Turmeric in Lock Down in Marathi Comedy stories by Kalyani Deshpande books and stories PDF | लॉक डाऊन मधील हळदीकुंकू

Featured Books
Categories
Share

लॉक डाऊन मधील हळदीकुंकू

आमच्या सोसायटीतल्या सगळ्या महिलांनी सोशल डिस्टनसिंग पाळून का होईना पण दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी जरी सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही योग्य ती खबरदारी घेऊन क्लब हाऊस मध्ये हळदी कुंकू करायचं ठरवलेच.

दरवर्षी हळदी कुंकवाच्या प्रोग्रॅम ला आम्ही काही ना काही उपक्रम राबवतो. जसे मागच्या वर्षी वृक्षारोपणाचे महत्व समजावून देणारं आम्ही एक छोटं नाटक बसवलं होतं आणि सगळ्यांना वाण म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे रोपं दिले होते.


ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून घरगुती मास्क बनवले व ते विक्रीसाठी ठेवले त्यातून जे पैसे मिळाले त्यातून आम्ही रस्त्यावर कचऱ्याच्या पिशव्या विकणाऱ्या लहान मुलांना कपडे आणि खाऊ चे पॅकेट्स घेऊन त्यांना वाटले. त्याशिवाय ह्यावेळेस सारखं घरी राहून राहून कंटाळवाणं झाल्यामुळे हळदी कुंकवाच्या दिवशी कोणीतरी स्टँड अप कॉमेडी शो आयोजित करण्याची कल्पना सुचवली. महिलांपैकी एकीच्या ओळखीतले एक स्टँड अप कॅमेडिअन सापडले. त्यांनी यायचं मान्य केलं.


वेगवेगळ्या कॉमेडी किस्यांबरोबरच गमतीदार आडनावावरून कसे विनोद निर्माण होतात हे सादर करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे त्यांनी आम्हा सगळ्या महिलांच्या नावांची लिस्ट मागवून घेतली होती.


त्या लिस्ट मधून त्यांनी काही जणींना सिलेक्ट केलं आणि त्यांना स्टेजवर बोलावण्यात येईल ह्याची कल्पना दिली. माझं नाव बघून त्यांच्या शो साठी ते अनसुटेबल असल्याने मला त्यांनी प्रेक्षकांमध्येच बसण्यास सांगितले.


आधी आमचा एकमेकींना हळदी कुंकू आणि वाण देण्याचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात आम्ही सगळ्या सहा वित अंतरावर खुर्च्यांवर बसलो होतो. आणि हळदी कुंकू लावण्यासाठी आम्ही बाजारातून स्पेशल कोरोना फेम हळदी-कुंकू स्टिक आणली होती जी सहा वित लांबीची होती आणि तिच्या टोकाला स्त्री हळदी कुंकू लावताना कशी हाताची मुद्रा करते तसा प्लास्टिक चा हात होता. प्रत्येक वेळेस हळदी कुंकू लावल्यावर तिला सॅनिटाईझ करण्यात येत होतं.


ह्यावेळेस ओटी आणि तिळगुळ चे सॅनिटाईझ केलेले पॅकेट्स च देण्यात आले तसेच वाण म्हणून सॅनिटाईझर च्या बाटल्या देण्यात आल्या.


आमचं एकमेकींना हळदी कुंकू वाण देणं झाल्यावर कॉमेडी शो ला सुरुवात झाली.


एकाहून एक गमतीदार विनोदी किस्से कॅमेडिअन सांगत होते त्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला एक वेगळीच खुमारी आली होती.


कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सांगितल्या प्रमाणे आडनावाववरून विनोद हा कार्यक्रम सुरू झाला.


कॅमेडिअन महाशयांनी लिस्ट मधलं एक नाव वाचलं आणि सभोवताली बघत म्हंटल,

"महिलांनो तुम्ही आजपर्यंत अनेक चमत्कार बघितले असतील पण आता जो होणार आहे तो अत्यंत दुर्मिळ चमत्कार आहे."


सगळ्यांची उत्सुकता ताणल्या गेली. कोणता चमत्कार असेल बुवा! असा सगळ्या विचार करू लागल्या. ह्याला अपवाद होता फक्त दोन महिलांचा ज्या शांतपणे खुर्चीला मान टेकवून डुलकी घेत होत्या आणि त्याच दोन महिलांचे नाव कॅमेडिअन महाशयांनी घेतलं.


"मी स्टेजवर गोरे-कावळे वहिनी व काळे-बगळे वहिनींना आमंत्रित करतो. "


गोरे-कावळे वहिनीचं गोरे हे माहेरचं तर कावळे हे सासरचे आडनाव होते आणि त्याचप्रमाणे काळे-बगळे वहिनींचं काळे हे माहेरचे आणि बगळे हे सासरचे आडनाव होते.


आपल्याला बोलावलं हे दोघींच्या ध्यानीही नव्हतं. दोघींची मस्त ब्रह्मानंदी टाळी लागली होती. त्या उठत नाही हे बघताच शेजारच्या वाघ-सिंह वहिनी त्यांच्यावर गुरकावल्या तशा त्या दोघी खडबडून जाग्या झाल्या. आणि गोऱ्या मोऱ्या होत अवेळी झोपण्याचं स्पष्टीकरण देताना गोरे-कावळे वहिनी म्हणाल्या,"अहो नातू! नातू लहान आहे माझा! रात्री झोपतच नाही हो! काय करणार!"


काळे-बगळे वहिनी तर अजूनही थोड्या झोपेतच होत्या.


"हे बघा मी म्हंटल होतं की नाही चमत्कार! कधी काळे बगळे आणि गोरे कावळे बघितले तुम्ही? इथे मात्र दोन्ही उपस्थित आहेत.",कॉमेडियन महाशय


त्यांनी असं म्हणताच माझ्या बाजूच्या गंभीर-आळशी वहिनी म्हणाल्या,"हा होय चमत्कार! हा चमत्कार आम्ही अनेक वर्षांपासून रोजच बघतो ! त्यात काय मोठं! मला वाटलं काही वेगळंच असेल बाई!"


पुढे कॅमेडिअन महाशय म्हणाले,"गोरे-कावळे आणि काळे-बगळेंना डरकाळी फोडून उठवणार्या वाघ-सिंह वहिनी आधी स्टेजवर या."

असं त्यांनी म्हणताच वाघ-सिंह वहिनी इकडे-तिकडे रागाने बघत गुरकावत शेपटी झटकल्या सारखा आपला शेपटा झटकत स्टेजवर गेल्या.


तेवढ्यात क्लब हाऊस मध्ये घाईघाईने एक वहिनी शिरल्या त्यांना बघून कॅमेडिअन महाशय म्हणाले,

"तुरुतुरु चालत आत्ताच कार्यक्रमाला येणाऱ्या उंदरे-मांजरेकर वहिनी स्टेजवर या."


त्यांनी असं म्हणताच खरंच त्या वहिनी उंदरासारख्या तुरुतुरु चालतच स्टेजवर पोचल्या आणि साडीत पाय अडकून सहा फुटवरून पडल्या(कारण स्टेज सहा फूट उंचीवर होता.) पण पडल्यातरी त्या खाली नाही कोसळल्या दोन पायावर त्या शक्तिमान सारख्या खट्ट उभ्या राहिल्या. त्यांना असं उभं राहिलेलं बघताच कॉमेडियन महाशय म्हणाले "आत्ता मांजरेकर शोभलात वहिनी! "

सगळीकडे हशा पिकला.


पुढे ते म्हणाले," बघा आणखी चमत्कार उंदरे- मांजरेकर आणि वाघ-सिंह नावात का होईना एकमेकांसमोर उभे राहिले.

त्यानंतर मी पाचारण करतो कोल्हे-हरणे वहिनी आणि लांडगे-काळवीट वहिनी ह्यांना" त्यांनी असं म्हणताच कोल्हे-हरणे वहिनी लांडगे-काळवीट वाहिणींपासून थोडं अंतर ठेवून घाबरत घाबरतच चालू लागल्या. त्यांना तसं बघताच लांडगे-काळवीट वहिनींनी कारण विचारलं," का हो वहिनी का एवढ्या दुरून चालल्या? तुम्ही तर सहा विताच्या ऐवजी दहा वित अंतर ठेवलंय"


त्यावर कोल्हे-हरणे वहिनी म्हणाल्या,"अहो आधीची गोष्ट वेगळी होती तेव्हा मी कोल्हे होती पण आता हरणे आहे न म्हणून भीती वाटली"


यावर हसत लांडगे-काळवीट वहिनी म्हणाल्या,"अहो मग मुळीच घाबरू नका मला कारण मी तरी कुठे लांडगे राहिली आता? काळवीट नाही का झाली मी!"


असं म्हंटल्यावर कुठे कोल्हे-हरणे वहिनींना हायसं वाटलं.


"दुरुनही मी त्या वहिणींचं आडनाव ओळखू शकतो त्या हिरवे-फडके वहिनींना मी स्टेजवर आमंत्रित करत आहे.", असं त्या विनोदवीराने म्हणताच सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि सगळे खुसखूसू लागले. योगायोगाने हिरवे-फडके वहिनी मास्क म्हणून हिरवा रुमाल नाकाला बांधून आल्या होत्या.


"त्यानंतर मी केळकर-बोरकर वहिनी तसेच जामकर-आंबेकर वहिनींना स्टेजवर आमंत्रित करतो."

त्या दोघी स्टेजवर गेल्यावर विनोदवीर म्हणाले,

"फळांच्या टोपल्या कुठे आहेत? "


त्यावर दोन्ही वहिनी हसत म्हणाल्या," फार जड होत्या म्हणून आम्ही त्या स्टेजवर आणल्याच नाहीत"


"बघा भगिनींनो जाम(पेरू) आणि आंबा कधी एका ऋतूत मिळतो का?"


सगळ्या म्हणाल्या "नाही"


"पण तुमच्याच सोसायटी त हा चमत्कार आहे",विनोदवीर


पुन्हा सगळ्या बायकांमध्ये हास्याची लकेर उमटली.


"ह्यानंतर स्टेजवर ज्यांना मी बोलावणार आहे त्यांचं नाव ऐकून घाबरायचं नाही हां! तर मी आमंत्रित करतो (छातीवर हात ठेवून श्वास रोखून धरल्याच्या अविर्भावात) भूत-राक्षस वहिनी ह्यांना"


भूत-राक्षस वहिनी मोठे मोठे ढांगा टाकत क्षणात स्टेजवर पोचल्या आणि कॅमेडिअन महाशयांच्या कानात त्यांनी "भोक्क" केलं.


"बापरे मी फारच घाबरलो आता मला धीर यावा म्हणून मी आमंत्रित करतो देव-संत वहिनींना"


असं त्यांनी म्हणताच देव-संत वहिनी अगदी शांतपणे संथपणे आल्या व स्टेजवर स्थानापन्न झाल्या.


"काय हो! केव्हाच पासून बघतेय मी एकेक जणींना बोलावताय तुम्ही माझं नाव कधी घेणार?",एका वहिनींनी मोठ्याने कॅमेडिअन महाशयांना म्हंटल.


"तुमचं आडनाव सार्थ केलं तुम्ही वहिनी ह्याचीच मी वाट बघत होतो. आता मी दांडगे-गुंड वहिनींना आमंत्रित करतो. या वहिनी"


"आता मी ज्या वहिणींचं नाव घेणार आहे ते ऐकून तुमच्या मनात वात्सल्य रस जागृत झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. तर मी स्टेजवर आमंत्रित करतो टिल्लू-बाळ वहिनींना", असं त्यांनी म्हणताच आता एखादं लहान मूल दुदुदुडू धावत येईल की काय असं सगळ्यांना वाटू लागलं पण थोड्या वयस्कर अशा आणि थोड्या हेल्दी वहिनी उठून उभ्या राहिल्या आणि स्टेजवर यायला निघाल्या पण हेल्दी असल्याने त्या हळूहळू चालत येऊ लागल्या. ते बघून विनोदवीर म्हणाले," आपलं टिल्लू-बाळ लांगत लांगत येईपर्यंत आपण स्टेजवर नातू-माई वहिनींना आमंत्रित करू.",त्यांनी असं म्हणताच सगळी कडे हास्यकल्लोळ उठला. मात्र टिल्लू-बाळ रुसलं म्हणजे टिल्लू-बाळ वहिनींना खूप राग आला.


इकडे नातू-मायी वहिनी कधीच स्टेजवर येऊन पोचल्या होत्या.


"काहो माई एकट्याच आल्या? नातू कुठेय?",कॉमेडियन महाशय


"अहो तो बाहेर खेळतोय इथे हळदी कुंकवात काय करणार तो?", नातू-माई वहिनी हसत म्हणाल्या.


टिल्लू-बाळ वहिनी स्टेजवर यायला अजूनही अवकाश असल्याने कॅमेडिअन महाशयांनी वेळेअभावी भराभर काही वहिनींचे नावं घेऊन त्यांना स्टेजवर आमंत्रित केले.


"मी आता स्टेजवर

भोपळे-दाते वहिनी(ज्या दात दिसू नये म्हणून तोंडावर हातच ठेवून आल्या)

भडभडे-ओक वहिनी(ज्या मळमळल्या सारखं तोंड करून स्टेजवर आल्या.)

घोरे-झोपे वहिनी(ज्या स्टेजवर येताच चार सेकंद घोरल्या आणि मगच स्थानापन्न झाल्या)

घोरपडे-मगर वहिनी(ज्या त्यांचे नेलपेंट लावलेले लांब लांब नखं दाखवत आल्या)

निरखी-पारखी वहिनी(ज्यांनी स्टेजवरच्या एक दोन खुरच्यांना नीट निरखून पारखून घेतलं आणि मगच त्यातील एका खुर्चीवर त्या बसल्या)

कापसे-काठपातळ वहिनी(ज्या मोठया काठाची पातळ(नऊवारी) नेसून आल्या होत्या)

लोखंडे-फाटक वहिनी(करकरतच आल्या)

नागे-विंचूरकर वहिनी(रांगेतून अचानक सळसळत स्टेजवर हजार झाल्या)

प्रधान-राजे वहिनी(ज्या हात नसलेल्या खुर्चीवर सिंहासनावर बसल्याप्रमाणे दिमाखात बसल्या.)


झाडे-फुले वहिनी,महाकाळ-समुद्र वहिनी,चोरे-मोरे वहिनी,गंभीर-आळशी वहिनी,जिराफे-माने वहिनी, काटे-भाले वहिनी, तांबे-पितळे वहिनी,वांगे-सांभारे वहिनी दंडे-पुंडे वहिनी ह्या सगळ्या सगळ्या वहिनींना मी स्टेजवर आमंत्रित करतो",कॅमेडिअन महाशय म्हणाले.


तिकडे टिल्लू-बाळ रागातच खुर्चीवर येऊन बसलं होतं आणि वहिनींनी सगळ्यांशी अबोला धरला कोणाशीच त्या बोलेचना.


सगळीकडे खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले होते. अपवाद होत्या त्या टिल्लू-बाळ वहिनी.


सरते शेवटी आभार प्रदर्शनाचे काम माझ्याकडे होते त्यामुळे मी स्टेजवर गेली. टिल्लू-बाळ वहिनींना रागात बघून कॉमेडियन महाशयांनी मला एक आयडिया करण्यास सांगितली. मी माईक हातात घेतला.


"आभार प्रदर्शन करण्याआधी एक सगळ्यात महत्वाचे वहिनी राहून गेल्या त्यांना मी आमंत्रित करते त्या वहिनी आहेत किडे-मुंगी वहिनी",असं मी म्हणताच एक महिला उठली तिच्या बाजूच्या एक दोन महिलांनी चुकून आपापले पदर झटकले. त्या वहिनी स्टेजवर आल्या.


"आता ह्यांची ओळख करून देते ह्या आहेत आत्ताच ज्यांनी आपल्या स्टँड अप कॅमेडीने हसवून हसवून आपलं पोट दुखवलं त्याह्या विनोदवीराची पत्नी ज्यांचं माहेरचं आडनाव किडे आणि सासरचे आडनाव आहे मुंगी.",मी असं म्हणताच कॉमेडियन महाशयांनी मोठयाने हसत अंगावर किडे मुंगी चढल्यासारखे कपडे झटकले. स्टेजवरच्या सगळ्या बायका पदर झटकू लागल्या. कॉमेडियन महाशयांचा खिलाडू वृत्ती बघून टिल्लू-बाळ वहिनींचा राग कुठल्या कुठे पळून गेला आणि त्या सगळ्यांशी पूर्ववत बोलायला लागल्या.


सगळीकडे हसत खेळत वातावरण बघून कॉमेडियन महाशय मला म्हणाले,"आता ह्या स्टेजवर फळं म्हणू नका, प्राणी म्हणू नका, पक्षी म्हणू नका, अगदी देव भूत संत किडे मुंगी नातू बाळ माई असे सगळे ब्रह्मांडच इथे अवतरलेय तेव्हा मॅडम तुम्ही आभार प्रदर्शन करायला काहीच हरकत नाही"


त्यानंतर मी आभारप्रदर्शन केलं आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.


अश्या तर्हेने लॉक डाउन मधलं हळदी कुंकू यथासांग पार पडलं.

★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★