Geet Ramayana Varil Vivechan - 24 in Marathi Mythological Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | गीत रामायणा वरील विवेचन - 24 - सावधान राघवा

Featured Books
Categories
Share

गीत रामायणा वरील विवेचन - 24 - सावधान राघवा

श्रीरामाच्या शोधात भरत मोठे सैन्य घेऊन ज्या दिशेने श्रीराम गेले त्याच दिशेने मार्गक्रमण करू लागले. भरताचा सैन्य घेण्याचा एकच उद्देश की जेवढे जास्त लोकं सोबत घेऊ तेवढे जण रामाला शोधण्यास उपयोगी पडतील व श्रीराम लवकरात लवकर दिसेल. रस्त्यात असणाऱ्या वाटसरू मंडळींनी, आश्रमातील ऋषीगणांनी श्रीराम कुठे गेले? कुठल्या दिशेने गेले हे भरतास अचूक सांगितले त्यामुळे भरत कुमार सैन्यासह श्रीराम जिथे पर्णकुटी बांधून राहत होते तेथे त्या दिशेने हळूहळू येऊ लागले.

जसजसे ते सैन्य जवळजवळ येऊ लागले तसतसे त्यांच्या पावलांमुळे धुळीचे लोट उठू लागले. ते बाहेरच उभ्या असलेल्या लक्ष्मणास दिसले. व ते श्रीरामांना म्हणू लागले,
"श्रीरामा जानकी देवींना सुरक्षेच्या दृष्टीने आत पर्णकुटीत पाठवा. आणि आपण धनुष्य बाण घेऊन तयार राहा. बघा दुरून वनात ढगांच्या गर्जनेसमान आवाज येत आहेत. त्या आवाजाने जनावरे पशु तोंडचं भक्ष्य टाकून भयाने सैरावैरा पळत आहेत. ही धूळ बघा नक्कीच कोणीतरी सैन्य ह्याच दिशेला येत आहे. त्यांना आपण असल्याची खूण कळू नये म्हणून जिथे अग्नी पेटवला असेल तो विझवून टाका.",लक्ष्मणाचे हे बोलणे ऐकून श्रीराम सुद्धा कानोसा घेऊ लागतात त्यावर लक्ष्मण श्रीरामांना पुन्हा म्हणतात,

"उत्तरेकडून तो सैन्याचा समुदाय कशासाठी येत असावा काही कळत नाही. ह्या उंच ताल वृक्षावर चढून मी बघतो म्हणजे काही अंदाज येईल. ह्या निर्मनुष्य वनात सैन्य घेऊन येण्याचे कोणाला काय प्रयोजन असावे? आपण आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ओढून सावध तयार राहू. बघू कोण वीर येतोय आपल्याला त्याचे शौर्य दाखवायला!",असे म्हणून लक्ष्मण ताल वृक्षावर चढतात व दूरवर बघून श्रीरामांना सांगू लागतात,

"इथून मला अनेक जण दिसत आहेत. लाखभर तरी सैन्य असावं असं वाटतेय. अनेक हत्ती घोडे मला येताना दिसत आहेत. एक रथ आहे त्यावर एक सारथी व रथात एक महारथी राजा उभा असलेला दिसतो आहे. तो महारथी श्रीरामा तुमच्याप्रमाणेच सावळ्या वर्णाचा असून आपल्याप्रमाणेच दिर्घबाहु आजानुबाहु(लांब हात असलेला) आहे. त्याच्या दिसण्यावरून हा भरत च आहे ह्यात संदेह नाही. भरत तुमच्याशी युद्ध करण्याच्या हेतूने येतो आहे असे स्पष्टपणे दिसते आहे. हा भ्याड भरत काय आपल्याशी युद्ध करणार? येऊ दे माझ्या समोर त्याला! त्याचा कंठ छेदून त्याचा प्राणच घेतो. त्या दुष्ट कैकयी ला बघू दे तिच्या प्रिय पुत्राचा मृतदेह मग दुसऱ्यांच्या वेदना कळतील त्या निर्दयी स्त्रीला.", लक्ष्मण हे बोलत असता सैन्यांचा आवाज जवळ अधिक जवळ येऊ लागतो तो ऐकून लक्ष्मण म्हणतात,

"सैन्य जवळ येतेय. आज माझे युद्धकौशल्य दाखवण्याची संधीच जवळ येतेय असे वाटते. ते लाख जरी असले तरी त्यांच्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे. भरत युद्धात नवा आहे आणि त्याची प्रजाही सत्वहीन आहे. त्यांचा माझ्यापुढे काय निभाव लागणार? आता जो ही पुढे येवो त्याला यमसदनी पाठवल्याशिवाय मी राहणार नाही. रणांगणात पोरके पोर जरी आले तरी त्याला दयामाया दाखवायची नसते. शत्रूला नामोहरम करणे हाच क्षत्रिय धर्म आहे. आणि आज तोच मी निभावणार आहे. येऊ दे कोणीही त्याला नरकात नाही पाठवलं तर बघा!",लक्ष्मणाचा हा अनियंत्रित क्रोध बघून श्रीराम त्यास म्हणतात,

" अरे लक्ष्मणा शांत हो! किती क्रोधीत होतोस? भरत च असेल तर त्याला समीप येऊ तर दे! कशावरून तो युद्धास आला असेल? त्याच्या मनात काय आहे हे आधी कळू तर दे! आधीच गैरसमज करून अविचाराने पाऊल उचलण्यात काही अर्थ नाही."

त्यावर लक्ष्मण श्रीरामांना म्हणतात,
"तुम्ही काही म्हणा श्रीरामा मला माझा क्रोध आवरत नाहीये. सैन्य घेऊन तो येतोय म्हणजेच युद्ध करण्यासाठी च येतोय. त्याला काय वाटते राम एकटा आहे. राम काय फक्त त्रास, अपमान, संकटं सहन करण्यासाठी आहे असे वाटते की काय ह्या लोकांना? आधी रामाचे सिंहासन हिसकावून घेतले मग त्याला वनवासात पाठवले आणि अजूनही ह्या करस्थान्यांची मने शांत झाली नाहीत म्ह्णून हे सैन्य घेऊन इथपर्यंत येतायेत! ते काही नाही ! एकदाच काय तो सोक्षमोक्ष मी लावून टाकणार आहे. ह्या भरतास वधून मी ही पृथ्वी पापमुक्त करणार आहे. मग ह्या भारतखंडात रामराज्य स्थापित होईल व जनतेचे कल्याण होईल. हे धर्मकार्य मी करणारच आहे आणि त्यात मी नक्कीच विजयी होईल ह्याची मला खात्री आहे."

(ह्या गीतातून लक्ष्मणाचा अन्यायाविरुद्ध असलेला पराकोटीचा राग व आपल्या भावाबद्दल म्हणजेच श्रीरामबद्दल असलेला पराकोटीचा प्रेमभाव भक्तिभाव स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे श्रीरामांचा शांत विवेकी स्वभाव ही कळतो व कैकयी च्या पोटी जन्मून भरत किती नीतिमान सद्गुणी, भावावर प्रेम असणारा निपजला हे ही कळून येते.)

श्रीराम लक्ष्मणास शांत होण्यास सांगत राहतात. सैन्य समीप आणखी समीप येत राहते. आता पुढे काय होईल ते पाहू उद्याच्या भागात. श्रीराम जय राम जय जय राम🙏🚩

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
ग.दि.माडगूळकर रचित गीतरामायण मधील चोविसावे गीत:-

आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा
चापबाण घ्या करीं सावधान राघवा!मेघगर्जनेपरी, काननात हो ध्वनी
धावतात श्वापदे, भक्ष्यभाग टाकुनी
कोकतात भेकरे, कंपितांग थांबुनी
धूळ ही नभी उडे, सैन्य येतसे कुणी
खूण ना दिसो कुणा, दीप्त अग्नी शांतवा

उत्तरेस तो थवा, काय तर्क बांधुनी?
पाहतोच काय ते, तालवृक्षि जाउनी
कोण येइ चालुनी, निर्मनुष्य ह्या वनी
सिद्ध राहू द्या तळी, चाप रज्जू ओढुनी
पाहु वीर कोण तो, दावि शौर्य-वैभवा

कैक पायि धावती, हस्ति अश्व दौडती
घर्मस्नात सारथी, आत ते महारथी
कोण श्रेष्ठ एक तो, राहिला उभा रथी
सावळी तुम्हापरी, दीर्घबाहु आकृती
बंधु युद्धकाम का, शोधु येइ बांधवा?

भ्याड भरत काय हा बंधुघात साधतो
येउ दे पुढे जरा, कंठनाल छेदतो
कैकयीस पाहू दे, छिन्न पुत्रदेह तो
घोडदौड वाजते, ये समीप नाद तो
ये पुनश्च आज ही, संधी शस्त्रपाटवा

एक मी उभा इथे, येउ देत लाख ते
लोकपाल तो नवा, स्वत्वहीन लोक ते
क्षम्य ना रणांगणी, पोरकेहि पोर ते
शत्रुनाश क्षत्रिया, धर्मकार्य थोर ते
ये समोर त्यास मी, धाडितोच रौरवा

नावरेच क्रोध हा बोधिल्या अनेकदा
राम काय जन्मला सोसण्यास आपदा
हो‍उ देच मेदिनी पापमुक्त एकदा
भरतखंड भोगु दे रामराज्य संपदा
धर्मरक्षणी क्षणी, मी अजिंक्य वासवा
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★