीड असते की सहजासहजी एका दिवसात आधारकार्डचं काम होत नाही. दररोज चकरा माराव्या लागतात. ज्यात वेळ व पैसा वाया जातोच. शिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो वा नुकसान होते व त्याला घेवून जाणाऱ्या पालकांच्याही कामाचं नुकसान होत असतं. जे आजच्या महागाईच्या काळात अतिशय महत्वाचं असतं. यावर उपाय म्हणजे आधारकार्ड बनविण्याच्या ॲपची वा अपडेट करणाऱ्या ॲपची उपलब्धता शिक्षकाच्या मोबाईलवर करुन देणे. ज्यातून आधारकार्ड काढणे वा अपडेट करणे ही प्रक्रिया सहज व सुलभ घडू शकेल हे तेवढंच खरं आहे.*
शाळा.......शाळा हे संस्काराचं एकमेव औपचारिक केंद्र आहे. तिथं शिक्षणासोबत संस्काराचीही मेजवाणी मिळत असते. अशाच या शाळेतून कोणत्याही प्रकारच्या देश विकासाच्या योजनेचे बी पेरण्याचं काम सरकार करीत असतं.
सरकारचही बरोबर असतं. कारण लहान मुलांच्या बाबतीत संस्कार पेरतांना पालक हे मजबूर असतात. कारण शाळेत आपल्या मुलांना नाही पाठवत म्हटल्यास विद्यार्थ्यांचं नुकसान होतं व पाठवतो म्हटलं तर सरकारचं दडपण शोषावंच लागतं.
सरकारनं अशीच आणलेली आधारकार्ड योजना. जे आधारकार्ड भारतीय नागरिकत्वाचं प्रमाण नाही, असंच कार्डवर लिहिलेलं असतं. हे जरी खरं असलं तरी त्या योजनेनुसार सरकारनं आधारकार्ड हे प्रत्येक नागरीकाला अनिवार्य केलं व सरकारनं प्रत्येकाला आधारकार्ड काढायला लावलं. मग गरीब असो की श्रीमंत, ज्यांचा कार्ड काढतांना वेळ वाया गेला तरी चालेल, ते कार्ड काढतांना वेळ लागला तरी चालेल. सरकारला त्याचं काही घेणदेणं नाही.
आधारकार्ड........आधारकार्ड जरी देशाच्या नागरीकत्वाचं प्रमाण नसलं तरी ते सर्वांना अनिवार्य केलं आहे. त्याचबरोबर ते विद्यार्थ्यांनाही अनिवार्य केलं आहे. परंतु असं आधारकार्ड काढत असतांना ज्या समस्या उद्भवतात. त्या न सांगितलेल्या बऱ्या. विद्यार्थ्यांचं आधारकार्ड काढत असतांने वा ते अपडेट करीत असतांना एका एका समस्येसाठी व ती चूक दुरुस्त करण्यासाठी पालकांना आधारकार्ड केंद्रावर किती चकरा माराव्या लागतात याची गणतीच करता येत नाही. बर्‍याच चकरा तर आधारकार्ड बायोमेट्रिक करतांनाच माराव्या लागतात. कारण लहान लेकरांचे बोटाचे ठसेच लवकर येत नाहीत. शिवाय कधीकधी स्पेलिंग चूक तर कधी जन्मतारखेत घोळ. कधी मेलचं फिमेल होतं तर कधी फिमेलचं मेल. त्यातच उच्च शिकलेला असलेला व्यक्तीही आपली माहिती स्वतः भरत नाही. तो दुसऱ्याच व्यक्तीला भरायला लावतो आपली माहिती आणि जो माहिती ऐकून भरतो. तोही चूक माहिती भरतो. त्यानंतर ती भरलेली माहिती शिकलेला व्यक्ती कधीच वाचून पाहात नाही आणि शहानिशाही करीत नाही की ती माहिती चूक आहे की बरोबर आहे. यातूनच चुका होतात. एवढ्या चुका होतात की सतरावेळा आधारकार्ड केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात.
आधारकार्ड बाबतीत चुका. काही चुका अनवधानानं होत असतात तर काही चुका या जाणूनबुजूनही होत असतात. जाणूनबुजून होत असलेल्या चुका या आपलं त्या आधारकार्ड फॉम भरीत असतांना दुर्लक्ष केल्यानं होत असतात. या चुका सहजासहजी सुधारता येत नाही. त्याला वेळ लागतोच.
अलिकडील काळात आधारकार्डला अतिशय महत्व आलेलं आहे. त्यामुळंच छोट्याछोट्या गोष्टीसाठी आधारकार्ड सुधारणे गरजेचे आहे. म्हणूनच आधारकार्ड सुधरविण्यासाठी सतरा चकरा मारणे गरजेचे. हा दृष्टिकोन हेरुन आधारकार्डसाठी चकरा मारल्या जातात. त्यातच लहान मुलांचं अर्थात विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करतांना चकरा माराव्या लागतात सगळे कामधाम सोडून. यावर उपाय एकच. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अपडेट करण्याची जबाबदारी शिक्षकांना द्यावी आणि त्यासाठी सरकारनं एक आधारकार्ड बनविण्याचं किंवा अपडेट करण्याचं ॲप बनवावं. ज्या ॲपनुसार विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करता येईल वा नवीन काढता येईल. तसंच आधारकार्ड काढण्याचं काम सुकर होईल. परंतु सरकार तसं करीत नाही. ते शिक्षकांना आदेश देत असतं की तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करुन घ्या. आधारकार्ड काढून घ्या. आधारकार्ड दुरुस्त करुन घ्या. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास द्या. त्यांच्या पालकांना त्रास द्या. त्यातच एखाद्या पालकानं आपल्या पाल्याचं आधारकार्ड अपडेट नाही केलं वा ते कार्ड बनवलंच नाही तर त्या विद्यार्थ्यांना गाडीवर बसवून व स्वतः आधारकार्ड केंद्रावर घेवून जावून त्याचं आधारकार्डचं काम करुन घ्या. असं जर तुमच्यानं जमत नसेल तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करु नका. नोटीस घ्या व घरी बसा.
सरकारचं शिक्षकांप्रती हे धोरण. जे आधारकार्ड देशीय नागरिकत्वाचं प्रमाण नाही. ते आधारकार्ड काढत असतांना शिक्षकांना पालकांना व विद्यार्थ्यांना असा होणारा त्रास. हा त्रास जर पाहिला तर आधारकार्ड का काढायला लावावं सरकारनं? असा प्रश्न पडतो. अन् ते जर काढायचं असेल तर त्याचं आजच्या ऑनलाईनच्या काळात सरकारनं त्याचं ॲप शिक्षकांना का बरं देवू नये की जेणेकरुन विद्यार्थ्यांना कोणत्याच स्वरुपाचा त्रास होणार नाही. तसेच पालकांनाही कोणत्याच स्वरुपाचा त्रास होणार नाही. तसाच त्रास शिक्षकांनाही होणार नाही. अर्थातच जर सरकार आधारकार्ड प्रत्येक विद्यार्थ्यांना अनिवार्य म्हणत असतं व करीत असतं. परंतु ते तसं अनिवार्य करीत असतांना जर आजच्या ऑनलाईनच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर त्याचं ॲप द्यावं. जेणेकरुन प्रत्येकाला प्रत्येकाचं आधारकार्ड घरच्या घरीच अपडेट करता येईल. बनवता येईल व होणारा त्रास वाचवता येईल हे तेवढंच खरं. तसं ॲप उपलब्ध करुन देणं यात काहीच गैर नाही. एवढंच सांगावेसे वाटेल.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०