भरत कुमारांची इच्छा असते की श्रीराम दिसताच त्यांना राजमुकुट घालून त्यांचा तिथेच राज्यभिषेक करून त्यांना परत आयोध्येस आणायचे त्यासाठी अयोध्या सोडतानाच भरत मुनिवस्त्र परिधान करतात. परंतु श्रीराम त्यांना राजवस्त्र परिधान करण्यास व राजमुकुट घालून राज्यपद सांभाळ असे सांगतात. आणि चौदा वर्षे होईपर्यंत मी परत अयोध्येला येणार नाही असे निक्षून सांगतात. तेव्हा भरताचा नाईलाज होतो. जसे श्रीराम निश्चयी व तत्ववादी असतात त्याप्रमाणेच श्रीरामांचे बंधू असल्याने भरत सुद्धा तेवढेच निश्चयी व तत्ववादी असतात. ते श्रीरामांना म्हणतात,
"तात गेले माय असून नसल्यासारखीच आहे त्यामुळे मला अनाथ झाल्यासारखं वाटते. कोणाचाच आधार वाटत नाही. आपण आयोध्येस आले असते तर आपला आधार वाटला असता पण आपण वचन बद्ध असल्याने येऊ शकत नाही. मग कमीतकमी आपल्या खडावा तरी मला द्या.
(ह्यात भरतास श्रीरामांची चरणधुळ लागलेल्या खडावा हव्या आहेत. ह्यात एक प्रश्न पडतो की श्रीरामांनी खडावा दिल्यावर त्यांना अनवाणी चालावे लागणार नाही काय? मग तर त्यांना आणखी त्रास होईल पण भरताने त्यांना दुसऱ्या नवीन खडावा नक्कीच दिल्या असतील किंवा निघताना श्रीरामांनी दोन जोड खाडवांचे घेतले असतील असे आपण नक्कीच समजू शकतो.)
जशी गरूडभरारी एक गरूडच घेऊ शकतो एखादी माशी गरुड भरारी घेऊ शकेल का?
जसा एखाद्या हत्तीचा भार एखादा घोडा पाठीवर वाहून नेऊ शकेल का? तसेच राघवांनी ज्या राज्यपदी बसणे योग्य आहे त्या सिंहासनावर भरत बसणे शक्य होईल का? वंशपरंपरा काय सांगते ? की जो ज्येष्ठ आहे तो सिंहासनावर विराजमान होईल. ज्येष्ठ बंधू रानावनात भटकतोय आणि कनिष्ठ बंधू सिंहासनावर बसून सत्ता उपभोगतोय असे कधी झाले आहे का? राज्य सांभाळणे ही जबाबदारी आहे ती दान म्हणून तुम्ही मला कशी काय देता? जेव्हा तुम्हाला शोधण्यास मी अयोध्या सोडली तेव्हाच मी हा मुनींचा वेष परिधान केला होता. आता पुन्हा राजवस्त्र परिधान करून सिंहासनावर बसून कैकयी प्रमाणे प्रजेचा रोष
मी सहन करू शकत नाही. असे चुकीचे वागण्याचा सल्ला आपण का मला देत आहात?
तुम्ही दिलेल्या पादुका मी दशरथ राजांच्या सिंहासनावर स्थापन करतो व त्यांची पूजा करून अयोध्येच्या बाहेर राहून दुरून तुम्ही परत येईपर्यंत तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य सांभाळतो. जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही ओले होत नाही,अलिप्त राहते त्याप्रमाणे राज्य संभाळूनही मी त्यातून मिळणाऱ्या सोयी सुख सुविधांपासून अलिप्त राहीन.
चौदा वर्षे एकेक वर्ष मोजून मी हे व्रत करत राहीन परंतु जर चौदा वर्षे पूर्ण होऊन ही आपण आला नाहीत तर मात्र मग मी माझा हा देह अग्नीला समर्पित करेन ही प्रतिज्ञा मी आत्ता तुमच्या समोर तुमच्या पायांची धूळ माझ्या कपाळाला लावून घेतली आहे.", भरत श्रीरामांना चरणस्पर्श करत म्हणतात.
भरताचा हा निर्मोही निष्कपट निस्वार्थी स्वभाव व बंधुप्रेम बघून श्रीरामांचे डोळे अश्रूंनी व हृदय भावनांनी काठोकाठ भरून येते. ते भरतास प्रेमाने आलिंगन देतात. चौदा वर्षे पूर्ण झाल्या झाल्या मी अयोध्येत हजर असेन असे वचन देतात. आपल्या पादुका देऊन श्रीराम भरतास प्रेमभराने निरोप देतात.
भरत, श्रीराम, जानकी देवी, लक्ष्मण, मंत्री सुमंत, सैन्य, सारथी सगळ्यांच्या डोळ्यातुन अश्रूंचा बांध फुटतो. असे आदर्श बंधुप्रेम आणि निर्व्याज स्वभावाचे दर्शन होताच सगळ्यांचे अष्टसात्विक भाव जागृत होतात. भरत श्रीरामांच्या खडावा घेऊन मोठ्या जड अंतकरणाने अयोध्येच्या दिशेने मार्गक्रमण करू लागतात. श्रीराम साश्रु नयनांनी ते दूर दिसेनाशे होईपर्यंत त्यांना मनोमन आशीर्वाद देत बघत राहतात.
{धन्य तो निरलोभी भरत व धन्य ते निश्चयी श्रीराम. हा त्रेता युगातील प्रसंग असल्याने तेव्हा हे सगळं शक्य होतं पण कलियुगात असे प्रसंग घडणे केवळ अशक्य. एक भाऊ आपली सत्ता स्वहस्ते दुसऱ्या भावाला देतोय आणि दुसरा भाऊ 'ती सत्ता माझी नाही तर मी कसा घेऊ?' असं म्हणतोय हे केवळ अशक्य आहे ह्या काळात. आत्ताचा काळ म्हणजे 'सत्तेसाठी कायपण' असा आहे. तेव्हा चा काळ 'तत्वांसाठी काहीपण' असा होता. आत्ताच्या काळातले सत्तेचे राजकारण बघितले की तोच काळ चांगला होता असे वाटते. असो.}
(रामकथेत पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात. तोपर्यंत जय श्रीराम जय भरत कुमार🙏🚩)
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
महान गीतकार ग.दि.माडगूळकर रचित सव्वीसावे गीत:-
तात गेले, माय गेली, भरत आता पोरका
मागणे हे एक रामा, आपुल्या द्या पादुका
वैनतेयाची भरारी काय माशका साधते?
का गजाचा भार कोणी अश्वपृष्ठीं लादते?
राज्य करणे राघवाचे अज्ञ भरता शक्य का?
वंशरीती हेच सांगे- थोर तो सिंहासनी
सान तो सिंहासनी का, ज्येष्ठ ऐसा काननी?
दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका?
घेतला मी वेष मुनिचा सोडताना देश तो
कैकयीसा घेउ माथी का प्रजेचा रोष तो?
काय आज्ञा आगळी ही तुम्हिच देता बालका?
पादुका या स्थापितो मी दशरथाच्या आसनी
याच देवी राज्यकर्त्या कोसलाच्या शासनी
चरणचिन्हे पूजुनी ही साधितो मी सार्थका
राम नाही, चरणचिन्हे राहु द्या ही मंदिरी
नगरसीमा सोडुनी मी राहतो कोठे तरी
भास्कराच्या किरणरेखा सांध्यकाळी दीपिका
चालवीतो राज्य रामा, दुरुन तुम्ही येइतो
मोजितो संवत्सरे मी, वाट तुमची पाहतो
नांदतो राज्यात, तीर्थीं कमलपत्रासारखा
सांगता तेव्हा न आले, चरण जर का मागुती
त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्नीदेवा आहुती
ही प्रतिज्ञा, ही कपाळी पाऊलांची मृत्तिका
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★