विक्रांत गोगटे परत जैन रोडला आला व म्हणाला, इन्स्पेक्टर कदम, नरसिंह कुठे आहे? कदमांनी उत्तर दिले, आज तो कुठेतरी घसरून पडला व त्याला जखम झाली आहे म्हणून मी त्याला घरी पाठवले. विक्रांत गोगटे म्हणाला, हे प्रकरण तर खूप गुंतागुंतीचे आहे. अनेक विद्वान मंडळी यात गुंतलेली आहेत. पहिला माणूस नरसिंह, काल नरसिंह घरात बसला नव्हता असे हरिदास म्हणाला. त्याला बाहेर जाताना एका दुकानदाराने पाहिले. इतकेच नाही तर ते त्याच्या कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाले. कॅमेऱ्यात दिसले की तो एका माणसाशी आणि मुलीशी बोलत होता. तू म्हणतोस, त्याची तब्येत बरी नव्हती पण तब्येत बरी नसतानाही तो का बाहेर गेला? खरे कारण असे की नरसिंह आजारी नव्हता. हे ऐकल्यावर हरिदास पळायला लागला पण इन्स्पेक्टर कदमांनी त्याला पकडले व खुर्चीवर बसवले. विक्रांत गोगटे म्हणाला, तुझी योजना चांगली होती पण कॅमेऱ्यामुळे फसली. तू म्हणालास, तो घरात होता म्हणजे नरसिंह व मुरारी दत्ता दोघेच होते. आमचा संशय नरसिंहावर आणायचा तुझा प्रयत्न होता कारण तो मुरारी दत्तांचा खून करू शकला असता एकांतात. पण कॅमेऱ्याने त्याला टिपले, म्हणून आम्हाला हे खोटे कळले. बोल तुला हे खोटे बोलायला कोणी सांगितले? हरिदास चाचरत म्हणाला, अहमद बीन सादीन, म्हणजे माझ्या मालकांनी हे खोटे मला बोलायला सांगितले. असे तो बोलला एवढ्यात एक बाण सरसरत आला व त्याच्या म्हणजे हरिदासच्या पोटातच घुसला. हरिदास जागीच मेला. विक्रांत गोगटेला बाण मारणारा दिसला. तो व इन्स्पेक्टर शंकर गजानन कदम चित्त्याच्या चपळाईने त्या माणसामागे पळाले व त्याला त्यांनी पकडले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण तो काही विक्रांत गोगटेच्या पकडीतून सुटला नाही. त्याला घरात आणून खुर्चीवर बसवले. विक्रांत म्हणाला, “कोण तू? व ह्याला का मारलेस?” तो माणूस थरथरला, म्हणाला मला हरिदासला मारायचे काम दिले होते जर त्याने अहमद बीन सादीनचे नाव घेतले तर. मी कर्तलाब खान आहे. विक्रांत गोगटे म्हणाला, तुला हे काम कोणी दिले? तर त्याला कर्तलाब खान म्हणाला, हे वसीम साहेबांनी व कादीर साहेबांनी सांगितले होते. विक्रांत म्हणाला, त्यांच्या घराचा पत्ता सांग. कर्तलाब खान म्हणाला, त्यांनी मला डोळे बांधून तिथे नेले होते. हां, पण त्यांचा बंगला खूप मोठा होता व मी सहज बाहेर डोकावलो तर वर लक्षदीप नावाची पाटी दिसली. कर्तलाब म्हणाला, तेव्हा बंगल्यात एकूण चार पुरुष होते, त्यातले तीन माझ्या ओळखीचे होते म्हणजे, कादिरसाहेब, अहमदसाहेब व वसीमसाहेब. चौथा अनोळखी होता पण त्याने आपले नाव तेजस सांगितले. विक्रांत गोगटे म्हणाला, तुला हरिदासला मारल्यामुळे आता फाशीची शिक्षाही होऊ शकते. हवालदार याला घेऊन जा. हवालदार कर्तलाबला घेऊन गेले. विक्रांत गोगटे म्हणाला, तुम्ही ते घर शोधा व त्या सर्व मंडळींना पकडा. लक्षात ठेवा, नरसिंहला पण पकडायचे आहे. इन्स्पेक्टर शंकर कदम हवालदारांना घेऊन गेले.
सायंकाळ झाली होती. विक्रांत गोगटे मुरारी दत्ताच्या बायकोला बोलावून म्हणाला, सूड घ्यायला माणूस काहीही करू शकतो, सावध रहा. मी आता निघतो. विक्रांत नंतर जेवायला ‘दिल्ली-तडका’ उपाहारगृहात गेला व तिथे त्याने दोन सुरमई व एक चिकन लॉलीपॉप खाल्ला, नंतर बाहेर आला आणि मोपेड वर बसून घरी जाणार इतक्यात त्याचे लक्ष समोरच्या घराकडे गेले. त्या घराचे नाव होते लक्षदीप. विक्रांत गोगटेने इन्स्पेक्टर शंकर कदम यांना फोन केला व विचारले तुम्ही कुठे आहात? मी उपाहारगृह ‘दिल्ली-तडकाच्या’ बाहेर आहे. नुकताच पोटोबा भरलाय व समोरच लक्षदीप घर दिसले. शंकर कदमांनी उत्तर दिले. आम्ही उपाहारगृह राजधानीत झकास कोंबड्या खाल्ल्या. राजधानी उपहारगृह हे दिल्ली- तडकापासून 50 मीटरच लांब आहे. मला तुम्ही दिसलात सुद्धा. तुम्ही तिथेच थांबा, मी हवालदारांना घेऊन येतोय, एक खुशी खबरी आहे की आम्ही नरसिंहाला पकडले. जरा दरडावल्यावर त्याने कबूल केले की खूनी माणसाला आत यायला त्यानेच मदत केली. पण खून्याचे नाव त्याला माहिती नाहीये. त्याला लक्षदीप घरात नेले होते व खुन्याला मदत करण्यासाठी पैसे दिले होते. तो म्हणतोय खूनी उंच, तगडा आणि तरुण माणूस होता. तो खुन्याला परत पाहिल्यावर ओळखेल. विक्रांत गोगटे ने भ्रमणध्वनी ठेवला.
थोड्यावेळाने इन्स्पेक्टर शंकर कदम नरसिंहला घेऊन आले. त्याचे दोन्ही हात बांधलेले होते विक्रांत गोगटे म्हणाला काय रे? तुझे मालक मुरारी दत्ता तुला पैसे देत नव्हते? नरसिंह रडतच म्हणाला, देत होते ना. पण खुन्याने अधिक पैसे दिले म्हणून मी त्याला मदत केली. विक्रांत गोगटे समोरच्या घराकडे बोट दाखवत म्हणाला, हेच का ते लक्षदीप जिथे तुला नेले होते? तू खोटं बोललास तर तुला शिक्षा गंभीर होऊ शकते. नरसिंह म्हणाला, हेच ते, विक्रांत गोगटे. इन्स्पेक्टर शंकर कदम नरसिंह ला घेऊन लक्षदीपच्या बाहेर उभे राहिले. विक्रांत गोगटेने बेल वाजवली व आपली बंदूक काढली. आतून प्रतिकार झाला तर असावी म्हणून. दार एका तरुणाने उघडले, दार उघडताच विक्रांत गोगटेने त्या तरुणाच्या डोक्यावर बंदूक ठेवली व म्हणाला, आम्हाला या घराची झडती घ्यायची आहे. तुझे नाव काय? तो तरुण म्हणाला, तेजस राठोड. इन्स्पेक्टर कदमांनी नरसिंहला विचारले हाच का खूनी? नरसिंह म्हणाला, चेहरा खुन्यासारखाच वाटतो पण खूप हडकुळा आहे. हा खूनी नसणार नक्कीच. विक्रांत गोगटे म्हणाला, नक्की ना? नरसिंहने मान डोलावली. विक्रांत गोगटे व नरसिंह त्या तरुणाबरोबर म्हणजेच तेजस राठोडबरोबर आत गेले. विक्रांत गोगटे भिंतीपाशी लपला व तेजस आणि नरसिंह खोलीत गेले. तिथे तीन माणसे होती ज्यांना विक्रांत गोगटे लपला आहे याची बातमी नव्हती. एक माणूस म्हणाला, “चंद्रावती, ऐकले, गुप्तहेर विक्रांत गोगटे, मुरारी दत्ता खून प्रकरणाची तपासणी करत आहे. पण त्याला कसे कळणार की तू खून केलास त्या मुरारी दत्ताचा. आता आपले पुरुषी कपडे काढ. चंद्रावरती उर्फ तेजसने आपले पुरुषी कपडे काढले व आता ती एका बाईच्या वेशात आली. विक्रांत गोगटेला सर्व समजले. तो हळूच इन्स्पेक्टर कदमकडे गेला व त्यांना सर्व समजावून सांगितले. इन्स्पेक्टर कदम हवालदारांना घेऊन विक्रांत गोगटे मागोमाग आत गेले व त्यांनी सर्वांना पकडले आणि मुरारी दत्ताच्या घरी नेले. पोलीस गाडीचा आवाज ऐकून पार्वती म्हणजेच मुरारीची पत्नी बाहेर आली. गाडीतून विक्रांत गोगटे प्रथम उतरला व पाठोपाठ इन्स्पेक्टर कदम सर्व टोळीला घेऊन उतरले. सर्वजण आत गेले.
पार्वतीला काहीच कळेना, हे कोण? विक्रांत गोगटेने सर्व सांगायला सुरुवात केली, ही मुलगी म्हणजे तुमच्या नवऱ्याचे पहिले प्रेम. पण स्वारीला तुम्ही आवडायला लागलात व ही नावडती झाली. हीने बदला म्हणून आपल्या मित्रांसोबत सलीम व वसीमबरोबर या मुरारीचा खून केला. मुलींची जातच आक्रमक हो. या नतदृष्ट मुलीने तुमच्या नोकराला लाच दिली मदत तिला करायला. तेजस या नावाने वावरत होती बया. पण आम्ही तिला रंगेहाथ पकडले. म्हणतात ना, विक्रांत गोगटे सारखा बुद्धिमान व्हा. आता तिला फाशी होईल. गुन्हेगार कितीही हुशार असो समोर आला विक्रांत रामानंद गोगटे की फसतोच. विक्रांत गोगटेचे डोके व रिकामे खोके यात काय चालू आहे कोणाला समजत नाही. “आता मला मस्त एक कप गरमागरम चहा व या सर्वाना थंडगार लिंबू सरबत द्या की बाई”, विक्रांत गोगटे पार्वतीला म्हणाला. चहा घेऊन विक्रांत पुढच्या केससाठी तपासासाठी रवाना झाला.